व्यावसायिक पिकांसह ‘हायटेक’ फुलशेतीचा आदर्श

नागेश खांडरे यांची पाॅलिहाउसमधील आकर्षक रंगाची लक्षवेधी जरबेरा फुले.
नागेश खांडरे यांची पाॅलिहाउसमधील आकर्षक रंगाची लक्षवेधी जरबेरा फुले.

डोंगरकडा (जि. हिंगोली) येथील नागेश खांडरे या कृषी पदवीधर तरुणाने कृषी सहायकाची नोकरी सोडून प्रयोगशील शेतीलाच वाहून घेतले आहे. व्यावसायिक पिकांची शेती करताना दुसरीकडे पाॅलिहाउस व शेडनेटद्वारे फुलांच्या ‘हायटेक’ शेतीचा सुरेख मेळही त्यांनी घातला आहे. त्यातून शेतीचे अर्थकारण उंचावण्याचा प्रयत्न आहे.  

हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा (ता. कळमनुरी) येथील नागेश बाबूराव खांडरे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून उद्यानविद्या (हॉर्टिकल्चर) या विषयातून पदवी घेतली. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात कृषी सहायक म्हणून ते रुजू झाले; परंतु नोकरीत मन रमत नव्हते. शेतीतच काही प्रयोगशील घडवायचे या ध्येयाने सहा महिन्यांच्या कालावधीतच नोकरीला रामराम ठोकला.

नागेश यांची प्रयोगशील शेती

  • शेती - १२ एकर. जमीन - काळी कसदार, भारी, पाण्याची पुरेशी उपलब्धता
  • दरवर्षी पाच एकर केळी, तीन एकर ऊस, दोन एकर हळद या प्रमुख पिकांसह कारले, दोडके, कांदा आदी भाजीपाला पिकांचे उत्पादन
  • कौशल्यविकास

  • शेती तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण व्हावी यासाठी २०१३ मध्ये कृषी व्यवसाय व्यवस्थापन (एबीएम) हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम हैदराबादच्या मॅनेज संस्थेतून पूर्ण
  • पुणे जिल्ह्याचा अभ्यास दौरा करून फुलशेती, पाॅलिहाउस, शेडनेटच्या संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादन मिळते अशी माहिती मिळाली. पूर्ण अभ्यासाअंती जरबेरा लागवडीचा निर्णय घेतला.
  • हायटेक शेती 

  • पॉलिहाउस - जरबेरा - १० गुंठे - यंदाचे चौथे वर्ष
  • शेडनेट - गुलाब - २० गुंठे - दीड वर्ष अनुभव
  • भांडवल व कर्ज परतफेड राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानांतर्गत पाॅलिहाउस प्रकल्पाचा खर्च १२ लाख ८५ हजार रुपये होता. त्यापैकी सहा लाख ४२ हजार रुपये अनुदान मिळाले. शासकीय बॅंकेकडून सहा लाख ४२ हजार रुपये कर्ज मिळाले. शेतीतील उत्पन्नातून कर्ज परतफेड करणे शक्य झाल्याचे नागेश म्हणाले.

    जरबेरा शेतीविषयी उत्पादन

  • पुणे येथील कंपनीकडून ३५ रुपये नगाप्रमाणे नऊ हजार रोपे आणली.
  • अडीच फूट रुंदीच्या बेडवर लागवड.
  • वर्षभर फुले सुरू राहतात. महिन्याकाठी १२ हजार ते १५ हजार फुले मिळतात.
  • दर ३ रुपये प्रतिफूल - वर्षाची सरासरी सण- समारंभ, लग्न आदींच्या वेळी हा दर १५ रुपयांपर्यंत

    खर्च तीन रुपये उत्पन्नामागे दीड रुपया खर्च     मार्केटिंग नांदेड, हैदराबाद, नागपूर या ठिकाणी जरबेरा फुलांचे मार्केट. फुले तोडल्यानंतर रात्रभर पाण्यात ठेवली जातात. तापमान नियंत्रित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाॅलिथिनमध्ये पॅक केली जातात. चार बाय तीन फूट आकाराच्या कागदी बाॅक्समध्ये ४०० फुले बसतात. नांदेड येथील बाजारपेठेत ती पाठवली जातात. नांदेड येथून रेल्वेमार्गे नागपूर, हैदराबाद मार्केटला फुले जातात.  

    जरबेरा फुले उत्पादन (वार्षिक) व सरासरी दर रुपये प्रतिनग

    वर्ष             उत्पादन            दर
    २०१५      १,५०,०००      ३.२० रु.
    २०१६    १,४५,०००      २.२५ रु.
    २०१७       १,४०,०००       २.२५ रु.
    २०१८        ३५,०००       २.७० रु.

    अन्य व्यावसायिक पिके दरवर्षी चार एकर केळी असतात. त्यापासून तसेच हळद, भाजीपाला यांच्यापासून प्रत्येकी एकरी एक ते दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.

    शेतीतील मदत वडील बाबूराव खांडरे, आई बेबीनंदा व पत्नी यांची मोठी मदत शेतीत होते. त्यामुळे मजूरबळ कमी लागते. दोन सालगडी आहेत. ट्रॅक्टर, पाॅवर टिलर आदी यंत्रसामग्री आहे. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी व सध्या यवतमाळ येथील ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डी. बी. काळे यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यानुसार सुधारित हळद लागवड पद्धतीच्या वापरातून उत्पादनात वाढ झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, तोंडापूर कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभते. आता दरमहा शाश्वत उत्पन्न देऊ शकणाऱ्या रेशीम शेतीकडे नागेश वळणार आहेत. तुती लागवडीसाठी रोपवाटिकेत रोपे तयार केली आहेत. त्यांचे कृषी सेवा केंद्रही आहे. परिसरातील शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा उपलब्ध करून देण्यासोबत पीक व्यवस्थापन सल्ला देण्यासाठी नागेश यांनी गावी अॅग्री क्लिनिकही सुरू केले आहे.

    नाला खोलीकरण सिंचनासाठी विहीर आणि दोन बोअर्सची सुविधा आहे. पाण्याचा कार्यक्षम काटेकोर वापर करीत कमी पाण्यात जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी ठिबक सिंचनाचा अंगीकार केला. गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण झाले आहे. सिंचनासाठी पाणी कमी पडत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतातून जाणाऱ्या एक किलोमीटर नाल्याचे खोलीकरण स्वखर्चाने केले, त्यावर वनराई बंधारे बांधले. त्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरत आहे. त्यामुळे विहिरी, बोअरच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचा नागेश यांचा अनुभव आहे.

    संपर्क : नागेश खांडरे, ९५२७८६७५५७  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com