निर्यातक्षम डाळिंब उत्पादनाचा घेतला ध्यास

निर्यातक्षम डाळिंबाला उच्चांकी दर साधारण तीन वर्षांपूर्वी साडेचार एकरांत २२ टन, तर मागील वर्षी २७ टन उत्पादन मिळाले. यंदा तर निर्यातक्षम पद्धतीचे व्यवस्थापन राहिल्याने बारामती भागातील एका कंपनीने कृष्णा यांच्याकडून डाळिंबांची खरेदी केली. ती युरोपला निर्यात होत आहेत. आत्तापर्यंत साडेचार एकरांतून सुमारे २७ टन माल निघाला. त्यातील साडे १२ टन माल संबंधित कंपनीला दिला. कंपनीने किलोला १४१ रुपये इतका उच्चांकी दर दिल्याचे कृष्णा यांनी सांगितले.
कृष्णा चौगुले यांची निर्यातक्षम डाळिंबाची बाग
कृष्णा चौगुले यांची निर्यातक्षम डाळिंबाची बाग

 सेंद्रिय घटकांच्या वापरावर पुरेपूर भर देत, तेलकट डाग रोगावर नियंत्रण ठेवत सोलापूर जिल्ह्यातील तपकिरी शेटफळ येथील कृष्णा चौगुले यांनी निर्यातक्षम डाळिंब पिकवण्याची किमया साधली आहे. यंदा आपल्या डाळिंबाला किलोला १४१ रुपये असा उच्चांकी दर मिळवण्यातही ते यशस्वी झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात केळी, द्राक्ष या फळपिकांच्या तुलनेत डाळिंबाचे क्षेत्र महत्त्वाचे आहे. भागातील अनेक शेतकरी नैसर्गिक आपत्ती, तेलकट डाग रोग आदी समस्यांशी लढत निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेत आहेत. जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्‍यातील तपकिरी शेटफळ गावचे कृष्णा चौगुले या तरुणाला डाळिंब शेतीचा सन २००८ पासून अनुभव आहे. एकात्मिक पद्धतीने व त्यातही सेंद्रिय शेतीवर अधिक भर देत त्यांनी ही बाग निर्यातक्षम बनवण्यास सुरवात केली आहे. यंदा त्यात त्यांना चांगले यश आले आहे. कृष्णा यांची शेती पंढरपूर तालुक्‍यातील काही मोजकी गावे माण नदीकाठी येतात. त्यातील तपकिरी शेटफळ हे गाव. येथील बहुतांश शेती आजही कोरडवाहू आहे. काही मोजक्‍या शेतकऱ्यांकडे ऊस, डाळिंब व भाजी पाल्याची पिके आहेत. यामध्ये कृष्णा यांनी मोठ्या धाडसाने पीक पद्धतीत बदल करून भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड केली. त्यांची एकूण सात एकर शेती आहे. त्यातील वडिलोपार्जित फक्त तीन एकर कोरडवाहू शेती होती. नदीकाठी शेती असूनही येथे पाण्याचे नेहमीच दुर्भीक्ष असते. पाणीटंचाईच्या काळातदेखील कृष्णाचे वडील दगडू यांनी पावसाच्या पाण्यावर कापूस, तूर, मटकी अशी विविध पिके घेतली. परंतु उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने शेती तोट्यात जात होती. रासायनिक खते, मजुरी, बियाणे आणि मशागतीचा खर्च वाढला होता. बदलाच्या मनोवृत्तीतून शेती सुधारली अशा परिस्थितीमध्ये कृष्णा यांनी पारंपरिक शेती व पीक पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २००८ साली एक एकरांत भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड केली. फळबागेचा अनुभव कमी असल्यामुळे दोन वर्षे जेमतेम उत्पादन मिळाले. तरीही हार न मानता मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने व्यवस्थापन सुधारण्यावर भर देत उत्पादन घेणे सुरू ठेवले. काही अनुभवी डाळिंब उत्पादकांकडून मार्गदर्शन घेतले. कृष्णा यांच्या बाग व्यवस्थापनातील बाबी १) तेलकट डाग रोगावर नियंत्रण बागेच्या स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे. पावसाळ्याच्या तीन महिने काळात बागेचे सूक्ष्म निरीक्षण. रोगट पाने, फांद्या काढून त्यांची योग्य विल्हेवाट लावली जाते. शिवाय सेंद्रिय खतांचा अधिक वापर केल्यामुळे बाग सशक्त व रोगप्रतिकारक झाली आहे. २) सेंद्रिय खतांचा अधिक वापर कमी खर्चात आणि कमी क्षेत्रात अधिक उत्पादन व उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने कृष्णा यांची सुरवातीपासूनच धडपड राहिली. सेंद्रिय खतांमध्ये लेंडीखताच्या वापरावर अधिक भर दिला आहे. चार वर्षांपासून माडग्याळ जातीच्या ११ मेंढ्या व १० शेळ्यांचे पालन सुरू केले आहे. या खताच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारला आहे. रासायानिक खतांचा व कीडनाशकांचा वापर कमी केल्यामुळे खर्चात किमान ५० टक्के बचत करणे शक्य झाले आहे. पालापाचोळा किंवा पिकांचे अवशेष यांचा वापर केला जातो. साधारण ५० टक्के सेंद्रिय खत घरचे व ५० टक्के बाहेरून आणून वापरले जाते. अन्य बाबी

  • डाळिंबाच्या साडेचार एकरांत ड्रिप
  • जीवामृत शेतावरच बनवले जाते. दर १५ दिवसांच्या अंतराने त्याचा वापर
  • दोन म्हशी. त्यांच्या शेणाचा व बाहेरून विकत गोमूत्राचाही वापर
  • यंदाच्या वर्षी फळांना सनबर्निंग होऊन क्वालिटी खराब होऊ नये म्हणून पॉलिथिन आच्छादनाचा वापर केला. साडेचार एकरांत साधारण ९० हजार रुपये खर्च आला.
  • निर्यातक्षम फळाला १४१ रुपये दर साधारण तीन वर्षांपूर्वी साडेचार एकरांत २२ टन, तर मागील वर्षी २७ टन उत्पादन मिळाले. यंदा तर निर्यातक्षम पद्धतीचे व्यवस्थापन राहिल्याने बारामती भागातील एका कंपनीने कृष्णा यांच्याकडून डाळिंबांची खरेदी केली. ती युरोपला निर्यात होत आहेत. आत्तापर्यंत साडेचार एकरांतून सुमारे २७ टन माल निघाला. त्यातील साडे १२ टन माल संबंधित कंपनीला दिला. कंपनीने किलोला १४१ रुपये इतका उच्चांकी दर दिल्याचे कृष्णा यांनी सांगितले. तर लोकल बाजारपेठेत ६० ते ६५ रुपये दराने उर्वरित मालाची विक्री झाली आहे. अजून प्लॉट सुरू असून, अजून १७ ते १८ टन माल हाती लागेल अशी अपेक्षा कृष्णा यांना आहे. या वर्षी पहिल्यांदाच निर्यातीसाठी माल गेल्याने कष्टाला यश मिळाल्याचा आनंद त्यांना झाला आहे. वडिलांच्या कष्टाला यश वडील दगडू यांनी यापूर्वी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पंक्‍चर काढणे, हॉटेल चालवणे, पिठाची गिरणी चालवणे यासारखे लहान व्यवसाय गावातच केले. ते सांभाळत त्यांनी शेतीही केली. पुढे मुलांनी शेतीला आधुनिकतेची जोड देत बाजारपेठेचे ज्ञान आत्मसात केले. त्यातून शेतीत प्रगतिपथावर राहणे त्यांना शक्य होत आहे. सेवाभावी वृत्तीचे कृष्णा कृष्णा यांना शेतीबरोबरच समाजकारण आणि राजकारणाचीही आवड आहे. स्वतः बरोबरच गावाचाही विकास व्हावा असा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन असतो. त्यामुळे दरवर्षी सामाजिक हेतूने शेती उत्पन्नातील काही रक्कम ते समाजासाठी खर्च करतात. गावातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेच्या इमारत बांधकामासाठी ११ हजार रुपयांची देणगी त्यांनी दिली. तसेच दुष्काळी काळात प्राथमिक शाळेसाठी स्वखर्चातून बोअर घेत पाण्याची सोय उपलब्ध करुन दिली. सेवाभावी वृत्ती जपलेले कृष्णा म्हणूनच अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणूनही जबाबदारी पार पाडताहेत. कृष्णा चौगुले - ९९२२९७९६२८  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com