सिंचनक्षमता बळकट करून फळबागशेती केली विकसित

निर्यातक्षम केळीचे उत्पादन केळीची शेती पढावद भागात फारशी दिसत नाही. मात्र, पवार यांनी हे पीक टिकवण्याचा प्रयत्न करताना निर्यातक्षम उत्पादनही घेतले आहे. प्रतिझाड २३ किलोपासून ३२ किलोची रास मिळाली आहे. यंदा निर्यातक्षम केळीची भागातील प्रसिद्ध कंपनीने किलोला १२ रुपये दराने खरेदी केली.
रब्बी ज्वारीच्या (दादर) बीजोत्पादनाची बीज प्रमाणीकरण विभागाकडून पाहणी.
रब्बी ज्वारीच्या (दादर) बीजोत्पादनाची बीज प्रमाणीकरण विभागाकडून पाहणी.

केळीचे मुख्य पीक, त्याचे निर्यातक्षम उत्पादन, जोडीला विविध बीजोत्पादन आणि पपईचा आधार अशा पीकपध्दतीतून अवर्षणप्रवण पढावद (जि.धुळे) येथील पवार पिता पुत्रांनी फायदेशीर शेतीची घडी बसवली आहे. आपल्या पूर्ण ३७ एकरांत ठिबक सिंचनासह विहिरीत जलपुनर्भरणाचा प्रयोग करून जलस्राेत सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ उत्पादनावर भर न देता जमिनीची सुपीकता टिकविण्यावरही त्यांनी चांगलाच भर दिला आहे. . धुळे जिल्ह्यातील पढावद (ता. शिंदखेडा, जि.धुळे) हे अवर्षण प्रवण. गावशिवारात कोरडवाहू पिके अधिक असतात. फेब्रुवारीच्या दरम्यान हिरवेगार शिवार उजाड होण्यास सुरवात होते. गावातील प्रकाश पवार यांनी सुरवातीपासूनच प्रयोगशील शेतीची मनोवृत्ती ठेवत शेतीत सुधारणा सुरू केल्या. सन १९८८ च्या दरम्यान गावानजीकच्या पांझरा नदीत विहीर खोदली. नदीचे वाहणे बंद झाले तशी विहीरही बंद झाली. पवार यांच्या भिलाणे रस्त्यानजीक १५ एकर शेतातही त्याच सुमारास विहीर खोदली. तिलाही नंतर पाणी कमी होऊ लागले. या शिवारात केळी, पपईची शेती केली जाते. पवार यांना मुलगा शरद यांची समर्थ साथ शेतीत मिळते. पीकपद्धती व शेतीतील बदल

  • केळी व पपईला पाणी कमी पडू नये म्हणून सात वर्षांपूर्वी पाच इंची व्यासाच्या पाइपची जलवाहिनी तापी नदीवरून घेतली. पांझरा नदीला पाणी आल्यास नदी ओलांडून जाण्याचा मार्ग बंद होतो. मग सुमारे २१ किलोमीटर अंतर पार करून काही किलोमीटर असलेल्या उपसास्थळी जावे लागते.
  • संपूर्ण ३७ एकरासाठी ठिबक सिंचन
  • मुख्य पीक केळी. केळीनंतर पपई व त्यानंतर हंगामी पिकांचे बीजोत्पादन
  • केळीच्या दरवर्षी साधारण साडेपाच हजार उतीसंवर्धित रोपांची लागवड
  • खरिपात मूग, उडीद, रब्बीत हरभरा, ज्वारी
  • गावात जीवनधारा शेतकरी उत्पादक कंपनी कार्यरत. पवार त्याचे अध्यक्ष. कंपनीच्या माध्यमातून बियाण्याची विक्री
  • दरवर्षी पपईचे क्षेत्र सुमारे पाच एकर असते. यंदा ते सात एकर. पपईच्या रोपांचे उष्णतेपासून संरक्षण व्हावे यासाठी क्रॉप कव्हरचा वापर केला आहे. ‘बेड’वर डबल लॅटरलचा वापर केला आहे. मागील हंगामात पपईला प्रतिकिलो सरासरी सात रुपये दर मिळाला. दर्जेदार पपईची खरेदी व्यापारी थेट शेतात येऊन करतात.
  • पीकविमा या विषयात पवार यांचा गाठा अभ्यास आहे. या विषयावर त्यांनी ॲग्रोवनमधून सातत्याने लेखन केले आहे.
  • ठळक बाबी

    बीजोत्पादनातून दुप्पट फायदा बीजोत्पादनासाठी बियाणे परभणी, अकोला व राहुरी (जि.नगर) येथील कृषी विद्यापीठांकडून आणले जाते. बीजोत्पादन कसे परवडते याचे उदाहरण देताना पवार म्हणाले की मागील वर्षी हरभऱ्याला बाजार समितीत क्विंटलला ४५०० रुपये दर मिळाला. हाच दर बियाण्याला ९००० रुपये मिळाला. खर्च व क्विंटलला २५०० रुपये अनुदान या बाबींचा विचार करता बीजोत्पादनात दीडपट ते दुप्पट नफा मिळाला. यंदा पवार यांनी हरभऱ्याचे सुमारे नऊ एकरांत ५२ क्विंटल, चार ते पाच एकरांतील ज्वारीचे ५० क्विंटल बिजोत्पादन केले. तर ‘जीवनधारा’ कंपनीतर्फे मुगाचे ५४ क्विंटल व उडीदाचे सुमारे १२ क्विंटल बीजोत्पादन झाले. सेंद्रिय कर्ब वाढवला पूर्वी केळीच्या शेतातील सामू (पीएच) 8.3 होता. काळी माती असल्याने निचरा प्रमाण कमी होते. नंदुरबार व धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रानेही माती परीक्षण अहवाल दिला होता. या स्थितीत हिरवळीचे खत धैंचाची लागवड करून जमिनीत गाडण्याची प्रक्रिया सुरू केली. साधारण आठ एकरांत दरवर्षी धैंचाचा प्रयोग केला जातो. एकरी पाच ट्रॉलीपर्यंत शेणखताचा वापर सुरू केला. पपईचा बेवडही चांगला असल्याचा अनुभव पवार विशद करतात. निचरा होण्यासाठी गादीवाफ्याचा वापर सुरू केला. सर्व उपायांमधून पूर्वी ०.२ टक्के असलेला सेंद्रिय कर्ब ०.९ टक्क्यापर्यंत वाढल्याचे ते सांगतात. जलपुनर्भरण आपल्या क्षेत्रासह नजीकच्या पाच शेतकऱ्यांच्या शेतातील पाणीही आपल्या शेतात आणून विहिरीचे जलपुनर्भरण करून घेतले आहे. विहिरीभोवती वाळूचा मोठा भराव केला आहे. विहिरीत पाणी जावे यासाठी ठिकठिकाणी अडीच व तीन इंची व्यासाचे पीव्हीसी पाईप लावले आहेत. तापी नदीवरील जलवाहिनीला अडचण येऊन पाणीसमस्या उदभवली तर पढावदनजीकच्या शेतात एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारले आहे. त्यात प्लॅस्टिक पेपरचे अस्तरीकरण केले आहे. मागील वेळेस समस्या आल्यानेच शेततळ्यातील पाण्याचा वापर पपई व केळीसाठी केला. संपर्क- प्रकाश पवार- ८३०८४८८२३४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com