फळबाग शेती, रायपनिंग चेंबर, थेट विक्री

द्रशेखर कुलकर्णी यांची अंजीर बाग
द्रशेखर कुलकर्णी यांची अंजीर बाग

डोंगरकडा (जि. हिंगोली) येथील वयाच्या पासष्टीमध्ये पदार्पण केलेले प्रयोगशील शेतकरी चंद्रशेखर कुलकर्णी यांचे आदर्श शेती व्यवस्थापन तरुणांनाही प्रेरणादायी ठरणारे आहे. बहुवीध फळपीक लागवड पध्दती, ‘रायपनिंग चेंबर’ची उभारणी, थेट ग्राहकांनी विक्री ही त्यांच्या शेतीची काही वैशिष्ट्ये होत. परभणी येथील महाराष्ट्र सिंचन सहयोग परिषदेत पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.   कुलकर्णी यांच्या शेतीची वैशिष्ट्ये रायपनिंग चेंबर अकोला- हिंगोली- नांदेड महामार्गालगत कुलकर्णी यांचे शेत आहे. या ठिकाणी २०१० मध्ये रायपनिंग चेंबरची उभारणी केली. यात ३५ बाय १२ बाय फूट आकाराचे तीन चेंबर्स असून, प्रत्येक चेंबरची फळ पिकवण्याची क्षमता १० टन आहे. स्वतःबरोबर शेतकरी, व्यापाऱ्यांची केळी दीड रुपये तर आंबा दोन रुपये प्रतिकिलो दराने पिकवून दिला जातो. या चेंबरसाठी ४२ लाख रुपयांची गुंतवणूक केली. स्वतःकडील तसेच काही रक्कम हातउसने घेतली. थेट ग्राहक विक्री कुलकर्णी आपल्या शेतातील उत्पादनापैकी २० टक्के मालाची विक्री थेट करतात. त्यासाठी महामार्गाला लागून स्टाॅल उभारण्यात आला आहे. कृषी विभागाच्या योजनेतून उत्पादक ते ग्राहक थेट विक्री केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी ‘रायपनिंग चेंबर’मध्ये पिकवलेली फळे ठेवली जातात. एका व्यक्तीकडे व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली. महामार्गावरून ये-जा करणारे प्रवासी अंजीर, केळी आदी फळांची खरेदी करतात. थेट शेतातून आलेली म्हणजेच ताजी, दर्जेदार फळे उपलब्ध होत असल्यामुळे ग्राहकांची मोठी पसंती असते. केळी लागवडीची सुधारित पद्धत काळानुरूप बदलाचा वेध घेत कुलकर्णी आता उतिसंवर्धित ग्रॅंड नैन केळी वाणाची झिगझॅग पद्धतीने लागवड करतात. त्यामुळे एकमेका शेजारील झाडांना पानांचा अडथळा होत नाही. एरवी उन्हामुळे घडांच्या दांड्याचे मोठे नुकसान होऊन उत्पादनावर परिणाम होतो. त्यावर मात करण्यासाठी घडाच्या दांड्यावर गवताचे आच्छादन करून उन्हापासून संरक्षण करण्याचा उपाय योजला आहे. यामुळे घडाचे दांडे उन्हामुळे तापून काळे पडत नाहीत. उत्पादनावरही त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचा अनुभव आहे. केळीत मल्चिंगही केले आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होण्यास मदत होते. याशिवाय उतिसंवर्धित रोपांची ‘हार्डनिंग’ करून विक्रीही केली जाते. जमीन सुपीकेतवर भर गायी आणि म्हशी तसेच अन्य मिळून सुमारो शंभरपर्यंत पशुधन आहे. गोठ्यातील मूत्र सिमेंटच्या हौदात जमा केले जाते. त्याचा वापर पिकांसाठी होतो. दरवर्षी सुमारे ४० ट्राॅली शेणखत मिळते. बायोडायनॅमिक्स पद्धतीने, तसेच गांडूळखत निर्मिती करून त्याचाही वापर होतो. रासायनिक खतांच्या संतुलित वापरावर भर असतो. त्यातून जमिनीची सुपीकता टिकवण्यावर भर दिला आहे. उत्पादनातही सातत्य आहे. केळीचे एकरी ३० ते ४० टन, मोसंबीचे १० ते १५ टन तर अंजिराचे प्रतिझाड १५ किलो याप्रमाणे उत्पादन मिळते. पाण्याचा काटेकोर वापर एक विहीर आणि दोन बोअर्स आहेत. संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. शेतातून वाहणाऱ्या ओढ्यावर बांध टाकला आहे. त्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरून विहिरीची पाणीपातळी वाढण्यास मदत होत आहे. नावीन्याचा अंगीकार जे जे नवे ते ते हवे या उक्तीप्रमाणे कुलकर्णी १९७८ पासून शेती करतात. शेतीत नवीन प्रयोग करण्याची आवड त्यांनी पूर्वीपासूनच जपली आहे. डोंगरकडा येथे त्यांचे वास्तव्य असते. त्यांचा मुलगा दीपक नांदेड येथे आर्किटेक्ट आहे. यापूर्वी त्यांनी आपल्या भागात सर्वप्रथम ब्रोकोली, चेरी टोमॅटो, झुकिनी, भाजीपाला, बेबीकाॅर्न आदी परदेशी भाजीपाला पिकांचे प्रयोग केले. मुंबई, पुणे, बंगळूर या ठिकाणी विक्री केली. या पीकपद्धतीत यशही मिळवले. आता मात्र काही तांत्रिक कारणाने ही शेती त्यांनी थांबवली आहे. फळबागांची लागवड करत असताना त्यांनी सर्वांत आधी पपईची लागवड केली. अंजिराची बाग सुमारे २३ वर्षे जुनी आहे. सीताफळही १७ वर्षे, संत्रा, मोसंबीच्या बागा १४ वर्षांपूर्वी लागवड केलेल्या आहेत. आजवर विविध पीकपद्धतीचा अवलंब त्यांनी केला आहे. उतारवयातही शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची त्यांची तयारी असते. पुणे येथील ‘सकाळ इंटरनॅशनल लर्निग सेंटर’तर्फे घेतल्या जाणाऱ्या परदेशी भाजीपाला, निर्यातक्षम शेती आदी विषयांच्या प्रशिक्षणात त्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे शेतीतील ज्ञानाबाबत अपडेट राहणे त्यांना शक्य झाले.

ॲग्रोवन मार्गदर्शक.... अॅग्रोवनच्या सुरवातीच्या अंकापासून ते नियमित वाचक आहोत. अॅग्रोवनचा दिवाळी अंकदेखील ते दरवर्षी घेतातत. अॅग्रोवनच्या माध्यामतून नवीन तंत्रज्ञान, परदेशी भाजीपाला लागवडीची माहिती त्यांना मिळाली. कृषीविषयक पुस्तकांचा संग्रह त्यांनी केला आहे. पुरस्काराने सन्मान परभणी येथील महाराष्ट्र सिंचन सहयोग परिषदेत कुलकर्णी यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. राज्यातील विविध संस्थांनीही त्यांच्या शेतीतील कामगिरीची दखल घेत गौरवले आहे.

संपर्क : चंद्रशेखर कुलकर्णी, ७७९८०३८६७६  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com