दर्जेदार, निरोगी लिंबू रोपनिर्मितीचा ‘मॉडिफाइड कंटेनर’ प्रयोग यशस्वी

सौरऊर्जा संस्करण केलेली माती टाकून त्यावर बी पेरले जाते. 'मॉडिफाइड कंटेनर’ पद्धतीत अशी अोळीने रोपे तयार होतात. ठिबकचा केलेला वापर.
सौरऊर्जा संस्करण केलेली माती टाकून त्यावर बी पेरले जाते. 'मॉडिफाइड कंटेनर’ पद्धतीत अशी अोळीने रोपे तयार होतात. ठिबकचा केलेला वापर.

फळे, भाजीपाला उत्पादनवाढीत निकोप, निरोगी रोपांचे महत्त्व अनन्य साधारण अाहे. हेच महत्त्व लक्षात घेऊन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने लिंबूवर्गीय फळांसाठी ‘मॉडिफाइड कंटेनर नर्सरीचा’ प्रयोग केला अाहे. कमी मनुष्यबळात निरोगी व अधिक संख्येने दर्जेदार रोपांची निर्मिती त्या माध्यमातून शक्य झाली आहे. वर्षाला २५ ते ३० हजार रोपांची विक्री हेच प्रयोगाचे यश म्हणून मोजता येते. काळाची गरज पाहता सध्या रोप निर्मितीचा व्यवसाय सर्वत्र वाढत चालला अाहे. त्याचवेळी निकृष्ट दर्जाची रोपे देऊन फसवणूक होण्याचे प्रमाणही वाढले अाहे. निरोगी, निकोप रोपे मिळतीलच याची खात्री राहिलेली नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत लिंबूवर्गीय अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पात कार्यरत तज्ज्ञांनी ‘मॉडिफाइड कंटेनर नर्सरी’चा प्रयोग तीन वर्षांपासून राबवण्यास सुरवात केली आहे. पारंपरिक ते ‘मॉडिफाइड नर्सरी’ कृषी विद्यापीठात लिंबूवर्गीय फळांवर सातत्याने संशोधन केले जाते. विदर्भात अाणि त्यातही अकोला जिल्ह्यांत लिंबूच्या बागा अधिक असून, रोपांची मागणी अधिक राहते. सध्या प्रकल्पाच्या नर्सरीमध्ये मागील तीन ते चार वर्षांचा विचार केला, तर ७५ हजार ते एक लाख संख्येने रोपे तयार केली जात आहेत. पूर्वी पारंपरिक पद्धतीने गादीवाफ्यावर मोकळ्या जागेत रोपांची निर्मिती व्हायची. काळाची गरज अोळखून नर्सरीच्या स्वरूपात अामूलाग्र बदल होत गेले. प्रकल्पाचे प्रमुख व कनिष्ठ उद्यानविद्यावेत्ता डॉ. दिनेश पैठणकर यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन, सहकाऱ्यांच्या सहकार्याने पुढाकार घेत ‘मॉडिफाइड कंटेनर’ तंत्राद्वारे ‘नर्सरी’चे रूप बदलवले आहे.   तंत्रज्ञानाचे फायदे

  • सशक्त, निरोगी रोपे तयार होतात.
  • लिंबाचे रोप सुमारे सहा ते आठ महिन्यांत विक्रीयोग्य होऊ शकते.
  • एका कंटेनरमध्ये वर्षात दोन वेळा रोपनिर्मिती करणे शक्य.
  • कमी कालावधीत, कमी जागेत अधिक संख्येने रोपनिर्मिती
  • उपलब्ध जागेचा तसेच स्राेतांचा (टाकाऊ) वापर योग्य होतो.
  • मजुरीवरील खर्च कमी
  • अन्नद्रव्ये, पाणी व्यवस्थापन तसेच मल्चिंगचा वापर. एकच मनुष्य नर्सरीचे व्यवस्थापन करू शकतो.    
  • पाणी प्रत्येक रोपाला देण्याएेवजी संपूर्ण कंटेनरला झारीने दिल्याने श्रमांत बचत.
  • तंतूमय मुळे जास्त मिळतात. तुलनेत अन्य पद्धतीत मुळे गुंडाळली जाण्याची शक्यता असते. रोपांची काढणी करताना इजा होऊ शकते.
  • संत्रा, मोसंबीचीही रोपे या पद्धतीने तयार करणे शक्य  
  • रोप जगण्याचे प्रमाण अधिक; खर्च कमी
  • पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड केल्यानंतर ती जगण्याचे प्रमाण शेकडा ७० ते ७२ टक्के असते. ‘माॅडिफाइड’ पद्धतीत हेच प्रमाण ९६ टक्के अाहे, असे डॉ. पैठणकर यांनी सांगितले. रोपांच्या निर्मितीवर होणारा प्रतिरोप खर्चही या पद्धतीत अवघा साडेआठ रुपयांपर्यंत अाला. उर्वरित पद्धतीत प्रतिरोप हाच खर्च ९ ते ११ रुपयांपर्यंत येतो.
  • पाण्याची बचत; कमी मनुष्यबळ
  • मागील काही वर्षांत पाऊस कमी झाल्याचा ताण विद्यापीठातील प्रक्षेत्राला झेलावा लागला. वीजपुरवठ्याचाही प्रश्न निर्माण व्हायचा. ‘मॉडिफाइड कंटेनर नर्सरी’ सुरू झाल्यापासून या त्रासातून सुटका झाली. मल्चिंग पेपर, ठिबकचा वापर केल्याने रोपांना गरजेइतके पाणी मिळत अाहे. एकूण ४००० लिटर पाणी देणाऱ्या दोन टाक्या आहेत.
  • रोपांची विक्री नव्या तंत्राद्वारे तयार रोपांना शेतकऱ्यांकडून चांगली मागणी आहे. दरवर्षी सरासरी २५ ते ३० हजार रोपांची विक्री होत आहे. मागील वर्षी ती ४० हजारांपर्यंत झाल्याचे डॉ. पैठणकर यांनी सांगितले. लिंबाच्या पीडीकेव्ही लाईम, साई सरबती, फुले सरबती आदी जातींच्या रोपांची निर्मिती केली आहे.

    काय आहे मॉडिफाइड कंटेनर तंत्र?

  • नर्सरीसाठी एक मीटर रुंद, सहा मीटर लांब व अर्धा मीटर उंच ‘मॉडिफाइड कंटेनर’ टाकाऊ वस्तूंपासून बनविला. यात ॲसबेसटॉस शीटस, पॉलिथीन (२०० मायक्रॉन जाडी), शेडनेट (९० टक्के) यांचा वापर
  • कंटेनर गाळाची माती, शेणखत व भसवा (२ः१ः१) या प्रमाणात वापरून ३० सेंटिमीटर जाडीचा थर देऊन भरण्यात अाला. या मिश्रणाला त्याआधी सौरऊर्जा संस्करण करून निर्जंतुकीकरण
  • कंटेनरचा जमिनीशी संपर्क येऊ नये यासाठी खाली विटांचा थर
  • जून-जुलैमध्ये बीजप्रक्रिया केलेल्या लिंबाच्या बियांची कंटेनरमध्ये दोन अोळीतील अंतर १० सेंटिमीटर ठेवून लावण केली.
  • अोलितासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला. सुमारे १२ फूट उंचीवर पाण्याच्या टाक्या ठेवून ‘ग्रॅव्हिटी’ तत्त्वाने पाणी खाली आणले जाते. पाण्यात विरघळणाऱ्या खतांद्वारे नत्र, स्फुरद, पालाश, जस्त, लोह, बोरॉन यांचा पुरवठा करण्यात येतो.
  • नर्सरीत १०० मायक्रॉन पॉली मल्चिंग अाच्छादनाचा वापर करण्यात येतो. यामुळे अोलावा टिकून ठेवण्यास मदत होते.
  • माती निर्जंतुकीकरणासाठी सच्छिद्र पाइपचा वापर करून फॉरमॅलीन या रसायनाचा वापर अत्यंत दक्षतेने करण्यात आला.
  • या ठिकाणी सुमारे सहा ते आठ महिने रोपे वाढवण्यात येतात. (हंगाम व वातावरणानुसार)
  • त्यानंतर रोपे चिमट्याने उपटून ६ बाय ९ इंच अाकाराच्या पॉलिथीन बॅगमध्ये ठेवण्यात येतात. रोपांना भरपूर मुळे असल्याने व मुळे कणखर असल्याने रोपे १५ ते २० दिवसांत विक्रीयोग्य होतात.
  • संपर्क : डॉ. दिनेश पैठणकर ९८८१०२१२२२, ७०३८०३७६४२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com