तूर, उडीद लागवडीवर सर्वाधिक भर

तूर, उडीद लागवडीवर सर्वाधिक भर
तूर, उडीद लागवडीवर सर्वाधिक भर

आमच्या भागात खरिपात सहसा पिके घेत नाहीत, रब्बी हा आमचा प्रमुख हंगाम आहे. पण अलीकडच्या काही वर्षात पावसाच्या भरवशावर आम्ही खरिपात पिके घ्यायला सुरवात केली आहे. त्यातही फक्त तूर किंवा तूरीमध्ये उडदाचे आंतरपीक घेतले जाते. तूर, उडदाला मिळणारा दर हे त्याचे एक कारण आहेच, पण तुरीमुळे जमिनीच्या मशागतीचा खर्च वाचतो, तर उडदामुळे जमिनीची सुपीकता वाढत असल्याने आमच्यासाठी ही पिके बोनस ठरतात, असे दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील भंडारकवठ्याचे शेतकरी उमाशंकर पाटील सांगतात... उमाशंकर पाटील यांची २० एकर शेती आहे. त्यात सध्या ८ एकर ऊस आहे. इतर क्षेत्रावर खरीप आणि हंगामात हंगामी पिके घेतली जातात. पाण्यासाठी विहीर, बोअरसह शेततळे आहे. पण सगळे गणित पावसावर अवलंबून आहे. यंदाच्या खरिपातील पिकासाठी त्यांनी सध्या जमिनीच्या मशागतीला सुरवात केली आहे. यंदा पुन्हा ते चार एकर क्षेत्रावर तूर आणि उडदाचा प्रयोग करणार आहेत. आपल्याकडील जमीन आणि पाण्याच्या उपलब्ध स्राेताचा वापर करून शेती करणे, त्यातही कमीत-कमी खर्चात ती करणे, आवश्‍यक आहे, असे त्यांचे मत आहे. त्या हेतूनेच उसाची लागवड केलेली असली, तरी खरीप हंगामात ते तूर आणि उडदाचा प्राधान्याने विचार करतात, तुरीला जरी पाच-सहा महिने लागत असले, तर आंतरपीक म्हणून घेतले जाणारे उडीद अवघ्या ११० दिवसात निघते. शिवाय एखादे पाणी मिळाले, तरी हे पीक जोमदार येऊ शकते. त्यामुळे तूर आणि उडदाचा गेल्या दोन-तीन वर्षाचा त्यांना चांगला अनुभव आला आहे. खरीप हंगामात मुख्यतः पाऊस वेळेवर पडला पाहिजे, पण आमच्याकडे पाऊस उशिराने पडतो, त्यामुळे बऱ्याच वेळी खरीप कोरडा जातो. त्याशिवाय बोगस बियाणे आणि मजूर टंचाई याही समस्या असतातच. पण पीक लागवडीचे योग्य अंतर आणि घरच्या घरी कामे करणे, मशागतीसाठी ट्रॅक्‍टरचा वापर करणे, हे पर्याय शोधले आहेत. या समस्येवर उपाय सांगताना संकरित बियाणे वापरताना सरकारी प्रमाणित बियाणे वापरणे किंवा देशी बियाण्यांचा वापर यावर माझा भर असतो. त्यामुळे एक-दोन क्विंटलचा फरक पडेलही, पण खात्रीशीर उत्पादन मिळू शकते. पीक पद्धती यशस्वी करण्यामध्ये मुख्यतः नियोजनाला महत्त्व देतो, खरिपात सर्वाधिक तुरीची आणि आंतरपिकासाठी उडदाची निवड करतो. तूर, उडदाला हमीभाव असल्याने पैशाची खात्री असते. शिवाय कमी पाणी आणि खर्च. हेही एक कारण आहे. तांत्रिकदृष्ट्या या पिकाचा विचार करता तुरीच्या लागवडीमुळे काढणीनंतर जमिनीची चांगली मशागत होते, तर उडदामुळे जमिनीची प्रत सुधारण्यास मदत होते. मुख्यतः बेवड चांगली होते. आज तुरीच्या शेतात लागवड केलेला ऊस अगदीच जोमदार येत असल्याचे माझे निरीक्षण आहे, असे पाटील म्हणतात. गेल्या दोन-तीन वर्षात तुरीचेच पीक घेतो, त्यासाठी योग्य वाणाची निवड, लागवडीतील योग्य अंतर, ठिबकद्वारे पाणी आणि खताचा मर्यादित वापर यावर लक्ष देतो. साहजिकच, त्यातून मला तुरीचे एकरी सरासरी ७ क्विंटल उत्पादन मिळते. तर उडदाचे २ क्विंटल उत्पादन मिळते. सरकारनेही वेळेवर खरेदी केंद्रे सुरु करुन नियोजन केल्यास उत्पादन आणखी वाढेल आणि शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल. संपर्क : उमाशंकर पाटील, ८८८८८२४२४५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com