डाळिंबातून समृध्दी

पाण्याचा काटेकोर वापर बाजीराव यांना २०१६ मध्ये इस्राईलला जाण्याची संधी चालून आली. तेथे अत्यंत कमी किंवा काटेकोरपणे पाण्याचा वापर करून होणारी शेती त्यांनी पाहिली. काटवन परिसरातही अल्प प्रमाणातच पाणी उपलब्ध असल्याने ठिबक सिंचनावर आधारित शेती सुरू केली.
पॉलिमल्चिंग, ठिबक सिंचन व सुधारित तंत्राचा वापर करून डाळिंबाची जोपासलेली बाग.
पॉलिमल्चिंग, ठिबक सिंचन व सुधारित तंत्राचा वापर करून डाळिंबाची जोपासलेली बाग.

डाळिंब या पिकावर जिवापाड प्रेम करीत पंचवीस वर्षांपेक्षाही अधिक काळ हे पीक टिकवण्यात बाजीराव गोलाईत (टेंभे खालचे, जि. नाशिक) यशस्वी झाले आहेत. सुरवातीची काही वर्षे स्वतः मार्केटिंग करीत या पिकाला मार्केट देण्याचे प्रयत्न त्यांनी केले. आज एकरी १० ते १४ टन असे उत्पादन मिळवणारे गोलाईत निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेतात. सुयोग्य व्यवस्थापन करीत याच पिकाच्या जोरावर अतीव कष्टातून शून्यातून त्यांनी शेती व कौटुंबिक समृद्धी मिळवली आहे. नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुका ठिकाणापासून नजीक सोळा गाव काटवन भागात टेंभे खालचे हे गाव आहे. येथील बाजीराव सदाशिव गोलाईत यांची पूर्वीची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. उदरनिर्वाहासाठी त्यांना शाळा सोडणे भाग पडले आणि शिवणकाम अवगत केले. शिलाई यंत्र घेण्याची देखील परिस्थिती नसताना गावातीलच एका व्यक्तीकडून काही महिने यंत्र चालविण्यासाठी घेतले. दहा वर्षे शिवणकाम केले. आई सोजळबाई देखील शेतात मोलमजुरी करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होत्या. प्रगतिशील शेतीची खूणगाठ घरासाठी पै पै जोडताना आपणही चांगली शेती करावी असे बाजीराव यांना वाटे. त्यातच मालेगाव तालुक्यातील अनुभवी डाळिंब उत्पादक सुभाष शेवाळे यांची प्रगतिशील डाळिंबाची शेती पाहण्यात आली. त्यानंतर अशी शेती करण्याची खुणगाठ बाजीराव यांनी बांधली. घरच्यांचा विरोध होता. मात्र स्वतःच्या हिमतीवर विश्वास ठेवून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एक एकरात गणेश डाळिंबाच्या १८० झाडांची लागवड केली. ही गोष्ट होती साधारण १९८५ काळातील. प्रयत्नपूर्वक जोपासलेल्या बागेने त्या वेळी चांगला नफा मिळवून दिला. तेव्हापासून टप्प्याटप्प्याने बाजीराव यांनी डाळिंब पिकावरील आपली पकड घट्ट केली. बाजारपेठ स्वतःच शोधली बाजीराव यांची वडिलोपार्जित आठ एकर शेती आहे. डाळिंबाची नवी बाग होती त्या वेळी कांदा आंतरपिकाने त्यांना एकरात त्या काळात १६ हजार रुपये मिळवून दिले होते. मग शेतीतील आत्मविश्वास अजून वाढला. सुरवातीच्या काळात डाळिंब विकावे कुठे, बाजारपेठा कोठे आहेत, याची काहीच कल्पना नव्हती. मग अभ्यास, वाचन करून त्यांनी अहमदाबाद व नजीकची बाजारपेठशोधली. त्या वेळी ट्रकच्या टपावर बसून तेथे जाऊन, चार दिवस तेथे थांबून ते डाळिंब विकून येत. आज मात्र व्यापारी त्यांच्या शेताच्या बांधावर येऊन डाळिंब घेऊन जातात. निर्यातदारांनाही ते फळे देतात. बागेचे नेटके व्यवस्थापन

  • बाजीराव आज सुमारे चार हजार डाळिंब झाडांचे संगोपन करतात. चार एकर बाग काही वर्षांपूर्वीची आहे, तर अलीकडील दोन वर्षांतच चार एकरांवर नवी लागवड केली आहे.
  • पूर्वीची लागवड १२ बाय १० फूट अंतरावर होती. नवी लागवड १२ बाय आठ फुटांवर आहे.
  • इस्राईल देशातील तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.
  • बागेत पॉलिमल्चिंग पेपर वापरण्यात येतो.
  • अलीकडील काळात रासायनिक निविष्ठांचा वापर कमी करून सेंद्रिय पद्धतीवर अधिक भर दिला आहे. दरवर्षी प्रतिझाड २० किलो शेणखत दिले जाते. गरजेनुसार दरवर्षी ट्रकद्वारे ते विकत आणले जाते. - घरची बैलजोडी अाहे. गोठ्याजवळच स्लरीसाठी एक हजार लिटर क्षमतेचा टॅंक जमिनीत बनविला आहे, त्याद्वारे प्रत्येक झाडाला ठिबक संचाद्वारे स्लरी दिली जाते.
  • पाण्याचा वापर अत्यंत गरजेपुरता. पांढऱ्या मुळीची चांगली काळजी घेतली जाते. झाडांची पानेही सदाहरित ठेवण्याचा प्रयत्न असतो. बागेत रोगराई उद्‍भवू नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते.
  • भगवा वाण असलेल्या डाळिंबाचे एकरी १० ते १४ टनांपर्यंत उत्पादन ते घेतात. किलोला ५० ते ६० रुपये दर त्यांना मिळतो. उत्पादन खर्च एकरी दोन लाख रुपयांपर्यंत येतो.
  • आज अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना बाजीराव मार्गदर्शन करतात.
  • इस्राईलची प्रेरणा घेत पाण्याचे नियोजन बाजीराव यांना २०१६ मध्ये इस्राईलला जाण्याची संधी चालून आली. तेथे अत्यंत कमी किंवा काटेकोरपणे पाण्याचा वापर करून होणारी शेती त्यांनी पाहिली. काटवन परिसरातही अल्प प्रमाणातच पाणी उपलब्ध असल्याने ठिबक सिंचनावर आधारित शेती सुरू केली. पाण्याच्या नियोजनासाठी तीन विहिरी खोदल्या असून, दोन विहिरींतील पाणी तिसऱ्या विहिरीत जमा करून ठिबकद्वारे ते झाडांना दिले जाते. दर चार दिवसांनी ठिबकद्वारे २० ते २५ मिनिटे पाणी दिले जाते. डाळिंबाने उंचावले अर्थकारण काही वर्षांपूर्वी पुणे येथे टोमॅटो लागवडीचे सुधारित प्रशिक्षण घेतले. सुमारे ३८ गुंठ्यांतील टोमॅटोने चांगला नफाही कमावून दिला. कलिंगड व अन्य प्रयोगही केले. मात्र, सर्वांत जास्त फायदा डाळिंबानेच दिल्याचे बाजीराव यांनी सांगितले. गेल्या पंधरा वर्षांत शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही. तसेच, कर्ज किंवा उधारीची मदतही घ्यावी लागली नाही. कष्टाच्या जोरावर शेतीतून फोर व्हीलर, दोन ट्रॅक्टर्स, अवजारे, सहा दुचाकी, मालेगाव येथे वास्तू, नामपूर शहरात प्लाॅट व शेतात घर आदी बाबी घेणे शक्य झाल्याचे बाजीराव अभिमानाने सांगतात. आपण शिक्षणापासून वंचित राहिलो. मात्र आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, ती मोठी व्हावीत यासाठी त्यांना शिक्षणाच्या सर्व संधी दिल्या. त्यातूनच चेतन बीएचएमएस डाॅक्टर, नितीन इंजिनिअर झाले, असे बाजीराव सांगतात. संपर्क- बाजीराव गोलाईत - ९४२१६०५०७१, ७७५६००५०७१.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com