लोकसहभागातून दिली ग्रामविकासाला दिशा

लोकसहभागातून दिली ग्रामविकासाला दिशा
लोकसहभागातून दिली ग्रामविकासाला दिशा

औरंगाबादमधील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ ही संस्था मराठवाड्यातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला लोकसहभागातून गती देण्याचे काम करत आहे. पहिल्या टप्प्यात संस्थेचे काम, दुसऱ्या टप्प्यात लोकांचा सहभाग आणि तिसऱ्या टप्प्यात लोकांच्या उपक्रमाला संस्थेची साथ या सूत्रातून विविध गावांना शाश्वत विकासाची दिशा मिळाली आहे.

औरंगाबादमधील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या डॉ. सतीश कुलकर्णी, डॉ. एन. डी. कुलकर्णी, डॉ. राजेंद्र क्षीरसागर, डॉ. ज्योत्स्ना क्षीरसागर, डॉ. अश्विनीकुमार तुपकरे, डॉ. भारत देशमुख आणि डॉ. मंजिरी व्यवहारे यांनी शहर तसेच गावपरिसरात आरोग्यसेवेसाठी १९८९ मध्ये डॉ. हेडगेवार रुग्णालयाची सुरवात केली. आरोग्यसेवेच्या बरोबरीने या गटाने शिक्षण, कृषीसह विविध विकास प्रकल्पांची आखणी केली. यातूनच १९९४ मध्ये सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाची सुरवात झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील तीन दुर्गम गावांमध्ये आरोग्य विषयक काम करताना महिला, शेतकरी, विद्यार्थांच्या विविध प्रश्नांची साखळी समोर आली. लोकसहभागातून हे प्रश्न सोडविण्यासाठी संस्थेने २००७ पासून विविध उपक्रम हाती घेतले. सध्या डॉ. दिवाकर कुलकर्णी (अध्यक्ष), सुनील रायथट्‌टा (उपाध्यक्ष), डॉ. विशाल बेद्रे (कोषाध्यक्ष) आणि सुहास आजगावकर (सचिव) संस्थेची जबाबदारी सांभाळत आहेत. संस्थेने जल, जमीन, जंगल आणि जनावरांच्या संगोपनावर भर दिला आहे.

संयुक्‍त जबाबदारी गटाची संकल्पना संस्थेने पंधरा गावात १२० संयुक्‍त गटाची संकल्पना राबविली. २०१२ ते २०१५ दरम्यान संस्थेने फळबागांच्या बरोबरीने कापूस, हळद, भाजीपाला आदी पिकांची लागवड करणाऱ्या सहाशे शेतकऱ्यांच्या ६८० एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन केले. कोणतीही बॅंक कर्ज द्यायला तयार नसणाऱ्या शेतकऱ्यांना दोन वर्षासाठी ठिबक सिंचनासाठी आवश्‍यक कर्ज बीनव्याजी स्वरूपात देणे आणि  स्थापित गटाने त्याची मुदतीत जबाबदारीने परतफेड करणे असे नियोजन केले. दहा शेतकऱ्यांनी मंडळाच्या माध्यमातून कर्ज परतफेड केल्यामुळे नाबार्डने सहाशे शेतकऱ्यांना अर्थसाहाय्याची तयारी दर्शविली. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ठिबकच्या माध्यमातून पाण्याच्या कार्यक्षम वापर करत पीक उत्पादन वाढविले आणि कर्जाची परतफेडही केली.

बावीस गावांत फळझाडांची लागवड संस्थेच्या माध्यमातून २००७ ते २०११ दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील २२ गावांत सुमारे ७८ हजार कोरडवाहू फळझाडांची (आवळा, सीताफळ, आंबा, चिंच) लागवड करण्यात आली. त्यानंतरच्या दुष्काळातही ६१ टक्‍के फळझाडे दुसऱ्या वर्षीही उभी होती. परंतू सततच्या संकटातूनही लागवड केलेल्या फळझाडांपैकी ३० टक्‍के झाडे अजूनही टिकून आहेत.

लोकसहभागातून ग्रामविकास   पाणी नाही म्हणून विकास थांबलेल्या पोफळा (जि. औरंगाबाद) या गावात तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर शेजारच्या डोंगरावरून वाहून जाणारे पाणी वळवून गाव तळ्यात आणण्यात आले. पाणलोट क्षेत्र विकासाची कामे झाली. तलावातील गाळ उपसून शेतात पसरण्यात आला. या गावाने २०१२ च्या दुष्काळात वॉटर बजेट तयार केले. त्यानुसार पाणी व्यवस्थापन करण्यात येते. या गावात आता शंभर टक्‍के शौचालये झाली. दहिगव्हाण (जि. जालना) गावामध्येही लोकसहभागातून विविध उपक्रमांना सुरवात झाली.

जलसंधारणावर भर   औरंगाबाद जिल्ह्यातील या गावांनी लोकवर्गणी जमवली, श्रमदानही केले. विविध कंपन्यांनीही साथ दिली. गावशिवारातील सहा बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन झाल्याने विहिरींची पाणीपातळी वाढली. २०१२ च्या दुष्काळात जेथे फळबागा मोडण्याची वेळ आली होती, तेथे २०१४ मध्ये सुमारे ७१ एकरावरील डाळिंब बागा केवळ नियोजनातून शेतकऱ्यांनी जगविल्या. यासाठी आयएल ॲन्ड एफएस, फोर्बस या कंपन्या, सीआयआय ही उद्योगाची संघटना, जलतज्ज्ञ, भूगर्भतज्ज्ज्ञ आणि गावकरी या सगळ्यांची मजबूत मोट मंडळाने बांधली. कोल्हापुरी बंधाऱ्याचे रूपांतर पक्‍क्‍या सिमेंट बंधाऱ्यांमध्ये झाले. पात्रात खोदकाम करून साठवण आणि भूजल पातळी वाढविण्यात यश मिळाले. गावातील ८९ विहिरींचा दैनंदिन अभ्यास करण्यात आला. बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रातील ८१ विहिरींना जल-मृद संधारणाच्या उपायांचा फायदा झाल्याचे समोर आले. सरकारी मदतीशिवाय आपण काही करू शकतो हा विश्वास गावकऱ्यांना आला. जिथे तीन लाखांचा लोकसहभाग अपेक्षित होता, तेथे तेरा लाख रुपये जमले. तीन वर्षात चार बंधारे होण्याऐवजी दोन वर्षातच सहा बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन झाले. शेलूद, चारठाप्रमाणेच दुधना, बोर्डी, गिरजा खोऱ्याचा तांत्रिक नकाशा तयार करून पाणलोट क्षेत्रविकासाची कामे करण्यात येत आहेत. २०१४-१५ मध्ये नाबार्डने दुष्काळ निर्मूलनाची विशेष मदत म्हणून तीन गावामध्ये ''डोह मॉडेल''साठी २३ लाखांची मदत दिली.तेवढीच रक्‍कम ग्रामस्थ आणि संस्थेने मिळून उभी करत कामे पूर्ण केली. एका दानशुराने ५२ लाखांची पोकलॅन यंत्रणा संस्थेला दान दिली.

गोकूळम पशुधन आरोग्य साथी ग्रामीण भागात आशा वर्करच्या धर्तीवर पशुधन आरोग्य साथी निर्माण करण्यावर मंडळाने भर दिला. संस्थेने ४५ गावातील ४५ निवड केलेल्या व्यक्‍तींना जनावरांमध्ये येणाऱ्या आजारांवर कोणते प्रथमोपचार करता येतील याविषयीचे प्रशिक्षण दिले. यामुळे जनावरांचे संगोपनाबाबत जागरूकता आली आहे.

 : सुहास आजगावकर (सचिव) ः ९४०३०१८९१७

 : डॉ. प्रसन्न पाटील, संचालक (प्रकल्प) ः ९८२२४३५५३९ आठ गावांत २०० सोलार ड्रायर

  • भाजीपाला वाळविण्यासाठी आठ गावांमध्ये २०० सोलर ड्रायर तसेच प्रशिक्षण.
  • हातमळी आणि लामकाणा येथील महिला शेतकऱ्यांनी दोन टन आले वाळवून मुंबई बाजारपेठेत विकले.
  • सध्या ६७ महिला बचत गट कार्यरत. महिला शेतकरी भाजीपाला वाळवून विक्रीसाठी उपलब्ध करून देतात.
  • 'कृषिकन्या' प्रकल्प शेतकरी महिलांच्या प्रबोधनासाठी औरंगाबाद, जालना जिल्ह्यात ७५० कृषिकन्या कार्यरत. आरोग्य, शिक्षणविषयक जनजागृती  

  • ग्रामीण, शहरी भागात गुरूवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र, संत रोहिदास आरोग्य केंद्र, संत गाडगेबाबा आरोग्य केंद्र, सहा ठिकाणी श्री गुरूजी चलचिकित्सालय.
  • आठ ठिकाणी संजीवनी ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्यक्ष ओपीडी, औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये माता बाल आरोग्य याविषयी काम.
  • जिल्हा परिषदेच्या ५५ शाळांमध्ये शालेय आरोग्य प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी घेण्याविषयी प्रबोधन.
  • शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी एका ठिकाणी ओंकार बालवाडी, चार ठिकाणी वस्ती बालवाडी, तीन ठिकाणी विद्यार्थी विकास प्रकल्प.
  • शहरातील पाच हजार मुली व ग्रामीण भागातील अठरा गावांतील दोन हजार मुलींच्या सहभागातून किशोरी विकास प्रकल्प.
  • कौशल्य विकासावर भर

  • सहा वर्षापासून संगणक परिचलनासह व्यवसाय प्रशिक्षण, कौशल्य विकासावर आधारीत प्रशिक्षण.
  • बालवाडी शिक्षिका, केटरिंग, अन्नप्रक्रिया, ब्युटिशीयन, फॅशन डिझायनिंग, रुग्ण सहायक, होम केअर असिस्टंट, वायरमन, हार्डवेअर नेटवर्किंग आदी विषयांचे प्रशिक्षण.
  • आजपर्यंत सहा हजार ग्रामीण व शहरी भागातील व्यक्‍तींना रोजगारासाठी प्रशिक्षण.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com