स्वकर्तृत्वातून प्रगती साधलेले तारगाव

गावातील ज्येष्ठांपासून तरुणांपर्यंत तसेच महिलाही गावाच्या विकासासाठी सातत्याने धडपडतात. गावात सर्वत्र बंदिस्त गटारे तसेच नदी काठांवरील वीजपंपाना सोलर युनिट, नदीकाठावर संरक्षक भित बांधण्याचा मनोदय आहे. गावाच्या विकासात आमदार बाळासाहेब पाटील, माजी उपसभापती कांतीलाल पाटील, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांचे सहकार्य मिळाले अाहे. गावच्या विकासात ग्रामविकास अधिकारी मोहन आढाव यांचाही मोठा वाटा आहे. - सुनील मलवडकर, सरपंच
गावाला शुध्द पाणीपुरवठा करणारी योजना सुरू करण्यात आहे.
गावाला शुध्द पाणीपुरवठा करणारी योजना सुरू करण्यात आहे.

सातारा जिल्ह्यात अनेक गावे श्रमदान, गावातील एकी व लोकसहभागातून स्वकर्तृत्वान झाली आहेत. कोरेगाव तालुक्यातील तारगाव हे त्यातीलच एक आदर्श गाव. प्रत्येकाच्या घरात शुद्ध पाणी, अंगणवाड्या, प्राथमिक शाळेसह ग्रामपंचायतीस आयएसओ मानांकन, ठिबक योजना, शौचालये आदी विविध कामांच्या माध्यमातून गावाने कार्याचा व प्रगतीचा ठसा उमटवला आहे. वेगवेगळ्या स्तरांवरील तब्बल १९ पुरस्कार मिळवित गावाने यशाची पताका कायम उंचावर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील तारगाव हे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले सुमारे पाच हजारांवर लोकसंख्या असलेले गाव. बहुतांश जमीन काळी जमीन असून कृष्णाकाठ असल्याने मोठ्या प्रमाणात बागायती शेती केली जाते. ऊस, आले, सोयाबीन, घेवडा अशी पिके येथील गावकरी घेतात. या गावास रेल्वेस्थानकही आहे. विकासाची पहिली पायरी साधारण २००५ पर्यंत गावात तसे एकीचे वातावरण नव्हते. साहजिकच अपेक्षित विकास होऊ शकला नव्हता. बागायत शेती असल्यामुळे अनेकजणांची आर्थिक परिस्थिती बरी होती. पण काळानुसार आपल्यात बदल घडला पाहिजे, नवे तंत्रज्ञान, नव्या योजना गावात खेळल्या पाहिजेत, असे ग्रामस्थांना वाटू लागले. गावची नवी ओळख त्यातून निर्माण होणार होती. त्याचेच पहिले पाऊल म्हणून २००५ मध्ये गावात ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. हीच गावाच्या विकासाची पहिली पायरी ठरली. निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे होणारे तंटे थांबले. ग्रामस्थांकडून विकासात्मक कामांवर भर देण्यास सुरवात झाली. ‘निर्मलग्राम’ होण्याकडे वाटचाल तारगावच्या ग्रामस्थांनी एकीतून निर्मलग्राम अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने आराखडा बनवत कामांना प्रारंभ केला. सरपंच, सर्व सदस्य तसेच ग्रामसेवक यांनी पुढाकार घेत प्रथम लहान असलेले रस्ते मोकळे केले. यासाठी सह्याद्री साखर कारखान्याकडून कामासाठी मोफत जेसीबी यंत्र देण्यात आले. लोकवर्गणी काढून यंत्राच्या इंधनासाठी पैसे उभारण्यात आले. बंद पडलेले सर्व रस्ते वाहतुकीस सुरू झाले. भरीव कामांचे फळ मिळाले नाममात्र लोकांकडे शौचालये होती. निर्मलग्राम करण्यासाठी शौचालय बांधण्यासाठी तसेच त्याचा वापर करण्यासाठी जनजागृती सुरू झाली. या उपक्रमास लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. यातून गावातील ९८ टक्के कुटुंबानी वैयक्तिक शौचालये बांधली. उर्वरित दोन टक्के कुटुंबे सार्वजनिक शौचालयाचा वापर करू लागले. सर्वांच्या भरीव कामातून सन २००९ मध्ये गावास निर्मलग्राम पुरस्कार मिळाला. यातून नवी दिशा मिळाली. लोकसहभाग आणि श्रमदानातून गावचा विकास घडू लागला. स्वातंत्र्यकाळापासून सुरू असलेले तंटे मिटवण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त अभियान यशस्वीपणे राबवत चार लाखांचे बक्षीसही गावाने पटकावले. राष्ट्रीय आरोग्य गाव आरोग्य अभियानांतर्गत सर्वाेत्कृष्ट आरोग्य गाव तर २००९-१० मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवून तालुकास्तरीय प्रथम पुरस्कारही प्राप्त केला. या पुरस्कारामुळे ग्रामस्थांचा उत्साह वाढू लागला. दरम्यान, गावातील कांतीलाल पाटील यांची कोरेगाव पंचायत समितीच्या उपसभापती निवड झाली. यामुळे विकासाला अधिक गती मिळाली. त्या निधीतून रस्त्यांची कामेही वेगाने सुरू झाली. राज्यात ग्रामविकासाची मॉडेल ठरलेल्या राळेगणसिद्ध, हिवरेबाजार आदी गावांना तारगावच्या ग्रामस्थांनी भेटी दिल्या. त्यातून आपल्या गावासाठी काय करता येईल याचा अभ्यास केला. 

लोकवर्गणीस मोठा प्रतिसाद तारगाव ग्रामस्थांकडून लोकवर्गणीसाठी कायम प्रतिसाद मिळत असतो. लोकवर्गणीतून शाळेसाठी चार खोल्या, दोन वस्तीवर जिजामाता लघू नळपाणीपुरवठा योजना सुरू झाल्या. राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी भरावी लागणारी दहा टक्के रक्कम म्हणजे १९ लाख रुपये लोकवर्गणीतून गोळा झाली. दोन कोटी रुपये जमा करत गावातील तब्बल चार मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला. पिण्याचे शुद्ध पाणी गावातील प्रत्येक ग्रामस्थाला शुद्ध पाणी मिळावे, यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनतून २४ बाय सात ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. सन २०१० मध्ये कामास प्रारंभ झाला. सन २०१४ मध्ये ही योजना लोकार्पण झाली. आता प्रत्येक वाॅर्डमध्ये चार तास शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे. या योजनेसाठी वर्षाकाठी ८० हजार रुपयांचे वीजबिल यायचे. या पंपांना सोलर युनिट बसविले आहे. यामुळे बिलात बचत झाली आहे. तारगावाची वैशिष्ट्ये

  • गेल्या दहा वर्षांपासून गावात शंभर टक्के वसुली
  • विकास सेवा सोसायटी तसेच अन्य सर्व सहकारी संस्थाची निवडणूक बिनविरोध होते.
  • मुलांना दर्जात्मक शिक्षण मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न. यातून गावातील सर्व शाळा ‘डिजिटल’ करण्यात आल्या अाहेत. यातील दोन अंगणवाड्या व दोन प्राथमिक शाळांना आयएसओ मानांकन
  • मुबलक पाणी असतानाही गावातील ७० टक्के पिकांना ठिबक सिंचनाचा वापर
  • ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय संगणकीकृत. गेल्या दहा वर्षांपासून सर्व प्रकारचे उतारे संगणकीय
  •  डासांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी फॅागिंग यंत्राचा वापर
  •  गावात डॅाल्बीमुक्त तसेच गुलालविरहित मिरवणुका काढल्या जातात. बाहेरील कलाकारांवर व साधनांवर खर्च न करता गावातील मुलेच आपली कला कार्यक्रमांमधून सादर करतात.
  •  गावातील नेहरू युवा मंडळाकडून गणेश उत्सवात रक्तदान शिबिरे.
  •  वेगवेगळ्या मुख्य चौकांत नऊ सीसीटीव्ही कॅमेरे. यामुळे व्यवसाय तसेच ग्रामस्थांना सुरक्षा.
  •  महालक्ष्मी मंदीर तसेच अन्य तीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी दोन कोटीचा निधी लोकवर्गणीतून जमा
  •  जिल्ह्यात प्रसिद्ध गावातील बोरबन येथील विठ्ठल मंदीर व गणेश मंदिराचे सुशोभीकरण. या मंदिरास क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त
  •  गावातील सर्व व्यवहार पारदर्शक. गावातील कामांचे टेंडर सर्वांना विश्वासात घेऊन ठेकेदारांना दिले जातात.
  •  गायरान जमिनीत दरवर्षी वृक्षारोपण
  •  गावाचा इतिहास पुढच्या पिढीस माहिती व्हावा, यासाठी अमृतपर्व ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. त्यात गावाविषयी स्वांतत्र्यपूर्व काळापासूनची माहिती उपलब्ध.
  •  माध्यमिक विद्यालयात शेतकरी हायस्कूल नावाने विद्यालय.
  •  शासकीय विविध योजना तसेच उपक्रमांची माहिती प्रोजेक्टरद्वारे ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध विविध १९ पुरस्कारांनी सन्मान
  • निर्मल पुरस्कार, तंटामुक्त गाव अभियान, सर्वोत्कृष्ट आरोग्य गाव, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी, कै. वसंतराव नाईक पाणी व सांडपाणी, प्रेमलकाकी चव्हाण स्मृती, आदर्श सरपंच, आदर्श ग्रामसेवक, दलित वस्ती सुधार अभियान, पर्यावरण विकासरत्न, यशवंत पंचायतराज अभियान, गौरव ग्रामसभा, राष्ट्रीय गौरव ग्रामसभा, यशवंतराव चव्हाण गौरव ग्रामसभा, आदर्श सरपंच, आयएसओ अंगणवा़डी, आयएसओ प्राथमिक शाळा व तसेच आयएसओ ग्रामपंचायत आदी विविध १९ पुरस्कार गावाला मिळाले आहेत.
  • गावात प्रत्येक योजनेत ग्रामस्थाचे मोठे योगदान अाहे. विविध योजना राबविण्यासाठी तारगावच्या ग्रामस्थांचा सहभाग मिळाल्याने यश मिळवता आले. गावचे सर्व कामकाज गेल्या दहा वर्षांपासून संगणकाच्या आधारे सुरू आहे. -  मोहन आढाव, ग्रामविकास अधिकारी --------------------------------------------------------------------- संपर्क : सरपंच सुनील मलवडकर ९७६६९२७१७२,            मोहन आढाव- ८९७५१६१७१९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com