कमी खर्चिक कसदार शेतीकडे आलमले यांची वाटचाल

किडींना अटकाव करण्यासाठी लावण्यात आलेले सापळे
किडींना अटकाव करण्यासाठी लावण्यात आलेले सापळे

चापोली (ता. चाकूर, जि. लातूर) येथील रत्नाकर आलमले तीन वर्षांपासून सेंद्रिय शेती पद्धतीवर भर देत शेती करीत आहेत. सुमारे ६० टक्के सेंद्रिय व ४० टक्के रासायनिक असे प्रमाण त्यांनी ठेवले आहे. कलिंगड, खरबूज, ऊस, मिरची आदी पिकांचे उत्पादन घेताना शेतीतील खर्च कमी करताना जमिनीची सुपीकता वाढवण्याचे उद्दिष्टही ते साध्य करताना दिसत आहेत.

लातूर जिल्ह्यातील चापोली (ता. चाकूर) येथील रत्नाकर आलमले यांची पाच एकर शेती आहे. जमीन तशी मध्यम स्वरूपाची. वर्षानुवर्षे पारंपरिक शेतीतून खर्च जास्त व उत्पन्न कमी अशीच परिस्थिती होती. बाजारातील महागडी रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर करून अर्थकारण काही सुधारत नव्हते. त्यातच शेतीमालाचा दर बेभरवशाचा. यातून मार्ग शोधण्याचा रत्नाकर प्रयत्न करीत होते.

अखेर मार्ग मिळाला ॲग्रोवन तसेच कृषिविषयक साहित्य, कृषी विभाग यांची मदत रत्नाकर यांना झाली. त्याद्वारे सेंद्रिय शेतीचे महत्त्व समजू लागले. सन २०१५ मध्ये लातूर येथे आयोजित कार्यशाळेत सहभाग घेतला. त्यातही या शेतीचे फायदे समजले. सेंद्रिय शेतीची सुरवात एक एकरापासून केली. शंभर टक्के या पद्धतीचा वापर करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी करावी असे ठरवले.

आलमले यांची सेंद्रिय- रासायनिक एकात्मिक शेती

  • सुमारे ६० टक्के सेंद्रिय व ४० टक्के रासायनिक पद्धती
  • घरची एक देशी गाय आहे. जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क यांची निर्मिती, शेणखत, गोमूत्र यांचा वापर.
  • यंदा गांडूळखत निर्मितीचे दोन बेडस. ५०० किलो खतनिर्मिती. यातून व्हर्मिवॉशदेखील मिळते. त्यातील गुणधर्मही पिकाला उपयोगी ठरतात.
  • यंदा एक एकरात धैंचा हे हिरवळीचे पीक घेऊन ते शेतात गाडले. बाकी गरजेनुसार रासायनिक निविष्ठांचा वापर  
  • कृषी विभागाच्या ‘आत्मा’अंतर्गत चापोली व शंकरवाडी येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा गट स्थापन केला आहे. यात आलमले यांनी सहभाग घेतला आहे.
  • आपली शेती कमी आहे, तेवढ्यातून असे कितीसे उत्पन्न मिळेल, असे प्रश्न मनात न आणता रत्नाकर, पत्नी सुनंदा, मुलगा शिवकुमार व सून किरण असे सर्वजण शेतीत लक्ष देतात. कुटुंबाच्या एकीमुळेच त्यात सुसूत्रता आली आहे.
  • शेतात केवळ एक विंधन विहीर आहे. पाच एकरांवर पारंपरिक पद्धतीने पाणी देणे शक्य होत नव्हते. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखून सर्व क्षेत्रावर ठिबक संच बसवला आहे. त्यातून आजपर्यंत ऊस, कलिंगड, मिरची, खरबूज, टोमॅटो, काकडी यांचे उत्पादन घेण्यात येत आहे.
  • मिरचीचेही उल्लेखनीय उत्पादन मागील वर्षी मेमध्ये एक एकरावर मल्चिंगद्वारे मिरचीची लागवड केली. सेंद्रिय पद्धतीचा अधिक वापर झालेली ही मिरची जोमात वाढली. त्यातून सुमारे २० टन उत्पादन मिळाले. त्यास किलोस कमाल ७० रुपये ते किमान १५ रुपये व सरासरी ३० रुपये दर मिळाला. यात सव्वा लाख रुपये खर्च आला. लातूर, उदगीर, नांदेड आदी स्थानिक मार्केटला विक्री झाली. उसाचे व्यवस्थापनही अधिकाधिक सेंद्रिय पद्धतीने केले. सन २०१६ मध्ये त्याचे एकरी ४० टन उत्पादन मिळाले. यंदा एक एकरांतील काकडीने ६० ते ७० हजार रुपये मिळवून दिले.  

    अॅग्रोवनने दिली दिशा आलमले अॅग्रोवनचे नियमित वाचक अाहेत. यातील सेंद्रिय शेती, मातीची सुपीकता, कमी खर्चाची शेती याविषयक लेख, यशोगाथा यांची स्फूर्ती त्यांना मिळाली. साम टीव्हीवरील कार्यक्रमांतूनही फायदा झाला.   पिकांनी वाढवला आत्मविश्वास सन २०१५ च्या सुमारास सेंद्रिय पद्धतीवर भर दिल्यानंतर कलिंगडाची लागवड केली. त्या वर्षी एकरी साधारण पाच टनांपर्यंतच उत्पादन मिळाले. मात्र पुढील वर्षीही या पद्धतीत सातत्य ठेवले. एकात्मिक शेतीत २०१६ मध्ये पाऊण एकर कलिंगडाचे सुमारे २० टनांपर्यंत, तर खरबुजाचे १० टनांपर्यंत उत्पादन मिळाले. कलिंगडाला किलोस ८ ते १० रुपये तर खरबुजाला २० रुपये दर सोलापूर मार्केटला मिळाला. बियाणे, मल्चिंग व लागवडीचा खर्च अधिक झाला. पुढे रासायनिक निविष्ठांवरील खर्चावर लगाम बसवला.

    प्रतिक्रिया :   आमची केवळ पाच एकर जमीन आहे. पूर्वी रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर अधिक होता. त्यामुळे खर्च जास्त व्हायचा. आता सेंद्रिय पद्धतीचा वापर सुरू केल्यापासून खर्चात सुमारे ५० टक्क्यांपर्यंत बचत साधली आहे. शिवाय मातीची सुपीकता वाढीस लागणार आहे याचे समाधान आहे. रत्नाकर आलमले, ९९७५८१८१४८  

    रासायनिक घटकांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता घटत आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे काळाची गरज बनली आहे. ‘आत्मा’अंतर्गत ५० शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीचा गट स्थापन करून वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. याच गटातील आलमले यांचे प्रयत्न प्रेरणादायक आहेत. कमी क्षेत्र असूनही आज ते त्यातूनही किफायतशीर शेती करताना दिसत आहेत. -  एस. डी. रोकडे, ९६३७१६०९०४ (कृषी सहायक, चापोली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com