एकत्रित कुटुंबाने शेतीला दिली नवी दिशा

बागेत द्राक्षांची पाहणी करताना रंगनाथ जाधव
बागेत द्राक्षांची पाहणी करताना रंगनाथ जाधव

बोरी बुद्रुक (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील भीमाजी होनाजी जाधव यांनी वडिलोपार्जित सात एकर जमिनीत काबाड कष्ट करत मिळालेल्या उत्पन्नातून टप्प्याटप्प्याने साठ एकरपर्यंत क्षेत्र वाढविले. शेती नियोजनात त्यांना भावंडांचीही चांगली साथ मिळते. गेल्या काही वर्षांत दर्जेदार द्राक्ष, डाळिंबाचे उत्पादन घेत जाधव कुटुंबीयांनी शेतीमध्ये वेगळी ओळख तयार केली आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा असलेल्या जाधव कुटुंबीयांची वडमाळवस्ती, बोरी बुद्रुक (जि. पुणे) येथे शेती आहे. जाधव कुटुंबात ३६ सदस्य आहेत. थोरले भीमाजी यांच्या मार्गदर्शनाखाली दशरथ, लक्ष्मण, रंगनाथ, ज्ञानेश्‍वर या भावांनी शेती व्यवस्थापनामध्ये चांगली साथ दिली आहे. शेतीबरोबरीने जाधव बंधुंचा सहा गाईंचे संगोपन करत दुधाचा छोटा व्यवसायही सुरू होता. त्या काळी बोरी परिसरामध्ये पडीक जमीन विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी असल्याने जाधव बंधुंनी ट्रॅक्टर खरेदी केला. १९८६ मध्ये बटाटा पिकांपासून दूर जात तीन एकर क्षेत्रामध्ये जाधव बंधुंनी द्राक्ष बाग केली. जोडीला टोमॅटो, कोबी, काकडी या भाजीपाला पिकांतून उत्पन्न वाढले. या पैशातून दहा एकर जमीन विकत घेत १९९१ ते २००० या कालावधीत द्राक्ष आणि ऊस लागवडीवर भर दिला.यातूनच एकत्रित कुटंबांची आर्थिक मिळकत वाढत गेली. तीस वर्षांपूर्वी तीन एकर क्षेत्रात सुरू केलेल्या द्राक्ष बागेने जाधव बंधुंना अाज प्रगतिशील बागायतदार अशी ओळख मिळवून दिली आहे. शेतीतील प्रगतीमुळे जिल्हा परिषदेतर्फे जाधव कुटुंबाचा डॉ. आप्पासाहेब पवार कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार रंगनाथ होनाजी जाधव यांनी स्वीकारला.

अविकसित क्षेत्र विकसित करण्यावर भर शेती व्यवसायातून प्रगती करत असताना शेती खरेदीवर अधिक भर देणाऱ्या जाधव कुटुंबीयांनी १९९७ मध्ये नारायणगडाच्या पायथ्याशी डोंगर उतारावरील २९ एकर आणि २००४ मध्ये चांडोह (ता. आंबेगाव) येथे ३५ एकर जमीन खरेदी केली. यासाठी गडाचीवाडी येथील दहा एकर क्षेत्र विकावे लागले. ही दोन्ही अविकसित क्षेत्र विकसित करण्यासाठी अपेक्षित खर्च पाहता त्यांनी २००८ मध्ये जेसीबी यंत्र खरेदी केले. यातून सुरवातीला चांडोह आणि त्यानंतर गडाचीवाडी येथील क्षेत्र पीक लागवडीखाली आणले.

पाचटाचे आच्छादन जाधव बंधुंनी द्राक्ष, डाळिंब बागेत पाचटाचे आच्छादन केले आहे. यामुळे ओलावा टिकला तसेच पाणी वापरात बचत झाली. उन्हामुळे पाचटाला आग लागून नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाचटावर माती टाकली आहे. यामुळे गवत वाढत नाही, पाचट कुजल्याने सेंद्रिय कर्ब वाढणास मदत होते. झेंडू पिकासाठी प्लॅस्टिक आच्छादनाएेवजी पाचटाचा वापर केला जातो. द्राक्ष हंगामाचे नियोजन द्राक्ष हंगामाच्या नियोजनाबाबत संतोष जाधव म्हणाले की, आम्ही बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन काळ्या रंगाच्या द्राक्ष जातींवर भर दिला. आमच्याकडे नाना पर्पल, कृष्णा सीडलेस या जातींची लागवड आहे. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यात बाग धरली जाते. हंगामात हिवाळ्याचा कालावधी अधिक असल्याने कमी तापमानात शिफारशीनुसार विद्राव्य खतांचा वापर केला जातो. योग्यवेळी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार कीडनाशकांची फवारणी केली जाते. यामुळे खर्चात बचत होते. द्राक्ष मण्यांना योग्य रंग येण्यासाठी काटेकोर नियोजन करतो. १२० दिवसांत द्राक्ष घड काढणीस येतात. बाग लवकर धरल्याने जानेवारी महिन्यात काढणी सुरू होते. त्यामुळे बाजारपेठेत सरासरी ६० ते ८० रुपये प्रति किलो दर मिळतो. एकत्र कुटुंबातून झाली प्रगती जाधव यांच्या कुटुंबात ३६ सदस्य आहेत. एकत्रितपणे कुटुंबाने शेती नियोजन केले आहे. क्षेत्र मोठे असल्याने प्रत्येक भावाने शेती कामाची जबाबदारी घेतली आहे. याबाबत संतोष जाधव म्हणाले की, भीमाजी संपूर्ण शेतीचा आर्थिक व्यवहार पहातात. दशरथ हे चांडोह येथील शेतीचे नियोजन पहातात. लक्ष्मण यांच्याकडे गडाचीवाडी येथील शेती आणि मजुरांचे नियोजन आहे. रंगनाथ यांच्याकडे शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांची खरेदी, पिकाला खतमात्रा देणे, कीडनाशकांच्या फवारणीची जबाबदारी आहे. ज्ञानेश्वर यांच्याकडे शेतीच्या बरोबरीने विविध पिकांसाठी लागणाऱ्या मजुरांच्या नियोजनाची जबाबदारी आहे. आमच्या कुटुंबातील महिलादेखील शेती नियोजनात सहभागी असतात. प्रत्येक सदस्याला शेतीमधील वर्षभराचे नियोजन माहिती असल्यामुळे कोणतेही काम खोळंबत नाही. माझा चुलत भाऊ विकास हा कृषी पदवीधर आहे. त्यामुळे येत्या काळात कृषिपूरक उद्योगाच्या उभारणीचे नियोजन केले आहे. यांत्रिकीकरणावर भर जाधव बंधू संपूर्ण क्षेत्रासाठी परीसरातील शेतकऱ्यांच्याकडून २०० ट्रॉली शेणखत खरेदी करतात. हे खत ट्रॅक्टरमध्ये भरण्यासाठी मोठ्या प्रमाणवर मजूर लागत होते. मजूर टंचाई लक्षात घेऊन खत भरण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो. यामुळे खत भरणे आणि वाहतुकीसाठी केवळ दोन माणसे लागतात. द्राक्ष बागेत फवारणीसाठी ब्लोअर यंत्र, डाळिंबबागेत फवारणीसाठी साधा ब्लोअर, २४  अश्वशक्तीचे तीन ट्रॅक्टर, एक जेसीबी आदी यंत्रे अवजारे आहेत. जाधव यांच्या बागेत वर्षभर पंधरा कुटुंबांना रोजगार मिळाला आहे.  नाशिक परिसरातील मजूर कुटुंब आता जाधव यांच्या शेताजवळ स्थायिक झाली आहेत. त्यांना रक्कम ठरवून कामाचा ठेका दिला जातो. सायफन पद्धतीने शेतीला पाणी गडाची वाडी येथे सात टप्प्यात असलेल्या शेतीमध्ये सर्वात वरच्या टप्प्यामध्ये पाऊण एकर क्षेत्रात जाधव बंधुंनी दोन कोटी लिटर क्षमतेचे शेततळे केले आहे. पायथ्याच्या टप्प्यापासून ७० फूट उंचीवर असलेल्या या शेततळ्यातून नैसर्गिक दाबाने विद्युत पंपाचा वापर न करता दहा एकर क्षेत्राला ठिबक सिंचनाने पाणीपुरवठा केला जातो. शेततळ्यात पाणी साठविण्यासाठी दोन कूपनलिका घेतल्या आहेत. त्यातून तळ्यात पाणी सोडले जाते. उन्हाळ्यात दोन महिने दहा एकर क्षेत्राला शेततळ्यातील पाणी दिले जाते. असे आहे पीक लागवड क्षेत्र द्राक्ष : २८ एकर क्षेत्र. काळ्या रंगाची जंबो द्राक्षे. नाना पर्पल, कृष्णा सीडलेस या जातींवर भर. एकरी १० टन उत्पादन. काही प्रमाणात व्यापाऱ्यांच्यामार्फत निर्यात, स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री. ऊस : वीस एकर क्षेत्र : पंधरा एकरावर को-८६०३२ जातीची लागवड, एकरी ६० टन उत्पादन. पाच एकरावर रसासाठी मागणी असलेल्या ४१९ या जातीची लागवड. डाळिंब : पाच एकरांवर भगवा जातीची लागवड, एकरी १२ टन उत्पादन. आळेफाटा आणि नाशिक बाजारपेठेत विक्री.   कांदा : सात एकरांवर फुरसुंगी जातीची लागवड, एकरी १५ टन उत्पादन. स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री. दरवर्षी गहू २ एकर, बाजरी दोन एकर आणि झेंडुची दीड एकरावर लागवड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com