संघर्षातून प्रगती साधत रुजवला व्यावसायिक शेतीचा आदर्श

वाटोळे यांची पेरू बाग
वाटोळे यांची पेरू बाग

कधीकाळी दोन वेळच्या भाकरीची सोय लागत नसल्याने अंबोडा (वाडी) (जि. यवतमाळ) येथील वाटोळे कुटुंबाला उपाशीपोटी दिवस काढावे लागले. मजुरी केली. मेहनत, अभ्यास व संघर्षाच्या बळावर त्यांनी परिस्थितीवर मात केली. एक एकर व त्यानंतर टप्प्याटप्प्याने तेरा एकर शेतीचे मालक हे मजूर कुटुंबीय झाले. आत्महत्याग्रस्त म्हणविणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात व्यावसायिक शेती त्यांनी आकारास आणत अन्य शेतकऱ्यांपुढे प्रोत्साहनात्मक उदाहरण तयार केले.

यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्‍यातील शेलूवाडी हे रामजी वाटोळे यांचे मूळगाव. उदरनिर्वाहाचे मुख्य साधन नसल्याने मिळेल त्या मजुरीवर गुजराण करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. काही वेळा उपाशीपोटी दिवस काढावे लागत. परिस्थिती बदलण्यासाठी संघर्ष सुरूच होता. मजुरी कामातून ते काही रक्कम शिल्लक टाकू लागले. हळूहळू पुंजी साठत गेली. त्या बळावर गावात एक एकर शेती खरेदी केली. पुढे त्यांचा मुलगा मारोती शेतीत काम करू लागला. दोघांनी मेहनतीच्या बळावर एक एकर क्षेत्र सहा एकरांवर नेले.

शेतीचा विकास मारोती यांची शिवशंकर आणि संतोष ही मुलेदेखील पुढे घरच्या शेतीत राबू लागली. सहा एकर शेतीसाठी दोन बोअरवेल, सात विहिरींचा पर्याय होता. परंतु पाण्याची सक्षम सोय होऊ शकली नाही. मग मात्र गाव सोडण्याचा निर्णय घेतला. महागाव तालुक्‍यात डोंगरखोऱ्यातील १३ एकर पडीक शेती असल्याचा शोध लागला. ती खरेदी करण्याचा निर्णय झाला. झाडेझुडपे, नाले अशी जमिनीची अवस्था होती. तीन महिने जेसीबी यंत्राने काम करून शेती लागवडयोग्य करण्यात आली. चौफेर माळरानाचे पाणी शेतात यायचे. शेतात घेतलेल्या विहिरीच्या पुनर्भरणाकामी हे पाणी उपयोगात आणण्याचे ठरले. त्यानुसार चर खोदून हे काम पुढे पार पाडले.

जमीन केली सुपीक अंबोडा (वाडी) शिवारातील ही जमीन खडकाळ असल्याने दरवर्षी २०० ट्रॅक्‍टर माती शेतात पसरविली जाते. गेल्या सात वर्षांपासून यात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. एवढ्यावरच न थांबता हे संपूर्ण क्षेत्र ठिबकखाली आणले. दरवर्षी २० ट्रॉली शेणखतही वापरले जाते.  

वाडी वसली अंबोडा (वाडी) ही नवी वस्तीच वाटोळे कुटुंबीयांच्या शेतातील रहिवासामुळे निर्माण झाली. या कुटुंबाने गावात वास्तव्य न करता सात वर्षे शेतात झोपडीवजा घरात वास्तव्य केले. त्याद्वारे शेतात चोवीस तास लक्ष राहत होते. ही जीवनशैली त्या भागातील अनेकांना रुचली. मग दहा शेतकरी कुटपंबीय शेतात घर बांधून राहू लागले. आता हा भाग अंबोडा (वाडी) म्हणून नावारूपास आला आहे.

व्यवसायिक शेतीवर लक्ष केंद्रित नव्या पिढीतील शिवशंकर यांनी शेतीची सूत्रे घेतल्यानंतर २०१४ च्या दरम्यान एक एकर पेरू, एक एकर डाळिंब, तितकाच संत्रा आणि पपई यांची लागवड केली. व्यावसायिक शेतीपद्धती हाताळताना २०१७ मध्ये केळीची दीड एकरावर लागवड केली. त्याचे एकूण उत्पादन ५० क्विंटलपर्यंत जाऊन दरही दहा रुपये प्रति किलो असा समाधानकारक मिळाला. सीताफळाची एक एकरावर नवी लागवड केली आहे. सुमारे २० ते २५ झाडे आंब्याची असून त्यात दशेरी, लंगडा आणि केशर जातींचा समावेश आहे.

आंतरपीक पद्धती सन २०१४ मध्ये घेतलेल्या पेरूत चवळीचे आंतरपीक घेतले. हा पर्याय बोनस उत्पन्नासारखा ठरत असल्यामुळे त्यात सातत्य राखले आहे. अडीच एकरांतील भेंडीत ढेमसाचे आंतरपीक घेतले. ढेमसे वेलवर्गीय असल्याने ते जमिनीवर पसरते तर भेंर्डीची वाढ उंच होते. त्यामुळे आंतरपीक घेण्यात अडचण आली नाही.

पेरूचे मार्केटिंग पेरूचे तीन बहर घेतले जातात. त्यासाठी छाटणीवर भर दिला जातो. या वर्षी उन्हाळा तीव्र होता. त्यातच पाण्याचे स्रोत आटल्याने पिकाला पाण्याचा ताण बसला. त्यामुळे पावसाळ्यात उत्पादन घेता आले नाही. तुळजापूर-नागपूर महामार्गावरील कलगाव ठिकाणी ८० रुपये प्रतिकिलो दराने थेट ‘मार्केटिंग’च्या माध्यमातून दोन ते चार क्‍विंटल मालाची विक्री केली.  

ऊस लागवड सन २०१६ मध्ये एक एकरावर ऊस होता. टप्प्याटप्प्याने हे क्षेत्र चार एकरांवर नेले. गुंज येथील साखर कारखान्याला ऊस दिला. खडकाळ जमिनीत एकरी ३० ते ४० टनांहून अधिक उत्पादन अद्याप मिळाली नसल्याचे शिवशंकर यांनी सांगितले.

शेताच्या बांधावरही पैसे बांधावर पाच वर्षांपूर्वी फणसाची २० झाडे लावली. पैकी १५ वाचली. आता या झाडांपासून उत्पादन मिळण्यास सुरवात झाली अाहे. यंदा ३० रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे बाजारात विक्री केली. जांभूळ, निलगिरी, बांबू, शेवगा अादी झाडेही बांधावर आहेत. या माध्यमातून शेताचा बांध (धुरा)देखील उत्पन्नक्षम करण्यात यश आले आहे.   यांत्रिकीकरणावर भर मशागतीसाठी ट्रॅक्‍टर, कल्टिव्हेटर, दोन बैल आहेत. यांत्रिकीकरणाचा पर्याय श्रम आणि वेळेची बचत करण्यास पूरक ठरतो असा वाटोळे यांचा अनुभव आहे. सेंद्रिय आणि रासायनिक घटकांचा मध्य साधत माल पिकविण्यावर भर असतो. शिवशंकर यांचा भाऊ संतोष करंजी येथे राहतात. ते दोन एकर शेतीचे व्यवस्थापन पाहतात. टोमॅटो, काकडी, ढोबळी मिरची यांसारखी भाजीपाला पिके घेण्यावर त्यांचा भर असतो. अपयशानेही शिकवले तीन एकरांवर टोमॅटोची लागवड केली. यंदा बाजारात आवक अधिक होऊन दर घसरले. त्यामुळे खर्चाची भरपाई होऊ शकली नाही. त्यामुळे टोमॅटो काढून कारली आणि दोडक्याची लागवड केली. शेतीपूरक कुक्‍कुटपालन व्यवसायाचाही प्रयत्न केला. परंतु हवामान व मुख्य म्हणजे मनुष्यबळाची कमरतात त्यामुळे हा व्यवसायही आकारास आला नाही. आज चार शेळ्या आहेत. त्यांची संख्या वाढवण्याचा विचार आहे. नव्याने रेशीम शेतीची कास धरली आहे.

संपर्क :शिवशंकर वाटोळे, ९०११२०७९९२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com