सत्तर हजार एकरांवर पॉलिहाउसेस, सर्व उत्पादन रसायन अंशमुक्त

कृषिप्रधान स्पेनचा जगात दबदबा आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उत्पादन, पिकांसह अन्नद्रव्ये, माती, पाणी यांचा सूक्ष्म अभ्यास, रासायनिक अवशेषमुक्त शेती पद्धती या वैशिष्ट्यांच्या जोरावर या देशाने आपल्या उत्पादनांचा जागतिक बाजारपेठेत दबदबा तयार केला आहे. भारताला त्याच्याकडून घेण्यासारखे खूप आहे. तिकडची पीक पद्धती, हवामान, माती, भौगोलिकता आदी बाबी भारताशी बऱ्याचअंशी मिळत्याजुळत्या आहेत.
अल्मेरियातील लोला गोमेज फेरॉन यांचे ग्रीनहाउस.
अल्मेरियातील लोला गोमेज फेरॉन यांचे ग्रीनहाउस.

कृषिप्रधान देशांमध्ये स्पेन या युरोपीय देशाचा समावेश होतो. सुमारे सत्तर हजारांहून अधिक पॉलिहाउसेस, रासायनिक अवशेषमुक्त शेती, उत्कृष्ट शेतकरी संघटन, आधुनिक तंत्र, गुणवत्तापूर्ण उत्पादन, पिकांसह अन्नद्रव्ये, माती, पाणी यांचा सूक्ष्म अभ्यास आदी वैशिष्ट्ये जपत या देशाने शेतमाल उत्पादनांत जागतिक बाजारपेठेत दबदबा तयार केला आहे. अलीकडेच झालेल्या स्पेनमधील शेती अभ्यास दौऱ्याचा हा वेचक वृत्तांत. ............................... भाग १ ............................... ‘केल्याने देशाटन’ म्हणजेच जग फिरल्याशिवाय आपण कोठे आहोत, कोठे जायला हवे याचा अंदाज येत नाही हे सत्य आहे. जगातील कृषिप्रधान देशांना भेटी देण्याचा विषय येतो त्या वेळी ईस्राइल, ब्राझील, नेदरलॅंड्स आदींची नावे पटकन डोळ्यांसमोर येतात. त्या पंंक्तीत आणखी एक नाव घ्यावे लागेल ते म्हणजे स्पेनचे. युरोपीय महासंघातील (युरोपीयन युनियन) २८ देशांपैकी तो आहे. युरोपीय देश म्हणजे द्राक्षे, अन्य फळे, भाजीपाला किंवा एकूणच शेतमालांसाठी केवळ निर्यातीच्या बाजारपेठा असाच आपला दृष्टिकोन असतो; पण स्पेनला भेट दिल्यानंतर हा चक्क कृषिप्रधान देश अाहे, यावर विश्वास ठेवणं भाग पडतं. आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उत्पादन, पिकांसह अन्नद्रव्ये, माती, पाणी यांचा सूक्ष्म अभ्यास, रासायनिक अवशेषमुक्त शेती पद्धती या वैशिष्ट्यांच्या जोरावर या देशाने आपल्या उत्पादनांचा जागतिक बाजारपेठेत दबदबा तयार केला आहे. भारताला त्याच्याकडून घेण्यासारखे खूप आहे. तिकडची पीक पद्धती, हवामान, माती, भौगोलिकता आदी बाबी भारताशी बऱ्याचअंशी मिळत्याजुळत्या आहेत. स्पेनमधील ट्रेडकॉर्प ही जैविक कृषी निविष्ठा क्षेत्रातील कंपनी व पुणे येथील धनश्री ॲग्रो इंडस्ट्रीज यांच्या वतीने महाराष्ट्रातील निवडक १७ शेतकऱ्यांचा स्पेनमधील सात दिवसांचा अभ्यासदौरा नुकताच आयोजित करण्यात आला. यात विदर्भ, मराठवाडा, सोलापूर, नाशिक, सातारा, सांगली भागातील प्रगतशील व अभ्यासू शेतकऱ्यांसह ॲग्रोवनचाही समावेश होता. दौऱ्याचा हा वेचक वृत्तांत. कृषिप्रधान स्पेनची वैशिष्ट्ये

  • युरोपीय खंडात दक्षिणेच्या टोकावरील देश. फ्रान्स व पोर्तुगालचा शेजारी.
  • क्षेत्रफळ- पाच लाख ५,९४४ चौरस मीटर
  • लोकसंख्या- चार कोटी ६५ लाख २८, ०२४, पैकी ग्रामीण लोकसंख्या- २३.३२ टक्के
  • शहरी व ग्रामीण मिश्रीत- ३३.६९ टक्के
  • (आकडेवारी- २०१७)
  • चलन- युरो- अमेरिकी डॉलरपेक्षा महागडे. एक युरो म्हणजे सुमारे ८० भारतीय रुपये.
  • देशाची कृषी उत्पादने निर्यात- ४५ हजार ५८३ दशलक्ष युरो
  • देशाची कृषी उत्पादने आयात- ३० हजार ४८१ दशलक्ष युरो
  • पिके- फळे व भाजीपाला पिकांत जागतिक आघाडी.
  • प्रमुख पिके- पॉलिहाउसमधील टोमॅटो, ढोबळी मिरची, झुकिनी, वांगे, काकडी, आॅलिव्ह, द्राक्षे, डाळिंब, संत्रा, लिंबू,
  • अन्य पिके- भात, बटाटा, कांदा, बार्ली, अोट
  • पूरक व्यवसाय- दुग्धोत्पादन, वराह, शेळ्या-मेंढ्या, पोल्ट्री
  • संपन्न शेतीचे वैभव विविध प्रांत व त्यांची स्वतंत्र शासन यंत्रणा अशा स्पेनची रचना आहे. देशाच्या दक्षिणपूर्व भागातील अँदालुसिया, मुर्सिया, व्हॅलेंशिया हे प्रांत समृद्ध, संपन्न शेतीचे वैभव व देशाच्या अर्थकारणाचे शिलेदार आहेत. भूमध्य समुद्राचा (मेडिटेरेनियन) सुंदर किनारा त्यांना लाभला आहे. रस्त्यांच्या दुतर्फा दूरवर पसरलेल्या पांढऱ्या शुभ्र व तपकिरी डोंगररांगा. त्यावर उगवलेली झाडांची कुरणं. अर्ध वाळवंटी भाग. जमिनी हलक्‍या, वालुकामय. डोंगररांगांमधून विस्तीर्ण पसरलेल्या आॅलिव्ह झाडांच्या बागा असे डोळ्यांत साठवून ठेवावे विहंगम दृष्य म्हणजे स्पेनच्या शेतीचे प्रतिबंब आहे. जगातील अद्वितीय मॉडेल- अल्मेरिया एकाच परिसरात ७० ते ७५ हजार एकर किंवा त्याहून अधिक पॉलिहाउसेस. त्यात भाजीपाला. तोही शंभर टक्के रासायनिक अवशेषमुक्त. आश्चर्यचकित झालात ना? दूरवर जिथं नजर संपते तिथंपर्यंत पॉलिहाउसेसवर अंथरलेला जणू अथांग पांढराशुभ्र गालीचा हे दृश्य पाहताना स्तीमित झाल्याशिवाय राहात नाही. जगाच्या पाठीवर हा असा एकमेव प्रदेश आहे ॲंदालुसिया प्रांतातील अल्मेरिया. एवढ्या प्रचंड क्षेत्रावर रेसिड्यू फ्री आणि युरोपीय मार्केटची गरज पुरवणारा दर्जेदार भाजीपाला पिकवायचं हे वाटतं तितकं सोपं नाही. पण आपल्या कुटुंबाचे आणि देशाचे अर्थकारण सक्षम करणारे इथल्या शेतकऱ्यांनी साकारलेले शेतीचे हे अद्वितीय मॉडेल अभ्यासाण्याजोगेच आहे. ग्रीनहाउस संस्कृतीच्या साक्षीदार लोला अल्मेरियातील महिला शेतकरी लोला गोमेज फेरॉन वयाने ज्येष्ठ नागरिक. पण शेतीतील अभ्यास, उत्साह तरुणांनाही लाजवणारा. अल्मेरियातील ग्रीनहाउस संस्कृतीच्या त्या मुख्य साक्षीदार. त्यांची आधुनिक तंत्राने युक्त शेती पाहण्यासाठी दूरवरून शेतकरी, तज्ज्ञ येतात. दौऱ्यात सहभागी शेतकरी अत्यंत अभ्यासू. त्यामुळे लोला यांच्याकडून बारीकसारीक पैलू समजून घेण्यात ते कुठे कमी पडले नाहीत. त्यामुळे संवाद घडताना शास्त्रीय परिसंवादच सुरू आहे असाच अनुभव यायचा. लोला सांगतात

  • सुमारे ३१ हजार हेक्‍टरवर अल्मेरियात ग्रीनहाउसेस. १५ हजारांपर्यंत ग्रीनहाउसधारक शेतकरी
  • प्रत्येकाचे सरासरी क्षेत्र एक, दोन ते पाच हेक्‍टर. त्यात टोमॅटो, रंगीत ढोबळी मिरची, काकडी, वांगी, झुकिनी आदी विविध भाजीपाला.
  • मुख्यत्वे जुलै, ऑगस्टमध्ये लागवड. काढणीचा हंगाम नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत
  • सुमारे ७० टक्के किंवा त्याहून अधिक भाजीपाला अन्य युरोपीय देशांना निर्यात.
  • पूर्वी माझे आजोबा खुल्या शेतात भाजीपाला घ्यायचे. ‘टेबल ग्रेप्स’ही व्हायची. साधारण ५५ वर्षांपूर्वी इथे ‘ग्रीनहाउस कल्चर’ला सुरवात झाली. भूमध्य समुद्र किनारा आम्हाला जवळ. हिवाळ्यातील किमान तापमान ७ ते ८ अंश असायचे. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा त्रास व्हायचा. वर्षातले ८० ते १०० दिवस ६० ते ७० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहायचे. झाडे कोलमडून पडायची; मग संरक्षित शेतीचा पर्याय समोर आला. आता हे कल्चर चांगलेच रुजले आहे.
  • हवामानाची साथ पाऊस १०० ते १५० मिलिमीटर. फार तर २५० मिमीपर्यंतच कृपादृष्टी दाखवतो. लोला सांगतात, पुढील सात ते आठ वर्षांत भूजलातलं पाणी संपून जाईल अशी भीती वाटते. आजूबाजूच्या डोंगरावर पडणारा पाऊस भूगर्भात साठतो. इथं नद्या किंवा तत्सम प्रवाह फार नाहीत. भूजलातलं पाणी वरती चढवून टाक्‍यांत साठवून शेतीसाठी वापरले जाते. युरोप खंडातील वैशिष्ट्यपूर्ण म्हणावा असा आमचा अर्ध वाळवंटी प्रदेश आहे. इथल्या मूळ मातीत सेंद्रिय घटकांचे प्रमाण जवळपास नव्हतेच. बाहेरून माती आणून ती सुपीक बनवली आहे. मातीच्या वरच्या थरात (सुमारे १२ ते १५ सेंमी.) वाळूचा थर पसरला जातो. त्यामुळे पाण्याचा वापर अत्यंत कमी झाला आहे.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com