agricultural success story in marathi, chinchner vandan dist. satara , Agrowon, Maharashtra | Agrowon

जिरायती भागात आठ वर्षे यशस्वी पोल्ट्री व्यवसाय
विकास जाधव
शनिवार, 5 मे 2018

चिंचनेर वंदन (ता. जि. सातारा) या सैनिकी परंपरा असलेल्या गावातील वैभव अशोक बर्गे या पदवीधर तरुणाने चिकाटी, हिंमत व अभ्यास यांच्या जोरावर करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय सात ते आठ वर्षे अखंडीत यशस्वी केला आहे.

चिंचनेर वंदन (ता. जि. सातारा) या सैनिकी परंपरा असलेल्या गावातील वैभव अशोक बर्गे या पदवीधर तरुणाने चिकाटी, हिंमत व अभ्यास यांच्या जोरावर करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय सात ते आठ वर्षे अखंडीत यशस्वी केला आहे. जिरायती दोन एकर शेतीला पर्याय म्हणून सहाहजार पक्ष्यांची बॅच सांभाळत ‘चिकन शॅापी’ही सुरू करून व्यवसायात मूल्यवृद्धी केली आहे.

सैनिकी परंपरेचे गाव
सातारा जिल्ह्यातील अपशिंगे या गावाबरोबरच सैनिकी परंपरा असलेले गाव म्हणून चिंचनेर वंदन (ता. सातारा) अोळखले जाते. गावात जवळपास प्रत्येक घरातील सदस्य सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करीत आहे. याच गावात वैभव अशोक बर्गे व बंधू विनोद हे तरुण शेतकरी राहतात. त्यांचे वडील सैन्यातून सेवानिवृत्त झाले आहेत.

तरुणांची शेती
घरची शेती तशी दोनच एकर. तीही जिरायती. त्यामुळे वाणिज्य शाखेची पदवी घेतलेल्या वैभव यांनी  उत्पन्नाचा स्त्रोत वाढवण्याच्या दृष्टीने सुमारे चार वर्षे नोकरी केली. फिरतीचे काम असल्याने अनेकवेळा प्रयोगशील शेतकऱ्यांची शेती पाहण्याचा योग यायचा. तो अनुभव घेत असतानाच शेतीतच काही भरीव करावे असे सातत्याने मनात येत होते.

अनेक पर्याय शोधले
ग्रीन हाऊस, रेशीम शेती, इमूपालन, वराहपालन असे अनेक व्यवसाय ढुंढाळले. प्रत्येकाचे अर्थकारणही अभ्यासले. जाणकारांसोबत चर्चा केली. वाई तालुक्यात काही खासगी कंपन्या पोल्ट्री विषयात करार शेती करतात अशी माहिती मिळाली. पोल्ट्री व्यवसायातून भविष्याची संधी दिसू लागली.

व्यवसायाचा श्रीगणेशा
वैभव यांनी मग निवडक, यशस्वी पोल्ट्री उत्पादकांच्या प्रकल्पांना भेटी दिल्या. वडील तसेच लहान बंधू विनोद यांच्याशी चर्चा केली. नोकरी सोडून पूर्णवेळ हाच व्यवसाय करण्याचा निर्णय सांगितला. कुटुंबातील  सदस्यांनीही विचारांती होकार दिला. सन २०१० मध्ये बँकेकडून १२ लाख रुपये कर्ज घेतले. आवश्यक साधनसामग्री घेतली. त्यातून व्यवसायाला आकार देण्यास सुरवात केली.

अखंडित सात-आठ वर्षे व्यवसाय
जिल्ह्यातील अनेक भागांत पोल्ट्रीची करार शेती केली जात होती. वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक शेतकरी अडचणीत आल्याने त्यांना व्यवसाय बंद करावा लागला. मात्र वैभव यांनी हिंमत ठेऊन तसेच सातत्याने नवनवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवली. व्यवसायात होत असलेले बदल तसेच मार्केट यांवर लक्ष केंद्रित केले. त्यातून सात-आठ वर्षे व्यवसाय अखंडीत सुरू ठेवत यशस्वी उत्पादनही मिळवले आहे.

चिकन शॅापीद्वारे मूल्यवृद्धी  
सलग सात वर्षे पक्ष्यांचे उत्पादन घेतले. मात्र व्यवसायातून मूल्यवृद्धी केली पाहिजे या हेतूने चिकन शॅापी सुरू करण्याचा विचार पुढे आला. त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवाने काढले. सहा महिन्यांपूर्वी ही  शॅापी सुरू केली आहे. एक कर्मचारी येथे तैनात केला आहे. करार शेतीतील कंपनीकडूनच पक्ष्यांची खरेदी केली जाते. चिकनचे दर बाजारातील दरांच्या तुलनेत थोडे कमी असल्याने व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या व्यवसायातून दैनंदिन घरखर्च वसूल होतो असे वैभव सांगतात.

‘ॲचिव्हमेंट’
वेळोवेळी वडिलांकडूनही अार्थिक मदत होते. व्यवसायासाठी घेतलेले कर्ज पाच वर्षांत पूर्ण फेडण्यात वैभव यशस्वी झाले आहेत. व्यवसायाचा पुढील टप्पा म्हणून नुकतेच वाहन खरेदी केले आहे. त्यातून कोंबड्यांची वाहतूक करणे सोपे होणार अाहे. भविष्यात केवळ करार शेतीवर अवलंबून न राहाता स्वतःच या व्यवसायाचा विस्तार करण्याची वैभव यांची इच्छा आहे. उत्कृष्ट व्यवस्थापन तसेच पक्ष्यांचे चांगले वजन व उत्पादनासाठी कंपनीकडून सलग तीन वेळा त्यांना पुरस्कार मिळाला आहे.

व्यवसाय दृष्टिक्षेपात

 • सातहजार चौरस फूट क्षेत्रफळाचे शेड  
 • ब्रॉयलर पक्ष्यांचे संगोपन करणारी करार शेती
 • सुरवातीच्या काळात अनुभव नसल्याने चुका होत होत्या. साधारणपणे तिसऱ्या बॅचनंतर व्यवसायातील बारकावे समजायला सुरवात झाली.
 • सुरवातीला शेडमध्ये सात हजार पक्षी होते. मात्र शेडमध्ये हवा खेळती रहावी, पक्ष्यांची मरतूक कमी व्हावी यासाठी शेडचा विस्तार केला आहे.
 • त्याचबरोबर पक्ष्यांची संख्या सहाहजारांवर आणली.
 • कंपनीकडून पोल्ट्री उत्पादकाला एक दिवसाचे पिल्लू दिले जाते. साधारण ३२ ते ४२ दिवस ते शास्त्रीय दृष्ट्या वाढवून कंपनीला द्यायचे असते. असे व्यवसायाचे स्वरूप आहे.
 • पोल्ट्री व्यवसायाची गेली आठ वर्ष केला जात असून वार्षिक सरासरी पाच याप्रमाणे 40 लॅाट घेतले आहेत. यातील तीन लॅाटचा अपवाद वगळता इतर सर्व लॅाटचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. वर्षाकाठी सुमारे पाच ते सहा बॅचेस
 • प्रत्येक बॅच संपल्यानंतर शेड स्वच्छ व निर्जंतूक केले जाते.
 • व्यवसायातील सर्व कामांत वैभव यांना पत्नी, वडील तसेच बंधू विनोद यांची मोठी मदत होते. त्यातून मजुरी खर्चात बचत होते.
 • मिळणाऱ्या कोंबडी खताच्या विक्रीतून वीजबिल व अन्य खर्च भागवला जातो.
 • पहिले सात दिवस पिल्लांची विशेष काळजी घेतली जाते. यामुळे कोंबडीचे चांगले वजन येण्यास मदत होते.   उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी गारवा, फॅन, कूलर, उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी झाडे, हिवाळ्यात हिटरच्या सहाय्याने उष्णता वाढविणे, पावसाळ्यात ओलावा होऊ न देणे अशा बाबींमुळे मरतूक कमी होते.
 • वेळच्या वेळी खाद्य व स्वच्छ पाणी दिले जाते.

वजन व दर

 • ४० ते ४२ दिवसांत पक्ष्यांचे होणारे वजन- सव्वा ते अडीच किलो
 • दर- ७.५ रु. प्रति किलो, उन्हाळ्यात- ८ रु.

संपर्क : वैभव बर्गे - ९८५०७३७५७१

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...