नगर ः सरकार शहरांचे पोषण करण्यासाठी खेड्यांचे शोषण करत आहे.
अॅग्रो विशेष
अनुभवाचे बोल
सुरंगीच्या रोजगारनिर्मितीचे विश्व उलघडताना या भागातील शेतकरी संजय गडेकर म्हणाले, की सुरंगी गोळा करण्याचे काम जोखमीबरोबर खर्चिकही आहे. यासाठी हंगामात प्रतिव्यक्ती प्रतिदिवस ९०० रुपये मजुरी पडते. सुरंगीला श्रावणात चांगला दर मिळतो; मात्र स्थानिक मार्केट ठराविक व्यापाऱ्यांच्याच हातात आहे. व्यवसायिक हनुमंत सातार्डेकर म्हणाले, की सुरंगीच्या कळ्या गोळा करण्याचे काम खूप जोखमीचे आहे. नंतरही त्या नीट सुकवून ठेवाव्या लागतात. कमी कालावधीत जास्त काम करायचे असते. सुरवातीला याला खूप दर मिळतो.
सह्याद्रीच्या कडेकपारीत शेकडो वैशिष्ट्यपूर्ण व बहुपयोगी वृक्ष आहेत. मात्र वृक्षतोड, अज्ञान अशा अनेक कारणांमुळे जंगली वृक्ष, प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावे आपल्या भागातील सुरंगी वृक्षाचे संवर्धन करीत आहेत. त्याला जिवापाड जपले आहे. विशेष म्हणजे आंब्याच्या या पट्ट्यात सुरंगी वृक्षाला व्यावसायिकतेची जोड देत रोजगारनिर्मिती साधली आहे. सुमारे ८०० कुटुंबांचे अर्थकारण या सुरंगीवर आज उभे आहे.
पश्चिम घाटात अनेक लक्षवेधी वृक्ष आहेत. सुरंगी हा त्यातीलच एक. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या गावांत सुरंगीचे वृक्ष आढळतात. यातले बरेचसे वृक्ष दोन-तीन पिढ्यांपूर्वीचे आहेत. वेणी, गजरा बनविण्यापुरता याचा वापर सर्वांना माहीत आहे. कोकणातील आरवली येथील प्रसिद्ध देवस्थान श्री देव वेतोबाला सुरंगीच्या फुलांची पूजा बांधण्याची प्रथा आहे. देवाला वाहण्यासाठी, विशेषतः रामनवमीत पूजेसाठी सुरंगीच्या फुलांचे विशेष महत्त्व असते; मात्र याही पलीकडे सुरंगीच्या सुकवलेल्या कळ्या, फुले यांच्या मार्केटचीही व्याप्ती पसरली आहे. मात्र, या झाडाविषयी अद्याप फारसे संशोधन झालेले नाही.
अशी आहे सुरंगी
सुरंगीचे झाड साधारण आंब्याच्या झाडासारखेच मोठे असते. ते सुमारे ७० वर्षे जगते. फेब्रुवारीच्या मध्यापासून मार्चपर्यंत साधारण दोन बहरांत फुलते. सकाळी दिसणाऱ्या कळ्य साधारण नऊ-दहा वाजेपर्यंत फुले होऊन जातात. परागकण मोठ्या प्रमाणात असणाऱ्या सुरंगीच्या पिवळसह पांढऱ्या फुलांचा सुगंध आसमंतात दरवळतो. एकदा झाड बहरू लागले की किमान दोन पिढ्यांच्या आयुष्यात त्याचा सुगंध दरवळत राहतो.
सुरंगीवर आधारलेली गावांची अर्थव्यवस्था
सुरंगी ही पश्चिम घाटाची मक्तेदारी आहे असे म्हणतात. मात्र, पूर्ण पश्चिम घाटात हा वृक्ष आढळत नाही. अर्थात यावर फारसे संशोधनही झालेले नाही; मात्र वेंगुर्ले तालुक्यातील काही गावांची अर्थव्यवस्था बरीचशी सुरंगीवर अवलंबून आहे. सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ले तालुक्यांतील काही भाग या झाडासाठी पोषक मानला जातो. आरवली, सोन्सुरे, टाक, आसोली, धाकोरे, फणसखोल, वडखोल, कोलगाव, आकेरी या गावांमध्ये सुरंगीची संख्या बऱ्यापैकी आहे. या भागातील जवळपास आठशे कुटुंबे सुरंगीच्या माध्यमातून आपले अर्थार्जन चालवतात. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केलेल्या प्राथमिक पाहणीनुसार जिल्हाभर सुरंगीच्या पसरलेल्या नैसर्गिक लागवडीचे क्षेत्र साधारण ४० ते ४२ हेक्टर असावे.
सुरंगीचे व्यावसायिक महत्त्व
वेंगुर्ले तालुक्यातील आरवली, सोन्सुरे, टाक, आसोली, धाकोरे, फणसखोल, वडखोल या सात गावांत खऱ्या अर्थाने सुरंगीचा व्यापारी दृष्टिकोनातून विचार होतो. कोलगाव, आकेरीत सुरंगीचे गजरे करण्याचा व्यवसाय चालतो. अन्य गावांत मात्र सुरंगीच्या कळ्या सुकवून त्या विकल्या जातात. एका मोठ्या झाडापासून दरवर्षी साधारण ३० ते ३५ किलो कळ्या मिळतात. याचा दर प्रतिकिलो सहाशे रुपयांपासून अडीचशे ते तीनशे रुपयांपर्यंत असतो. यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ८०० कुटुंबांचा सहभाग असतो. प्रतिकुटुंबाला यातून प्रतिहंगामाला पन्नास हजार ते दोन लाख रुपयांपर्यंतही उत्पन्न मिळू शकते. फुलांचा खरा हंगाम वर्षाला साधारण पंधरा ते वीस दिवसांचा असतो. प्रत्येकी सर्वसाधारण उत्पन्न दोन लाख रुपयांचे धरले तरी एकूण उलाढाल १६ कोटी रुपयांपर्यंत जाते. यासाठी झाडाची कोणतीही काळजी घ्यावी लागत नाही.
सुरंगीचा अन्य वापर
सुकलेल्या कळ्या आणि फुलांची स्थानिक पातळीवर खरेदी होते. यासाठी स्थानिक बाजारपेठ शिरोड्यात आहे. कळ्यांना जास्त तर फुलांना कमी दर असतो. हा माल हवाबंद करून साठवला जातो. दरानुसार मुंबईला पाठवला जातो. तेथून पुढील मार्केटचा ठावठिकाणा अद्याप समजलेला नाही. सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक औषधे, सुगंधी द्रव्ये, रंग आदींसाठी त्याचा वापर होत असल्याचे जाणकार सांगतात. सध्या सुरंगीची आवकच मर्यादित आहे. यामुळे बाजारपेठही मर्यादित आहे. शेतकरी आणि मुख्य बाजारपेठ यांना थेट जोडणारा दुवा नसल्याने याचे अर्थकारण ठराविक लोकांच्याच हाती राहते.
अनुभवाचे बोल
सुरंगीच्या रोजगारनिर्मितीचे विश्व उलघडताना या भागातील शेतकरी संजय गडेकर म्हणाले, की सुरंगी गोळा करण्याचे काम जोखमीबरोबर खर्चिकही आहे. यासाठी हंगामात प्रतिव्यक्ती प्रतिदिवस ९०० रुपये मजुरी पडते. सुरंगीला श्रावणात चांगला दर मिळतो; मात्र स्थानिक मार्केट ठराविक व्यापाऱ्यांच्याच हातात आहे. व्यवसायिक हनुमंत सातार्डेकर म्हणाले, की सुरंगीच्या कळ्या गोळा करण्याचे काम खूप जोखमीचे आहे. नंतरही त्या नीट सुकवून ठेवाव्या लागतात. कमी कालावधीत जास्त काम करायचे असते. सुरवातीला याला खूप दर मिळतो.
सुरंगीवरील अभ्यास
सुरंगी जंगली वृक्ष असल्याने वातावरणातील बदलांचा तो मुकाबला करू शकतो. ग्रामीण विकास क्षेत्रात काम करणाऱ्या लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन या संस्थेने २०१४ मध्ये यावरील संशोधनाला चालना दिली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने सुरंगीवर अभ्यास झाला. बऱ्याच प्रयत्नानंतर सुरंगीचे प्रमाणित रोप बनविण्यात यश आले. मात्र, अद्याप पुरेशा प्रमाणात ती बनविण्यात आलेली नाही. त्यामुळे ती सहज उपलब्ध नाहीत. संस्थेतर्फे त्याचे प्रशिक्षण नर्सरीधारकांना दिले जाणार आहे. यामुळे पुढच्या काळात सुरंगीची कलमे उपलब्ध होऊ शकतील.
तुझे आहे तुझपाशी
सुरंगीचे हे विश्व कृषी क्षेत्राला चालना देणारे आहे. आपल्या आजूबाजूला अनेक जंगली वृक्ष असतात. त्यांचा व्यावसायिक उपयोगही खूप असतो. मात्र कुठेतरीच बाजारपेठही उपलब्ध असते. ती शोधण्याचा फारसा प्रयत्न होत नाही. आपण अनेकदा त्याच त्या पारंपपिक पिकांमध्ये अडकलेले असतो. मात्र, नैसर्गिक व दुर्लक्षित जैवसंपत्तीचा, त्याच्या क्षमतांचा पुरेपूर वापर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. यातून अनेक दुर्मिळ वनस्पतींना संजीवनी मिळेल.
अर्थकारण
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरंगीचा व्यापार करणाऱ्या गावांची संख्या- ९
- प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभार्थी कुटुंबे-८००
- प्रत्येक कुटुंबाचे प्रतिहंगाम सरासरी उत्पन्न-सुमारे दोन लाख रु.
- प्रतिहंगाम वार्षिक उलाढाल- अंदाजे १६ कोटी रु.
प्रतिक्रिया
सुरंगीची लागवड पूर्ण पश्चिम घाटात होऊ शकते. लागवडीला चालना देणे गरजेचे आहे. उत्कृष्ट आंतरपीक ठरणाऱ्या सुरंगीमुळे मधमाश्यांची संख्या वाढून आंबा, काजू आदी पिकांना परागीकरणासाठी फायदा होऊ शकतो. सुरंगीसारख्या अनेक बहुगुणी वनस्पती आपल्या आजूबाजूला असतात. त्याची बाजारपेठ शोधून त्यातून रोजगार निर्मिती करता येऊ शकते. विशेषतः वनौषधी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या अनेक जंगली वनस्पती पश्चिम घाटात आहेत. मात्र, त्यांचा व्यावसायिक वापर होत नाही. ही स्थिती बदलून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करता येतील.''
- योगेश प्रभू, प्रकल्प व्यवस्थापक, लुपिन फाउंडेशन, सिंधुदुर्ग
सुरंगी हे संरक्षित करण्याची गरज असलेले झाड आहे. ते पश्चिम घाटातील सर्वच भागात येत नाही. प्रत्येक कुटुंबाने आपल्या परसबागेत दोन झाडे लावली तरी हा वृक्ष संरक्षित होईल. त्यातून त्या कुटुंबाला उत्पन्नही मिळेल. सुरंगी परागीकरणाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. यावर संशोधन करताना त्याची उंची कमी राहील व सहज त्याच्या कळ्या काढता येतील असा विचार हवा.
-डॉ. पराग हळदणकर, शास्त्रज्ञ,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ
कष्टाचे सुगंधी फळ
सुरंगीची उलाढाल कमी कालावधीत मोठी दिसत असली तरी त्यासाठीची मेहनत आणि जोखीम तितकीच आहे. सुरंगीचे झाड मोठे आणि पसरलेले असते. याच्या फांद्यांना फुले येतात. सकाळी दिसणाऱ्या कळ्या दहा वाजेपर्यंत फुलतात. त्याआधी त्या काढाव्या लागतात. याच्या फांद्या कमकुवत असतात. या झाडावर चढणेही अनुभवी आणि कसब असलेल्यांनाच शक्य होते. फुले छोट्या फांद्यांच्या खोडाला असल्याने ती काढणे कठीण असते. यासाठी झाडाला दोऱ्या बांधून ती काढावी लागतात. अगदी भल्या पहाटे या सगळ्या प्रक्रियेला सुरवात होते. या हंगामात सुरंगीच्या झाडावरून पडून जीवघेणी इजा झाल्याच्या घटना सऱ्हास घडतात. या झाडावर चढणाऱ्यांची मजुरी साधारण ६०० ते ८०० रुपयांपर्यंत जाते. ज्यांना कळ्या काढणे शक्य नाही ते झाडाभोवती शेणाचा सडा किंवा प्लॅस्टिकचे मोठे कापड पसरून ठेवतात. पडलेली फुले गोळा करून ती सुकवतात. सुरंगीची झाडे आंब्याप्रमाणे खंडाने देण्याचीही प्रथा आहे.
संपर्कः संजय गडेकर- ९४२१२३९४२२
शेतकरी, सोन्सुरे-आरवली
हनुमंत सातार्डेकर-८००७७१५०६१
सुरंगी खंड पद्धतीने घेणारे व्यापारी
योगेश प्रभू- ९४२२३७४०२०
प्रकल्प व्यवस्थापक, लुपिन फाउंडेशन
फोटो गॅलरी
- 1 of 289
- ››