जलसंधारण, बहुवीध पीक पद्धतीतून धामणी स्वयंपूर्णतेकडे

जलमित्र पुरस्काराने गाैरव पाणलोटचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल जलसंपदा, मृद जलसंधारण विभागाच्या वतीने "जलमित्र" पुरस्काराने धामणी गावाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तर ग्रामविकासाच्या कामांमुळे ग्रामपंचायतीला आयएसआे प्रमाणपत्र मिळाले आहे. महात्मा गांधी तंटामुक्ती, पर्यावरण समृद्ध गाव, निर्मल ग्राम असे विविध पुरस्कारही मिळाले आहेत.
जलसंधारणाच्या कामांमुळे पाणी उपलब्ध होऊन गावात हिरवा चारा पिकू लागला आहे.
जलसंधारणाच्या कामांमुळे पाणी उपलब्ध होऊन गावात हिरवा चारा पिकू लागला आहे.

अनेक वर्षांपासून दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील धामणी गावाने जलसंधारणाच्या कामांमधून जलक्रांती केली आहे. पाणीपातळीत वाढ, बहुवीध पीकपद्धती, चारा पिके, दुग्धव्यवसाय, फळबागांद्वारे गावाने स्वयंपूर्णतेकडे वाटचाल केली आहे. पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात डाेंगर कुशीत वसलेले टुमदार गाव. सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू असायचे. मुळात गावात पावसाचे प्रमाण कमी. जो काही पाऊस पडायचा तो वाहून जायचा. पावसाच्या पाण्यावरच शेती अवलंबून असायची. ज्वारी, बाजरी यासारखी पारंपरिक पिके घेतली जात. पावसाचे दिवसेंदिवस घटलेले प्रमाण, उपलब्ध होणारा पाऊस, शेती आणि त्या अनुषंगाने अर्थकारण यांचा ताळमेळ कधीच बसला नाही. जलसंधारणात गावाचा पुढाकार दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या धामणीने लोकसहभागातून पाणलोट विकास कार्यक्रम हाती घेतला. त्याबाबत २६ जानेवारी २०११ च्या ग्रामसभेत निर्णय घेण्यात आला. म्हाळसाकांत पाणलोट समितीची अंकुश भूमकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली. सचिव म्हणून सुभाष जाधव तर शासन प्रतिनिधी म्हणून कृषी सहाय्यक डी. के. भोर यांची नियुक्ती करण्यात आली. अशी झाली पाणलोटाची कामे

  • समितीच्या माध्यमातून वाडीवस्त्यांवर जाऊन जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. सुरवातीला गावकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र चिकाटीने पाठपुरावा करीत राहिल्याने गावकऱ्यांचा प्रतिसाद मिळू लागला.
  • लाेकसहभाग आणि शासकीय याेजनांची अंमलबजावणी करत २०११ ते २०१६ या पाच वर्षांत ३९ लहान माेठ्या सिमेंट नाल्यांची कामे झाली.
  • आेढे नाले, रुंदी आणि खाेलीकरण ही कामे सुरू असताना अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात हाेत्या. बांधही काेरले जात हाेते. मात्र भविष्यातील पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन या शेतकऱ्यांनी कामांना मान्यता दिली. सन २०१६ च्या सर्वेक्षणानुसार भूजल पातळी ५.६ फुटांनी वाढली. एकूण पाणीसाठा ७१२ टीसीएम झाला.
  • ठिबक सिंचनाखाली आले क्षेत्र पहिल्या वर्षी जलयुक्तच्या कामांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीत समतल चर, बांध बंदिस्ती यासारखी कामे करण्यास अनुकूलता दाखवली. भूजलपातळीतही वाढ झाली. कधी काळी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होऊ लागले. ऐन उन्हाळ्यात शेतीला पाणी कमी पडू लागले. मग शेततळ्याची मागणी हाेऊ लागली. यानंतर कृषी विभागाच्या सहकार्याने शेततळ्यांची खोदाई सुरू झाली. उपलब्ध पाण्याच्या काटेकाेर वापरातून विविध पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. ठिबक सिंचनाकडे कल वाढला. टप्प्याटप्प्याने बहुपीक घेणारे गाव म्हणून धामणीची अोळख झाली. गेल्या तीन वर्षांत गावात ५९ शेततळी उभारली गेली तर ४० टक्के शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर सुरू केला. षी अधिकारी डी. के. भाेर, एम. सी. बाेऱ्हाडे, प्रकाश पवार, राजेंद्र देढे यांचे सहकार्य गावाला लाभले आहे. राेजगारासाठीचे स्थलांतर थांबले दुष्काळाच्या छायेत दहा वर्षांपूर्वी गावातील महिला राेजगारासाठी तालुक्याच्या ठिकाणी आणि परिसरातील बागायती गावात शंभर रुपये रोजगारीने कामाला जात. पाण्याच्या उपलब्धतेमुळे आपलीच शेती फुलवण्याचा आनंद त्या घेऊ लागल्या आहेत. पशुपालनामध्ये वाढ शेती आेलिताखाली आल्यानंतर उन्हाळ्यात चारा उपलब्ध हाेऊ लागला. त्यातून शेतकऱ्यांचा कल गायी, म्हशीपालनाकडे वाढला. पंधरा वर्षांपूर्वी असलेले अवघे तीनहजार लिटर दूधसंकलन आता १३ हजार लिटरपर्यंत वाढले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना पाचहजार रुपयांपासून ते २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. याबाबत पशुविकास अधिकारी डॉ. बी. जी. लामखडे म्हणाले की २०१२ च्या पशुगणनेनुसार दुधाळ पशुधनाची संख्या ७०० च्या आसपास हाेती. ती सुमारे पाचशेने वाढली आहे. नवीन पशुगणना अद्याप झाली नसल्याने नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र पशुवैद्यकीय सल्ला, उपचार आणि निदानासाठी शेतकरी म्हैस, गायी घेऊन येण्याचे प्रमाण वाढले आहे. जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या कामांमुळे हिरवा चारा उपलब्ध झाला. त्यातून पशुधनाचे आराेग्य चांगले राहात असून दूध देण्याची क्षमता वाढली आहे.

    प्रतिक्रिया  पूर्वी एक म्हैस आणि गाय हाेती. त्या वेळी दूध संकलन ५ ते १० लिटर हाेते. आता उन्हाळ्यात हिरवा चारा घेऊ लागल्याने चार संकरित गायी घेतल्या अाहेत. दरराेजच्या २० लिटर दूध संकलनातून महिन्याला सुमारे १० हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. - राजेश भगत संपर्क- ९५६१९६५१९९ ‘‘प्रामाणिक प्रयत्न असेल तर गाव तुमच्या पाठीशी उभे राहते. याचा प्रत्यय पाणलाेट समितीचे काम करताना आला. गावातील शेतकऱ्यांनी आेढे रुंदीकरण, खाेलीकरणासाठी आपले क्षेत्र जाऊ दिले. एकीमुळेच ३९ बंधारे बांधू शकलाे. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला.गावाची आेळख बहुविध पिके घेणारे म्हणून झाली आहे. गाव आणखी स्वयंपूर्ण करण्यावर भर आहे. -सुभाष जाधव ) सचिव, म्हाळासाकांत पाणलोट समिती संपर्क - ७३८७०४३५१५   राजकारणात काम करीत असताना, शासकीय अधिकारी आणि गावकऱ्यांचा विश्‍वास संपादन करून त्यांना आत्मविश्वास देणे गरजेचे आहे. हे काम पाणलाेट समितीच्या माध्यमातून केले. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या विविध याेजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करून गावे स्वंयपूर्ण कशी हाेतील याचे धामणी उदाहरण आहे. गावात ज्वारी, बाजरी या पारंपरिक पिकांशिवाय टाेमॅटाे, कलिंगड, गवार, भेंडी, काेबी, फ्लॉवर, मिरची आदी पिके ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरवर शेतकरी घेत आहेत. - रवींद्र करंजखेले  पंचायत समिती सदस्य. संपर्क - ९८९०८९२१३२

    गावातील सुविधा सुमारे साडेपाच हजार लोकसंख्येच्या गावात रयत शिक्षण संस्थचे उच्च माध्यमिक विद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोस्ट ऑफिस, केंद्र पातळीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वर्ग एक श्रेणीचा पशुवैद्यकीय दवाखाना, ‘अ’ दर्जाचे जयहिंद वाचनालय अशा विविध सुविधा आहेत. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, व जयहिंद वाचनालयाचे उद्‌घाटन ज्येष्ठ राजकीय नेते व तत्कालीन मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले आहे.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com