ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक स्वावलंबन

ब्लॉक प्रिंटिंग करताना महिला सदस्या.
ब्लॉक प्रिंटिंग करताना महिला सदस्या.

पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत हातमागावरील कापडाचे उत्पादन होते. अशा कापडावर ब्लॉक प्रिंटिंग करून मूल्यवृद्धी करण्याचे काम अकोल्यातील महिलांचा वेव्ह हा बचतगट करत आहे. या महिलांनी प्रतिष्ठेचे सिल्कमार्क हे मानांकन मिळवले असून, अगदी सैन्यदलाला सातत्यपूर्ण दुपट्टे पुरवण्यापर्यंत मजल मारली आहे. यातून या अकरा गृहिणी महिलांना आर्थिक स्वावलंबनाची दिशा गवसली आहे. अकोला येथील अनघा दीक्षित यांनी एम.एस्सी (टेक्सटाईल) पर्यंत शिक्षण झाल्यानंतर नागपूर येथील बिझांनी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. त्या फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रम शिकवत. महाविद्यालयांतर्गत कमवा आणि शिका या योजनेमध्ये कापडावर ब्लॉक प्रिंटिंगला प्रोत्साहन देण्यात आले होते. त्यानिमित्ताने आवश्यक कापड मिळवण्याच्या उद्देशाने अनघा दीक्षित यांचा भंडारा व वर्धा जिल्ह्यांतील हातमाग व्यावसायिकांशी संपर्क झाला. पूर्व विदर्भातील हातमाग व्यवसायाची चांगली माहिती झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन त्या अकोल्यात परतल्या. महिलांसाठी कापडावरील ब्लॉक प्रिंटिंगचे प्रशिक्षण महिलांना देण्यास सुरवात केली. याला महिलांचा प्रतिसाद मिळत होता. कपड्यावर ब्लॉक प्रिंटिंग करून, त्याची विक्री करण्यासाठी २०१३ मध्ये सुरवात केली. अनघा दीक्षित यांच्या घरातच हे काम केले जाई.

वेव्ह बचत गटाची स्थापना ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने अनेक महिलांनी यात काम करण्याची तयारी दर्शविली. व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवलाचा प्रश्‍न होता. तो दूर करण्यासाठी बचत गट उभारण्यात आला. सुरवातीला दीपाली रावदेव, मृण्मयी बोबडे, प्रियंका रामटेके, अंजली अतकरे, प्रांजली हरकरे, केतकी देसाई, धनश्री कुळकर्णी, आशा मानकर, दीपाली रावदेव, अनघा दीक्षित, सौ. रामटेके अशा अकरा महिलांनी महिना ५०० रुपये बचत सुरू केली. त्यानंतर २०१६ मध्ये वुमेन अॅट वर्क फॉर आंत्रप्रेन्युअरशीप अॅँड एम्प्लॉयमेंट (वेव्ह) या महिला स्वयंसहायता समूहाची उभारणी झाली. कामाने वेग घेतला. अगदी कामासाठी जागा अपुरी पडू लागली. या वेळी अकोल्यातील प्रा. डॉ. अंजली कावरे यांनी आपल्या घराच्या परिसरातील कारशेडची जागा व्यवसायाकरिता निःशुल्क उपलब्ध करून दिली.

असा चालतो व्यवसाय

  • व्यवसायाकरिता वर्षाला दीड हजार मीटर कापड लागते. भंडारा जिल्ह्यातील हातमागधारकांकडून हे कापड मागवले जाते. आवश्यकता वाटल्यास अनघा दीक्षित स्वतः जाऊन नवीन कापड, पॅटर्न यांची माहिती घेतात. आधुनिक फॅशन क्षेत्राकडून मागणी होऊ शकेल, अशा नवीन पॅटर्नच्या कापडांची मागणी नोंदवली जाते. संबंधित हातमागधारकांच्या बॅंक खात्यात थेट पैसे जमा केले जातात.
  • हातमागावर विणलेल्या या कापडावर ब्लॉक प्रिंटिंग केले जाते. प्रिंटिंगसाठी पिगमेंट डायचा वापर होतो. ते इंदूर, अहमदाबाद या भागांतून मागवले जात असल्याचे अनघा दीक्षित सांगतात.
  • बचत गटातील सर्व अकरा महिला सदस्य यात काम करतात.
  • मानाचा सिल्कमार्क ज्याप्रमाणे सोन्याचे प्रमाणीकरण हॉलमार्कद्वारे केले जाते, त्याच धर्तीवर सिल्क कापडाला वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून सिल्कमार्क दिला असते. पश्चिम विदर्भातील अशाप्रकारचा सिल्कमार्क मिळविणारा अकोल्यातील वेव्ह हा एकमेव गट ठरला आहे. सिल्कमार्क असलेले कापडात भेसळ राहत नाही. सिल्कचे कापड ५०० ते ७०० रुपये मीटर असते. याउलट काही भेसळयुक्‍त साड्यांची विक्री अवघ्या एक हजार रुपयात होते. त्यामुळे भेसळमुक्त सिल्कसाठी सिल्कमार्क असलेले कापडच खरेदी करण्याचे आवाहन अनघा दीक्षित करतात.

    असे आहेत दर

  • सध्या कॉटन साडीची रेंज एक ते तीन हजार रुपये अशी आहे. तर कॉटन सिल्क साडी २८०० ते ६००० रुपये असा प्राथमिक दर आहेत.
  • सिल्क साडीला सोनेरी काठ असल्यास अशा साड्या सहा ते सात हजार रुपयांना विकल्या जातात.
  • ब्लॉक प्रिंटिंगवर सरासरी ४०० रुपये खर्च होतो. त्यासोबत अशा साड्यावर काही वर्कदेखील केले जाते. परिणामी, मजुरीचे दर वाढतात.
  • साडी, कुर्ती, दुपट्टे, कुर्ती मटेरियल, जॅकेट याचे उत्पादन होते. उरलेल्या कापडातून तोरण, कुशन्स व इतरही अनेक प्रकारच्या वस्तू तयार होतात. -लहान मुलींचे फ्रॉक तयार करून त्याच्याही विक्रीवर भर दिला आहे.
  • अशी होते विक्री ब्लॉक प्रिंटिंग केलेल्या कापडाच्या विक्रीसाठी थेट मार्केटिंगचा पर्याय अवलंबण्यात येतो. त्याकरिता वस्त्र प्रदर्शनाची मदत घेतली जाते. नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, बुलडाणा, पुणे, नाशिक, जळगाव या जिल्हयांमध्ये अशाप्रकारचे प्रदर्शन दर महिन्याला एक याप्रमाणे भरविले जाते. एका प्रदर्शनातून सरासरी ६० हजार ते दोन लाख रुपयेपर्यंतच्या कापडाची विक्री होते. पुण्यातील विविध सोसायट्या तसेच क्‍लब हाऊसमध्येदेखील विक्री करत असल्याची माहिती त्यांनी दिली. सैन्यदलाकडून दुपट्टे पुरविण्याचे कंत्राट सैन्य मुख्यालयांना भेटी देणाऱ्या विदेशी पाहुण्यांसोबतच्या महिला सदस्यांना स्टोल (दुपट्टे) भेट देण्याची प्रघात आहे. हे दुपट्टे पुरविण्याचे कंत्राट अकोल्यातील वेव्ह गटाला मिळाले आहे. गेल्या काही वर्षांपासून या पुरवठ्यात सातत्य असून त्याबद्दल सैन्य दलाकडून सन्मानपत्रही गटाला दिले आहे. नुकतीच विशाखापट्टणम येथे नेव्ही मीट आयोजित केली होती, त्यात १३६ देशांच्या सैन्यदलांचा सहभाग होता. यामध्ये महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग दालन मांडण्याचा मान वेव्ह गटाला मिळाल्याचे अनघा दीक्षित अभिमानाने सांगतात. महिलांना मिळाला रोजगार अनघा दीक्षित यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व महिला मध्यमवर्गीय गृहिणी आहेत. कामानुसार गटातील सदस्यांना मोबदला निश्चित केला असून, प्रतिमाह सरासरी पाच ते सात हजार रुपयांपर्यंत मोबदला मिळतो. या व्यवसायातून आर्थिक स्वावलंबन शक्य झाले आहे. व्यवसायाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, त्यानुसार भविष्यात आपल्या पतीची मदतही घ्यावी लागेल. सध्या त्यांचे पती वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. एका छोट्याशा सुरवातीलाच यश मिळाल्यामुळे या महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. अन्य बचतगटांनाही यातून प्रेरणी मिळू शकेल, असा आशावाद वाटतो. भंडारा जिल्ह्यातील कोसा सिल्क प्रसिद्ध पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात टसर रेशीम उत्पादन होते. पूर्वी केवळ ढिवर समाजातील व्यक्‍तींकडूनच परंपरागत पद्धतीने होत असलेल्या या व्यवसायात अन्य समाजातील लोकही उतरले आहेत. टसर रेशीम उत्पादनामध्ये भंडारा जिल्ह्यातील तुमसर, आंधळगाव, पवनी निष्ठी, मोहाडी ही गावे आघाडीवर आहेत. वर्धा जिल्ह्यातही अनेक गावांमध्ये चरख्यावर सूत कताई केली जाते किंवा बाजारातून सूत विकत आणून हातमागावर खादी व अन्य कापडाची निर्मिती केली जाते. भंडारा जिल्ह्यात खड्डा लूम प्रसिद्ध असून, पूर्वी या व्यवसायात अनेक कुटुंब कार्यरत होते. मात्र, नवीन पिढी या व्यवसायात उतरत नाहीत. परिणामी, जुन्या पिढीतील विणकरांवरच हा व्यवसाय तग धरून असल्याचे अनघा दीक्षित सांगतात. देशभरातील अनेक भागांमध्ये येथील कापडाचा पुरवठा होतो. अनघा दीक्षित, ९८९०५३९८०३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com