फळबाग, भाजीपाला प्रक्रियेतून उभारला छात्रालयाचा डोलारा

नवभारत छात्रालयाच्या प्रक्षेत्रात भाजीपाला, रोपनिर्मिती, फळबाग लागवड पाहण्यास मिळते.
नवभारत छात्रालयाच्या प्रक्षेत्रात भाजीपाला, रोपनिर्मिती, फळबाग लागवड पाहण्यास मिळते.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या बाजूला असलेलं नवभारत छात्रालय आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी हक्काचं व दोन वेळच्या अन्नाची सोय करणारं घर झालं आहे. सुमारे १९ एकरांवर विविध फळबागा, भाजीपाला व रोपवाटिका व्यवसाय व जोडीला प्रक्रिया उद्योग व त्यातील उलाढाल यातून छात्रालयाचा आर्थिक डोलारा सांभाळला आहे. शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू ठेवून प्रशिक्षण व प्रात्यक्षिके उपक्रमांतूनही त्याला प्रगतिशील बनवण्याचे काम होते आहे.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ म्हणजे कोकणातील कृषी शिक्षणाची गंगोत्रीच आहे. याच विद्यापीठाच्या बाजूला नवभारत छात्रालयाची इमारत आहे. कोकणचे गांधी अशी ओळख असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन व लोकनेते शामराव पेजे यांच्या संकल्पनेतून १९४७ मध्ये हे  छात्रालय सुरू झाले. कामकाज अधिक सोयीस्कर व्हावे यासाठी पुढे दापोली येथे कुणबी सेवा संघाची स्थापना करण्यात आली. सामंत गुरुजी व शिंदे गुरुजी यांनी छात्रालयाची पायाभरणी करून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच मूल्य आणि श्रमांची जोड दिली. दापोली परिसरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची व दोन वेळच्या अन्नाची सोय व्हावी म्हणून हे छात्रालय उभारण्यात आले आहे. येथे अगदी पाचवी इयत्तेपासून ते ‘एमएस्सी’ या पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांची सोय करण्यात येते. सुमारे ५० विद्यार्थीनी व १०० विद्यार्थी येथे राहतात. सध्या छात्रालयाचे अध्यक्ष म्हणून प्रभाकर शिंदे जबाबदारी सांभाळतात. छात्रालयाचे ते मुख्य आधारस्तंभ आहेत. दापोली येथील कृषी विद्यापीठात ते साहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. विद्यापीठातील चांगल्या वेतनाची नोकरी दहा वर्षे आधीच सोडून त्यांनी छात्रालयाच्या कामात स्वतःला झोकून दिले. आज त्यांच्या तांत्रिक ज्ञानाचा फायदा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनाहोतो.                                                  फळबाग- भाजीपाला शेतीतून आर्थिक डोलारा छात्रालयाची सुमारे १९ एकर शेती आहे. त्यातून छात्रालयाचा आर्थिक डोलारा उभारला जातो. त्याचबरोबर समाज कल्याण खात्याचे अनुदानही मिळते. व्रतस्थ मंडळींनी चालवलेल्या या चळवळीतून  गेल्या ६७ वर्षांत शेतकरी वर्गातील सव्वातीन हजार मुले शिक्षण घेऊन बाहेर पडली आहेत. शिंदे यांनी आपल्या निवृत्ती वेतनातून विद्यार्थ्यांसाठी विहीर बांधली. याच विहिरीच्या पाण्यावर आंबा, काजू, चिकू, नारळाचे दर्जेदार मातृवृक्ष तयार करण्यात आले. यातून नवभारत कृषिकेंद्र छात्रालय नावाची सुंदर रोपवाटिका उभी राहिली. शेतीत चिकू, आंबा, नारळ, काजू, पेरू आदी विविध फळांसह कोबी, नवलकोल, गाजर, टोमॅटो, मिरची आदी विविध भाजीपाला पिकेही घेण्यात येतात. या शेतीमालाला स्थानिक ग्राहक असतातच. शिवाय दापोलीचे कृषी विद्यापीठ जवळच असल्याने येथे अनेक अभ्यास सहली येत असतात. त्यामुळे तेदेखील आयते ग्राहक होऊन जातात. फळ प्रक्रिया उद्योग छात्रालयाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे फळप्रक्रिया उद्योग. एका ट्रस्टच्या माध्यमातून ६४ लाख रुपयांची देणगी मिळाली. त्यातून प्रक्रियेसाठी लागणारी यंत्रसामग्री आणण्यात आली. आज या ठिकाणी काजू, कोकम, करवंद व अन्य फळांपासून जॅम, ज्यूस असे पदार्थ तयार केले जातात. त्याचबरोबर पापड, लोणची यांचीही विक्री होते.

लाखांची उलाढाल भाजीपाला- फळे आदी विविध शेतीमाल तसेच रोपविक्रीतून सुमारे ३० लाख रुपयांची उलाढाल होते. यात ५० टक्के सुमारे नफा मिळतो. नर्सरीतील विविध फळपिकांच्या रोपांना शेतकऱ्यांकडून पसंती असते. प्रक्रिया उद्योगातून सुमारे १५ लाख रुपयांची उलाढाल होते. त्यातून दोन ते तीन लाख रुपयांचा नफा हाती येतो. ‘फूड सेफ्टी’ विभागाचा परवानाही घेतला आहे. या उत्पादनांना ग्राहकांकडून चांगली पसंदी आहे. बहुतांशी उत्पादने महिलाच तयार करीत असल्याने विक्री व्यवस्थेतदेखील त्यांनाच संधी दिल्याचे शिंदे सांगतात. आत्तापर्यंत सुमारे दोन हजार महिलांना विविध व्यवसाय व प्रक्रियेचे प्रशिक्षण इथे मिळाले आहे. केंद्राच्या वरच्या मजल्यावर लग्नमंडप उभारल्याने उत्पन्नाचं साधन तयार झाले आहे. शेतीविषयक उपक्रम, प्रशिक्षण केवळ अनुदानावर अवलंबून चालणार नव्हते. त्यासाठी छात्रालयाने शेतीकेंद्रित उपक्रम स्वीकारले. अर्थात शेतकऱ्याचा लाभ हाच केंद्रबिंदू ठेवण्यात आला आहे. त्यांना सूक्ष्म सिंचन, फळशेती, भाजीपाला लागवड, फुलशेती, पीकसंरक्षण याविषयी प्रशिक्षण दिले जातेच. शिवाय शेतीसाठी कर्ज प्रकरण तयार करायचे असल्यासही मदत केली जाते. रोपवाटिका, कन्या छात्रालय, व्यवसाय शिक्षण विद्यालय, कृषी विकास प्रकल्प, कृषी उद्योग प्रशिक्षण केंद्र, फळप्रक्रिया उद्योग असे विविध उपक्रमदेखील राबविले जातात.विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणापासून ते रोपनिर्मितीपर्यंतचे शिक्षण दिले जाते.  आपले शैक्षणिक करिअर सांभाळून ते त्यासाठी वेळ देतात. आजूबाजूंच्या गावांमध्ये शेतकरी मेळावे, पीक प्रात्यक्षिके घेऊनही शेतकऱ्यांना प्रगतिशील शेतीचे ज्ञान देण्यात येते. छात्रालयाला डॉ. गोविंद जोशी यांच्या रुपाने आधारस्तंभ लाभला आहे. कृषी विद्यापीठाचे अधिष्ठातापद भुषविलेले डॉ. जोशी हे फळप्रक्रिया युनिटला दिशा देण्याचे काम करीत आहेत. छात्रालयाचे एक विद्यार्थी म्हणजे सध्याचे केंद्रिय अवजड उद्योगमंत्री अनंतराव गीते होय. शक्य असेल त्या वेळी ते छात्रालयात येऊन विविध उपक्रमांना मदत करतात.   

संपकर् :  प्रभाकर शिंदे, ९२७३९४७८७३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com