पाच गुंठ्यांतून शोधले किफायतशीर शेतीचे सूत्र

दररोज तीन ते चार टन माल बाजारात सिन्नर भागातील ठाणगाव, वडगाव, भाटवाडी या तीन गावांतून आज वर्षभर दररोज तब्बल तीन ते चार टन व प्रसंगी पाच टन परदेशी भाजीपाला गोवा, हैदराबाद, इंदूर, पुणे, दिल्ली, बंगळुरू या मोठ्या शहरांत पाठविला जातो. मागील सहा ते सात वर्षांपासून लागवड ते विक्री व्यवस्था यशस्वी करण्यात सांगळे व त्यांच्या सहकाऱ्यांना यश मिळाले आहे
कारभारी सांगळे यांच्या दर्जेदार ब्रोकोलीला राज्य, परराज्यातूनही मोठी मागणी राहते.
कारभारी सांगळे यांच्या दर्जेदार ब्रोकोलीला राज्य, परराज्यातूनही मोठी मागणी राहते.

दररोज किंवा ताजे उत्पन्न मिळवण्यासाठी साधारण पाच गुंठे क्षेत्रात वर्षभर विविध परदेशी भाजीपाला पिके घेण्याची पीकपद्धती कारभारी सांगळे यांनी स्थापित केली आहे. मॉल, सुपरमार्केट्‌स यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला. गावपरिसरातील बेरोजगार युवकांनाही या शेतीसाठी उद्युक्त केले. आता तीन गावांमधून दररोज सुमारे तीन ते चार टन माल विविध बाजारपेठांना पाठवला जात असून शेतकऱ्यांना दररोजचे उत्पन्न त्यातून मिळू लागले आहे.   नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्‍याचा बहुतांश भाग वर्षानुवर्ष दुष्काळी राहिलेला आहे. पाणीटंचाई, मुरमाड जमीन, बदलते हवामान या आव्हानांशी झुंजत असताना सिन्नरच्या जिद्दी शेतकऱ्यांनी कधीच हार मानली नाही. या प्रतिकूलतेतच संधी शोधत त्यांनी शेतीत नवे प्रयोग करण्याचा ध्यास घेतला. कमीत कमी क्षेत्रात नियमित उत्पन्न घेण्यावर भर दिला. तालुक्यातील वडगाव येथील कारभारी महादू सांगळे हे त्यापैकीच एक आहेत. त्यांना शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरवण्यातही आले आहे. गेल्या दहा वर्षांपासून परदेशी भाजीपाला शेतीचे (एक्सॉटीक) प्रयोग ते करताहेत. फयान वादळामुळे द्राक्षबागेचे नुकसान झाल्यानंतर ते कमी क्षेत्रावरील शेतीकडे वळले. त्यांची साधारण सहा एकर शेती आहे. त्यातील पाच गुंठे क्षेत्रावर त्यांनी पीकपद्धतीची नेटकी घडी बसवली आहे. त्यातून आपले अर्थकारण उंचावले आहे. सांगळे यांची शेतीपद्धती

  • सहा एकरांपैकी सुमारे पाच ते दहा गुंठ्यावर एक्सॉटीक भाजीपाला
  • वर्षभरात त्यात सुमारे तीन ते चार पिके. काहीवेळा दोनही.
  • यातील पिके- ब्रोकोली, लाल कोबी, केप्चॉय, चायना कोबी
  • उर्वरित क्षेत्रात कांदा, लसूण, कोबी, फ्लॉवर व अन्य नियमित प्रकारचा भाजीपाला असं नियोजन
  • पीक फेरपालट राहिली आहे महत्त्वाची
  • वर्षभर विविध टप्प्यात पीक उत्पादन सुरू. दररोज किंवा वर्षभर ताजा पैसा हाती येत राहील अशी पिकांची सांगड
  • बाजारातील मागणीचा अंदाज, हवामानाचा अभ्यास आणि कमीत कमी क्षेत्रावर गरजेनुसार उत्पादन या त्रिसूत्रीचा अवलंब
  • केलेले स्तुत्य प्रयत्न सांगळे म्हणाले की, फयान वादळाने एक एकर द्राक्षशेतीचे अतोनात नुकसान झाले होते. सलग दोन वर्षे बागेपासून उत्पादन मिळाले नाही. या दरम्यान सिन्नर येथीलच युवामित्र संस्थेने पंजाब, दिल्ली या राज्यांत दौरा ठरवला होता. यात शेतीबरोबरच शेतकऱ्यांनी बाजारपेठ मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती मिळाली. एका भागातील विक्री केंद्रात नेहमीच्या भाजीपाल्याचे प्रति किलोचे दर ५० रुपयांच्या आसपास होते. तर परदेशी भाजीपाल्यांचे दर १५० ते १६० रुपयांच्या आसपास होते. महानगरांमध्ये अशा भाजीपाल्याला विशेष मागणी असते हे समजले.

    लागवड प्रयोग समजून घेतले त्याचबरोबर नाशिकहून मुंबईला माल जातो. तोच माल आमच्या नाशिक किंवा अन्य शहरांत पुरवठादारांकडून विक्रीस येतो ही बाबदेखील समजली. गावी मित्रांशी चर्चा केली. पुन्हा पंजाब, दिल्ली भागात दौरा केला. परदेशी भाजीपाला प्रयोग पाहिले. लागवड पद्धती समजून घेतली. जे विकतं तेच पिकवायचं असा निर्धार केला होता. ब्रोकोलीने दिला हात साधारण २००९ ची गोष्ट. जुन्या द्राक्षबागेत ब्रोकोलीची लागवड केली. ती बॉक्‍स पॅकिंगमधून मुंबईच्या बाजारात पाठविली. या ब्रोकोलीच्या खरेदीसाठी व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली होती. या ब्रोकोलीसाठी किलोला ९० रुपयांपासून ते १६० रुपयांपर्यंत बोली लागली. एका व्यापाऱ्याने १२५ रुपये दराने सर्व खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला. त्या वेळी एक एकरात खर्च वजा जाता सुमारे सहा ते सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर परदेशी भाजीपाला हा विषय अधिक गांभीर्याने घेण्यास सुरवात केली. आज त्यात सातत्य ठेवले आहे. बाजारपेठेचा केलेला अभ्यास

  • मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद आदी शहरांतील तारांकित हॉटेलांना वर्षभर परदेशी भाजीपाला लागतो. त्यांचे पुरवठादारांचे वर्षभराचे करार असतात. सांगळे व सहकारी थेट त्यांनाच भेटले. त्यांची मागणी समजून घेतली. त्यानंतर लागवडीचे नियोजन केले.
  • उन्हाळ्यात विशेषत: लग्नसराईत ब्रोकोली किंवा तत्सम भाजीपाल्याला चांगली मागणी असते. - पावसाळ्यातही मागणी असते. मात्र या काळात नुकसान होत असल्याने माल कमी मिळतो.
  • हैद्राबाद, गोवा राज्यातील अनेक शहरे, मुंबई, दिल्ली, पुणे या शहरातून ब्रोकोली सारख्या परदेशी भाजीपाल्याला मागणी असते.
  •  पुरवठादारांसोबत वार्षिक करारा दरम्यान जो व्यावसायिक चांगले दर देईल त्याला माल दिला जातो. अन्य भाजीपाला सिन्नर शहरातील मार्केटमध्ये विकला जातो.
  • अलीकडील काळात मात्र दर घसरल्याचे जाणवते.
  • शेतकरी उत्पादन कंपनीची स्थापना दरम्यान सिन्नर भागात कार्यरत ‘युवामित्र’च्या प्रयत्नांतून शिवारात देवनदी व्हॅली फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन झाली. त्याचे सांगळे अध्यक्ष आहेत. शेतकऱ्यांचा पहिला ॲग्रीमॉल या कंपनीने उभारला. नाबार्डचे अर्थसाह्य मिळविणारी देवनदी ही राज्यातील पहिली कंपनी ठरली. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती निविष्ठा रास्त दरात मिळण्यासाठी व बाजारासाठीही मदत झाली. संपर्क- कारभारी सांगळे - ९४२२३२७७९६  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com