छोट्याशा झाडगावात रेशीम शेतीतून समृध्दी

रेशीम शेतीने काय दिले? रेशीम व्यवसाय वाढीस लागल्याने झाडगावचे अर्थकारण हळूहळू बदलले. यातील उत्पन्नाच्या बळावर गावातील अनेकांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित करण्यावर भर दिला. पारंपरिक पिकाच्या भरवशावर हे कधीच शक्‍य झाले नसते, असे शेतकरी सांगतात. भोजराज म्हणाले, की याच शेतीच्या बळावर दोन मुलांना इंजिनिअरिंगचे शिक्षण दिले. दहा लाख रुपयांचे शेड बांधले. फोर व्हीलर घेतली
धनेश्‍वर पानसे यांनी रेशीम कोष उत्पादनात सातत्य ठेवले आहे.
धनेश्‍वर पानसे यांनी रेशीम कोष उत्पादनात सातत्य ठेवले आहे.

सिंचन सुविधांचा अभाव, कोरडवाहू परिस्थिती आणि पारंपरिक पीकपद्धतीच्या गर्तेत अडकलेल्या झाडगाव (जि. वर्धा) येथील शेतकऱ्यांना रेशीम शेतीच्या माध्यमातून संपन्नतेची दिशा मिळाली. गावातील भोजराज भागडे यांनी सुमारे बारा वर्षांपूर्वी रेशीम शेतीत पाऊल टाकले. त्यातून यशस्वी होत अर्थकारण सक्षम केले. इतरांकडून या प्रयोगशीलतेचे अनुकरण झाले. आज गावाचा चेहरामोहरा पालटण्यास सामूहिकता व प्रयोगशीलता याच बाबी कारणीभूत ठरल्या आहेत. वर्धा या जिल्ह्याच्या ठिकाणापासून सुमारे १० किलोमीटरवर झाडगाव हे छोटे गाव आहे. येथील बहुतांश ग्रामस्थांच्या उपजीविकेचे साधन शेती आणि शेतमजुरीच होते. सिंचनाच्या पुरेशा सुविधा नसल्याने कपाशी, तूर यांसारख्या पिकांवरच भिस्त होती. भागडे यांची प्रयोगशीलता गावातील भोजराज भागडे अत्यंत प्रयोगशील वृत्तीचे शेतकरी. पारंपरिक पीकपद्धतीतून काहीच हाती लागत नसल्याने नवा मार्ग ते शोधत होते. झाडगावपासून सुमारे १२ किलोमीटरवरील वायफड गावाने रेशीम शेतीत नाव मिळवले होते. भोजराज यांनी तेथील शेतकऱ्यांकडून रेशीम शेतीचे ठोकताळे जाणून घेतले. त्याचे मार्केट अभ्यासले. त्यानंतर जिल्हा रेशीम कार्यालय, कृषी विभागाच्या संपर्कातून या शेतीशी संबंधित तांत्रिक बाबी जाणून घेतल्या. रेशीम शेती आपल्या समृद्धीचा राजमार्ग ठरू शकतो, असा विश्‍वास त्यांना आला. त्यांनी धाडसाने हा पर्याय निवडला. जिद्द, सातत्य व चिकाटीतून रेशीम शेतीत स्थैर्यही मिळवले. भागडे यांची रेशीम शेती

  • पूर्वी-  सुरवातीला ५ अंडीपुंज व एक एकर तुती लागवडीतून रेशीम शेतीला सुरवात.
  • यात यश मिळत गेले तसे टप्प्याटप्प्याने पारंपरिक पिकांखालील क्षेत्र कमी केले.
  • आत्ता

  • ५०० ते ६०० अंडीपुंजांची प्रतिबॅच
  • तुतीचे क्षेत्र - पाच एकर
  • वर्षातील एकूण बॅचेस - सुमारे सात ते आठ
  • अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा भोजराज यांची रेशीम शेती दररोज जवळून अभ्यासत असलेल्या गावातील शेतकऱ्यांना त्यांचा आदर्श घ्यावा असे वाटू लागले. त्यानंतर एक-एक करीत आजमितीला वीस ते बावीस शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत. शेतकऱ्यांचा हा कल पाहता जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती, उपविभागीय कृषी अधिकारी जी. आर. कापसे, कृषी सहायक अंकुश लोकरे यांच्या पुढाकाराने अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. लातूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, पंढरपूर भागातील रेशीम व्यावसायिकांच्या शेतांना या दौऱ्यात भेट देण्यात आली. मार्केटिंगचे धडे घेतले गावात आज सुमारे ३५ हेक्‍टरवर तुती लागवड आहे. रेशीम उत्पादकांची संख्या तर वाढली; पण उत्पादित रेशीम कोषांच्या विक्रीचा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर होता. सुरवातीला बाजारपेठांची पुरेशी माहिती नव्हती. त्या वेळी १४५ ते १७० रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे रेशीम विभागाला कोषविक्री करण्यात आली. दरम्यान, गावातील रेशीम उत्पादकांची संख्या पाहिल्यानंतर व्यापाऱ्यांचे गावात येणे सुरू झाले. त्यांनी कमी दराने कोष खरेदीचा सपाटा लावला. दरम्यान, झाडगावच्या शेतकऱ्यांना हैदराबाद व पुढे कर्नाटकातील रामनगर या प्रसिद्ध मार्केटची माहिती मिळाली. सामूहिकपणे होते कोषविक्री आज सुमारे चार ते पाच शेतकरी गटाने एकत्र येऊन रामनगर येथील बाजारात कोषविक्रीसाठी जातात. गावापासून हे ठिकाण तब्बल ११०० किलोमीटर आहे. मात्र, सुमारे १० क्विंटलपर्यंत माल सोबत असल्याने व दरही चांगले मिळत असल्याने वाहतुकीचे अर्थकारण परवडते, असे भोजराज म्हणाले. भोजराज यांनी सांगितले आपले अर्थकारण

  • साधारण ६०० अंडीपुंजाची प्रतिबॅच
  • त्यातून उत्पादन - साडेतीन ते चार क्विंटल
  • रामनगरसारखी बाजारपेठ, त्यामुळे तेथे मिळणारा दर - ४०० ते ५०० रुपये प्रतिकिलो
  • प्रतिबॅच - उत्पादन खर्च - उत्पन्नाच्या ४० टक्के
  • घरचे दोघे जण पूर्ण क्षमतेने लक्ष देत असले, तर एक एकर तुती लागवड सोपी होऊन जाते.
  • मजुरांची गरज कमी होते.
  • अंडीपुंजांसाठी व अन्य बाबींसाठी मिळते रेशीम उद्योगाचे अनुदान.
  • आणि लग्नाचे रेशीमबंध जुळले भोजराज म्हणाले, की मला दूरदर्शनचा सह्याद्री पुरस्कार मिळाला. त्या माध्यमातून माझी शेती, त्याचे व्हिडिअो अनेकांपर्यंत पोचले. दरम्यान, मोठ्या मुलाचे विशालचे लग्न जमवण्याचे प्रयत्न सुरू होते.यवतमाळमधील एक स्थळ चालून आले. त्यांच्या पाहण्यात माझ्या रेशीम शेतीचा व्हिडिअो आला. त्यांना तो खूप आवडला आणि पुढे ही दोन्ही घरे लग्नाच्या निमित्ताने एकत्र आली ती कायमचीच! शेतकरी प्रतिक्रिया नऊ वर्षांपासून रेशीम शेतीत सातत्य आहे. अडीच एकरांवर तुती लागवड होते. शेडसाठी सुमारे एक लाख रुपये खर्च आला. प्रतिबॅचमधून सव्वा क्‍विंटल कोषांचे उत्पादन मिळते. - धनेश्‍वर पानसे, ९७३००९२५७३ जेमतेम तीन एकर शेतीतील पारंपरिक पिकांतून अपेक्षित उत्पन्न होत नव्हते, त्यामुळे रेशीम शेतीकडे वळलो. आता पाच वर्षांपासून त्यात सातत्य आहे. या शेतीच्या माध्यमातून माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला आपल्या मुलाला इंजिनिअरिंगचे शिक्षण देणे शक्‍य झाले. - प्रभाकर शेंदरे गावातील अन्य शेतकऱ्यांचे अनुकरण करीत रेशीम शेती सुरू केली. आज त्यातून निश्चित समाधान कमावले आहे. - अशोक धोंगडे

    संपर्क- भोजराज भागडे - ९५२७०१४२४७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com