जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
अॅग्रो विशेष
स्मार्टग्राम, स्वच्छता अभियान, तंटामुक्त पुरस्कारावर मोहोर
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राम, स्मार्टग्राम आणि तंटामुक्त गाव यासारख्या शासनाच्या विविध स्पर्धांमध्ये गावाने सहभाग घेतला. या प्रत्येक स्पर्धेत यश मिळवलेच. ‘स्मार्टग्राम’ स्पर्धेत जिल्हा स्तरावरील दहा लाख रुपयांचा पहिला क्रमांकही पटकावत आणखी एक मानाचा तुरा खोवला.
रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा पुरवताना निर्मलग्राम, तंटामुक्त गाव आणि स्मार्टग्रामसारख्या सर्वच स्पर्धांतील बक्षिसांवर तावशी (जि. सोलापूर) गावाने यशाची मोहोर उमटवली आहे. "आयएसओ' मानांकन मिळवत मोफत पिठाची गिरणी, गावची ‘वेबसाईट’, मोबाईल ॲप, कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रिक प्रणाली, प्लॅस्टिक बंदी ठरावासह कापडी पिशव्या वापरण्याबाबत प्रबोधन आदी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत तावशी गावाने सर्वच कामांत-उपक्रमांत चांगलीच आघाडी घेतली आहे.
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर एकलासपूर गावापासून आत सहा किलोमीटरवर माण नदीच्या काठावर तावशी गाव (ता. पंढरपूर) वसले आहे.
तावशी गावची अोळख
- सुमारे पाच हजारांहून अधिक लोकसंख्या. परिसरातील पाच वाड्या-वस्त्यांही समाविष्ट
- भौगोलिक क्षेत्र सुमारे साडेतीन हजार हेक्टर. १९०० हेक्टरवर ऊस, डाळिंब, द्राक्ष अशी बागायती तर सुमारे १४०० हेक्टरवर जिरायती पिके.
- खंडोबा ग्रामदैवत. जागृत देवस्थान. नोव्हेंबरमध्ये मोठी यात्रा भरते त्या वेळी बाहेरूनही असंख्य भाविक मंदिरात मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
- पंढरपूरचे माजी आमदार भाई राऊळ तसेच गोवा मुक्ती संग्रामातील सर्वाधिक ४० स्वातंत्र्य सैनिक तावशीचे.
- तेरा सदस्यीय ग्रामपंचायतीत सरपंच सौ. सोनाली गणपत यादव आणि ग्रामसेविका म्हणून ज्योती पाटील यांच्याकडे जबाबदारी. दोन्ही महिलांच्या हाती गावचा कारभार आणि एकमेकांतील समन्वय यामुळे ग्रामस्थांचा विकासकामांना कृतीतून पाठिंबा
गावातील विकासकामे
पिण्यासाठी शुद्ध पाणी
पाण्यासाठी माण नदीवरून दोन किलोमीटरवरून पाइपलाइन केली. प्रत्येकी पन्नास हजार लिटरच्या दोन टाक्यांत साठवून प्रत्येकाच्या घरी पाणी पोचवले जाते. पिण्याच्या दृष्टीने शुद्ध पाणीपुरवठा प्रकल्प उभारला आहे. त्या माध्यमातून पाच रुपयांत वीस लिटर पाणी पुरवले जाते. तासाला साधारण एक हजार लिटर पाणी ‘फिल्टर’ करण्याची प्रकल्पाची क्षमता आहे. सकाळी सहा ते दहा आणि दुपारी चार ते आठ या वेळेत पाणी दिले जाते. वापरावयाच्या पाण्याबाबतही चोख नियोजन करताना गावात वेगवेगळ्या चार भागांत चार वॉल्व्हज बसविले आहेत. टाक्या भरून घेतल्यानंतर सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत आलटून-पालटून चारही विभागांना वेगवेगळ्या वेळेत पाणी पुरवले जाते.
महत्त्वाची कामे
- गावांतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण
- वाड्या-वस्त्यांसह अनेक ठिकाणी सिमेंटचे रस्ते
- संपूर्णपणे बंदिस्त गटारे. गटार शक्य नाही तिथे शोषखड्डे. त्यामुळे कुठेही उघड्यावरील गटार दिसून येत नाही.
- विजेची पुरेशी सोय. हायमास्ट दिवा, ४० एलईडी बल्ब्स आणि २० सौर दिवे
- गावात सातत्याने स्वच्छता मोहिम. स्वच्छतेविषयी जागरुकता. कचऱ्यासाठी २० ठिकाणी कचराकुंड्या.
- ओला आणि सुका कचरा स्वतंत्र ठेवण्यासाठी बकेट्स
- शंभर टक्के हगणदारीमुक्ती
- वृक्षारोपणावर कायम भर. गाव परिसरात सुमारे २०० झाडे ‘ट्री गार्ड’ सह सुरक्षित. त्यांची उंची पाच ते सात फुटांपर्यंत. त्यामुळेही गावच्या सौंदर्यात भर पडली आहे. स्मशानभूमीतही झाडे लावली आहेत.
- स्वच्छतेबरोबर आरोग्याचीही काळजी. साथीचे आजार होऊ नयेत यासाठी ग्रामपंचायतीकडून ‘फॉगिंग मशिन’ची खरेदी. त्याद्वारे महिन्यातून दोनवेळा रोग प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी.
- मुख्य चौकासह सात ठिकाणी ‘सीसीटीव्ही’
‘आयएसओ" मानांकन
तावशी ग्रामपंचायतीने "आयएसओ' मानांकन प्राप्त केले आहे. आवश्यक दफ्तरकाम अद्ययावत केले असून बहुतेक सर्व कामकाज संगणकीकृत आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, दोन प्राथमिक शाळा आणि दोन अंगणवाड्यांनाही ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. ग्रामपंचायतीत कर्मचाऱ्यांसाठी ‘बायोमेट्रिक’ प्रणाली बसविली आहे.
नावीन्यपूर्ण काही
नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणजे ग्रामपंचायतीचा शंभर टक्के कर भरणाऱ्या ग्रामस्थांना प्रति माणशी १० किलो दळण मोफत दळून देण्यात येते. त्यासाठी प्रत्येक महिन्याला कार्ड वाटप केले जाते. त्यावर कुटुंबातील सदस्य संख्या, दळण तारीख यांचा उल्लेख असतो. स्मार्टकार्डही देण्यात आले असून ते पाणी वाटपासाठी वापरात आणले जाते. त्यावर कुटुंब प्रमुखाचे नाव, सदस्य संख्या यांचा उल्लेख असतो. गावाची माहिती, वैशिष्ट्य, लोकसंख्या, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक असणारे गावाचे स्वतंत्र ‘मोबाईल ॲप’ तयार करण्यात आले आहे. संकेतस्थळही तयार करण्यात येऊन त्यावर विविध माहितीसह शासकीय योजना, अधिकाऱ्यांचे संपर्क क्र. व उपयुक्त माहिती ‘अपलोड’ करण्यात आली आहे.
प्लॅस्टिक बंदीचा ठराव, कापडी पिशव्यांचा वापर
प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी नुकतीच सुरू झाली. मात्र, ज्या वेळी शासनाने निर्णय घेतला त्यानंतर ग्रामपंचायतीने त्वरित प्लॅस्टिकबंदीचा ठराव केला. अंमलबजावणीसाठी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांची जागृती रॅली गावातून काढण्यात आली. ग्रामपंचायतीत येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला एक झाड आणि कापडी पिशवी आवर्जून दिली जाते.
ॲग्रोवन' सरपंच महापरिषदेने दिली प्रेरणा
तावशी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सोनाली यादव सुशिक्षित असून गावच्या विकासासह नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी त्या सतत धडपडत असतात. ॲग्रोवनच्या वतीने यंदा आळंदीत आयोजित सरपंच महापरिषदेत सहभाग घेण्याची संधी त्यांना मिळाली. त्यातून खूप माहिती मिळालीच, पण कार्यासाठी प्रेरणाही दिल्याचा उल्लेख सौ. यादव यांनी आवर्जून केला.
प्रतिक्रिया
ग्रामस्थांचं जीवनमान सुसह्य करण्याचा प्रयत्न आहे. विकासकामे सुरूच आहेत. नावीन्यपूर्ण उपक्रमांतून वेगळीच सकारात्मक ऊर्जा ग्रामस्थांमध्ये आणणे, गावच्या विकासात अधिकाधिक लोकसहभाग वाढवून ‘स्मार्टग्राम’चा लौकिक कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सौ. सोनाली गणपत यादव, सरपंच, तावशी
घनकचरा व्यवस्थापन हा मोठा विषय आमच्यासाठी बाकी आहे. उकिरडा मुक्त गाव करायचे आहे. वृक्ष लागवड वाढवून ‘हरितग्राम’ करायचे आहे. त्याशिवाय ‘डिजिटल’ तंत्रज्ञानातही काम सुरू आहे.
- श्रीमती ज्योती पाटील, ग्रामसेविका, तावशी
ग्रामस्थांचे सहकार्य असल्याशिवाय कामे होत नाहीत. त्यातूनच शासनाच्या योजना यशस्वी राबविल्या.
विकासाचा वेगळा पायंडा आमच्या गावाने घालून दिला आहे. तो टिकवण्याचा प्रयत्न आहे.
-अल्लाउद्दीन मुलाणी, उपसरपंच, तावशी, ता. पंढरपूर
संपर्क -सौ. सोनाली यादव - ९६६५६४१०१६
(सरपंच)
ज्योती पाटील - ७७४४०५२३७३
(ग्रामसेविका)
फोटो गॅलरी
- 1 of 288
- ››