agricultural success story in marathi, agrowon,usmanabad | Agrowon

‘मार्केट’ अोळखून ‘कडकनाथ’ कोंबडीपालन
सुदर्शन सुतार
मंगळवार, 29 मे 2018

कडकनाथ कोंबडी अौषधी गुणधर्माची असून, या व्यवसायाला बाजारात चांगली मागणी आहे.
एकही मजूर न ठेवता स्वबळावर सातशे कडकनाथ कोंबड्यांचे संगोपन करतो आहे, त्यासाठी वेळेचे नियोजन व व्यवस्थापन चांगले ठेवले आहे.
-रोहन दलभंजन

शेती किंवा संबंधित व्यवसायाची कोणतीही पार्श्‍वभूमी नाही. असे असतानाही उस्मानाबाद येथील रोहन विल्यम दलभंजन हा तरुण घर परिसरातच सुमारे सातशे कडकनाथ कोंबड्यांचा फार्म मोठ्या चिकाटीने चालवतो आहे. अभ्यास, व्यावसायिक वृत्ती हे गुण त्याला उपयोगी ठरले. हैदराबाद, सांगली आदी ठिकाणी अंड्यांसाठी त्याने मार्केट तयार केले आहे. एकाही मजुराची मदत न घेता या व्यवसायातून सुमारे ४० ते ५० टक्के नफा मिळवण्यापर्यंत रोहन यांनी यश मिळवले आहे.
 

उस्मानाबाद शहर परिसरात उपळा रस्त्यावर औद्योगिक वसाहतीच्या क्षेत्रामध्ये रोहन दलभंजन या तरुणाचा छोटेखानी मात्र व्यावसायिकदृष्ट्या कडकनाथ कोंबडीपालन व्यवसाय सुरू आहे. जिद्द, चिकाटी, शोधक वृत्ती व व्यावसायिकता हे गुण जपलेल्या रोहनने घर परिसरातील उपलब्ध जागेतच व्यवसाय थाटला आहे.

व्यवसायामागील पार्श्वभूमी
रोहन यांचे बीकॉमपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर ते पुणे येथे एका प्रसिद्ध ‘आयटी’ कंपनीत नोकरीस लागले. पगारही चांगला होता. सुमारे आठ वर्षे नोकरीचा अनुभव घेतला. मात्र व्यवसायाची अोढ अधिक होती. त्यातून स्वतःचा उद्योग सुरू करण्याची मनीषा होती. त्यातूनच मग राजीनामा देऊन रोहन यांनी २०१५ मध्ये आपले गाव गाठले.

उद्योगांचा बारकाईने अभ्यास
खरं तर शेती वा शेती व्यवसायाची काहीच पार्श्‍वभूमी नव्हती. वडीलही खादी वस्त्रांशी संंबंधित व्यवसायात होते. रोहन यांनी कोणत्या व्यवसायाला किती संधी आहे याचा बारकाईने अभ्यास केला.
त्यातूनच उस्मानाबादी शेळीपालन सुरू केले. पाच-सहा महिने व्यवसाय चालला. मात्र मजुरी तसेच काही तांत्रिक कारणांमुळे तो थांबवला.

कडकनाथ कोंबडीपालनाचे ध्येय
पुन्हा अभ्यास करता कडकनाथ या देशी व अौषधी कोंबडीला चांगली मागणी असल्याचे लक्षात आले.
काही पोल्ट्री शेड्‍सना भेटी दिल्या. त्यांचे संगोपन, मार्केट अशी माहिती घेतली. पण पिलांचा तुटवडा असल्याने सुरुवात २०० देशी कोंबड्यांच्या संगोपनापासून केली. यात कोंबड्यांचा आहार, पाणी, आजार यांचा अभ्यास झाला व अनुभवही आला.

‘कडकनाथ’चे संगोपन
सहा महिन्यांनंतर पहिल्या सर्व कोंबड्या विकून कडकनाथ कोंबडीपालन सुरू झाले. सुरुवातीला ५०० पिले होती. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ व फायदा लक्षात आल्यानंतर व्यवसायातील आत्मविश्‍वास वाढू लागला.

आजचा व्यवसाय दृष्टिक्षेपात

 • शेडची जागा एक हजार चौ. फूट
 • सुमारे अडीच ते तीन वर्षांच्या काळात कोंबड्यांची संख्या सुमारे - ७००
 • चोवीस तास पिण्याच्या पाण्याची व खाद्याची सोय.
 • शेडच्या पाठीमागे आमराई. त्यात दुपारच्या वेळेस कोंबड्या सोडल्या जातात. बाहेरची मोकळी हवा त्यांना मिळते. संध्याकाळी त्या पुन्हा शेडमध्ये येतात.
 • आहाराबाबत फार काळजी घ्यावी लागते. त्यासाठी वेळापत्रक ठरवले आहे. दिवसातून प्रतिकोंबडीला सकाळी आणि संध्याकाळी ११० ग्रॅम खाद्य दिले जाते. फार्ममध्ये वावरताना त्या पाणी आणि खाद्य घेऊ शकतात. मुक्तपणे फिरत असल्याने संगोपन आरोग्यदायी राहते.
 • कडकनाथ कोंबड्या काटक आणि चलाख आहेत. अन्य देशी कोंबड्यांप्रमाणेच त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आहेत. फार वेगळे संगोपन करावे लागत नाही.
 • थोड्या संवेदनशील असल्याने आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागते. त्यासाठी रोहन यांनी घरातच औषधांचा काउंटर तयार केला आहे. कोंबड्यांचे लसीकरण किंवा किरकोळ आजार असतील, तर शक्य ते उपचार स्वतः करण्यावर भर असतो. गरजेनुसार पशुवैद्यकाची गरज घेतली जाते.

अंडी साठवणुकीसाठी माठाचा प्रयोग
अंडी नियंत्रित तापमानात ठेवण्यासाठी काही व्यावसायिक वातानुकूलित यंत्रणेचा (एसी) वापर करतात. रोहन यांनी मात्र मातीच्या माठाला बाहेरून पोते गुंडाळून त्यामध्ये अंडी सुरक्षित ठेवण्याचा कमी खर्चिक, सुलभ प्रयोग केला आहे. त्यामुळे तापमान नैसर्गिकरीत्या नियंत्रणात राहताना अंडीही सुरक्षित राहण्यास मदत झाली.

उत्पादन, मार्केट, अर्थकारण

 • ५० टक्के- सातशे पक्ष्यांपैकी अंडी देणारे पक्षी
 • १५०- दररोज अंड्यांची उपलब्धता
 • ५००-आठवड्याची अंडी विक्री
 • १८ ते २० रु.- प्रति अंडे वार्षिक सरासरी दर
 • ४० ते ५० टक्के- व्यवसायातून नफा

मार्केट शोध

 • इंटरनेट
 • व्यापाऱ्यांशी संवाद

मार्केट

 • हॅचरी व्यावसायिक थेट ग्राहकांना (खाण्यासाठी)
 • हैदराबाद, सांगली, मिरज

मार्केटमधील चढ-उतार

 • नोव्हेंबर ते फेब्रुवारी या थंडीच्या काळात चांगला हंगाम. या हंगामात विक्री ७०० ते ८०० अंड्यांपर्यंत.
 • हंगामात प्रति अंडे दर ३० ते ३५ रुपयांपर्यंतही
 • किरकोळ विक्री ३५ ते ४० रुपयांपर्यंत

विक्री
एक दिवसीय पिलू-  दर ५० ते ६० रु.
सन २०१६ मध्ये  ५००, २०१७ मध्ये  ४०००
तर यंदा आत्तापर्यंत ३००. एकूण - २००० ते २३००

बिर्याणीची हातोहात विक्री
केवळ कोंबड्यांची पिले आणि अंडी विक्रीवर न थांबता रोहन यांनी पुढे जाऊन मार्केटिंगचे प्रयत्न केले. अलीकडे उस्मानाबाद येथे झालेल्या कृषी महोत्सवात कडकनाथ कोंबडीचा समावेश असलेल्या
बिर्याणीचा स्टॉल त्याने महोत्सवात लावला. खवय्यांनाही या अनोख्या प्रयोगाचे कौतुक वाटले. शंभर रुपये प्रतिप्लेट याप्रमाणे बिर्याणीची हातोहात विक्री होत पहिल्याच दिवशी चक्क दहा हजार रुपयांचे उत्पन्न रोहन यांनी कमावले. अंड्यांचीही विक्री झाली.

रोहन यांची गुणवैशिष्ट्ये

 • शेतीची पार्श्‍वभूमी नसताना पूरक व्यवसायातील धाडस
 • कमी भांडवलात अभ्यासातून टप्प्या-टप्प्याने व्यवसायवृद्धी
 • झोकून देऊन घेतलेले कष्ट, प्रामाणिकपणा
 • मार्केटिंगसाठी स्वतःचे कौशल्य, नावीन्यपूर्ण कल्पनांचा वापर

संपर्क - रोहन दलभंजन - ९८२३३५१४७१

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...