agricultural success story in marathi, agrowon,latur | Agrowon

प्रयोगशील शेतीविना जगणंच अशक्य
रमेश चिल्ले
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

 

शेतीसारखे समाधान दुसरे कुठे नाही
शेतीतले समाधान शब्दातीत आहे. आज शिवाजी पन्नास वर्षांचे असले तरी शरीर काटक, निरोगी ठेवले आहे. मन प्रसन्न, ताजेतवाने राहिल्याने कामात कंटाळा येत नाही. कुटुंबासह दर रविवारी दिवसभर शेतात घालवल्याने मुलांनाही शेतीची गोडी टिकून आहे. प्रत्येकाने किमान दहा टक्के क्षेत्रावर वनशेती किंवा अौषधी वनस्पतीची शेती करावी असे ते म्हणतात.

लातूर शहरात सुमारे २७ वर्षांपासून आपला वकिली व्यवसाय सांभाळत शिवाजी नागरगोजे यांनी शेतीचा व्यासंगही जोपासला आहे. वाइनच्या द्राक्षांचा प्रयोग त्यांना लाख रुपयांचे नुकसान करणारा ठरला; मात्र त्यातूनही सावरत केवळ शेतीच्या वेडापायी चंदनाचा प्रयोग त्यांनी साकारला आहे. जोडीला विविध पिके, शेततळे घेत विस्तार करीत शेतीवरील निष्ठा जपली आहे.

शेती हे असं क्षेत्र आहे की तिच्या प्रेमात पडणारा तिच्याशिवाय जगूच शकत नाही. निसर्गात, पशु-पक्ष्यांच्या सान्निध्यात धकाधकीच्या जीवनातून किमान तास, दोन तास व्यतीत करायला मिळण्यासारखे दुसरे समाधान नाही. अंगाला झोंबणारा गार वारा, गाई-बैलांना, पिकाच्या लुसलुसत्या कोंबांना, डोलणाऱ्या शिवाराला डोळे भरून पाहिले की सगळी दुःखं, चिंता, थकवा कुठल्याकुठं पळून जातात. अंगावर सूर्याची किरणं पडली, गाई-बैलांनी, कुत्र्याने कानं टवकारून शेपटी, मान हालवून मालकाला साद घातली की आपलीही कोणीतरी आठवण काढतं ही जाणीव लाखमोलाची वाटते. आजच्या आजूबाजूच्या कोरड्या, संवेदना बोथट झालेल्या शहरी जीवनात पदोपदी ही बाब जाणवते.

शहरापेक्षा शेतीचंच वेड जपलं
लातूर शहरातील शिवाजी नगरहरी नागरगोजे यांच्याबाबत अशीच काहीशी बाब आहे. शहरात राहायला असले व व्यवसायाने वकील असले तरी लहानपणापासूनच शेतीचे वेड जपलेले. त्यांचे मूळ गाव चाकूर तालुक्‍यात म्हाळंगी रामवाडी. तिथे वडिलोपार्जित सुमारे वीसेक एकर कोरडवाहू शेती. तिघे भाऊ. एक शिक्षक. एका भावाचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. एकत्र कुटुंबात तिथेही शेतीत वेगवेगळे प्रयोग करून चांगले उत्पादन घेतले. ऊस व हंगामी पिके केली. शिवाजी यांची सुमारे २७ वर्षे लातूरमध्ये वकिली व्यवसायात गेली. तसे वकिली पेशातून जास्त वेळ काढणे मुश्किल; पण शेतीची नाळ त्यांनी काही केल्या तुटू दिली नाही. लहानपणापासून शेतात नांगर, कुळव चालवले. पडेल ती शेतीकामे केली.

विकत घेतलेली शेती झाली प्रयोगशील
कामांचा व्याप वाढला. मग लातूरपासून सुमारे नऊ किलोमीटरवरील हरंगुळ बुद्रुक येथे २००४ पासून थोडी थोडी करीत १५ एकर शेती घेतली. साडेतीन किलोमीटरवरून मांजरा नदीतून भुईसमुद्रा केटीवेअरवरून पाइपलाइनने पाणी आणून विहिरीत साठवले. बोअर घेतला. ऊस लावला. पण खर्च-उत्पन्न बरोबर व्हायला लागले. मग २००७-०८ च्या दरम्यान सात एकरांवर वाइन द्राक्षाची वाय आकाराच्या मांडवावर लागवड केली. सन २०१३ पर्यंत बरे चालले होेते. नंतर मात्र दर पडले. वायनरी व्यावसायिक द्राक्षे खरेदी करेनात. पुढे कर्जावरचे व्याज वाढत गेले. सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचे नुकसान या शेतीत झाले.

द्राक्षानंतर चंदनाचा प्रयोग
वायनरी द्राक्ष शेतीत नुकसान आले तरी शिवाजी हिंमत हारले नव्हते. शेतीविषयक मासिके, वर्तमानपत्रे वाचणे, नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देणे, कृषी प्रदर्शनांना भेटी देणे, तज्ज्ञांशी चर्चा करणे, असे प्रयत्न, बोलणे चालू होते. सुरक्षित व शाश्‍वत दीर्घ मुदतीच्या शेतीचा शोध सुरू होता.अशातच चंदन लागवडीचा विषय समोर आला. बंगळूर, लखनौ येथे जाऊन संंबंधित संस्थांतील तज्ज्ञांच्या भेटी घेतल्या व चर्चा केली. त्याचे अर्थशास्त्र समजून घेतले. अखेर पूर्ण अभ्यासांती श्वेतचंदनाची २०१६ मध्ये १० बाय १२ फुटांवर सुमारे पाच एकरांत लागवड केली. कर्नाटक राज्यातील शिमोगा येथील एका नर्सरीतून वीस रुपयांना एक या दराने रोपे आणली.

चंदनात आंतरपिके
चंदन हे अर्धे परोपजीवी पीक आहे. त्याच्या जोडीला तूर, सोयाबीन ही पिके घेतली. चंदनाची सुमारे २९०० झाडे लावली होती. ती पुढे १९०० पर्यंत शिल्लक राहिली. मधली दोन रोपांतील मोकळी जागा खुणावत होती. अन्य खात्रीशीर अांतरपिकांचा शोध सुरू होताच.
त्यात मिलीया डुबिया या आधारासाठीच्या झाडांची लागवड केली. त्याचबरोबर शेवगा झाडे लावली. सुमारे १९०० पपईची झाडे लावली. मध्ये ६०० झाडे रक्तचंदनाची लावली. त्याला औषधी म्हणून जगभर मागणी आहे. पूर्ण वाढलेले खोड प्राणी खात नाहीत.

बहुगुणी मोहगुणी
चंदनाच्याच पाच एकरांत जागेचे नियोजन करून मोहगुणी या वृक्षाची सुमारे ५०० रोपे शिमोग्यातून दहा रुपये प्रतिनग या दराने आणून लावली. उच्च गुणवत्तेच्या फर्निचरसाठी त्याचा वापर केला जातो.
त्याचबरोबर बंदुकीचा दस्ता, जहाज बांधणीसाठीही त्याचा वापर होतो. सिल्वासा, दमण- दीव आदी भागांत त्याची असलेली लागवड शिवाजी पाहूनही आले. वीसेक वर्षांत पूर्ण वाढ झालेल्या या झाडाचे लाकूड दोन ते अडीच हजार रुपये प्रति घनफूट दराने विकले जाते असे जाणकार सांगतात. पुढील काळात हे पीक चांगले उत्पन्न देऊ शकेल, अशी शिवाजी यांचा अपेक्षा आहे.

कडुनिंबाचीही लागवड
शिवाजी यांनी विविध पिकांचे प्रयोग करण्याचे वेड काही सोडलेले नाही. शेती हे केवळ उत्पन्न देण्याचे साधन नसून ती आवडदेखील असल्याचे ते म्हणतात. चंदन शेतीत साधारण प्रत्येक चाळीस फुटांवर कडुनिंबाची सुमारे दीडशे झाडे लावली आहेत. पपईचेही उत्पादन आता सुरू होईल.
ठिबकवर वाटाणा- भाजीपालाही घेतला होता. कमी मजूरबळ लक्षात घेता येत्या काळात सीताफळाची लागवड ते करणार आहेत.

ऊस, शेततळे, मत्स्यपालन
चार एकरांवर ऊस आहे. अन्य हंगामी पिके घेतली जातात. मधला दुष्काळाचा काही कालावधी लक्षात घेता आता ५२ बाय ५५ बाय ८ मीटर आकाराचे सामुदायिक शेततळे प्लॅस्टिकसह कृषी विभागाच्या माध्यमातून घेतले. त्यात दहा ते अकरा कोटी लिटर पाणी साठते. ते पाणी फेब्रुवारी ते जूनपर्यंत वापरले जाते. अन्य वेळेत विहीर, बोअरचे पाणी उपयोगात आणले जाते. एक शेततळे विना प्लॅस्टिकचे असून, ते वाहून येणाऱ्या पाण्याने भरते. पावसाळाभर जमिनीत पाण्याचे पुर्नभरण झाल्याने चार ते पाच विहिरींचे पाणी वाढते. एक वर्षांपूर्वी राहू, मृगल व कटला जातीच्या साडेसात हजार माशांचे बीज नागपूरहून आणून शेततळ्यात टाकले आहे. आता एक किलो वजनापर्यंत मासे झाले आहेत.

शेतीतील समाधान
वकिली व्यवसाय रोजचा असला तरी सकाळी किंवा संध्याकाळी शेतातील फेरफटका चुकत नाही.
सेंद्रिय खतांच्या वापरावर अधिक भर असतो. लातूर शहरातील गोरक्षण संस्थेकडून दरवर्षी सुमारे २५ ट्रॅक्‍टर शेणखत आणून वापरले जाते. संपूर्ण क्षेत्र ठिबकखाली आणल्याने पाण्याची बचत होते.
शेतीतले समाधान शब्दातीत आहे. आज शिवाजी पन्नास वर्षांचे असले तरी शरीर काटक, निरोगी ठेवले आहे. मन प्रसन्न, ताजेतवाने राहिल्याने कामात कंटाळा येत नाही. कुटुंबासह दर रविवारी दिवसभर शेतात घालवल्याने मुलांनाही शेतीची गोडी टिकून आहे. प्रत्येकाने किमान दहा टक्के क्षेत्रावर वनशेती किंवा अौषधी वनस्पतीची शेती करावी असे ते म्हणतात.

संपर्क- शिवाजी नागरगोजे- ९४२२०७१५७७

(लेखक लातूर येथे मंडळ कृषी अधिकारी आहेत.)

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
गोकुळकडून गायीच्या दूध खरेदी दरात २...कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ)...
तीस टन हापूसची रत्नागिरीतून थेट निर्यातरत्नागिरी ः रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रातून...
उन्हाचा चटका; उकाडा नकोसापुणे : मे महिन्याच्या सुरवातीपासून कमाल तापमान...
पूर्वमोसमी वळीवाच्या सरींचाही दुष्काळपुणे: उन्हाच्या झळा वाढल्याने राज्याला तीव्र...
ग्राम स्तरावरील पीककापणी प्रयोग रद्द !पुणे: राज्यात येत्या खरिपात पीकविम्यासाठी ग्राम...
पराभव मान्य; पण लढाई संपलेली नाही... :...राज्यातील शेतकरी चळवळीचा चेहरा असलेले स्वाभिमानी...
दुधाचा कृशकाळ सुरू होऊनही दर कमीच !पुणे: दुष्काळामुळे दुधाचा कृशकाळ सुरू झालेला असून...
उष्ण, कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे: राज्यातील कमाल तापमानाचा पारा गेल्या काही...
एचटीबीटीविरोधात मोहीम तीव्र पुणे: राज्यात सुरू असलेल्या अनधिकृत तणनाशकाला...
फलोत्पादनासाठी अर्ज करण्यात नगर अव्वलनगर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत...
राज्यात पाणीटंचाईचा आलेख वाढताचपुणे: उन्हाचा चटक्याबरोबरच राज्यात पाणीटंचाईचा...
शेतकरी कंपन्या लातूरमध्ये उभारणार डाळी...लातूर : स्पर्धाक्षम बाजार घटक म्हणून शेतकरी...
देशातील जलाशयांमध्ये २१ टक्के पाणीसाठानवी दिल्ली ः उन्हाचा चटका वाढतानाच देशभरात...
नंदुरबारच्या दुर्गम भागात ‘सातपुडा भगर'...अक्कलकुवा तालुक्‍यातील आदिवासी महिला,...
गटशेती : काळाची गरजशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...
शिक्षण, आरोग्य अन्‌ प्रशिक्षणातून...नांदगाव (ता. बोदवड, जि. जळगाव) गावामध्ये विजय...
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...