निवृत्त शिक्षक झाला प्रयोगशील शेतीतील विद्यार्थी

मल्चिंग पेपर व ठिबकचा वापर करून उन्हाळी हंगामात घेतलेले भरिताचे वांगे.
मल्चिंग पेपर व ठिबकचा वापर करून उन्हाळी हंगामात घेतलेले भरिताचे वांगे.

वडगाव निंबाळकर (ता. बारामती, जि. पुणे) येथील रामचंद्र एकनाथ पवार अलीकडील वर्षांतच शिक्षकी पेशातील नोकरीतून निवृत्त झाले. मात्र शेतीची कायमच आवड जोपासलेल्या पवार यांचा विविध प्रयोग करण्याचा ध्यास मात्र अखंड सुरू आहे. ऊस हे मुख्य पीक व जोडीला विविध भाजीपाला पिकांच्या प्रयोगांत त्यांनी आपल्या साऱ्या कुटुंबालाच एकरूप केले आहे. बाजारपेठ व हवामानाचा अभ्यास करीत सुधारित तंत्राने शेती किफायतशीर करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे . पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका प्रयोगशील शेतकऱ्यांचा म्हणून अोळखला जातो. या भागाला अवर्षणाचा सामना कायम करावा लागतो. तरीही शेतकरी हिमतीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला प्रगतावस्थेत नेण्याच्या प्रयत्नात असतो. तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील रामचंद्र एकनाथ पवार हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. वक्तशीर व शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी ओळख मिळवली आहे. पर्यवेक्षक आणि त्यानंतर उपमुख्याध्यापक असलेले पवार २०१६ मध्ये सेवानिवृत्त झाले. शाळेतील शिस्त शेतीत ठरली महत्त्वाची पवार यांनी पहिल्यापासूनच शेतीची आवड जोपासलेली. नोकरीत कार्यरत असताना घरचे सदस्य शेती पाहायचे; पण पवार यांनी पूर्णवेळ आपल्या शेतीला वाहून घेतले आहे. शाळेतील शिस्त आणि प्रयोगशीलता त्यांना शेतीत उपयोगी पडते. वक्तशीरपणामुळे शेतीचे व्यवस्थापनही तितकेच चोख होऊन जाते. शिवाय, शाळेतील हिशेबीपणाही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे शेती म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार हा गैरसमज पुसून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. शालेय अभ्यासक्रम जसा ‘टार्गेट’ ठेवून पूर्ण केला जातो, तसेच ते शेतीतही ध्येय ठेवतात. कुटुंबाने शेतीला घेतले वाहून सकाळी उठल्यावर पवार यांचा ‘मॅार्निंग वाॅक’ शेतातच असतो. सायंकाळची शतपावली ही ‘शेतपावली’ असते. ते नोकरीत असताना पत्नी सौ. नंदिनी यांनी तीस वर्षे तरी शेतीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलली होती. त्यांचा अनुभव पवार यांना उपयोगी पडत आहे. उज्ज्वल हे त्यांचे चिरंजीव सोमेश्वर साखर कारखान्यात कार्यरत आहेत. कृषी पदवीधर असल्याने त्यांचे तांत्रिक ज्ञान शेतीला पुढे नेण्यासाठी उपयोगी ठरते. सूनबाई शुभांगी यादेखील शेतमालाच्या पॅकिंग, ग्रेडिंगमध्ये तरबेज आहेत. अशा रीतीने सारे कुटुंबच गुण्यागोविंदाने शेती करताना दिसते आहे. शेतीतील सुधारणा व तंत्र

  • कुटुंबाची आठ एकर शेती आहे. त्यात ऊस हे मुख्य पीक असते. उर्वरित शेतात कांदा, वांगी, कोबी, फ्लॅावर, मिरची आदी पिके आलटून पालटून घेतली जातात.
  • मार्केटचा उत्तम अभ्यास करून त्यानुसारच पीक व क्षेत्र यांचे नियोजन. दरवर्षी मे, जूनमध्ये फ्लॉवर असतो. मात्र, यंदा त्याला दरच नसल्याने दोन एकरांतील लागवडीचे नियोजन थांबवले.
  • खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांत कांदा असतो. खरिपातील कांद्याचे उत्पादन एकरी १० टन मिळते.
  • रब्बीत ते याहून अधिक मिळते. एका हंगामात एकरी २० टनांपर्यंतही रब्बीत उत्पादन मिळाले.
  • मिरची हेदेखील नियमित पीक असते.
  • ठिबक सिंचनाचा वापर असतोच. शिवाय, भाजीपाला पिकांत पॉलिमल्चिंगचा वापर सुरू केला आहे.
  • वातावरणातील बदलानुसारही पिकांचे पर्याय शोधले जातात.
  • उसाचे एकरी ७६ ते ८० टन, तर खोडव्याचे ५८ टनांपर्यंत उत्पादन ते घेतात.
  • भरिताच्या वांग्याचा उन्हाळी प्रयोग मागील हंगामात हिवाळ्यात भरिताच्या संकरित जांभळ्या वांग्याचा प्रयोग १४ गुंठ्यांत केला. यात सुरवातीच्या काळात किलोला ३५ ते ४० रुपये दर व त्यानंतर तो १८ रुपयांपर्यंत खाली घसरला. मात्र, या वांग्याने साधारण दीड लाख रुपयांचे चांगले उत्पन्न मिळवून दिले.पवार यांचे विक्रीसाठी पुण्याच्या बाजारपेठेत जाणे व्हायचे. यानिमित्ताने कुठल्या पिकाला कोणत्या काळात किती बाजार असतो, याचा अभ्यास त्यांनी केला. या वेळी अर्धा-पाऊण किलो आकाराच्या हिरव्या वांग्याला दीडपट ते दुप्पट भाव असल्याचे आढळले. शिवाय, ते बिनकाट्याचेही होते. वांग्याच्या ज्या वाणाची साल नाजूक असते, त्यावर तीव्र उन्हाचा लवकर परिणाम होतो, शिवाय बदला मालही खूप निघतो. उन्हाच्या तडाख्यात फुलगळतीही होते, असाही अनुभव आला. त्यानंतर हिरवे- पांढरे, काटा नसलेले, अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाचे आणि जाड सालीच्या भरिताच्या वांग्याला त्यांनी प्राधान्य दिले. जळगावी भरिताचे वांगे या नावाने बाजारात जास्त ओळखले जाते; परंतु हे वांगे ऐन उन्हाळ्यात फुलोऱ्यात येणे तसे जिकिरीचे. पुणे व सातारा जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी हे वांगे लावतात उन्हाळ्यात एप्रिल-मे मध्ये, त्याला फळे येतात जून-जुलैमध्ये. तोवर तापमान घटलेले असते आणि फुलकळी व फळही टिकते. या हंगामातही वांग्याला चांगला बाजार असतो. परंतु हेच वांगे ऐन मार्च-एप्रिलमध्ये बाजारात आणले तर जास्त दर मिळू शकेल, असे पवार यांना वाटले. त्यादृष्टीने त्याची लागवड केली. मल्चिंग व ठिबकचा फायदेशीर वापर पिकात तारकाठी व सुतळीच्या साहाय्याने बांधून घेतले. तार चांगल्या दर्जाची वापरली आणि खुंटही अडीच फुटांचे वापरले. यामुळे वादळात ग्रेडिंगसाठी केलेले शेड पडले; परंतु तारकाठी पडली नाही. तारकाठीमुळे पिकाला पुरेशी मोकळी हवा व प्रकाश मिळाला, परिणामी फळधारणा वाढली. ठिबक आणि मल्चिंग पेपर यांचा एकत्रित वापर केल्यास पीक उत्कृष्ट येते, हा अनुभव मागील वांगे पिकातदेखील पवार यांनी घेतला होता. ऐन उन्हाळ्यात मल्चिंग पेपरमुळे पाण्याचे बाष्पीभवन टळते, तणनियंत्रण आपोआप होते, जमीन वाफसा अवस्थेत जास्त काळ राहते आणि फळ तजेलदार येते. आश्वासक उत्पादन, दर मात्र घसरलेले सध्या उभ्या असलेल्या वांग्याची १५ टनांपर्यंत विक्री झाली आहे. अजून तेवढीच अपेक्षित आहे. साधारण २२ मार्चपासून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या वांग्याला २२ रुपये प्रतिकिलो दर मिळाला. एप्रिलअखेर तो १५ रुपयांवर आणि आता तो अजून घसरून १० रुपयांवर आला आहे. म्हणजे तापमान ४० अंशापेक्षा अधिक असूनही उत्पादनाच्या बाबतीत पवार कुटुंब समाधानी झाले. दरांबाबत मात्र निराश झाले. जून- जुलैमध्ये शाळा, खाणावळी सुरू झाल्या, की दर वीस रुपयांपर्यंत जाईल, असा त्यांना विश्वास आहे.

    संपर्क- उज्ज्वल पवार - ९७६७७०६८००

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com