agricultural success story in marathi, agrowon, vadgaon tanpure,karjat, nagar | Agrowon

स्वनिर्मिती तंत्रज्ञानाला शेतकऱ्याने मिळवली नऊ राज्यांत बाजारपेठ
मंदार मुंडले
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

कृषी प्रदर्शनांचा प्रभावी वापर
महाराष्ट्रासह बंगळूर, धारवाड, बागलकोट, बेळगाव, नागपूर, गुजरात आदी ठिकाणी मिळून सुमारे २० ते २२ प्रदर्शनांतून सुभाष तनपुरे यांनी भाग घेतला. त्याद्वारे विक्री ही महत्त्वाची बाब नव्हती. तर शेणस्लरी ड्रिपमधून देणे शक्य आहे व त्यासाठीचे तंत्रज्ञान एका शेतकऱ्याने तयार केले आहे, याचा प्रसार करता आला हीच माझ्यासाठी महत्त्वाची बाब होती. त्या वेळी तयार केलेल्या संपर्कातून पुढे ग्राहक तयार होण्यास मदत मिळाल्याचे तनपुरे म्हणाले.

नगर जिल्ह्यातील वडगाव तनपुरे (ता. कर्जत) येथील सुभाष तनपुरे प्रगतिशील शेतकरी म्हणून अोळखले जातात. कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावताना फिल्टर टॅंकची निर्मिती व त्या माध्यमातून ड्रिपद्वारे सेंद्रिय द्रवरूप स्लरी पिकांना देण्याचे वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले. आपले संशोधन स्वतःपुरते मर्यादित ठेवले नाही. तर मार्केटिंगचे कौशल्य, अंगी बाणवलेली उद्योजकता, व्यवहारचातुर्य, अथक प्रयत्न, चिकाटी यांच्या जोरांवर आपल्या संशोधनाला राज्य, परराज्यांत मार्केट मिळवून दिले. त्यातून आपल्या शेतीचे, कुटुंबाचे अर्थकारण उंचावताना राज्य व परराज्यांतील शेतकऱ्यांनाही स्वसंशोधनाचा फायदा मिळवून दिला आहे.

नगर जिल्ह्यातील कर्जत हा संपूर्णपणे जिरायती तालुका. याच तालुक्यातील वडगाव तनपुरे येथील सुभाष तनपुरे प्रतिकूल परिस्थितीतही शेतीत प्रगती साधण्यासाठी सतत नवे प्रयोग करीत असतात. कधीही स्वस्थ न बसण्याचा यांचा स्वभाव आहे. एकेकाळी सुमारे दोनशे जनावरांचे समृद्ध पशुधन त्यांनी जोपासले. पण पुरेशा मजूरबळाअभावी पशुधन व त्या अनुषंगाने दुग्ध व्यवसाय त्यांना थांबवणे भाग पडले.

स्वतःमधील संशोधक शोधला
कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता कल्पक बुद्धीचा वापर करून समस्येवर मार्ग शोधायचा हे जणू तनपुरे यांच्या रक्तातच भिनलेले. पशुधन सांभाळताना शेतीत शेणस्लरीचा वापर नित्याचा झाला होता. त्यातूनच जीवामृत किंवा शेणस्लरी फिल्टर करून ती ड्रिपवाटे (ठिबक) देण्याचे अभिनव तंत्रज्ञान त्यांनी गरजेतून विकसित केले. त्यातून आपल्यातील संशोधक वृत्तीचा प्रत्यय दिला. जाणकारांकडून आपल्या कल्पनेतील फिल्टर टॅंक तयारही करून घेतला. त्याला पृथ्वीराज असे नाव दिले.

स्वसंशोधानाला बाजारपेठ
खरंतर शेतकरी संशोधकही असतो. आपल्या बुद्धिकौशल्याचा वापर करून तो विविध तंत्रज्ञान विकसित करीत असतो. मात्र या संशोधनाला पुढे बाजारपेठ मिळणे ही सोपी गोष्ट नसते. एखाद्या कंपनीला आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग करणे सोपे असते. कारण त्यादृष्टीने कर्मचारी व आर्थिक बळ तसेच अन्य यंत्रणा त्या कंपनीजवळ असतात. एकट्या शेतकऱ्याला मात्र या गोष्टी करणे प्रचंड आव्हानाचे असते. तनपुरे यांनी हेच आव्हान पेलले व यशस्वीदेखील केले.

तनपुरे यांच्या कौशल्याच्या बाजू

 • सेंद्रिय वा रेसिड्यू फ्री शेतीतील सध्याची शेतकऱ्यांची गरज अोळखून तसे तंत्रज्ञान सादर केले.
 • आपल्या उत्पादनाचा प्रसार करण्यासाठी दिवस-रात्र, ऊन, पाऊस, थंडी असा काहीही विचार न करता अगदी एसटी बस वा अन्य वाहनांतून सातत्याने प्रवास. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचण्याचा प्रयत्न
 • मार्केटिंग ही खरेच अवघड कला. त्यातून नवी संकल्पना विकायची हे त्याहून अवघड आणि परराज्यांत जिथे भाषा, संस्कृतीच वेगळी अशा अनोखळी भागांत जाऊन मार्केटिंग करायचे अजूनच कठीण. पण तनपुरे यांनी ते साधले.
 • स्वतःची कंपनी स्थापन करून व्यापार क्षेत्रात तरबेज असलेल्या दोघांना मार्केटिंगसाठी सोबत घेत भागीदारी केली.

 पृथ्वीराज फिल्टर टॅंक तंत्रज्ञानाचा प्रसार

 • महाराष्ट्र व सुमारे नऊ राज्यांत प्रसार
 • एकूण सुमारे दोन हजार टॅंकची विक्री
 • महाराष्ट्रातील प्रसार - सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, कर्नाटक सीमा, पुणे जिल्हा, (नगर), संगमनेर, नाशिक, विदर्भात अमरावती भागात सुमारे ५० युनिट्स
 • अन्य राज्ये - पंजाब, हरियाना, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश. उत्तर प्रदेशातून अलीकडेच आॅर्डर मिळाली.
 • अल्पभूधारक शेतकऱ्यापासून ते मोठे शेतकरी, उद्योजक आदींकडून तंत्राचा वापर
 • या पिकांत वापर - ऊस, पपई, केळी, भाजीपाला, डाळिंब, संत्रा, मोसंबी, पेरू

 परराज्यांतील प्रातिनिधिक उदाहरणे
१) रायचूर येथील नागा रेड्डी यांनी ‘फ्लड इरिगेशन’ पद्धतीत तीन फिल्टर बसवले. सेंद्रिय भात हे उद्दिष्ट ठेऊन सुमारे ४० एकरांत टॅंकद्वारे सेंद्रिय द्रवरूप स्लरी देणे त्यांना शक्य होत आहे.
२) गुजरात राज्यातील प्रगतिशील शेतकरी प्रवीणभाई देसाई यांची पेरू, आंबा, खजूर, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट, केळी अशी विविध समृद्ध शेती आहे. त्यांच्याकडे सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण आहे. पाच फिल्टर टॅंक त्यांच्याकडे आहेत.
३) कर्नाटकात बंगळूरनजीक चित्रदुर्ग येथे डॉ. प्रशांत हे सुपारी व काळी मिरी पिकांत तर हसन जिल्ह्यातील महेशकुमार कॉफी व मिरीत १० ते १५ एकरांत ‘ट्रायल’ म्हणून फिल्टर टॅंकचा प्रयोग करीत आहेत.
५) छत्तीसगडमध्ये सुमारे ७० ते ८० भाजीपाला उत्पादक सुमारे १०० ते १५० फिल्टर टॅंक सेंद्रिय पद्धतीसाठी वापरत अाहेत.
६) मध्य प्रदेशातील उज्जैन येथे हॉटेल व्यावसायिकाचे २५ एकर क्षेत्र. अौषधी वनस्पतींच्या शेतात दोन टॅंकचा वापर.
७) राजस्थानातील गंगानगर जिल्ह्यातील उद्योजक राजेश्वरसिंग यांनी सेंद्रिय पद्धतीने गहू, ऊस, भात घेण्याच्या उद्देशाने १८ टॅंक बसवून सेंद्रिय शेतीला चालना दिली आहे.
८) लुधियाना (पंजाब) भागात पॉलिहाउसमधील काकडी, ढोबळी मिरचीसाठीही या तंत्राचा वापर होत आहे. तमिळनाडूत आयटी इंजिनिअर श्रीधर चौधरी यांचे ३० एकर पॉलिहाउस आहे. निर्यातक्षम गुलाबाला ते चार टॅंकद्वारे सेंद्रिय स्लरी देत आहेत.
 
तंत्रज्ञान प्रसारातील कष्ट, कौशल्ये

 • तनपुरे यांच्या प्रयोगाची यशकथा ॲग्रोवनमध्ये मार्च २०१४ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर राज्यभरातून शेतकरी त्यांना संपर्क करू लागले. ॲग्रोवन वा अन्य वर्तमानपत्रांद्वारे जाहिराती देऊनही मार्केटिंग केले.
 • 'वेबसाईट’ तयार करून आपले तंत्रज्ञान जगभरात पोचवले. त्या माध्यमातून परराज्यांतील शेतकरीही संपर्क साधू लागले.
 • शेतकऱ्यांकडून टॅंकची विचारणा आली की त्याचे गाव कोठेही असो, मग तनपुरे ऊन, वारा, पाऊस, थंडी, रात्र, दिवस यांचा विचार न करता त्यांच्यापर्यंत एसटी किंवा अन्य वाहनांतून पोचायचे.
 • त्याला संपूर्ण तंत्रज्ञान समजावून द्यायचे. प्रवासात प्रसंगी बस स्टॅंडवर झोपूनही रात्री काढल्या.
 • टॅंकसाठी संशोधन व विकास (आर ॲँड डी) व विक्री यासाठी भूक-तहान विसरून सुरवातीची काही वर्षे न मोजण्याइतकी भ्रमंती केली.
 • आजच्या जमान्यात सर्वांत लोकप्रिय ‘यू ट्यूब’वरही तंत्रज्ञान वापराचा व्हिडिअो अपलोड केला. त्यातूनही ग्राहक संपर्क साधू लागले. जर्मनी, आॅस्ट्रेलिया, आखाती देशांत वास्तव्यास तीन भारतीयांनी (महाराष्ट्र, अोरिसा, विशाखापट्टणम) संपर्क करून टॅंक खरेदी केले. त्यांच्या शेतात टॅंक बसवून प्रात्यक्षिक देण्यापर्यंत काम साधले.
 • व्हॉटसॲपसारख्या हुकमी तंत्रज्ञानाद्वारेही असंख्य ग्रुपवर मार्केटिंग
 • गेल्या दोन वर्षांत फिल्टर टॅंक मार्केटिंगसाठी महाराष्ट्रासह विविध राज्ये पालथी घालताना तब्बल दीड ते दोन लाख किलोमीटरचा प्रवास तनपुरे व त्यांचे व्यावसायिक भागीदार यांनी मिळून केला.
 • परराज्यात एका शेतकऱ्याकडे युनीट बसले, त्याला शेतात अनुकूल परिणाम दिसू लागले की परिसरात त्याची माऊथ पब्लिसिटी सुरू व्हायची. मग या शेतकऱ्याचा धागा पकडत त्या राज्यातील अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याची धडपड सुरू व्हायची.
 • पराज्यातील काही शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतात नेऊन टॅंक, स्लरी व त्याचे पिकांवरील परिणाम प्रत्यक्ष दाखवले. त्यातून त्यांची तंत्राविषयीची खात्री पटविली.
 • उत्पादनाच्या मार्केटिंगसोबत देशभरातील सेंद्रिय उत्पादकांचे प्रयोग, अनुभव शेअर केले. त्यामुळे ग्राहक अधिक जवळ येण्यास मदत झाली.
 • ग्राहकांना विक्रीपश्चात सेवा. सतत संपर्कात राहून त्यांच्याकडून फीडबॅक घेतला जातो.
 • दीड वर्षापासून डीलर नेटवर्क. सध्या राज्यात पाच डीलर. तर कच्छ (गुजरात), कर्नाटक व आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी १ डीलर.

शेतकरी असल्याचा झाला फायदा
तनपुरे म्हणाले की एकेक टॅंक विकताना संघर्ष करावा लागला. मुळात शेणस्लरी फिल्टर होऊन पूर्ण द्रवरूप स्थितीत ड्रिपमधून बागेला देता येते हेच अनेक शेतकऱ्यांना पटवून देण्यात संयमाची कसोटी लागली. स्वतः शेतकरी असल्याने शेतीतील प्रॅक्टिकल समस्या मला माहीत असायच्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या, गरजा सोडवणे अवघड गेले नाही. काही शेतकरी विचारायचे, की ड्रिपमध्ये स्लरी चोकअप होत नाही याची गॅरंटी काय? तेव्हा त्यांना सांगायचो, की तसे झाल्यास संपूर्ण ड्रिप यंत्रणा नवी बसवून देऊ. हा विश्वास ग्राहकांना देता यायला हवा. त्यासाठी तुमचे तंत्रज्ञान शंभर टक्के परफेक्ट हवे, असे तनपुरे म्हणाले.

विनामूल्य स्टॉल
शेतकऱ्याचे संशोधन म्हणून विनामूल्य स्टॉल
नाशिक येथे ॲग्रोवनने हार्टिकल्चर प्रदर्शन भरविले होते. त्या वेळी संशोधक शेतकऱ्याचे तंत्रज्ञान म्हणून विनामूल्य स्टाॅल उपलब्ध झाला. त्याचाही मोठा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले.

पृथ्वीराज फिल्टर टॅंक (तांत्रिक बाजू)

 • ‘एलएलडीपीइ’ घटकावर आधारित प्लॅस्टिकचा टॅंक. त्यात काळानुरूप तांत्रिक सुधारणा. दोन फिल्टर्स व द्रावण ढवळण्यासाठी स्टरर.
 • फिल्टरद्वारे बाहेर येणारे द्रावण पूर्णपणे चोथाविरहित द्रवरूप. ते ठिबक सिंचन यंत्रणेत ‘चोकअप’ होण्याचा धोका नाही.
 • ड्रिपद्वारे शेणखत दिल्यानंतर टॅंकमध्ये मागे राहिलेला चोथा, काडीकचरा काढण्यासाठी "बॅक फ्लश'ची सुविधा
 • सुमारे दहा ते पंधरा वर्षे टिकण्याची टॅंकची क्षमता
 • मोठा फिल्टर (१० ते २० एकरांसाठी लागू) - साठवण क्षमता १६०० लिटर. छोटा फिल्टर- (आठ एकरांपर्यंत काम करतो.) - साठवण क्षमता- ९०० लिटर.

फायदे
शेणखत, जीवामृत किंवा तत्सम सेंद्रिय स्लरी घटक संपूर्ण शेताला किंवा फळबागांमध्ये मजुरांकरवी देणे अत्यंत कष्टाचे, वेळखाऊ व खर्चिक.
मात्र फिल्टर टॅंक तंत्रज्ञानाद्वारे एकाच जागेवरून हे घटक एक एकरापासून ते १०, २० व अगदी ४० एकरांपर्यंत पिकाच्या थेट मुळांपर्यंत ड्रिपद्वारे देता येतात.
कडूनिंब, करंज, शेंगदाणा अशा विविध पेंडी, लेंडीखत, मासोळीखत, दशपर्णी अर्क, पंचगव्य आदी घटकही स्लरीद्वारे देणे शक्य.
श्रम, वेळ, मजुरीबळ, रासायनिक खतांचा वापर, त्यावरील व एकूणच उत्पादन खर्चात बचत.
जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब, जमिनीत गांडुळे, लाभदायक जीवाणू यांची संख्या वाढते.
जमीन भुसभुशीत होते.

संशोधनाला पुरस्कार, पेटंट

 • सन २०१२ मध्ये नाबार्डतर्फे घेण्यात आलेल्या ‘रुरल इनोव्हेशन’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत तनपुरे यांच्या संशोधनाचा गौरव. तंत्राचे पेटंट घेण्यासाठी तनपुरे यांचा अर्ज प्रक्रियावस्थेत.

अनुभव शेतकऱ्यांचे
तनपुरे संशोधित फिल्टर टॅंकचा वापर करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रातिनिधिक अनुभव असे.

डाळिंबाची गुणवत्ता वाढली
पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध लेण्याद्री गणेश मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या गोळेगाव येथील रमेश मेहेर यांची प्रयोगशील बागायतदार म्हणून त्यांची अोळख आहे. डाळिंब १० एकर, द्राक्षे अडीच एकर, गुलाब १० गुंठे तर ऊस दोन एकर असे त्यांचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. डाळिंब व द्राक्षाचे एकरी साधारण १० टन उत्पादन ते घेतात. निर्यातक्षम वा रासायनिक अवशेषमुक्त पद्धतीने मेहेर शेती करतात. आपले अनुभव सांगताना मेहेर म्हणाले, की फिल्टर टॅंकच्या माध्यमातून दोन वर्षांपासून सेंद्रिय स्लरी झाडांच्या थेट मुळांजवळ ठिबकद्वारे देणे शक्य होत आहे.

हे होताहेत फायदे
१) पूर्वी डाळिंबाचे एकरी उत्पादन ५ ते ७ टनांच्या पुढे जात नव्हते. एकूण व्यवस्थापनाला सेंद्रिय निविष्ठांची जोड मिळाल्यानंतर एकरी १० टन उत्पादनापर्यंत पोचणे शक्य झाले. प्रतिझाड ४० किलो उत्पादन मिळते.
२) पूर्वी मजुरांकरवी स्लरी प्रत्येक झाडाला देणे अत्यंत अडचणीचे ठरायचे. तो त्रास आता वाचला आहे.
३) सेटिंगचा काळ वगळता सेटिंगनंतर रेस्टिंग पीरियडपर्यंत सुमारे दहा महिने स्लरीचा वापर होतो. पूर्वी पाच एकराला महिन्याला चार हजार रुपये रासायनिक खतांवर खर्च यायचा. आता पाच महिन्यांमध्ये हाच खर्च सुमारे २० हजार रुपयांपर्यंत वाचवणे शक्य झाले आहे.
४) चुनखडीयुक्त जमिनीत पूर्वी पांढरी मुळी चालत नव्हती. बाग ४० टक्के पिवळी दिसायची. आता सेंद्रिय घटक पुरेशा प्रमाणात मिळू लागल्याने बाग हिरवीगार झाली आहे.
५) स्लरीद्वारे जीवामृत व त्यासह पॅसिलोमायसीससारख्या जैविक कीडनाशकाचा वापर थेट मुळापर्यंत केल्याने सूत्रकृमीचे नियंत्रण झाले. झाडाची प्रतिकारक्षमता व सशक्तपणा वाढला.
६) जमिनीत गांडुळांची संख्या, जमिनीचा भुसभुशीतपणा वाढला. फळाची गुणवत्ता, चव यातही फरक पडला आहे.

संपर्क - रमेश मेहेर - ९८८१०९१३५७
 
कांद्याला फायदेशीर
पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील मेमाणवाडी येथील रामदास निवृत्ती वारे यांची १४ एकर शेती आहे. सुमारे दीड ते दोन वर्षांपासून ते द्रवरूप स्लरीचा वापर ड्रिपद्वारे करीत आहेत. ते म्हणाले की स्लरीच्या वापराने रासायनिक खतांची गरज होते. पांढऱ्या मुळीची वाढ चांगली होते. पीक किडी-रोगाला कमी बळी पडते आणि पर्यायाने पिकाची वाढ चांगली होते, असे अनुभवण्यास आले आहेत.

कांद्याचा उल्लेखनीय अनुभव
मागील हंगामात सव्वा एकराला थोड्या कमी क्षेत्रावर रब्बी कांदा घेतला. त्यात रासायनिक खतांच्या वापरापेक्षा शेणखत, कोंबडीखत व स्लरीच्या वापरावर भर दिला. कांद्याला रोप फुटून आल्यानंतर १५ दिवसांनी, गाठ धरताना व वाढीच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजे काढणीच्या एक महिना आधी अशी तीन वेळा द्रवरूप स्लरी दिली. एकूण व्यवस्थापन चांगले ठेवले. पूर्वी कांद्याचे एकरी २०० ते ३०० बॅग्जपर्यंत उत्पादन मिळायचे. या प्रयोगात ४०० बॅग्जपर्यंत उत्पादन मिळाले. कांद्याचा आकार एकसमान होता.

गुणवत्तापूर्ण डाळिंब
डाळिंबाचे सहा एकरांपर्यंत क्षेत्र आहे. मागील हंगामात पीकवाढीच्या प्रत्येक विशिष्ट अंतराने त्याला १० ते १२ वेळा स्लरी दिली. पूर्वी २०० ते २५० ग्रॅम वजनाच्या फळांचे वजन ५०० पासून ते ७०० ग्रॅमपर्यंत वाढले. प्रतिझाड ३५ किलो उत्पादन मिळाले आहे.

स्लरी देण्याची वेळ
वारे म्हणतात की पंधरवड्यातून किंवा महिन्यातून स्लरी दिली. उसातही वापर समाधानकारक आढळला. फिल्टर टॅंकद्वारे एकसमान दाबाने स्लरी शेतात सर्वत्र जाते. शिल्लक राहणारी रबडी डाळिंबाच्या बेडवर टाकली आहे.

आता शेतात गांडुळे दिसतात
वारे म्हणाले की सन १९९० च्या आधी जी शेती पाहण्यात होती त्यात गांडुळे दिसायची. त्यानंतर ती अदृश्यच झाली होती. स्लरीच्या वापराने व रासायनिक खतांचा वापर कमी केल्याने शेतात गांडुळे दिसू लागली आहेत. कडक माती भुसभुशीत झाली आहे.
 
कांद्याचे दर्जेदार उत्पादन

पुणे जिल्ह्यातील पारगाव सालोमालो (ता. दौंड) येथील अत्यंत प्रयोगशील व अभ्यासपूर्ण शेती करणारा युवा शेतकरी इश्वर अनिल वाघ आपली १६ एकर शेती बंधू यांच्या साथीने कसतो आहे. त्यांनी मागील जानेवारीत लागवड केलेल्या कांद्याला प्रत्येक महिन्यात एकदा अशी चारवेळा स्लरी दिली. यात रोप लागवडीनंतर १५ दिवसांनी, त्यानंतर अनुक्रमे ३५, ७० व ९० दिवसांनी वापर केला. एकूण व्यवस्थापनही अत्यंत चोख होते. सेंद्रिय घटक ड्रिपद्वारे थेट पिकांच्या मुळांजवळ पोचल्याचा फायदा झाल्याचे वाघ सांगतात. कांद्याचे वजन ४०० ते ५०० ग्रॅमपर्यंत भरले होते. अर्थात त्यामागे एकूण व्यवस्थापनही कारणीभूत आहेत. दरवर्षी एकरी सरासरी उत्पादन १८ ते २० टनांपर्यंत मिळते. या प्रयोगात ते २१ टनांपर्यंत पोचल्याचे वाघ म्हणाले. त्यात बहुतांश माल ए ग्रेडचाच होता.

इश्वर सांगतात स्लरीची निरीक्षणे
१) सेंद्रिय घटकांच्या वापराने चाळीतील कांद्याची टिकवण क्षमता वाढली.
२) रोपांची मर कमी झाली. पांढऱ्या मुळीची वाढ चांगली झाली.
३) रासायनिक खतांवरील एकरी १५ हजार रुपये खर्च वाचला.
४) उसाबरोबर १० गुंठे बेणेमळा, जनावरांचा चाराही आहे. त्यासाठी द्रवरूप स्लरीचा वापर केला. उसात स्लरीचा वापर केल्याने कांड्याची जाडी वाढली. उन्हाळ्यात पाण्याअभावी उसाचे शेंडे एरवी करपतात. मात्र त्यांचे प्रमाण कमी होते. पानांची रुंदीही वाढली होती.
५) स्लरी द्रावणातून तयार होणाऱ्या रबडीत मोठ्या आकाराची गांडुळे तयार झालेली पाहण्यास मिळाली. आता गांडूळखताचे बेड तयार केले आहेत..
६) फ्लाॅवर पिकातही पानांची जाडी चांगली होती.
७) सुमारे १६ एकरांत रासायनिक खतांवरील मोठा खर्च कमी होत आहे.

स्लरीत काय असते? देशी गायीचे शेण, गोमूत्र, कडधान्यांचे पीठ, वडाखालची माती आदी घटक.

संपर्क - सुभाष तनपुरे - ९४२३७५२५१७

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...