agricultural success story in marathi, ansurdai dist.osmanabad , Agrowon, Maharashtra | Agrowon

एकच एकर शेती; त्यात बारमाही बहुविध भाजीपाला
रमेश चिल्ले
शुक्रवार, 15 जून 2018

अनसुर्डा (ता. जि. उस्मानाबाद) येथील दळवे दांपत्याने केवळ एक एकर शेती असतानाही निराश न होता त्यात वर्षभर विविध भाजीपाला पिके घेत आर्थिक स्थिती भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे.सेंद्रिय पद्धतीने अधिकाधिक नियोजन करताना शेळीपालन, पोल्ट्री आदींमधून उत्पन्नाचे स्रोत जोडले आहेत. याच एक एकरांतून घरचा प्रपंच नेटका करीत स्वावलंबनाचे समाधानही मिळवले आहे.

अनसुर्डा (ता. जि. उस्मानाबाद) येथील दळवे दांपत्याने केवळ एक एकर शेती असतानाही निराश न होता त्यात वर्षभर विविध भाजीपाला पिके घेत आर्थिक स्थिती भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे.सेंद्रिय पद्धतीने अधिकाधिक नियोजन करताना शेळीपालन, पोल्ट्री आदींमधून उत्पन्नाचे स्रोत जोडले आहेत. याच एक एकरांतून घरचा प्रपंच नेटका करीत स्वावलंबनाचे समाधानही मिळवले आहे.

पाण्याची कधीच शाश्वती नसलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी आव्हाने झेलीत शेतीत प्रयोग करीत असतात. उस्मानाबाद तालुक्यातील अनसुर्डा येथील दळवे दांपत्य त्यापैकीच एक. त्यातही रुक्‍मिणीताई अगदी हिमतीच्या. पती रामेश्वर यांच्या खांद्याला खांदा लावून त्या घराबरोबर शेती आणि महिला बचत गटाची आघाडीही सांभाळत आहेत. अनसुर्डा हे आडवळणाचे दोनेक हजार लोकवस्तीचे गाव.

रुक्‍मिणी लग्न होऊन दळवे कुटुंबात आल्या त्या वेळी घरी असंख्य अडचणीची जंत्री रांग लावून उभी होती.  शिवारात तीन भावांत मिळून तीन एकर कोरडवाहू शेती होती. पुढे वाटण्या झाल्या. प्रत्येकाच्या हिश्श्‍याला एक एकर जमीन आली. रामेश्वर देखील शेती व्यतिरिक्त रोजगार करून घरचा चरितार्थ चालवायचे. काहीतरी हातपाय हलवले पाहिजेत. आपण घराबाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही असे रुक्मिणी यांना वाटू लागले. आपल्या पतीला त्यांनी बांधकामाचे कसब शिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले. काही काळ रामेश्वर यांनी उस्मानाबाद येथे वेल्डिंग व्यवसायातही काम केले.

शेतीचा विकास
रुक्मिणी यांना आता जे काही करायचं होतं ते घरदार आणि लेकरं सांभाळूनच. दिवस सुरू झाल्यापासून शेतातच काम करता यावं म्हणून रस्त्याकडेच्या शेतातच पत्र्याचे शेड मारून तिथेच घर थाटले. दुसरे भाऊही तिथेच राहायला आले. एकमेकांना हक्काचा आधार मिळाला. आपापल्या शेतीत दिवसरात्र राबून चांगले उत्पन घेण्याची दिशा मिळाली. सर्वांत प्रथम पाण्याची सोय म्हणून बोअर घेतले. त्याला पाणीही चांगले लागले. शेतीचं क्षेत्र एक एकरच असल्याने तेवढ्यातूनच उत्पन्न घेणं म्हणजे कौशल्याचं काम होतं. दरम्यान शेळी घेऊन पिल्लं वाढवण्यास सुरवात केली. गायही घेतली.

खंबीर साथ मिळाली 
परिसरातील स्वयंसहाय्यता प्रयोग परिवार व उमेद परिवाराच्या माध्यमातून रुक्मिणी महिला गटात सहभागी झाल्या. उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाच्या ‘आत्मा’ यंत्रणेकडून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेतले. ओळखी वाढत गेल्या. आत्मविश्‍वास दुणावला. गटातील महिलांची खंबीर साथ मिळत गेली. आपण एकट्या नाही ही जाणीव मोठा आधार देऊन गेली. शेळ्या व कडकनाथ कोंबड्या घेण्यासाठी गटामार्फत कर्ज मिळाले. कष्ट करून ते वेळेवर फेडण्याचे सातत्य राखले. पुन्हा मोठे कर्ज घेऊन दोन गायी घेतल्या. दुग्धोत्पादन चालू केले. त्यातून घरखर्च भागू लागला. बॅंकेमार्फतही काही कर्ज मिळाले. रामेश्‍वर यांना पत्नीची खंबीर साथ मिळू लागली.

बहुविध भाजीपाला शेती
कायम ताजे उत्पन्न मिळवण्यासाठी एकरभर शेतीत बहुपीक पद्धती राबवण्यास दळवे दांपत्याने सुरवात केली. यात सव्वा ते दोन महिन्यात येणारी कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू अशी पिके निवडली.
त्याचबरोबर सुमारे पाच ते सहा महिने कालावधीची वांगी, भेंडी, मिरची, घेवडा, टोमॅटो अशी पिके घेण्यास सुरवात केली. याचबरोबर दीर्घ काळ उत्पादन व उत्पन्न देऊ शकणारे शेवग्याचे पीक घेतले.
शिवाय काही जागेत घरच्यापुरता कांदा, भुईमूग, जवस  घेणेही सुरू केली. या व्यतिरिक्त कोबी, फ्लाॅवर, लसूण अशीही बाजारपेठेतील मागणीनुसार पिके घेण्यास सुरवात केली.
 
सेंद्रिय नियोजनवर भर
भाजीपाला घेताना सेंद्रिय पद्धतीवर अधिक भर दिला. गायीच्या शेणापासून गांडूळ खत तयार करण्यास सुरवात केली. व्हर्मीवॉश, दशपर्णी, जीवामृत, बीजामृत आदी घटकही तयार करून त्यांचा वापर सुरू केला.

पूरक व्यवसायाला चालना
केवळ शेतीवर अवलंबून चालणार नाही हे उमजल्यावर दळवे दांपत्याने पोल्ट्री, शेळीपालनावर भर दिला आहे. सध्या देशी कोंबड्या असून तीन वर्षांपासून या व्यवसायात स्थिरता येत आहे. चार शेळ्या आहेत. त्यांना पिल्ले होतील तसा व्यवसायाला अधिक आकार    येईल.  

आर्थिक डोलारा सांभाळला
आज दळवे कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाले आहे. मोठ्या मुलीचे लग्न थाटामाटात करणे त्यांना शक्य झाले. चांगल्या घरी मुलगी दिल्याचे समाधान दांपत्याला आहे. दोन मुले शिक्षण घेत आहेत.
परिसरातील महिला गटामार्फत एकत्र येऊन गावाला पुढे आणण्यासाठी झटताहेत. त्यांच्या प्रेरणेने अनेकांच्या घरी चुली पेटल्या आहेत हे पुण्य निश्चितच मोठे आहे.

विक्री व्यवस्था
वर्षभरातील सर्व हंगामात दळवे यांच्या शेतात कोणते ना कोणते पीक असायचेच. त्यामुळे दररोज एका पिकाची काढणी असायची. हा माल मोटरसायकलवरून दररोज वाहून नेण्याचे कष्टदेखील सोबत आले. परिसरातील गावांमध्ये आठवडी बाजारांमधून कधी व्यापाऱ्यांना तर कधी स्वतः बसून हातविक्री सुरू केली. दररोज ताजा पैसा हातात येऊ लागला. रामेश्वर अन्य ठिकाणीही कामाला जात होतेच. मग रुक्‍मिणी यांच्याकडे शेतीची अधिक जबाबदारी आली. शेतातच राहायला असल्याने पूर्णवेळ शेतीला देणे शक्य झाले. ताजा सेंद्रिय भाजीपाला, घरचे देशी गाईचे दूध, धान्य यांचा लाभ कुटूंबालाही होऊ लागला. मोकळ्या वातावरणात आरोग्यही निरोगी राहू लागले. आज प्रति हंगाम खर्च वजा जाता साधारण एक ते दीड लाख रुपयांचा नफा हाती पडत आहे. शिवाय बचत गटात सक्रिय असल्याने त्यातूनही आर्थिक आधार मिळतो. आतापर्यंत संस्थेकडून मिळालेल्या अडीच लाख रुपये कर्जाची तीने वेळेत परतफेड करणे त्यांना शक्य झाले आहे. दिल्ली, पुणे, मुंबई, औरंगाबाद येथून सहली येत गटाची कार्यपध्दती त्यांना पाहण्यास मिळाली आहे. जर्मनीहूनही एक पथक येथे अभ्यासासाठी आले होते.

संपर्क : सौ. रुक्‍मिणी रामेश्‍वर दळवे, ९०७५६१०२६५
(लेखक सेवानिवृत्त कृषी अधिकारी व शेती व पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
कोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...
जपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...
कुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...