थोड्या क्षेत्रातील भाजीपाला ठरला यशस्वी

उत्पादित मालाची विक्री पुणे, मुंबई येथील सेंद्रीय शेतमाल विक्री करणाऱ्या केंद्रांना केली जाते. त्यांना वर्षभर विक्रीसाठी लागणारा भाजीपाला पुरवण्याची जबाबदारी पेलली जाते. हमीदराने हा भाजीपाला दिला जातो.
वप्निल दोंड पॉली मल्चिंगवर टोमॅटो, भेंडी, वांगे अादींची लागवड करतात.
वप्निल दोंड पॉली मल्चिंगवर टोमॅटो, भेंडी, वांगे अादींची लागवड करतात.

राहाता तालुक्यातील (जि. नगर) रांजणखोल हा उसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. याच गावातील कृषी पदवीधर तरुण स्वप्निल दोंड कमी क्षेत्रात विविध फळभाज्या व पालेभाज्या यांची शेती करीत आहे. रासायनिक अवशेषमुक्त शेतीवर त्यांनी अधिक भर दिला आहे; तसेच विक्री व्यवस्थाही मजबूत केली आहे. नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यापासून सुमारे चार किलोमीटरवर; तर राहाता तालुक्यापासून जवळपास वीस किलोमीटरवर रांजणखोल (ता. राहाता) हे छोटेसे गाव आहे. गावची लोकसंख्या साधारणपणे पाच हजारांपर्यंत आहे. उसाचे आगार म्हणून हे गाव ओळखले जाते. त्यामुळे येथील महाराष्ट्र शुगर मिल्स (टिळकनगर इंडस्ट्रीज) पूर्वी प्रसिद्ध होती; परंतु काही कारणाने ती बंद पडली. दोंड यांची शेती रांजणखोल गावाच्या परिसरात भंडारदरा कॅनाॅलचे पाणी आल्याने शेती बारमही बागायती झाली आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकरी ऊस, कांदा, सोयाबीन अशी मुख्य पिके घेतात. अलीकडील काळात सुशिक्षित तरुण पिढी शेतीत उतरल्याने नवनवीन प्रयोगांना चालना मिळाली आहे. याच गावातील रमेश दोंड यांची प्रगतशील शेतकरी अशी अोळख आहे. त्यांना दोन मुले आहेत. पैकी सर्वात मोठे आणि कृषी पदवीचे शिक्षण घेतलेले स्वप्निल पूर्णवेळ शेती करतात. धाकटे एमबीएचे शिक्षण घेतलेले किरण पुण्यात नोकरी करतात. दोंड यांची वडिलोपार्जित बारा एकर शेती आहे. शिक्षण झाल्यानंतर स्वप्निल गावात असलेल्या टिळकनगर इंडस्ट्रीजमध्ये नोकरी करीत होते; परंतु फेब्रुवारी २०१७ मध्ये काही कारणामुळे त्यांनी नोकरी सोडली. अर्थात नोकरी सुरू असताना शेतीची आवड असल्याने वेळ मिळेल तेव्हा ते शेतीत लक्ष देऊन ती अधिक चांगल्या प्रकारे करण्याचाही प्रयत्न करीत होते. सध्या बारा एकरांपैकी दोन एकरांत ऊस आहे; तर डाळिंब चार एकर, रेशीम उद्योगासाठी लागणारी तुती एक एकर उपलब्ध आहे. उर्वरित शेतात पालेभाज्या, फळभाज्या व चारा पिके अशी शेतीची रचना आहे. कृषी शाखेचे शिक्षण घेतल्यामुळे सेंद्रीय शेतीतील ज्ञान स्वप्निल यांनी घेतले होते. नोकरी करीत असतानाच २०१५ पासूनच त्यांनी रासायनिक अवशेषमुक्त अन्ननिर्मितीकडे वाटचाल सुरू केली होती. सुरवातीला घराजवळ असलेल्या शेतातील दीड एकरात भाजीपाला व त्यातही फळभाज्या पिकवण्यास सुरवात केली. लागवडीचे नियोजन लागवडीसाठी सुरवातीला बेडपद्धती अवलंबविण्यास सुरवात केली. त्यासाठी बेडमध्ये गांडूळ खत, शेणखत यांचा वापर केला. पाणी देण्यासाठी ठिबकचा अवलंब केला. भाज्यांच्या प्रकारानुसार साधारण बेडचे अंतर ठेवले. सर्वात उंचावर मुख्य पिकाची लागवड; तर टप्प्याटप्प्याने कमी उंचीची व कमी कालावधीच्या पिकांची लागवड केली. त्यामुळे एकाच बेडवर चार ते पाच प्रकारच्या भाज्या लावण्यात आल्या. जेणेकरून काढणी करताना अडचणी येणार नाही. दीड एकरात प्रत्येकी दहा गुंठ्याचे टप्पे केले जातात. यात भाजीपाला पिकांचे उत्पादन वर्षभर घेता येईल असे नियोजन केले आहे. सध्या विविध फळभाज्या व पालेभाज्या घेतल्या जात आहेत. ठिबकद्वारेच पाण्यातून जीवामृत दिले जाते. काढणी व विक्रीचे नियोजन दहा गुंठ्यांत लागवड केलेल्या भाजीपाला पिकांची आठवड्यातून तीन ते चार वेळा काढणी केली जाते. त्यामुळे उत्पादनात सातत्य राहून ग्राहकांना वेळेवर भाजीपाला पुरवठा केला जातो. उत्पादनात सातत्य ठेवले जाते. उत्पादित मालाची विक्री पुणे, मुंबई येथील सेंद्रीय शेतमाल विक्री करणाऱ्या केंद्रांना केली जाते. त्यांना वर्षभर विक्रीसाठी लागणारा भाजीपाला पुरवण्याची जबाबदारी पेलली जाते. हमीदराने हा भाजीपाला दिला जातो. त्यामुळे बाजारपेठेत ज्यावेळी कमी दर असतात त्यावेळीही चांगला दर मिळतो. मात्र बाजारपेठेतील दर जास्त झाल्यास काही वेळा तोटाही सहन करवा लागतो. कोबी, टोमॅटो, प्लाॅवर, भेंडी, दोडके, घोसाळे, भोपळा, गाजर, बीट, काकडी, गवार, मिरची, वांगी, कारले, शेवगा आदींची विक्री केली जाते. थेट विक्रीही साधली याशिवाय श्रीरामपूर येथे विक्री करत असलेल्या दुधासोबतही ग्राहकांना भाजीपाला पुरवठा केला जातो. त्यातून चांगला दर मिळण्यास मदत होते. आगामी काळात दुधासोबत भाजीपाल्याची रतीब म्हणून मोठ्या प्रमाणात विक्री करण्याचा मानस बोलून दाखविला. मुंबईत विक्री करताना वाहतुकीचा खर्च विक्रेते करतात; तसेच अडत, हमाली अशी कोणतीही कपात न करता विक्री होत असल्याने नफ्याचे मार्जीनन वाढण्यास मदत होते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्त्व समजावून देण्याच्या उद्देशाने विविध प्रशिक्षण घेतले जाते; तसेच दहा गुंठ्यांमध्ये विविध भाजीपाला व विक्री व्यवस्था, देशी गायीवर आधारित दुग्धव्यवसाय या विषयांवर प्रशिक्षणातून मार्गदर्शन दिले जाते. त्याचा सुमारे वीस ते पंचवीस शेतकऱ्यांनी फायदा घेतला असल्याचे स्वप्निल यांनी सांगितले. याशिवाय गोमूत्र अर्क, साबण बनविणे, धूपकांडी, गोवऱ्या बनविणे व विक्री व्यवस्था अशी विविध माहिती देखील दिली जाते. जेणेकरून शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळून भविष्यात लागणारा रासायनिक अवशेषमुक्त माल उत्पादित करू शकतील. उसात भाजीपाला पिकांचे उत्पादन गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात दोन एकरांवर उसाची लागवड केली होती. त्यात आंतरपीक म्हणून बन्सी व खपली वाणाचा गहू, हरभरा यासह बारा भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले होते. यामध्ये कोबी, फ्लॉवर, वांगे, टोमँटो, मिरची, पालक, मेथी, चवळी, कांदा अशा पिकांचा समावेश होता. त्यातून मिळलेल्या सर्व उत्पादनांची विक्री मुंबईत केली. संपर्क- स्वप्नील दोंड-९३२६६४१८४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com