खर्च कमी करणारी आंतरपीक पद्धती

खर्च कमी करणारी आंतरपीक पद्धती
खर्च कमी करणारी आंतरपीक पद्धती

पुणे जिल्ह्यातील बोरीपार्धी येथील दिलीप थोरात यांनी विविध नगदी किंवा फळपिकांचा अनुभव घेतला. मात्र सर्व प्रयोग करताना आंतरपीक पद्धतीचा जो अंगीकार केला, तो आजही कायम ठेवला आहे. आंतरपिकांची विविधता ठेवत मुख्य पिकाचा सुमारे ३० ते ४० टक्के आणि काहीवेळा अगदी १०० टक्के खर्चदेखील त्यातून कमी करीत शेतीतील नफ्याचे मार्जिन वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीपार्धी गावातून खडकवासला धरणाचा कॅनाल गेल्याने परिसर बागायती आहे. सुमारे वीसहजार लोकसंख्या असलेल्या गावातील अनेक शेतकरी उसाचे मुख्य पीक घेतात. गहू, कांदा, हरभरा, बाजरी, भाजीपाला, गुलझडी, लिंबू अशी पिके पाहण्यास मिळतात. गावाजवळून रेल्वे लाइन गेली असल्याने व पुणे- सोलापूर राज्यमार्ग जवळ असल्याने शेतमालाची वाहतूक करणे त्यांना सोयीचे झाले आहे. केडगाव व पुणे मार्केटही त्यांना जवळ आहे.

थोरात यांची व्यावसायिक शेती गावातील लक्ष्मण मारूती थोरात यांची बारा एकर शेती. त्यांना विजय, संजय, दिलीप अशी तीन मुले.पैकी दिलीप पूर्णवेळ शेती करतात. विजय रेल्वे विभागात तर संजय भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच अभियंते आहेत. दिलीप बीएस्सी ॲग्री आहेत. पूर्वी त्यांच्याकडे लिंबू, ऊस अशी पिके होती. दिलीप यांनी शेतीची जबाबदारी स्विकारल्यानंतर द्राक्षे, डाळिंब, केळी, शेवगा, कलिंगड, कारली, वांगे, दोडका, सूर्यफूल अशी विविधता दिसू लागली. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब ते करू लागले. बाजारपेठेतील मागणीनुसार पीकपद्धतीत बदल केला. द्राक्षे व केळी परवडेनाशी झाल्यानंतर ती घेणे थांबवले. काळानुरूप बदल केले तरी आंतरपिके हे वैशिष्ट्य त्यांनी अनेक वर्षांपासून जपले आहे. कृषी व आत्मा विभागाचे मार्गदर्शन कायम मिळते.

आंतरपीक पद्धती-  कारण व फायदे

  • मुख्य पिकातील खर्च सुमारे ३० ते ४० टक्क्याने कमी करतात. काही वेळा तो पूर्णपणेदेखील कमी केला आहे.
  • शेतीतील नफ्याचे मार्जिन वाढवणे
  • वेळेवर मुख्य पिकाची मशागत होते.
  • मुख्य पिकांबरोबरच आंतरपिकांना खते- पाणी देणे शक्य होते.   
  • किडी-रोगांचे एकात्मिक नियोजन करता येते.
  • शेतीतील व्यवस्थापन  

  • साई सरबती जातीच्या लिंबाची निवड. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतून खरेदी
  • लिंबात सुरूवातीला भूईमूग, मूग हीदेखील आंतरपिके घेतली.
  • आंतरपिकांतील रोग किडींचा वेळीच बंदोबस्त करण्यावर भर दिला जातो. ट्रॅक्टरच्या साह्याने चांगली मशागत करून घेतली जाते. त्यानंतर सरी पाडून बेसल डोसमध्ये निंबोळी पेडीचा अवलंब केला जातो. रोग-किडी वेळीच आटोक्यात येण्यासाठी सुरवातीपासून प्रयत्न होतो. वाढीच्या व फळ अवस्थेत  कीडनाशकांच्या फवारण्या केल्या जातात.  
  • तीन विहिरी व दोन बोअरवेल्स आहे. अलीकडील काळात उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. अनेक शेतकरीदेखील बोअर्स घेऊ लागले आहेत. काळाची गरज अोळखून पाण्याचा काटेकोर वापर करण्यावर भर दिला आहे. फार पूर्वीपासून ठिबक सिंचनाचा वापर होतो.
  • विद्राव्य खतांचा वापर, पीएसबी, अझोटोबॅक्टर, पोटॅश विरघळवणारे जिवाणू, ट्रायकोडर्मा अादी जैविक घटकांचा आवश्यकतेनुसार वापर. त्यामुळे पिकांची चांगली वाढ होऊन उत्पादन चांगले मिळण्याबरोबरच जमिनीची सुपिकताही वाढण्यास मदत होत आहे.
  • दर तीन वर्षांनी माती परिक्षण केले जाते. त्यातील शिफारशींनुसार पुढील तीन वर्षे खतांचे नियोजन केले जाते.
  • सन १९९३ पासून उसाच्या पाचटाचा वापर केला जातो. (शक्यतो कुट्टी करून).
  • एकात्‍मिक व्यवस्थापनाचा अंगीकार केल्याने ऊस उत्पादनात एकरी दहा टनाने वाढ झाली आहे.
  • एकरी ७० ते ८० टनांच्या दरम्यान उत्पादन मिळते. एकेवेळी ते १०५ टनही मिळाले आहे.  
  • पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी बांधावर फळझाडांव्यतिरिक्त दरवर्षी पाच झाडांची लागवड.
  • आंतरपिके (सद्यस्थितीत)

      ऊस (७ एकर)         लिंबू (३ एकर)(येत्या जुलैला बागेला तीन वर्षे पूर्ण होतील)
       २० बाय २० फुटांवर- त्यामुळे रूंद जागा
      मका- दरवेळी    कारले- वर्षभर
      भेंडी- यंदा घेतली      वांगे- यंदा उन्हाळ्यात घेतले.

    आंतरपिके देतात फायदा (प्रातिनिधीक)  

  • थोरात यांना केडगावचे मोठे मार्केट आहे. तेथील गरज भागवून माल शिल्लक राहिल्यास तो पुण्याला पाठवला जातो. आंतरपीक कारल्याचे खरिपात एकरी १० ते १२ टन उत्पादन मिळते. या वेळी दर किलोला १५ ते १८ रुपये असतात. उन्हाळी कारल्याचे उत्पादन कमी असते. मात्र दर ३० ते ४० रुपयांपर्यंतही मिळू शकतात. हे पीक प्रतिहंगामात ७५ रुपयांपर्यंतचे उत्पन्न देते. जे मुख्य पिकातील खर्च बराच कमी करण्यास सक्षम ठरते.
  • उसातील मक्याचे एकरी १५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. जवळच्या केडगाव मार्केटला पशुखाद्यासाठी दाण्यांची विक्री केली जाते. त्यास किलोला १३ ते १४ रुपये दर मिळतो. शिवाय कडबा एकरी पाचहजार रुपये दराने विकला जातो. हे बोनस उत्पन्न ठरते.
  •  वांग्याच्या आत्तापर्यंत चार ते पाच काढण्या झाल्या आहेत. सध्या सरासरी पंधरा रुपये प्रतिकिलो दर मिळत अाहे.
  •  यापूर्वी केळीत कलिंगड घेतले. मुख्य पिकाचा खर्च दीड लाख रुपये झाला होता. कलिंगडाने तो खर्च १०० टक्के भरून काढला.
  •  काढणी केल्यानंतर व्यवस्थितरीत्या मालाचे ग्रेडिंग व पॅकिंग केले जाते. त्यामुळे चांगला दर मिळण्यास मदत होते.
  • संपर्क : दिलीप थोरात, ९४२२५६२७२८, ८८३०८१२८२९  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com