शेतीला मिळाली पुरक व्यवसायाची जोड

शेतीला मिळाली पुरक व्यवसायाची जोड
शेतीला मिळाली पुरक व्यवसायाची जोड

करंज (ता.जि. जळगाव) येथील सुनील पाटील यांनी जमिनीची सुपीकता टिकवण्याच्या उद्देशाने रासायनिक खतांचा वापर कमी केला असून, शेणखत व गोमूत्र यांचे प्रमाण वाढवले आहे. दुग्ध व्यवसाय आणि देशी कोंबड्यांचे पालन हा पुरक व्यवसायातून आपले अर्थकारण नफ्यात आणले आहे. जळगाव जिल्ह्यातील करंज हे तापी नदीच्या काठी वसलेले साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव. काळी कसदार जमीन आणि पाण्याची मुबलकता यामुळे केळी व भाजीपाल्याची शेती प्रमुख आहे. येथील सुनील मधूकर पाटील यांच्याकडे आठ एकर शेती आहे. त्यांचे केळी प्रमुख तर कापूस दुसरे पीक आहे. कूपनलिका असून, सिंचनासाठी ठिबकचा १०० टक्के वापर ते करतात. शेतीला जोड म्हणून एचएफ गायींचे पालन, देशी कोंबड्यांचे पालन करतात. या दोन्ही व्यवसायातून आर्थिक उत्पन्नासोबतच शेतीसाठी गोमूत्र, शेणखत आणि कोंबडखत मिळते. तो बोनस ठरतो. जमिनीची सुपीकता टिकवण्याच्या उद्देशाने गेल्या सात वर्षापासून रासायनिक खतांचा वापर कमी केला असून, शेणखत व गोमुत्राचा वापर त्यांनी वाढवला आहे. केळी लागवड ः कांदेबाग केळीची दरवर्षी ते लागवड करतात. थोडी उशिरा म्हणजेच कापसाचे पीक घेतल्यानंतर जानेवारीच्या अखेरिस लागवड केली जाते. केळीची दरवर्षी पाच हजार झाडांची लागवड असते. लागवडीपूर्वी घरी उपलब्ध असलेले शेणखत शेतात टाकून नांगरणी करतात. शेत भुसभुशीत केल्यानंतर त्यात केळी कंदाची लागवड करतात. त्यासाठी रावेर किंवा गिरणा काठावरील भडगाव, पाचोरा तालुक्‍यातून उतिसंवर्धित रोप लागवडीच्या बागेतून केळी कंद आणतात. प्रतिकंद चार रुपये खर्च येतो. पूर्वी ते कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे खते देत. मात्र, चार वर्षापासून त्यात कपात करत त्यांनी शेतीमध्ये गोमूत्राचा वापर वाढवला आहे. केळी लागवडीनंतर १५ दिवसांनी व्हेंचूरीद्वारे गोमूत्र देतात. त्यानंतर दर २१ दिवसांनी घडांची कापणी सुरू होईपर्यंत ३०० लिटर गोमूत्र प्रतिपाच हजार झाडे या प्रमाणात दिले जाते. रासायनिक खतांचा वापर कमी केल्याने केळीचा एकरी उत्पादन खर्च केवळ १५ हजार रुपयांपर्यंत कमी झाला आहे.

  • कापूस किंवा कडधान्य घेतलेल्या शेतामध्ये जानेवारीत केळी लागवड केली जाते. पिकाचे अवशेष कधीही जाळले जात नाहीत.
  • दोन लहान गांडूळ खत युनिट आहेत. त्यातील गांडुळखत केळीसाठी वापरले जाते.
  • ज्या क्षेत्रात केळीचे पीक घेतलेले असते, त्यात नंतर मे महिन्यात पूर्वहंगामी कापसाची ठिबकवर लागवड केली जाते.
  • केळीची २४ किलो प्रतिघड, अशी रास मिळते. एकरी सुमारे २५० क्विंटल उत्पादन हाती येते. केळी दर्जेदार असून, तिची कापणी हिवाळ्याच्या सुरवातीला सुरू होते. या काळात रावेर, यावलमध्ये दर्जेदार केळीची उपलब्धता फारशी नसते. परिणामी, त्याला साधारण एक हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळतो, असे सुनील यांनी सांगितले. थेट शेतातून व्यापाऱ्यांना केळी विक्री केली जाते.
  • कापसाचे एकरी किमान १२ क्विंटल उत्पादन ते कमी खर्चात घेतात.
  • पशुपालन ः

  • १२ वर्षांपूर्वी चाळीसगाव (जि. जळगाव) येथील बाजारातून सुनील यांनी एक गाय आणली होती. तिचे चांगले संगोपन केले आणि गायींची संख्या वाढत गेली. चार वर्षांपासून त्यांच्याकडे नऊ गायी आहेत. गायींसाठी सुसज्ज, असा गोठा असून, त्यात पंखे, पाण्याची उत्तम सोय आहे. प्रति गाय ८ ते १४ लिटर दूध मिळते. ते गावातच सहकारी सोसायटीला दिले जाते. कृशकाळात दुधाला २१ ते २४ रुपये दर मिळाला असला तरी अलीकडे दर कमी झाले आहेत. यामुळे दुधापासून प्रक्रिया पदार्थ तयार करण्याचे नियोजन करत आहेत. या गोठ्यानजीकच दूध व उपपदार्थ विक्री केंद्र, रसवंती तयार करण्याचे नियोजन आहे. या रसवंतीसाठी यंदा पाऊण एकर ऊस लागवड केली आहे. सेंद्रिय पद्धतीने उसाचे व्यवस्थापन करत असून, पुढील वर्षी रसवंतीला तो उपलब्ध होईल. त्यांच्या गायींचा गोठा जळगाव - भोकर या मुख्य मार्गावर असून, येथे दूध विक्री केंद्र व रसवंती फायद्याचे ठरेल, असा सुनील यांना विश्वास वाटतो.
  • शेतीच्या नियोजनामध्ये वडील मधुकर पाटील यांची मदत आणि मार्गदर्शन असते.
  • शेतीकामासाठी एक सालगडीही असून, त्यासाठी ६० हजार रुपये प्रतिवर्ष असा खर्च होतो.
  • ३० ते ३५ ट्रॉली शेणखत गायींपासून मिळते.
  • गोमूत्र संकलनासाठी गोठ्याबाहेर एक चेंबर तयार केले आहे. ३०० लिटर क्षमता त्याची आहे.
  • गोठ्यातील सांडपाणी उघड्यावर जाऊ नये यासाठी गोठ्याजवळ १२ बाय १२ फूट आणि २५ फूट खोल असा एक शोषखड्डा केला आहे. त्यात सांडपाणी व पावसाचे पाणी जाते.
  • देशी कोंबड्यांचे पालन ः देशी कोंबड्यांच्या घरगुती संगोपनाचा अनुभव सुनील यांच्या कुटुंबीयांना आहे. त्यांच्याकडे कायम ४० ते ५० कोंबड्या असत. अंडी, मांसल पक्ष्यांची विक्री अशा दोन्हींतून उत्पन्न मिळे. यातूनच देशी सातपुडा कोंबडी संगोपनाचा व्यवसाय सुरू झाला. सध्या २०० कोंबड्यांप्रमाणे दोन लॉट घेतले जाते. त्यासाठी गायींच्या गोठ्यानजीकच ५०० पक्षी क्षमतेचे १० फूट रुंद व ५० फूट लांब असे आठ फूट उंचीचे शेड उभारले आहे. २१ रुपये प्रतिनग या प्रमाणे एक दिवसाची पिल्ले आणतात. त्याचे अडीच ते तीन महिने संगोपन केल्यानंतर विक्री केली जाते. आजूबाजूच्या २५ ते ३० गावांमधील मंडळी खरेदीसाठी येथे येतात. त्यातून सुमारे २५० रुपये प्रतिनग असा दर मिळतो. खर्च वजा जाता १८ ते २२ हजार रुपये मिळतात. कोंबडी खत शेतीसाठी उपलब्ध होते. संपर्क ः सुनील पाटील, ९६३७०७८४०४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com