जमीन सुपीकता जपत गूळनिर्मितीतून वाढविला नफा

बागणी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील प्रयोगशील शेतकरी स्वागत संजय शेटे यांनी जमिनीची सुपीकता जपत पीक नियोजन केले. केवळ ऊस उत्पादनावर न थांबता सेंद्रिय पद्धतीने गूळनिर्मितीवर लक्ष केंद्रित करत आर्थिक नफा वाढविला. सेंद्रिय उत्पादक गटाच्या माध्यमातून त्यांनी शेतीमाल विक्रीचेही योग्य नियोजन साधले आहे.
सेंद्रीय घटकांमुळे भुसभुशीत, सुपीक झालेली जमीन व त्यात उसाची झालेली जोमदार वाढ दाखविताना स्वागत शेटे .
सेंद्रीय घटकांमुळे भुसभुशीत, सुपीक झालेली जमीन व त्यात उसाची झालेली जोमदार वाढ दाखविताना स्वागत शेटे .

बागणी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील प्रयोगशील शेतकरी स्वागत संजय शेटे यांनी जमिनीची सुपीकता जपत पीक नियोजन केले. केवळ ऊस उत्पादनावर न थांबता सेंद्रिय पद्धतीने गूळनिर्मितीवर लक्ष केंद्रित करत आर्थिक नफा वाढविला. सेंद्रिय उत्पादक गटाच्या माध्यमातून त्यांनी शेतीमाल विक्रीचेही योग्य नियोजन साधले आहे.

पेठ - सांगली रस्त्यावरील बागणी हे वारणा नदीच्या पट्ट्यातील बागायती गाव. या गावशिवारात स्वागत संजय शेटे यांची पाच एकर शेती आहे. त्यांची जमीन चांगल्या निचऱ्याची आहे. यापैकी तीन एकरांवर ऊस लागवड आणि उर्वरित क्षेत्रात हंगामानुसार भाजीपाला, कडधान्ये, भुईमूग, खपली गव्हाची लागवड असते. शिक्षणानंतर वडिलांच्या बरोबरीने त्यांनी शेती नियोजनात लक्ष देण्यास सुरवात केली.

जमीन सुपीकतेवर भर स्वागत शेटे यांनी पीक उत्पादनवाढीच्या बरोबरीने जमीन सुपीकतेवर लक्ष दिले. याबाबत ते म्हणाले, की २००९ पूर्वी मी पिकांना रासायनिक खतांचा वापर करत होतो. परंतु त्यानंतर मी पूर्णपणे शेणखत, जिवामृताच्या वापराकडे वळलो. मी सुरवातीच्या काळात कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गाय, बैल सोडवून गोशाळेत, तसेच माझ्या शेतावरही सांभाळत होतो. त्यामुळे पुरेशा प्रमाणात शेणखताची उपलब्धता होऊ लागली. त्यातूनच मी पूर्णपणे नैसर्गिक शेती पद्धतीकडे वळलो. या पद्धतीमुळे रासायनिक खते, कीडनाशके आणि मजुरांच्या वरील खर्च वाचला. सध्या माझ्याकडे तीन देशी गाई आणि दोन खिलार बैल आहेत. गाई, बैल संगोपनास सुरवात केल्यावर शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे बंद केला. शेणखत, जिवामृताचा वापर आणि पाचट आच्छादनातून जमीन सुपीक करण्यास सुरवात     केली.

ऊस शेतीचे नियोजन शेती नियोजनाबाबत स्वागत शेटे म्हणाले, की सध्या अडीच एकरावर को-८६०३२ जातीचा खोडवा आहे. वीस गुंठ्यांवर को-९२००५ जातीची सुरू लागवड आहे. शेतात एक विहीर आणि पाणीपुरवठा योजनेचे पाणी आणले आहे. ट्रॅक्‍टर मशागतीमुळे जमिनी टणक बनतात. हे लक्षात घेऊन मी गेल्या आठ वर्षांपासून बैलाने जमिनीची मशागत करतो. त्यासाठी दोन खिल्लार बैल सांभाळले आहेत. ऊस लागवडीपूर्वी मी दरवर्षी आलटून पालटून वेगवेगळ्या क्षेत्रात मशागतीच्या वेळी शेणखत मिसळतो. त्यामुळे जमीन भुसभुशीत झाली, ओलावाही टिकून राहतो. ऊस लागवडीनंतर दर महिन्याला पाट पाण्याबरोबरीने जिवामृत दिले जाते. मी गेले नऊ वर्षे रासायनिक खताचा वापर केलेला नाही. पहिल्यापासून पाचटाचे आच्छादन केल्याने सेंद्रिय घटक जमिनीत मिसळतात, उन्हाळ्यात पाण्याचा ताण बसत नाही. गरजेनुसार गोमूत्र आणि जिवामृताची पिकावर फवारणी करतो. जमीन सुपीक झाल्याने गांडुळांची संख्या वाढली आहे. जमिनीचा सेंद्रिय कर्ब १.५६ पर्यंत गेला आहे. मला एकरी सरासरी पन्नास टन ऊस उत्पादन मिळते. 

गूळनिर्मितीवर भर नैसर्गिक पद्धतीने ऊस व्यवस्थापन केले तर उत्पादन खर्च कमी होतो, जमीन सुपीक होते हे खरे असले तरी सेंद्रिय उसाला स्वतंत्र मार्केट नाही. कारखान्याला ऊस दिला तर दरही तेवढाच मिळतो. हे लक्षात घेऊन स्वागत शेटे यांनी सेंद्रिय गूळनिर्मितीवर भर दिला. याबाबत ते म्हणाले, की मला एकरी पन्नास टन ऊस उत्पादन मिळते. त्यापैकी चाळीस टन ऊस गूळनिर्मितीला वापरतो. दहा टन ऊस परिसरातील शेतकऱ्यांना गूळनिर्मितीसाठी दिला जातो. आमच्या गटातील शेतकऱ्याचे गुऱ्हाळ आहे. तेथे सेंद्रिय पद्धतीनेच खात्रीने गूळनिर्मिती केली जाते. गूळनिर्मिती करताना देशी भेंडीचा रस आणि चुना वापरला जातो. मी स्वतः थांबून गूळनिर्मिती करून घेतो. साधारणपणे एक टन उसापासून शंभर किलो गूळ तयार होतो. दरवर्षी तीन टन गूळ आणि एक टन गूळ पावडर तयार करतो. खर्च वजा जाता नेहमीपेक्षा २० ते २५ टक्के नफा मिळतो.

‘श्रीकृष्ण’ ब्रॅंडने विक्री

  • थेट ग्राहकाला गूळ आणि पावडर विक्रीवर भर.
  • बाजारपेठेत वेगळेपण जपण्यासाठी ‘श्रीकृष्ण’ ब्रॅंड.
  • एक किलोचे गूळ पॅकिंग. गावामध्ये प्रति किलो ८० रुपये तर शहरात ९० रुपये किलो दराने गूळ विक्री. गूळ पावडर १२० रुपये प्रति किलो दराने विक्री.
  • नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झालेला भाऊ अभिनंदन हा ग्राहकांना थेट विक्री करतो.
  • कृषी प्रदर्शनातून गूळ, पावडर विक्रीवर भर.
  • सांगली, पुणे, मुंबई तसेच इतर शहरांतील ग्राहकांना मागणीनुसार गूळ, पावडर पाठविण्याची सोय.
  • लाकडी तेलघाणा उभारून पारंपरिक पद्धतीने खाद्यतेल निर्मितीचे नियोजन.
  • शेतकरी गटाची सुरवात स्वागत शेटे आणि परिसरातील सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या दहा शेतकऱ्यांनी गट तयार केला आहे. यामध्ये पीक उत्पादन, प्रयोगांबाबत चर्चा होते, शिवारफेरी केली जाते. या शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण केले आहे. त्याचबरोबरीने थेट ग्राहकांना गूळ, पावडर, गहू, ज्वारी, कडधान्ये, हळद, आले, भाजीपाल्याची विक्री केली जाते. गटातील सदस्य विविध प्रदर्शनात सहभागी होतात. त्यातून उत्पन्न वाढविण्याचा आणि नवीन ग्राहक जोडण्याचा प्रयत्न असतो.

    संपर्क : स्वागत शेटे, ८०५५३५०१३१  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com