नव्याने लागवड केलेल्या फ्लाॅवरच्या पिकात पंडीतराव काळे
नव्याने लागवड केलेल्या फ्लाॅवरच्या पिकात पंडीतराव काळे

तीस वर्षांच्या अनुभवातून फ्लॉवर पिकात मिळवली हुकूमत

जालना जिल्ह्यातील वडिगोद्री येथील पंडीतराव काळे यांनी किमान ३० वर्षांपासून फ्लॉवर शेतीत सातत्य ठेवले आहे. या पिकात त्यांनी हुकूमत तयार केली आहे. खरीप व रब्बी अशा दोन हंगामात ते या पिकाचा हंगाम साधतात. व्यापाऱ्यांबरोबरच नजिकच्या गावांमध्ये आठवडी बाजारात विक्री साधून त्यांनी बाजारपेठ हस्तगत केली आहे. सोबत कांदा, कलिंगडाचीही यशस्वी शेती केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने व वास्तव्याने पुनीत झालेलं गाव म्हणजे जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील वडीगोद्री. येथील काळे हे शेतीतील प्रयोगशीलतेला वाव देणारे कुटुंब. पारंपरिक शेतीला जोड देताना मोसंबी, कलिंगड, कांदा, भाजीपाला आदी पिके त्यांनी घेतली. 'फ्लाॅवर' पिकाशी त्यांचे किमान ३० वर्षांपासून नाते जडले आहे. काळे कुटुंबातील पाच भावंडे विभक्‍त झाली. मात्र, या पिकाशी जुळलेली नाळ कायम आहे. या भावंडांपैकी पंडितराव यांनी केवळ उत्पादनापुरते मर्यादित न राहता थेट विक्रीचेही काम केले. त्यामुळे दराच्या चढ उतारीचा प्रश्न फारसा भेडसावला नाही. काळे यांची शेती व पीकपद्धती पारंपरिक पिकांत ज्वारी, बाजरी, कपाशी, हरभरा, गहू, तूर आदी पिके घेतली जायची. शेतीतील उत्पन्नाच्याच जोरावर पंडितराव काळे यांनी चार एकरांची शेती आज १० एकरांपर्यंत नेऊन ठेवली आहे. त्यांचे धाकटे चिरंजीव सुरेश यांचे बीएडपर्यंत शिक्षण झाले आहे. ते समाजसेवेत कार्यरत असतात. त्यांच्याकडे कुटुंबातील व्यवहार सांभाळण्याची तर मोठा मुलगा अशोक यांच्याकडे शेतीची मुख्य जबाबदारी आहे. सध्याची पिके

  • मोसंबी -४ एकर
  • कपाशी - ३ एकर
  • ऊस - ५ एकर
  • फ्लाॅवर - २ एकर
  • ज्या वेळी शेती एकत्रित होती त्या वेळीही फ्लाॅवर असायचा. त्याचे बियाणे त्या काळी पोष्टाद्वारे उत्तर प्रदेशातून बोलावले जायचे. प्रसंगी नाशिकवरून आणल्याशिवाय पर्याय नव्हता असं काळे सांगतात. कुटुंब विभक्‍त झाल्यानंतर पंडितराव यांच्या वाट्याला चार एकर शेती आली. त्यात वांगे, टोमॅटो, मेथी फ्लाॅवर अशी पिके घेण्यास सुरवात केली. यातही दोन एकर क्षेत्र फ्लाॅवरसाठीच राखीव असायचे. दोन हंगामात लागवड फ्लाॅवरची पावसाळी व हिवाळी अशा दोन हंगामात लागवड केली जाते. पावसाळ्यात जूनच्या तिसऱ्या आठवड्यात तर हिवाळ्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या- दुसऱ्या आठवड्यात करण्याचे नियोजन असते. कपाशीतही आंतरपीक म्हणून त्याचा प्रयोग पूर्वी दोन वेळा केला आहे. पानांचे खत - दुहेरी उपयोग फ्लाॅवरची पाने जागेवरच कुजविण्याचे तंत्र अवलंबिले आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत होते. शिवाय पाने कुजल्यानंतर येणारा गंध शेतात रानडुकरांना येण्यापासून रोखत असल्याचे आढळले असे पंडीतराव म्हणाले. एकरी साधारण २० ते २५ टन उत्पादन मिळते. हंगामनिहाय त्यात फरक राहतो. दिवाळीच्या दरम्यान दर अधिक राहतात. रोपानिर्मिती करण्याला प्राधान्य गादीवाफ्यावर रोपनिर्मिती करण्याला प्राधान्य असते. लागवडीपासून ६० ते ६५ दिवसांनी उत्पादन सुरू होते. साधारण एकूण तीन महिन्यांत प्लॉट संपून जातो. हिवाळी हंगामातील फ्लाॅवर मात्र तयार व्हायला अधिक काळ लागतो. आर्थिक हातभार आजवरच्या फ्लाॅवर शेतीच्या प्रवासात किलोला चार रुपयांपासून ६० ते क्वचित प्रसंगी ७०, ८० रुपयांपर्यंत दर मिळविल्याचे काळे सांगतात. अर्थात दर पूर्ण पडण्याच्या वेळेसही त्यांना सामोरे जावे लागले. परंतु, घरचे दैनंदिन खर्च भागवण्यामध्ये फ्लाॅवरने हातभार दिला नाही असं कधीच झालं नसल्याचे ते म्हणाले. सर्व अनुकूल असल्यास दोन एकरातंल्या फ्लाॅवरने काहीवेळा ८० हजार ते एक लाख रुपयांपर्यंतही उत्पन्न त्यांना दिलं आहे. मार्केट मिळवले साधारणपणे फ्लाॅवरची विक्री पानांसहीत करण्याकडे विक्रेत्यांचा कलं असतो. दूरवरच्या बाजारात फ्लाॅवर विक्रीस न्यायचा तर दर्जावर परिणाम होऊ नये म्हणून तसा पाठविण्याचा मार्ग पुढे आला. परंतु, लोकल मार्केटला ताजा फ्लाॅवर नेणे शक्‍य असल्याने पानांविना विरीचा मार्ग पंडीतराव यांनी निवडला. साहजिकच त्यांच्या फ्लाॅवरला ग्राहकांकडून पसंती मिळत गेली. ती आजही कायम आहे. आपल्या जवळपास ३० वर्षांच्या अनुभवात थेट विक्रीसाठी पंचक्रोशीतील काही बाजारांची निवड केली. काही बाजार दोन वेळा करण्यालाही प्राधान्य दिले. यात वडिगोद्री, सुखापुरी, पाचोड, गोंदी, विहामांडवा, गेवराई, अंबड आणि शहागड आदी प्रमुख बाजार आहेत. मुले अशोकराव व सुरेशराव उत्पादित माल बाजारात पोचविण्याची जबाबदारी पाहतात. मात्र, लागवडीपासून ते विक्री, मार्केटिंगपर्यंत सर्व बाबींवर पंडितरावांचे नियंत्रण असते. ए ग्रेडचा माल अधिक मागील डिसेंबरमध्ये जवळपास पाच एकरांवर कलिंगडाचा प्रयोग केला. त्यातून एकूण ८० टन उत्पादन मिळाले. साडेतीन ते साडेपाच रुपये प्रतिकिलोप्रमाणे विकलेल्या कलिंगडामध्ये एकरी जवळपास १२ टन माल ए ग्रेडचा होता. सन २०१६-१७ दरम्यान दोन एकरांत खरीप कांदा घेतला. त्याचे एकूण ४५ क्‍विंटल उत्पादन मिळाले. सन २०१३-१५ या काळात दहा गुंठे वांगीही घेतली. शेतीतील अन्य वैशिष्ट्ये

  • एक मालकीची तर दोन सामायिक विहिरी
  • पाॅवर टीलर, ट्रॅक्‍टर
  • खास पंजाबमधून आणलेल्या मळणीयंत्राद्वारे दोन वर्षांपासून दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामधून बाहेर पडणारे धान्य काडी कचराविरहीत असल्याने ते शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरल्याचे पंडितराव यांनी सांगितले.
  • मोसंबीचा आधार सन २०१२ व १३ या दोन वर्षांत प्रतिवर्ष दोन एकर मोसंबी लागवड केली. सन २०१६ व २०१७ मध्ये एकरी १४ टन उत्पादन मिळाले. यंदा लगडलेली फळे पाहता किमान ३० ते ३५ टन उत्पादनाची आशा पंडितरावांना आहे. संपर्क : पंडीतराव काळे, ९८८१११६४५५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com