agricultural success story in marathi, balwantrao paul, banchincholi, nanded, maharashtra | Agrowon

सेंद्रिय शेतीसाठी उत्कृष्ट गांडूळ खत निर्मिती
डॉ. टी. एस. मोटे
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

खताचा दर्जा पाहून गाय सप्रेम भेट
परिसरातील शेतकरी शरद देशमुख यांनी जेव्हा पऊळ यांच्याकडील गांडूळखताचा दर्जा पाहिला त्या वेळी ते खूश झाले. तुम्ही सेंद्रिय शेती उत्तम करता, ही माझ्याकडील गाय तुम्हाला ठेऊन घ्या, तुम्हाला तिची अधिक गरज आहे असे म्हणत आपली गाय पऊळ यांना चक्क सप्रेम भेट दिली. ही आठवण आपल्यासाठी खूप मोलाची असल्याचे पऊळ म्हणतात.
 

बनचिंचोली (जि. नांदेड) येथील बळवंतराव देवराव पऊळ यांनी चार वर्षांपूर्वी सेंद्रिय शेतीला सुरवात केली. त्यासाठी सुरू केलेल्या गांडूळ खत उत्पादन प्रकल्पाची वाटचाल व्यावसायिक उत्पादनापर्यंत पोचली आहे. एक बेडपासून सुरू झालेला प्रवास आज बारा बेडसपर्यंत पोचला आहे. सोयाबीन, गहू, हरभरा, आदी विविध पिकांचे सेंद्रिय पध्दतीने दर्जेदार उत्पादन घेताना आरोग्यदायी अन्ननिर्मितीचे समाधान त्यांनी मिळवले आहे.

नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्‍यातील बनचिंचोली येथील ३५ वर्षीय बळवंतराव देवराव पऊळ यांची सुमारे २३ एकर शेती आहे. यातील दोन एकरांवर ऊस आहे. बाकीचे क्षेत्र पूर्णपणे कोरडवाहू आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी त्यांना सेंद्रिय खतांच्या वापराविषयी सांगण्यात आले. त्याचा वापर केला असता पीक उत्पादनाचा दर्जाही चांगला मिळाल्याचे आढळले. त्यानंतर सेंद्रिय शेतीत त्यांना रस निर्माण झाला.

सेंद्रिय शेतीकडे वाटचाल
सेंद्रिय शेती करताना रासायनिक शेतीतील उत्पादन खर्च कमी व्हावा हादेखील उद्देश होता. त्यादृष्टीने गांडूळ खत उत्पादनापासून सुरवात करण्याचा निर्णय घेतला. ‘एचडीपीई’ घटकांच्या साह्याने तयार लेल्या बेडच्या सहाय्याने गांडूळ खत निर्मितीविषयी माहिती ॲग्रोवनच्या माध्यमातून त्यांच्या वाचनात आली. सन २०१२ च्या दरम्यानची ही गोष्ट. सांगली जिल्ह्यातील संबंधित शेतकऱ्याशी संपर्क साधून त्यांनी बेड व दोन किलो गांडुळांची खरेदी केली. साधारण १२ बाय चार बाय दोन फूट असे या बेडचे आकारमान आहे. घरच्या जनावरांचे शेण व पालापाचोळा यांचा वापर करून गांडूळ खत तयार करणे सुरू केले.

रासायनिक शेती केली बंद
तयार झालेले गांडूळ खत पऊळ आपल्याच शेतात वापरू लागले. हळूहळू रासायनिक खतांवरील खर्च ते कमी करू लागले. त्यानंतर २०१३ मध्ये आणखी तीन बेड मागवले. आज त्यांच्याकडे बेडसची एकूण संख्या १२ झाली आहे. चार वर्षांपूर्वीच रासायनिक शेती जवळपास बंद केली आहे. सातत्याने चार वर्षांपासून शेतात गांडूळ खत वापरत असल्यामुळे कुठेही उकरून पाहिले असता गांडुळांचे भरपूर प्रमाण दिसून येते. यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत झाली आहे.

शिल्लक गांडूळखताची विक्री
उत्पादन दर्जेदार असल्याने शिल्लक गांडूळखताचा व्यवसाय करण्याचेही पऊळ यांनी ठरवले. त्यांच्या या खतास परिसरातून मोठी मागणी आहे. म्हणूनच आता ४० बेडस नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. बांबूचे ३६ बाय ८० फुटांचे शेड करून सावलीसाठी शेडनेट वापरले आहे. या शेडमध्ये बारा एचडीपीई बेडस ठेवले आहेत. याच शेडमध्ये खताची साठवणूकही केली जाते.

गांडूळ बेड भराई
बेडमध्ये जनावरांनी खाऊन उरलेला चारा, कुटार, शेण, गोमुत्रामध्ये घुसळून थरावर थर दिला जातो. त्यानंतर पंधरा दिवस पाणी शिंपडून त्यातील उष्णता काढून टाकली जाते. प्रत्येक बेडमध्ये दोन किलो गांडूळे सोडली जातात. सेंद्रिय घटक लवकर कुजावेत म्हणून तीन ते चार किलो गूळ अधिक दोन लिटर दही अधिक तीन किलो हरभरा पीठ व २५ ते ३० लिटर पाणी असलेले द्रावण बेडवर नियमित शिंपडले जाते. हे मिश्रण पाच बेडना पुरते. या द्रावणामुळे गांडुळाची संख्या झपाट्याने वाढते असा पऊळ यांचा अनुभव आहे.  साधारण प्रत्येक बेडमधून तीन महिन्यांच्या कालावधीत एक टनांप्रमाणे खतनिर्मिती होते. वर्षाला सर्व बेडस मिळून सुमारे ३० टन किंवा त्याहून अधिक खत उपलब्ध होते. शेणखत व शेळ्यांच्या लेंड्यापासून खत लवकर तयार होते. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांकडून त्यांची खरेदी केली जाते.

खताला भरपूर मागणी
पऊळ म्हणतात, की गांडूळखताला इतकी मागणी आहे की तेवढे उत्पादन करणे मला सध्या तरी अशक्य होत आहे. आत्तापर्यंत पाच टन खताची विक्री त्यांनी केली आहे. चाळीस किलोचे पॅकींग केले जाते. त्यासाठी पाचशे रुपये दर ठेवला आहे. आता दोन, चार किलोच्या लहान पिशव्याही तयार केल्या आहेत. नांदेड येथे पऊळ यांची मुले शिक्षणासाठी आहेत. साधारण दोन ते तीन दिवसांमागे पऊळ आपल्या नांदेड येथील घरीही जाऊन येऊन असतात. त्या वेळी गांडूळ खताच्या पिशव्याही विक्रीला आणतात. ‘वसुधा एंटरप्रायझेस’ या नावाने ब्रॅंड बनविला आहे.

पालापाचोळा कुजवण्याची पद्धती
शेतातील पालापाचोळा, गवत, उसाचे पाचट कुजवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले आहे. यात खत कुजवण्याची व ते तयार होण्याची प्रक्रिया जलद होते. यासाठी पालापाचोळ्याचा थरावर थर रचला जातो. प्रत्येक थर भरल्यानंतर जीवामृताची फवारणी करून तो थर ओला करून घेतला जातो. थरावर थर आठ फुटांचे झाल्यानंतर त्यावर पंधरा दिवस सतत पाणी फवारले जाते. त्यानंतर डेपो ताडपत्रीने झाकून घेतला जातो.

गोशाळेचे नियोजन -
गांडूळ खताला वाढता प्रतिसाद पाहता पऊळ यांना शेणाची टंचाई भासत आहे. सध्या त्यांच्याकडे चार गावरान गाई व दोन बैल आहेत. भविष्यात त्यांना गोशाळा सुरू करावयाची आहे. जखमी झालेल्या, वयस्क गायी सांभाळणे शेतकऱ्यांना परवडत नाही. अशा गायी घेऊन त्यांचे संगोपन करण्याची त्यांची इच्छा आहे.

दर्जेदार उत्पादन
सेंद्रिय पध्दतीचा वापर सुरू केल्यापासून उत्पादनाचा दर्जा वाढल्याचा अनुभव पऊळ यांना येत आहे. मागील वर्षी सोयाबीन एकरी १२ क्विंटल तर यंदा सात क्विंटल, मागील वर्षी हरभरा सव्वा एकरांत २० क्विंटल असे उत्पादन मिळाले. गव्हाचे मागीलवर्षी दोन एकरांत ३० क्विंटल उत्पादन मिळून जागेवरच २५०० रुपये प्रति क्विंटल दराने विकले गेले. मागील वर्षी डॉलर हरभऱ्याचे दोन एकरांतील उसात १८ क्विंटल उत्पादन मिळाले. तो किलोला १५० रुपये दराने विकला. यंदा पाणी नाही, गेल्यावर्षीही नाही. यंदा हरभरा १५ एकर असून तीन एकरांत डॉलर हरभरा आहे. त्याला १७० रुपये प्रति किलो दराने मागणी आहे. मात्र दोन वर्षांपासून पुरेशा पाण्याअभावी क्षेत्र वाढवणे व भरपूर उत्पादन घेणे अशक्य होत असल्याचे पऊळ यांनी सांगितले.

व्हर्मीव्हॉशचीही विक्री
पेरणीआधी सेंद्रिय घटकांची बीज प्रक्रिया केली जाते. गांडूळखतनिर्मितीत व्हर्मी व्हॉशही तयार होते. बेडच्या एका कोपऱ्यात जमिनीत खड्डा तयार करून त्यात भांडे ठेवतात. त्यात बेडमधून येणारे व्हर्मीव्हॉश जमा होते. त्याचा स्वतःच्या शेतात वापर होतोच. शिवाय ५० रुपये प्रति लिटर दराने विक्री देखील होते.

शेतकऱ्याचे प्रयोग वाचून मिळाली प्रेरणा
आरग (ता. मिरज, जि. सांगली) येथील संजय कोळी यांनी गांडूळखताचा वापर व त्याविषयीच्या तंत्राचा प्रयोग दोन वर्षांपूर्वी ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झाला होता. पऊळ यांनी त्यापासून प्रेरणा घेतली. त्यांनी कोळी यांच्याकडून संपूर्ण मार्गदर्शन व गांडूळखताचे बेडही खरेदी केले. आज कोळी हे पऊळ यांच्या यशकथेतील महत्वाच्या वाटेकऱ्यांपैकी एक ठरले आहेत.

बळवंतराव पऊळ - ९५५२२८४०४०
(लेखक नांदेड येथे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आहेत.) -

 

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...