छत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने पाडली भुरळ

महाराष्ट्र व छत्तीसगड राज्यातील सीताफळ उत्पादकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात अाला.
महाराष्ट्र व छत्तीसगड राज्यातील सीताफळ उत्पादकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात अाला.

सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ छत्तीसगड राज्यालाही पडली अाहे. या राज्यात व्यावसायिक पद्धतीने सीताफळाची लागवड वाढत अाहे. तेथील शेतकरी महाराष्ट्रातील अनुभवी शेतकऱ्यांचे तंत्र, कसब शेतीत गिरवू लागले आहेत. महाराष्ट्रातील सीताफळ उत्पादकांचा छत्तीसगड राज्यात नुकताच अभ्यास दौरा झाला. याही पुढे उत्पादनापासून ते प्रक्रियेपर्यंत ज्ञानाची देवाण-घेवाण होत राहील, असा निश्चय दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांनी केला.

महाराष्ट्र राज्य सीताफळ महासंघाने यंदाच्या २० व २१ मे रोजी छत्तीसगड राज्यातील दुर्ग, रायपूर या जिल्ह्यांत सीताफळ अभ्यास दौऱ्याचे अायोजन केले. दुर्ग जिल्ह्यात धमधा विभागातील धौराघाट येथे सुमारे १७० एकरांवर बालानगर जातीच्या सीताफळाची बाग उभी राहली अाहे. तीन वर्षांपूर्वी ही लागवड झालेली अाहे. महाराष्ट्रातील शेतकरी सीताफळ शेती तंत्रज्ञानात व वाणांच्या विकासात आघाडीवर आहेत. साहजिकच त्याचा फायदा परराज्याला झाला. धौराघाट येथील बागेत सुमारे ६१ हजार २०० रोपे महाराष्ट्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उभी राहिली आहेत.

‘कॉर्पोरेट लुक’ असलेला फार्म वझीरसिंग लोहान व अनिलकुमार शर्मा या दोघांनी ‘जेएस’ फार्म उभा केला. त्यातून सीताफळ शेतीला छत्तीसगडमध्ये कॉर्पोरेट लुक देण्याची धडपड सुरू केली. हा फार्म ४०० एकरांपेक्षा मोठा अाहे. सन २००२ मध्ये दुर्ग शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर धोराभट्ट शिवारात जमीन विकत घेतली. त्या वेळी ती खडकाळ, लागवडीस अयोग्य होती. तीन ते चार वर्षांत वेगाने ती विकसित केली.

तीन टप्प्यांत काम सुरू या फार्ममध्ये सीताफळ उत्पादन, मार्केटिंग, प्रक्रिया या तीनही टप्प्यांवर कटाक्षाने काम सुरू आहे. यात १७० एकरांत बालानगर जातीचे सीताफळ असून, संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करण्यावर जोर अाहे. यासाठी शंभर गीर गायींचे संगोपन करीत गोमूत्र व शेण मिळवले जाते. गेल्या हंगामात पहिला बहर घेतला. दुर्ग शहरातच ‘सेंद्रिय सीताफळ’ म्हणून त्याची थेट ग्राहकांना विक्री केली. काही फळांपासून गरही काढला अाहे. त्याची पुणे, बंगळूरच्या प्रयोगशाळेत तपासणी केली असून, उत्कृष्ट दर्जा मिळाल्याचे फार्मचे शर्मा यांनी सांगितले. अागामी हंगामात स्थानिक शेतकऱ्यांकडून सीताफळ खरेदी करून १०० टन गर काढण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी दिले शेतीचे धडे अभ्यास दौऱ्यात महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ८० हून अधिक अनुभवी सीताफळ उत्पादक होते. लागवडीसाठी उत्सुक छत्तीसगडमधील शेतकऱ्यांना त्यांनी पाणी व्यवस्‍थापन, छाटणी, फवारणी, बहर नियोजन याबाबत सविस्तर व प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी, सचिव अनिल बोंडे, उपाध्यक्ष एकनाथराव अागे, कोषाध्यक्ष मधुकरराव डेहनकर यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी, सदस्यांनी ज्ञान देवाणघेवाणीत सहभाग घेतला. वर्षानुवर्षे कमावलेले ज्ञान, अनुभव या वेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी छत्तीसगडमधील शेतकऱ्यांसोबत ‘शेअर’ केले.

सीताफळातील ‘डॉक्टर’ छत्तीसगड राज्याला समृद्ध वनसंपदा लाभली अाहे. साग, बांबू या वृक्षांसह कांकेर व सीताफळ अाढळते. वर्षानुवर्षे कुठलीही मशागत किंवा व्यवस्थापनाशिवाय येथील स्थानिक शेतकरी सीताफळ पिकवतो व पारंपारिक पद्धतीनेच विक्री करतो. रायपूर येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठात प्रा. नाग यांना ‘पीएचडी’साठी सीताफळाचा विषय निवडणे महत्त्वाचे वाटले. जंगलातील सीताफळाच्या विविध जाती, त्यावर अाढळणारे रोग याबाबत त्यांनी केलेला अभ्यास छत्तीसगडमध्ये सीताफळ वाढण्यासाठी उपयोगी ठरणार अाहे. आमचे विद्यापीठही शेतकऱ्यांना तंत्रज्ञान देण्यासाठी सदैव उपलब्ध अाहे, असा विश्वासही विद्यापीठाचे शिक्षण विस्तार         संचालक डॉ. राठोड यांनी दिला.

तरुण पिढीला शेतीचे अाकर्षण या राज्यात मोठे शेतीक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची मुले देश-परदेशांत कृषी शिक्षण घेऊन शेती स्वतः व्यवस्थापनात लक्ष देऊ लागली आहेत.  

महाराष्ट्रातून शिकले तंत्र छतीसगडमध्ये विकसित होत असलेल्या सीताफळ बागेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अनुभव व तंत्र यांचा सहभाग आहे. येथील काही फार्मचालकांनी महाराष्ट्रातील काही बागांना भेटी दिल्या. बालानगर वाणाच्या सीताफळाची रोपे महाराष्ट्रातीलच नर्सरींमधून नेण्यात आली आहेत. आज या राज्यात प्रामुख्याने दुर्ग, रायपूर जिल्ह्यांत काही शेतकरी दहा, वीस, चाळीस एकरांपर्यंत सीताफळ लागवडीकडे वळाले आहेत. सुमारे ४५ हजार झाडांचा जेएस फार्म हा सर्वांत मोठा गणला जातो. या फार्मचे मालक अनिल शर्मा यांनी सीताफळ महासंघातर्फे आयोजित चर्चासत्रांना उपस्थिती लावली. त्यातून तंत्र अवगत करीत अंमलबजावणी आपल्या बागेत केली. ते छत्तीसगडमधील सीताफळ उत्पादकांचे संघटन करीत आहेत.  

कुछ तो और करना है! वझीरसिंग लोहान, अनिलकुमार शर्मा म्हणाले की उत्पन्नासाठी अन्य उद्योगांचे पर्याय आमच्याकडे आहेत. मात्र समाजाला निरोगी, रासायनिक अवशेषषमुक्त फळे खायला मिळावीत, या हेतूने शेतीत पाऊल टाकले. आज सेंद्रिय पद्धतीने ती पिकवतो आहे. पर्यावरण रक्षणाचे कामही होत आहे. समाजाचे उत्तरदायित्व म्हणून आम्ही शेतीत उतरलो. ‘पैसा तो बहोत कमाया, लेकिन कुछ तो और करना है’ अशा शब्दांत त्यांनी आपले उद्दिष्ट प्रकट    केले.

फळबाग शेतीला कॉर्पोरेट लुक वनसंपदेने नटलेले, खाणी, अौद्योगिक क्षेत्रात प्रगतिशील अादिवासी बहुल छत्तीसगडमध्ये सोयाबीन, भात ही प्रमुख पिके घेतली जातात. भाजीपालावर्गीय पिकांसाठी रायपूर, दुर्ग हा भाग अधिक प्रयोगशील मानला जातो. टोमॅटो, मिरची, कारले, दोडके, दुधी भोपळा यात त्यांनी विशेष अोळख तयार केली आहे. या राज्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे रायपूर व सभोवतालच्या परिसरात ५० ते १०० एकरांचे अनेक फार्म अाता विकसित होत अाहेत.

संपर्क : श्याम गट्टाणी, ९४२३१४४६०३,९१३०९४४६०३  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com