मार्केटच्या मागणीनुसार केला लिंबाचा हस्त बहर यशस्वी

लिंबाचा हस्त बहर शेतकऱ्यांना मार्च ते मे या उन्हाळी हंगामातील कालावधीत चांगले दर देत चांगला नफाही मिळवून देऊ शकतो. त्यादृष्टीने हा बहर घेण्याचे तंत्र अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांत प्रसारित करण्यास सुरवात केली आहे. शेतकरीदेखील त्याचा फायदा घेत आर्थिकदृष्ट्या हे पीक अधिक फायदेशीर करण्याकडे वाटचाल करू लागले आहेत.
सातारगाव येथील महादेव तांबडे यांच्या बागेत लिंबाच्या बहार नियोजनाचे टप्पे समजावून सांगताना डॉ. दिनेश पैठणकर, डाॅ. योगेश इंगळे
सातारगाव येथील महादेव तांबडे यांच्या बागेत लिंबाच्या बहार नियोजनाचे टप्पे समजावून सांगताना डॉ. दिनेश पैठणकर, डाॅ. योगेश इंगळे

लिंबाचा हस्त बहर शेतकऱ्यांना मार्च ते मे या उन्हाळी हंगामातील कालावधीत चांगले दर देत चांगला नफाही मिळवून देऊ शकतो. त्यादृष्टीने हा बहर घेण्याचे तंत्र अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांत प्रसारित करण्यास सुरवात केली आहे. शेतकरीदेखील त्याचा फायदा घेत आर्थिकदृष्ट्या हे पीक अधिक फायदेशीर करण्याकडे वाटचाल करू लागले आहेत.

बाजारपेठ हाती नसल्याने शेतकऱ्यांना अनेक वेळा तोटा सहन करावा लागतो. अकोला जिल्ह्यातील लिंबू उत्पादकांची अवस्थाही वेगळी नाही. लिंबाचे उत्पादन तसे वर्षभर मिळते. परंतु, त्याचे दर उन्हाळ्यातच अधिक राहतात. मग हीच संधी व वेळ साधण्यासाठी लिंबाचा हस्त बहर घेणे गरजेचे असते. त्यासाठी त्याचे तंत्र समजून घ्यावे लागते. बाळापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने बहर व्यवस्थापन करीत आश्वासक पाऊल टाकले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील लिंबूवर्गीय संशोधन केंद्रातील तज्ज्ञांचे त्यांना मार्गदर्शन लाभत आहे. त्यातून वार्षिक उत्पन्नात वाढ करणे त्यांना शक्य होत आहे.

लिंबू बागांची स्थिती अकोला जिल्ह्यात पातूर, बाळापूर तालुक्यांमध्ये लिंबू उत्पादन मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते. दिवसेंदिवस पाणी पातळी खालावल्याचा फटकाही लिंबू बागांना झेलावा लागत अाहे. बागेला वर्षभरात किमान २५ ते ३० पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. पाण्याची समस्या सार्वत्रिक बनली अाहे. यामुळे लिंबू बागा धोक्यात अाल्या. उत्पन्न अधिक मिळाले तरच शेतकरी यात टिकाव धरू शकतील अशी परिस्थिती अाहे. त्यादृष्टीने हस्त बहर घेणे आश्वासक ठरत आहे.

महादेव तांबडे यांचा अनुभव बाळापूर तालुक्यातील सातारगाव येथील महादेव नामदेव तांबडे यांनी २००७ मध्ये दोन एकरांत कागदी लिंबाची लागवड केली. सन २०१३ पासून बाग चांगल्यापैकी उत्पादन देऊ लागली. त्यातून पहिल्या वर्षी साधारणतः ६० ते ७० हजार रुपयांची, २०१४ मध्ये दोन बहर मिळून एक लाख रुपयांपर्यंतची तर २०१५ मध्ये मृग व अांबिया बहर मिळून पावणे दोन लाखापर्यंत मिळकत झाली. मात्र, याच वर्षात झाडांचे शेंडे वाळण्याचा प्रकार दिसून अाला. हे कशामुळे घडते अाहे हे तांबडे यांना उमगले नाही. त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रात संपर्क केला. या ठिकाणी मिळालेल्या सल्ल्यानुसार व्यवस्थापन करून बाग वाचली. त्यामुळे २०१६ चा हंगाम दोन लाखांपर्यंत उत्पन्न देऊन गेला. तांबडे हे केंद्रातील तज्ज्ञ डाॅ. डी. एच. पैठणकर यांच्या संपर्कात होते. या दरम्यान वेळोवेळी झालेल्या चर्चेतून डॉ. पैठणकर यांनी हस्त बहराचे नियोजन करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तांबडे कामाला लागले. बागेचा ताण, खत-पाणी व्यवस्थापन हे सल्ल्यानुसार केले. याचा फायदा म्हणजे या वर्षात एकमेव घेतलेल्या हस्त बहराने सुमारे दोन लाख ३० हजार रुपयांचे उत्पन्न  तांबडे यांना मिळवून दिले. प्रति झाडावर ४० ते ४५ किलो लिंबू मिळाले.        

कडाळे यांनी साधले हस्त बहराचे तंत्र बाळापूर तालुक्यातील वाडेगाव हा भाग लिंबू उत्पादनात सातत्याने अग्रेसर अाहे. याच गावातील उमेश मुगुटराव कडाळे हा उच्चशिक्षित तरुण कुटुंबाची पाच एकर शेती सांभाळतो. त्यांनी अडीच एकरांत २००७ मध्ये कागदी लिंबू बाग लावली. उमेश देखील अांबिया, मृग बहर घ्यायचे. अनेकदा हस्त बहरा व्यतिरिक्त बहरातील लिंबाच्या १५ किलो गोणीला केवळ १०० रुपयांपर्यंत दर मिळायचा. ही बाग परवडत नाही या विचारांपर्यंत कडाळे कुटुंब अाले होते. व्यवस्थापन चांगले, उत्पादनही ठीकठाक असताना मिळकत तेव्हढी नव्हती. उमेश यांनीही डॉ. पैठणकर यांच्याशी सल्ला मसलत केली. त्यानुसार डॉ. पैठणकर यांनी बाजारपेठेत लिंबाची मागणी राहणारा कालावधी, गेल्या काही वर्षांत मिळालेला दर याचा ताळेबंद समजून सांगितला. त्यानुसार उमेश यांनी हस्त बहराकडे अापला कल वळवला. मागील दोन वर्षांपासून हस्तबहर घेत त्यांनी उत्पन्नात वाढ केली आहे. सन २०१७ व २०१८ मध्ये हस्तबहरातील फळांपासून सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले. यापूर्वीच्या वर्षी त्यांना अन्य बहरातील हेच उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत मिळाले होते.  

विद्यापीठानेही मिळविले चांगले उत्पन्न डॉ. पैठणकर म्हणाले, की आमच्या प्रक्षेत्रात लिंबाची सुमारे १७५ झाडे आहेत. आम्हीही हस्त बहराचे नियोजन केले. ही बाग व्यापाऱ्याने मागील वर्षी सहा लाख ७० हजार रुपयांना खरेदी केली. अन्य बहरांत एवढे उत्पन्न निश्चित झाले नसते. हस्त बहर सहजपणे घेता येत नाही ही वस्तुस्थिती अाहे. लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये अांबिया बहर ६० टक्के, मृग बहर ३० टक्के, तर हस्त बहर अवघा १० टक्के येत असतो. मात्र हस्त बहर यशस्वी करण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून मशागत, खते, पाणी व्यवस्थापन व संजीवकांचा वापर करून उत्पादनात वाढ करणे शक्य अाहे. बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अाता हे गणित जुळायला लागले आहे. चांगल्या व्यवस्थापनातून लिंबाचे एकरी १० ते १२ टन उत्पादन घेता येते, असेही डॉ. पैठणकर यांनी सांगितले. हस्त बहर नियोजन व फायदे

  • यात मृग बहर न घेता केवळ हस्त बहर घेणे
  • कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार जिबरेलिक अाम्ल, क्लोरमेक्वाट क्लोराइड यांची त्या त्या अवस्‍थेत फवारणी, झाडांना योग्य काळात ताण देणे, शिफारशीनुसार खते, कीडनाशके यांचा वापर  
  • ही लिंबे मार्च-एप्रिल ते मे या काळात बाजारात येतात.
  • या काळात त्यांना चांगली मागणी
  • फळांना प्रतिकट्टा कमाल दर १००० ते १२०० रुपये
  • उत्पन्नात चांगली वाढ
  • संपर्क :  डॉ. डी. एच. पैठणकर, ९८८१०२१२२२ (कनिष्ठ उद्यान विद्यावेत्ता)

    उमेश कडाळे, ९५१८९१४७९१ लिंबू उत्पादक, वाडेगाव जि. अकोला  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com