केवळ ठेवली जिद्द म्हणूनच हाती आले यश

शेततळ्याचा सुयोग्य वापर करून राधेश्याम कोळकर यांनी डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन घेतले.
शेततळ्याचा सुयोग्य वापर करून राधेश्याम कोळकर यांनी डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन घेतले.

पाण्याशिवाय शेती, त्यातही फळबाग अशक्‍यच. आधीच कोरडवाहू भाग. त्यात पाऊस दरवर्षी अधिकच तोकडा झालेला. तरीही डाळिंबाच्या चार एकरांतील बाराशे झाडांचे यशस्वी संगोपन करण्याची जिद्द जालना जिल्ह्यातील वाकुळणी येथील राधेश्‍याम दगडू कोळकर यांनी दाखवली आहे. पावसाचा अंदाज घेऊन शेततळ्यात पावसाचे पाणी साठवून, प्रसंगी पाणी विकत घेऊन त्यावर बहर नियोजन करून उत्पादन घ्यायचं त्यांचं शास्त्र कमालीचं आहे.   जालना जिल्हा मुळातच कोरडवाहू. त्यातच अलीकडील काळात दुष्काळाची वर्षे वाढलेली. त्यामुळे शेतीत नेमकं पिकवायचं काय आणि हाताला नेमकं लागेल काय हेच समजणं शेतकऱ्यांना अवघड झालं आहे. बदनपूर तालुक्यातील वाकुळणी येथील राधेश्‍याम कोळकर यांची बारा एकर शेती आहे. या शेतीत पूर्वी मुख्य पीक कापूसच पिकायचे. बीटी तंत्रज्ञान अवगत केलेल्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या वेळी ठिबकवरील कपाशीसाठी शेततळ्याची योजना होती. त्यातूनच कोळकर यांनी २००९ मध्ये ३० बाय ३० मीटर आकाराचे शेततळे घेतले. त्या भरवशावरच ते कपाशीचं पीक घ्यायचे. कालांतराने दुष्काळ, उत्पादनात आलेली घट यामुळे पर्यायी पिकांचा शोध ते घेऊ लागले. डाळिंबाची केली निवड दरम्यानच्या काळात शिवाजी तावरे व बाळू उकिर्डे यांचे डाळिंब पिकाविषयी मार्गदर्शन लाभले.त्यातून २०१३ मध्ये डाळिंबाचा पर्याय निश्चित केला. पाण्याची मजबूत सोय अजूनही झालेली नव्हतीच. पण, केवळ शेततळ्यात असलेला आठ ते दहा फूट पाण्याचाच काय तो आसरा होता. त्या भरवशावर ठिबकच्या साहाय्याने बारा एकर शेतीपैकी चार एकरांवर सुमारे १२५५ रोपांची लागवड केली. त्यासाठी दीड ते दोन फूट उंचीचे बेड तयार केले. पाण्याचे नियोजन पहिल्याच वर्षी लागवडीपासून शेततळ्यातील पाण्याचा थेंब न् थेंब कसा कारणी लागेल याचा ध्यास घेतला. त्यातून जूनअखेरपर्यंत चार एकरांतील फळबागेला पाणी पुरविले. दरम्यान, पाण्याच्या चांगल्या नियोजनामुळे एकूण लागवडीपैकी बाराशे झाडे जगवण्यात कोळकर यांना यश आले. त्यानंतरच्या पहिल्याच पावसात इंजिन लावून शेतालगतच्या नाल्यावर असलेल्या बंधाऱ्यातील वाहत्या पाण्यातून शेततळे भरून घेतले. त्या आधारे पुढील जूनपर्यंत बाग जगविली. मृग बहाराचे नियोजन डोळ्यांसमोर होते. पहिलं आश्वासक उत्पादन पाण्याच्या सर्व समस्यांशी झुंजताना सुरवातीचे चार एकरांतील उत्पादन होते एकरा टनांपर्यंत. कशाबशा पाण्याच्या भरवशावर डाळिंब घेणाऱ्या कोळकर यांनी विक्रीच्या थेट फंदात न पडता बाग बागवानाला थेट आठ लाख रुपयांत देऊन टाकली. पुन्हा शेततळे भरले, पुन्हा आश्वासक उत्पादन पहिलं उत्पादन आल्यानंतर उत्साहात थोडी वाढ झाली होती. दुसऱ्या वर्षी शेतालगतच्या नाल्यावरून वाहत्या पाण्यातून पावसाळ्यात पुन्हा शेततळे तुडुंब भरून घेतले. पुन्हा जूनमध्ये पावसाचा अंदाज घेऊन दोन- तीन दिवस आधी पानगळ करून घेतली. मृग बहराचे नियोजन केले. पुन्हा पहिल्या वेळेप्रमाणे कष्ट, जिद्दीला निसर्गाची साथ मिळाली. या वेळी एकूण क्षेत्रातून २८ टन उत्पादन घेतले. या डाळिंबाला ८० ते ९५ रुपये प्रतिकिलो दरही मिळाला. उत्पादित मालापैकी जवळपास सात टन माल निर्यातक्षम असल्याने एका कंपनीमार्फत निर्यातही झाली. तिसऱ्या वर्षी जून- जुलैमध्ये पावसाने खोडा घातला. मग मात्र मृग बहराच्या नियोजनात अडथळा आला. परंतु पाऊस येण्याचा अंदाज घेऊन पानगळ करून घेतली होती. प्रचंड कठीण परिस्थितीतही नातेवाईक विजय कोळकर यांच्या शेतातून पाणी घेतले. एकूण २० ते २२ टन उत्पादन घेतले. यंदाही चांगले उत्पादन यंदा पुन्हा एकदा शेततळे भरून घेतले. ज्या वेळी शेततळ्यात काहीच पाणी शिल्लक राहिले नव्हते, अशा वेळी ते विकतही घेतले. आज हीच सकारात्मकता कोळकर यांना पुढे घेऊन गेली आहे. चार एकरांतून ४२ टन उत्पादन घेतले आहे. अजूनही काही उत्पादनाची आशा आहे. यंदाही विजय कोळकर यांच्याकडून पाणी घ्यावे लागले. त्यासाठी सुमारे पंधरा हजार रुपये खर्च करावे लागले. यंदा ६१ रुपये प्रतिकिलो दर त्यांना मिळाला आहे. यंदा एकूण क्षेत्रातून सुमारे १५ ते २० लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. कोळकर यांच्या शेतीतील ठळक बाबी

  • बागेत स्लरी वापर करण्यावर अधिक भर. तीन वेळा स्लरीचा वापर
  • प्रत्येक वर्षी प्रतिझाड २० किलो शेणखत. त्यासाठी ७० हजार ते एक लाख लाख रुपयांपर्यंत खर्च
  • केवळ बेसल डोसपुरताच रासायनिक खतांचा वापर
  • तीन ते चार मजुरांना दररोज मिळते काम
  • मजुरांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पत्नी छायाताई यांच्याकडे
  • डाळिंबाबरोबरच कपाशी, ज्वारी, सोयाबीन अशी परिस्थितीनुसार घेतली जातात पिके.
  • कपाशीचे व सोयाबीनचे एकरी सहा ते सात क्विंटल उत्पादन
  • सध्या केवळ डाळिंबाच्या चार एकर क्षेत्रावरच ठिबक -
  • अॅग्रोवन’चे नियमित वाचक
  •  संपर्क- राधेश्‍याम कोळकर - ९१५८७४८१११

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com