वैविध्यतेने नटलेली १३ एकरांवरील सेंद्रिय शेती

जीवामृत तयार करताना सच्चिदानंद माळी
जीवामृत तयार करताना सच्चिदानंद माळी

लातूर जिल्ह्यातील अजनसोंडा (बु.) (ता. चाकूर) येथील शिवराम माळी यांनी पाच वर्षांपासून शंभर टक्के सेंद्रिय शेतीला सुरवात केली आहे. फळबागा, रोपवाटिका, शेळीपालन, रेशीमशेती, भाजीपाला गांडूळखत निर्मिती आदी विविध स्त्रोतांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण ठसा त्यांनी निर्माण केला आहे. आपल्या सेंद्रिय उत्पादनांची विक्री ते स्वतः बाजारपेठेत करतात. सेंद्रिय पद्धतीतून जमिनीची प्रतही सुधारण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातील अजनसोंडा (बु.) येथील शिवराम माळी हे सेवानिवृत्त तलाठी आहेत. त्यांची १३ एकर शेती आहे. त्यांना पूर्वीपासूनच शेतीची आवड असून नवे प्रयोग करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. सन २००४ मध्ये सेवानिवृत्तीनंतर ते पूर्णपणे शेतीकडे वळले. शेतीवर होणारा भरमसाठ खर्च व त्यातून मिळणारे उत्पन्न यामुळे शेतीचे अर्थकारण जुळत नव्हते. रासायनिक घटकांच्या अनियंत्रित वापरामुळे शेतीची प्रतही घसरली होती. परिणामी उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळत नव्हते. यावर उपाय म्हणून त्यांनी शेतीवरील खर्च कमी करण्याचा निश्चय केला.

सेंद्रिय शेतीवर दिला भर शिवराम यांना मुलांची समर्थ साथ मिळाली. सर्वजण एकमेकांच्या समन्वयातून शेतीत सुधारणा करू लागले. टप्प्याटप्प्याने रासायनिक घटकांचा वापर कमी करून सेंद्रिय पद्धतीचा अवलंब होऊ लागला. सन २०१४ पासून जवळपास १०० टक्के सेंद्रिय शेती सुरू झाली.  

माळी यांच्या सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये

  • शेतात मित्रकिटकांची संख्या वाढवली. त्याद्वारे किडींचे नियंत्रण सोपे होते.
  • पिकांचे अवशेष, पालापाचोळा जागेवर कुजवला जातो.
  • सेंद्रिय कर्ब ०.९ टक्के. जमिनीतील ह्युमसच्या प्रमाणात वाढ.
  • सन २०१४ नंतर मातीत रासायनिक घटकांचा जराही वापर नाही.
  • शेणखत, गोमूत्र, दशपर्णी अर्क, जीवामृत, गांडूळ खत आदींचा वापर
  • पाणीबचतीसाठी ठिबकचा वापर.
  • शेतीतील विविधता
  • रोपवाटिका सन २००२ मध्ये तीन एकरांत शासन प्रमाणीत ‘जय हनुमान केशर आंबा रोपवाटिका’ सुरू केली. त्यात केशर, मलगोबा अांबा, चिकू, डाळिंब, चिंच, एन ७ आवळा, कागदी लिंबू, शेवगा आदींच्या रोपांची निर्मिती होते. उत्कृष्ट दर्जाची रोपे मिळत असल्याने परिसरातून मागणी चांगली आहे.   अडीच एकरांत फळबाग पारंपरिक पिकांना बगल देत अडीच एकरांत फळबाग लागवड केली आहे. यात आंब्याची २१०, डाळिंब १२०, कढीपत्ता २५ तर चिकूची ४० झाडे आहेत. बागेतील मातृवृक्षांचा उपयोग कलमीकरणासाठी केला जातो. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली फळे असल्याने त्यांचा स्वाद चांगला असतो. मागणी जास्त असल्याने फळे हातोहात विकली जातात. मागील हंगामात प्रति किलोसाठी आंब्याला ८०, ९० ते १२० रुपये, चिकू ३० ते ४० रुपये तर डाळिंबाला ६० ते ७० रुपये दर मिळाला.

    भाजीपाला लागवड हंगाम व बाजारातील मागणी लक्षात घेऊन भेंडी, मेथी, वांगे, शेपू, कोथिंबीर आदी भाजीपाला लागवड केली जाते. हा भाजीपाला देखील सेंद्रिय असल्याने त्याची गुणवत्ताही चांगली असते. माळी कुटुंबीय या भाजीपाल्याची स्वतः चाकूर, चापोली, अहमदपूर, शिरूर ताजबंद, हाळी येथील बाजारात हातविक्री करतात. त्यामुळे नफ्याचे मार्जिन वाढते. उर्वरित क्षेत्रावर सोयाबीन, तूर, इंद्रायणी भाताची लागवड करून सेंद्रिय पद्धतीनेच त्यांचे उत्पादन घेतले जाते.   पॉलिहाउस उभारणी शिवराम यांनी पॉलिहाऊस शेतीचे पुणे येथे मार्च २०१८ मध्ये आठ दिवसांचे प्रशिक्षण घेतले. त्यानुसार दहा गुंठ्यांत पॉलिहाउस उभारले आहे. सध्या त्यात मेथी व कांद्याची रोपे असून येत्या सप्टेंबरमध्ये जरबेरा फुलाची लागवड करण्याचे नियोजन आहे. बांधावरचे उत्पन्न बांधावर चिमणसाग १००, चिंच ५०, चंदन १०० व अॅपलबोरच्या २५ झाडांची लागवड केली आहे. त्यामुळे एक प्रकारे शेतीला कुंपणच तयार झाले आहे. यातून दरवर्षी सरासरी ४० ते ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.

    रेशीम शेती माळी यांचा आधुनिक शेती व नवनवीन प्रयोग करण्याकडचा कल प्रत्यक्ष कृतीतून सतत दिसतो. सन २०१४ मध्ये त्यांनी रेशीम शेतीला सुरवात केली. त्या वेळी अपेक्षेप्रमाणे यश आले नाही. त्यानंतर या शेतीचे बारकावे शेतकरी व तज्ज्ञांना भेटून माहीत करून घेतले. त्यानंतर एक एकर वर तुतीची लागवड केली. आता १२५ अंडीपूजांपासून १०० किलो कोष उत्पादन ते घेत आहेत.   गांडूळ खत विक्रीतून नफा गांडूळ खत निर्मितीसाठी चार हौद बांधले आहेत. सुमारे ३० जनावरांचे संगोपन करतात. त्यांच्या शेणाचा उपयोग या खतासाठी होतो. बायोगॅस निर्मितीसाठी २०१६ मध्ये दोन हौद बांधले आहेत. त्यापासून मिळणारा गॅस घरगुती कामांसाठी वापरत असल्याने इंधनावरील खर्चात बचत होते. गांडूळ बिजाची एकहजार रुपये तर गांडूळखताची १५ रुपये प्रति किलो दराने विक्री होते. यातून दरवर्षी समाधानकारक उत्पन्न मिळते. कुटुंबाची साथ  शिवराम यांना संतराम व सच्चिदानंद ही दोन मुले आहेत. संतराम यांचे कृषी पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. शेतात घर बांधून माळी कुटुंबीय राहतात. सारे कुटुंब शेतावर लक्ष ठेवत असल्याने प्रगतीकडे वाटचाल सुकर झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शेतीला पूरक म्हणून गेली पाच वर्षांपासून बंदिस्त शेळीपालन केले जात आहे. सध्या २५ पर्यंत शेळ्या आहेत. यातून वर्षाला साधारण ५० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.   अॅग्रोवन ठरला दिशादर्शक पूर्वी रासायनिक शेतीत खर्च मोठ्या प्रमाणात व्हायचा. आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे. सेंद्रिय पद्धतीमुळे जमिनीची प्रतही सुधारली आहे. शेतीत सुधारणा करण्यासाठी अॅग्रोवनमधील यशोगाथा, तज्ञांचे सल्ले व नवनवीन तंत्रज्ञाची माहिती दिशादर्शक ठरत असल्याचे माळी सांगतात. परिसरातील शाळेच्या शैक्षणिक सहलीदेखील त्यांच्या शेतावर आयोजित केल्या जातात. सेंद्रिय शेतीची ही वाटचाल इतरांसाठी प्रेरणादायीच आहे. संपर्क : शिवराम माळी, ९९२३९६८९३८ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com