agricultural success story in marathi, agrowon,alandi, pune | Agrowon

सरपंचांनो... पाच वर्षांत जग बदलते; मग गाव का नाही...?
टीम ऍग्रोवन
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

जमीन मोजणी मोफत होण्याचा प्रस्ताव-
गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना गावशिवारातील जमिनीची निश्चित माहिती हवी असते. मात्र जमिनीची मोजणी झालेली नसल्यामुळे ग्रामपंचायतींना अडचणी येतात. मोजणीसाठी शुल्क आकारले जात असून, त्यामुळे मोजणी रखडते. त्यामुळे ग्रामविकासासाठी प्रोत्साहनाची बाब म्हणून ग्रामपंचायतींना सामूहिक जमीन मोजणी निःशुल्क करून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार आहे, अशी माहिती श्री. दळवी यांनी या वेळी दिली.

आळंदी, पुणे: पाच वर्षांत जग बदलते; मग सरपंच म्हणून तुम्ही गाव का बदलू शकत नाही, असा सवाल करीत “मी अधिकारी असूनही ३५ वर्षे लोकांसोबत काम करून माझे निढळ गाव पूर्ण बदलून टाकले. सरपंच म्हणून तुम्ही केवळ मिरवणार असाल तर पाच वर्षे केव्हाच निघून जातील, परंतु सचोटीने कामे करणार असाल तर तुम्हाला वेळ पुरणार नाही. आता तुम्हीच ठरवा की वेळ वाया घालवायाचा की संधीचे सोने करायचे, असे रोखठोक आवाहन पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले.

आळंदी येथे ‘सकाळ अॅग्रोवन’च्या सातव्या सरपंच महापरिषदेत "असं साकारलं समृद्ध गाव" या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी; तर स्वागत सरव्यवस्थापक प्रमोद राजेभोसले यांनी केले. साताऱ्याच्या खटाव भागातील निढळ गावात झालेल्या विकासाची चित्रफित श्री. दळवी यांनी सादर या वेळी सादर केली.
आयएएस अधिकारी असूनदेखील सरकारी चौकटीत राहून कष्ट व कौशल्याने सुधारणा घडवून आणण्यात श्री. दळवी यांना मिळालेले यश पाहून महापरिषदेतील उपस्थित सरपंच अवाक् झाले.

निढळ गावचा भूमिपूत्र म्हणून मी केवळ शहरी वातावरणात न रमता गावाच्या विकासासाठी सतत झटत होतो. सरपंचदेखील गाव बदलू शकतात. मी तुमच्या बरोबर आहे. काही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क (९८२२२२१६००) साधा. शक्य झाल्यास तुमच्या गावात येऊन संवाद साधेन, असे आश्वासन श्री. दळवी यांनी या वेळी दिले.

सरपंचाच्या पाठीशी गावाने उभे राहावे
गावातील सर्व घटकांनी सरपंचाच्या पाठीशी उभे राहणे अत्यावश्यक आहे. निम्मी शक्ती गावच्या राजकारणात जात असेल तर सरपंचाने गावचा विकास केव्हा करायचा असाही प्रश्न अनेक गावांमध्ये असतो. पण सरपंचांनी चिकाटी, प्रामाणिकपणा सोडू नये. ग्रामस्थ आपोआप तुमच्या बरोबर येतील, असा विश्वास श्री. दळवी यांनी दिला. साडेचार हजार लोकसंख्येचे निढळ दुष्काळी गाव होते. वर्षाला फक्त सव्वापाचशे मिलिमीटर पावसाच्या या गावाला १५ वर्षांपासून टॅंकरने पाणी आणले जायचे. आम्ही लोकसहभागातून जलसंधारणाची उत्तम कामे केली. आजही गावच्या विहिरी, बंधारे भरलेले आहेत. गावाला शंभर टक्के ठिबक संच वापराकडे नेत आहोत, असेही श्री. दळवी म्हणाले.

पद-प्रतिष्ठा बाजूला ठेवावी
गावात कामे करताना पद-प्रतिष्ठा याबाबी बाजूला ठेवाव्या लागतात. सनदी अधिकारी अजूनही दर महिन्यातून एकदा गावात जाऊन पायजमा-शर्ट घालून विकासकामे करतो. गावाला बदलविण्यासाठी सरपंचांनी आधी नियम, कायदे समजून घ्यावेत. संयम व सचोटीची जोड देत ग्रामसेवकाशी संघर्ष न करता त्याच्याशी समन्वयानेच कामे करावीत, असे श्री. दळवी यांनी नमूद केले.

हेतू स्वच्छ ठेवून बेधडक कामे करावीत
चिकाटीने पाठपुरावा केल्यास सरपंचाला निधी मिळत जातो. हेतू स्वच्छ ठेवला तर गाव बदलविण्यासाठी कामे बेधडक सुरू करावीत. अतिक्रमणे काढून विकास करावा. सरपंच आरक्षण पद्धतीमुळे तुम्ही असेही पुन्हा सरपंच होणार नाहीत. त्यामुळे पाच वर्षे लोकसहभागातून कामे केली तर ‘चांगला सरपंच’ म्हणून तुम्ही परिचित होतात. त्यामुळे पुढे जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्यत्वासाठी तुमचे नाव आपोआप घेतले जाते, असे सल्ला श्री. दळवी यांनी दिला.

 गावात सरपंचाने कसे वागावे? श्री. दळवी यांचा सल्ला

 • गावात लोकांशी नीतीने वागा.
 • सरळ मार्गाने गावात कामे करा
 • लोकांना देशाचे राजकारण कळत असते. त्यामुळे सरपंचाचा हेतू तर जनता पटकन ओळखते, त्यामुळे समाजकारणावर भर द्या.
 • सर्वधर्म, संप्रदाय, जाती-धर्मांशी सलोख्याने वागावे

कृषिकेंद्रित ग्रामविकासासाठी काय करावे?

 • गावशिवारात शेतीविकास, जोडधंदे यासाठी अभ्यास करून योजना सुचवाव्यात
 • सर्वप्रथम एसटी स्टॅंडचा प्रवेश रस्ता चांगला करून घ्यावा. त्यानंतर इतर रस्ते दुरुस्त करून घ्यावेत.
 • सांडपाणी व्यवस्थेसाठी गटार व्यवस्था, शोषखड्डे तयार करावेत.
 • घाणीचे साम्राज्य म्हणजे गाव ही व्याख्या बदलण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन करा.
 • गावच्या आर्थिक विकासासाठी पतसंस्था काढा, बॅंकेकडून पतपुरवठा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.
 • लोकवर्गणीतून शिक्षणविषयक कामे उभारावीत.
 • गावातून शहरात स्थलांतरित झालेल्या नोकरदारांना शोधा. त्यांना गावविकासात सामावून घ्या.

 काय करायचे राहिले याचा ‘सर्व्हे’ केला
निढळ गावाचा विकास पाहण्यासाठी देशपरदेशांतून लोक येतात. पाणलोट विकासाचा देशातील सर्वांत मोठा प्रकल्प व तोदेखील स्वयंसेवी संस्थे विना राबविण्याचा मान निढळ गावाला जातो. या गावाला डझनभर पुरस्कार मिळाले आहेत. सर्व कामे करूनदेखील अजून काय करायचे राहिले याचा खास ‘सर्व्हे’ निढळ गावाने केला. त्यामुळेच गावाची प्रगती सतत होत असल्याचे श्री. दळवी यांच्या मार्गदर्शनातून सरपंचांना दिसून आले.

सरपंचाने गावासाठी निधी कसा आणावा
सरपंचाने आधी प्रस्तावित योजनेसाठी अभ्यास करावा. जागेचा प्रश्न मिटवूनच आराखडा, प्रस्ताव तयार करावा. त्यानंतर निधीचा शोध घ्यावा. ग्रामपंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद स्वनिधीतून गावाला पैसे मिळू शकतो. जिल्हा परिषदेचा ग्रामनिधी पडून असतो. चौदाव्या वित्त आयोगातून पाच वर्षांच्या कामांसाठी पैसा मिळू शकतो. जिल्हा नियोजन समिती, पशुसंवर्धन,आरोग्य,कृषी विभागातूनही पैसा येतो. आमदार निधी, खासदार निधी, विशेष प्रस्ताव म्हणून निधी मिळवण्याचे मार्ग सरपंचांकडे आहेत. मात्र, त्यासाठी भरपूर पाठपुरावा करण्याची तयारी ठेवावी, असेही श्री. दळवी यांनी आपल्या भाषणात सांगितले.
 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
निवृत्त शिक्षक झाला प्रयोगशील शेतीतील...वडगाव निंबाळकर (ता. बारामती, जि. पुणे) येथील...
प्रयत्न, सातत्यामुळेच मिळाला...प्रयत्न व त्यात सातत्य हाच खरा तर यशाचा मंत्र आहे...
‘ए ग्रेड’ कलिंगड उत्पादनात राजेंद्र...नंदुरबार जिल्ह्यातील होळ येथील राजेंद्र पाटील...
शास्त्रोक्त व्यवस्थापनातून दुष्काळातही...औरंगाबाद जिल्ह्यातील शिरेगावचे अनिल रघुनाथ...
दुग्ध व्यवसायातून डौलापूरने उंचावला...दर आणि बाजारपेठ यांचा अभाव असल्याने कधीकाळी दुग्ध...
मित्रांची अशी दिलदारी म्हणूनच...मुंबईत माथाडी कामगार असलेले सुखदेव पाटील कंपनी...
शेडनेटमधील भरीत वांग्याची आश्वासक गटशेतीलोहा तालुक्यातील (जि. नांदेड) आधुनिक विचाराने...
उपकरण देईल आजारी जनावराची पूर्व सूचनाएसएनडीटी विद्यापीठाच्या मुंबईमधील प्रेमलीला...
युवकांनी घेतली ग्राम विकासाची जबाबदारीशेतकरी, शेतमजुरांच्या मुलामुलींना शालेय जीवनातच...
गिरणी उद्योगातून उभारला उत्पन्नाचा शाश्...जळगाव शहरातील पुष्पा विजय महाजन यांनी एका...
फळबागकेंद्रित नफ्याची शेतीपारंपरिक पिकांना वळण देत केशर आंबा, डाळिंब,...
शेतीत विविध प्रयोगांसह थेट विक्रीतून...पाथर्डी (जि. नगर) येथील पानखडे बंधूंनी नोकरी...
लाकडी घाण्यावर शुद्ध खाद्यतेलांची...ठाणे भागातील उपनगर डोंबिवली येथील सौ. हर्षदा...
शेकडो कुटुंबांचे स्थलांतर थांबले,...सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पांजरे (ता. अकोले, जि...
एकमेकांच्या साथीने शेती, घराला आणले...हिंग्लजवाडी (ता. जि. उस्मानाबाद) येथील सतीश व...
डाळिंबातून समृध्दी डाळिंब या पिकावर जिवापाड प्रेम करीत पंचवीस...
नोकरीपेक्षा शेतीतच केले उत्तम ‘करियर’कंपनीतील खासगी नोकरी सोडून पूर्णवेळ शेतीच...
एकात्मीक पद्धतीचा, मजुरांविना ४०...दुग्धव्यवसाय आतबट्ट्याचा असल्याची चर्चा अनेक...