agricultural success story in marathi, agrowon,banavadi, karhad, satara | Agrowon

कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा बनवडी गावचा आदर्श
हेमंत पवार
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

बनवडीतील कचऱ्याची समस्या सोडवण्यात ग्रामपंचायतीला यश आले आहे. वेळच्या वेळी कचऱ्याचे योग्य संकलन होऊन त्याची योग्य विल्हेवाट लागत अाहे. गावात अन्यत्र कचरा पडून राहत नाही. त्यामुळे दुर्गंधी, डास, रोगराई असे प्रश्‍नच निकाली निघाले आहेत.
आशा गुरव, ग्रामस्थ, बनवडी

राज्यातील प्रत्येक शहरासह गावासमोर सध्या कचऱ्याचा गंभीर प्रश्‍न उभा आहे; मात्र त्यावर प्रक्रिया करून पर्याय शोधण्याचे काम सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्‍यात असलेल्या बनवडी गावाने केले आहे. प्रक्रियायुक्त गांडूळखताचा वापर त्यामुळे वाढेलच, शिवाय ग्रामपंचायतीला त्यातून उत्पन्नाचे मोठे साधन निर्माण होणार आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीने घरबसल्या ऑनलाइन कर भरण्याची ई पेमेंट ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करणारी सातारा जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

सातारा जिल्ह्यात कऱ्हाड शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर वसलेले बनवडी सुमारे सात ते आठ हजार लोकसंख्येचे गाव आहे. कृष्णा नदीजवळच गाव असल्याने शेती बागायती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत विविध प्रयोग करत येथील शेतकरी आर्थिक सक्षम होत आहे. गावातील विकासकामांच्या माध्यमातूनही गावाने सातारा जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ऊस शेतीत अग्रेसर
बनवडीकर उसाची शेती मोठ्या प्रमाणात करतात. काळानुरूप तंत्रज्ञानाच्या जोरावर कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यामुळे एकरी उत्पादकता वाढण्यास मदत झाली आहे. गावामध्ये विकासकामे करताना राजकारण आड आणले जात नाही. त्यामुळे गावचा एकोपा कायम राहतो. शांतता आणि सलोखा अनेक वर्षांपासून कायम आहे.

कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी गावचा पुढाकार
आज राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींपुढे कचऱ्याची मोठी समस्या आहे. अनेक ठिकाणी तर पुरेशी जागाच नसल्याने कचरा टाकायचा कोठे? असा प्रश्न पडला आहे. नेमक्या याच बाबीचा विचार करून तो सोडवण्यासाठी गावातील काही बुजुर्ग मंडळींनी पुढाकार घेतला. त्यातील एक नाव म्हणजे बनवडीचे माजी सरपंच शंकरराव खापे. त्यांनी सरपंच सौ. उषा करांडे, उपसरपंच हारुण पठाण, ग्रामविकास अधिकारी एस. टी. लाटे व ग्रामपंचायत सदस्यांशी विचारविनिमय केला. त्यातून कचरा प्रक्रिया प्रकल्पाला दिशा देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, विस्तार अधिकारी श्री. सोनवले यांचे सहकार्य मिळाले. गावातील कचऱ्याचे गावातच विघटन करून त्यापासून खतनिर्मिती करण्याचा संकल्प करण्यात आला.

अभ्यास, भेट व जनजागृती
नवी मुंबई महापालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पासह वेंगुर्ला, पुणे यासह राज्यातील अनेक ठिकाणच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांना बनवडीच्या काही ग्रामस्थांनी भेटी देऊन अभ्यास केला. कचरा प्रकल्प साकारण्यासाठी ग्रामपंचायतीकडे जागा नव्हती. त्यामुळे ६० हजार रुपये दराने २० गुंठे जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली.

उपक्रमातील ठळक बाबी

  • पूर्वतयारी म्हणून ग्रामस्थांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासंदर्भात जागृती
  • ग्रामस्थांना त्यासाठी बकेट वाटप
  • या कामाची प्रत्यक्ष झाली अंमलबजावणी
  • गावातू संकलित झालेला ओला आणि सुका कचरा प्रक्रिया प्रकल्पात आणून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यापासून गांडूळखतनिर्मिती केली जाते.
  • सध्या कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी ४५ हजार रुपये खर्चून पंधरा बेड तयार करण्यात आले. त्यासाठी ६८ हजार रुपये खर्चून शेड उभारण्यात आले आहे.
  • सुमारे ९० दिवसांत गांडूळ कल्चर, व्हर्मी वॉश आणि खत असे मिळून वर्षाकाठी सुमारे साडेनऊ लाख हजार रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.

उत्पन्नाचे साधन तयार होणार
या प्रकल्पामुळे कचऱ्याची समस्या कायमची मार्गी लागेलच. शिवाय ग्रामपंचायतीलाही उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. ज्या ग्रामपंचायतींकडे जागा आहे, भांडवल आहे त्यांच्यासह ज्या ग्रामपंचायतींकडे भांडवल आहे; मात्र जागा नाही त्यांच्यासाठीही बनवडी आदर्शवत ठरले आहे. प्लॅस्टिक कचऱ्यासाठी ग्रामस्थांना कापडी पिशव्या वापरण्याची सवय लागावी, यासाठी ग्रामपंचायतीतर्फे सामाजिक बांधिलकीतून कापडी पिशव्यांचे वाटप केले जाते.

केळी उत्पादकांचे गाव
बनवडीत झपाट्याने नागरीकरण वाढत आहे; मात्र शेतकरीही बदलत आहेत. अलीकडेच तरुण शेतकऱ्यांनी उसाबरोबरच केळी उत्पादनावरही भर दिला आहे. गावातील बहुतांश तरुणांनी केळीच्या
शेतीतून चांगले उत्पन्नही कमावले आहे. त्यामुळे हे गाव केळी उत्पादकांचे म्हणूनही नावारूपास येत आहे. त्याचबरोबर भाजीपाला उत्पादनाकडेही कल वाढला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी प्रभाकर पाटील, कऱ्हाड तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली यांत्रिकीकरणाच्या योजनेतून अवजारांचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर ठिबक सिंचन योजना, शेतकरी बचत गटाला प्रशिक्षण, हरभरा बियाणे वाटप व प्रात्यक्षिक, वैरण विकासअंतर्गत प्रात्यक्षिक, कृषी दिंडी, खरीप हंगाम प्रशिक्षण आदी उपक्रम राबवले आहेत. त्याचाही फायदा पीक उत्पादनवाढीसाठी झाला आहे.

ग्रामपंचायतीत "ई "कारभार
ग्रामपंचायतीमध्ये कागदविरहीत कामकाज चालावे, यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सातारा जिल्ह्यात प्रथमच ग्रामपंचायतीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून ई कर भरणा प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मोबाईलद्वारेही ग्रामपंचायतीचा कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘ऑनलाइन’ यंत्रणेमुळे कारभारात पारदर्शकता आली आहे.

विजेची उपलब्धता
ग्रामपंचायत कार्यालयातील वीजबिल वाचावे आणि ते पैसे गावच्या सामाजिक कार्यात उपयोगास यावेत या हेतूने ग्रामपंचायतीत सौरऊर्जेवर आधारित विजेवर कामकाज सुरू करण्यात आले आहे. नेट मेट्रिंग पद्धतीने बसवण्यात आलेली ही यंत्रणा अल्पखर्चाची असून, त्यातून जादा झालेली वीज वीज कंपनीला थेट जाते, तर कमी पडणारी वीज खेचून घेतली जाते अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया... 
अनेक ग्रामपंचायतींसमोर सध्या कचऱ्याचा मोठा प्रश्‍न आहे. तो सोडवण्यासाठी आम्ही अनेक ठिकाणी कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेटी दिल्या. आमच्यासमोर जागेचा प्रश्‍न होता; मात्र ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भाडेत्त्वावर जागा घेऊन कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. त्यात ग्रामस्थांचाही सहभाग चांगला आहे. ओला व सुका कचरा वेगळा करण्याविषयी जनजागृती केली आहे. या प्रकल्पात एकवेळच अधिक गुंतवणूक करून अनेक वर्षे ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळण्याचे साधन तयार झाले आहे. अन्य ग्रामपंचायतींनीदेखील हा प्रकल्प राबवणे आवश्‍यक आहे.
-  शंकरराव खापे
प्रवर्तक, कचरा प्रक्रिया प्रकल्प
९५२७३१३३७५

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...