agricultural success story in marathi, hol dist. nadurbar , Agrowon, Maharashtra | Agrowon

‘ए ग्रेड’ कलिंगड उत्पादनात राजेंद्र झाले मास्टर !
आर. एम. पाटील
शुक्रवार, 18 मे 2018

नंदुरबार जिल्ह्यातील होळ येथील राजेंद्र पाटील अत्यंत प्रयत्नवादी, जिद्दी व ज्ञानी वृत्तीचे शेतकरी आहेत. जिरायती भाग असूनही पीकपद्धतीची रचना चांगल्या प्रकारे केली आहे. पाच वर्षांपासून कलिंगड शेतीत सातत्य ठेवत त्यात कुशलता मिळवली आहे. एकरी २० ते २२ टन व बहुतांश सर्व ‘ए’ ग्रेड अशी आपल्या कलिंगडाची अोळख तयार केली आहे. प्रयोगशील शेतीतूनच कर्जमुक्ती मिळवल्याचे समाधान त्यांनी मिळवले आहे.  

नंदुरबार जिल्ह्यातील होळ येथील राजेंद्र पाटील अत्यंत प्रयत्नवादी, जिद्दी व ज्ञानी वृत्तीचे शेतकरी आहेत. जिरायती भाग असूनही पीकपद्धतीची रचना चांगल्या प्रकारे केली आहे. पाच वर्षांपासून कलिंगड शेतीत सातत्य ठेवत त्यात कुशलता मिळवली आहे. एकरी २० ते २२ टन व बहुतांश सर्व ‘ए’ ग्रेड अशी आपल्या कलिंगडाची अोळख तयार केली आहे. प्रयोगशील शेतीतूनच कर्जमुक्ती मिळवल्याचे समाधान त्यांनी मिळवले आहे.  

नंदुरबार शहराच्या पूर्वेला सुमारे १६ किलोमीटरवर होळ हे २१०० लोकवस्तीचे अवर्षणप्रवण गाव आहे.  गावच्या जमिनी तशा अत्यंत सुपीक, उपजाऊ. साधारणत २००९-१० पर्यंत गावात खरीप, रब्बी हंगाम अत्यंत चांगल्या पद्धतीने घेतला जायचा. पुढे मात्र दर वर्षी पर्जन्यमान कमी होत गेले. बागायती पिकांना उतरती कळा लागली. साधारण २०१३-१४ पर्यंत बागायतदारांची संख्या तुरळक राहिली आहे. गावचा रब्बी हंगाम संपल्यात जमा आहे.

पूर्वीची शेती
राजेंद्र यांची घरची वडिलोपार्जित आठ एकर शेती आहे. पावसाळा चांगला झाला, तर तीन-चार एकर शेती बागायती होईल, अशी स्थिती. राजेंद्र यांचे वडील देवाजी दंगल पाटील पारंपरिक पद्धतीने शेती करायचे. कापूस, मिरची, पावसाळी कांदा, तसेच रब्बीत हरभरा ही नेहमीची पीक पद्धती होती. शेतीची सूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर राजेंद्र त्यांनी त्यात सुधारणा करण्यास सुरुवात केली.

प्रतिकूल परिस्थितीत प्रयोगशील शेती
होळ गावातील अवर्षण परिस्थितीतही राजेंद्र डगमगले नाहीत. अत्यंत मेहनतीने, कौशल्याने, तसेच पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन करून शेती प्रयोगशील करण्यास सुरवात केली. सन २००३-०४ मध्ये त्यांचा नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राशी (केव्हीके) संपर्क आला. तेथील तज्ज्ञांच्या सल्ल्याने शेतीची दिशा बदलली. कापूस, मिरची, पावसाळी कांदा या पिकांना सुधारित तंत्रज्ञानाची जोड देत एकरी उत्पादकता वाढवली. पारंपरिक पद्धतीत कापसाचे एकरी ५ ते ६ क्विंटल उत्पादन मिळायचे. ते ११ ते १२ क्विंटलपर्यंत नेण्यात राजेंद्र यशस्वी झाले. सरासरी ४० क्विंटल प्रतिएकर पूर्वी मिरचीचे उत्पादन येत असे. त्याचे दुप्पट म्हणजे ८० क्विंटलपर्यंत उत्पादन नेले. पावसाळी कांद्याचे उत्पादन ६० क्विंटलवरून ८० ते ९० क्विंटल प्रतिएकरापर्यंत पोचविले. पूर्ण बागायती क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणले.

कलिंगडाचा प्रयोग
सुधारित शेतीतही नेहमीच्या पिकांमध्ये दरांची समस्या होती. निविष्ठांचा वाढता खर्च होता. अपेक्षित प्रगती दिसत नव्हती. दिवसें-दिवस घटत जाणारी पाण्याची पातळी चिंतेत भर टाकत होती. सन २०१३-१४ मध्ये तर अवघे दोन एकर क्षेत्र सिंचनाखाली येईल, अशी अवस्था झाली. त्या वर्षी कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांसोबत चर्चा करून गावात प्रथमच कलिंगड लागवडीचा निर्णय घेतला. पाण्याची दुर्भिक्षता, घरावर असलेले कर्ज, तसेच एकरी किमान ४० हजार रुपये खर्च अपेक्षित असल्याने घरून या प्रयोगाला विरोध झाला. मात्र, राजेंद्र यांचा निर्णय ठाम होता. त्यांनी मावशीकडून उसनवारीने पैसे घेत दोन एकरांवर लागवडीचे नियोजन केले.

यशस्वी ठरला प्रयोग
एकरी ३०० ग्रॅम संकरित बियाणे, मल्चिंग पेपर, कीडनाशके व अन्य असा सर्व दोन एकरांचा खर्च साधारण ७० हजार रुपयांपर्यंत आला. पहिल्याच वर्षी साधारण ७५ दिवसांत दोन एकरांतून पहिल्या गुणवत्तेचे ४३ टन उत्पादन मिळाले. खर्च वजा जाता सुमारे दोन लाख ३९ हजार रुपये उत्पन्न हाती आले. गावात पहिल्यांदाच कलिंगडचा प्रयोग असल्याने काढणीच्या दिवशी उत्पादनाचे गणित जवळून पाहण्यासाठी गावातील अनेक मंडळी शेतात उपस्थित होती.

कलिंगड शेतीत सातत्य-ठळक बाबी  

 • गेल्या पाच वर्षांपासून राजेंद्र यांनी कलिंगड पिकात ठेवले सातत्य
 • आपल्या गावात पाण्याची दुर्भिक्षता असल्याने गेल्या दोन वर्षांपासून पाणी असलेल्या गावात नातेवाइकांकडे भाडेपट्टीने कलिंगड शेती
 • सहा बाय दीड फुटावर लागवड.
 • लागवडीनंतर १२ ते १५ दिवसांपासून ‘फर्टिगेशन’ला प्रारंभ. ते साधारणत: ५५ दिवसांपर्यंत.
 • पिकाच्या ३५-४५ दिवसांच्या फुले व फळधारणेच्या कालावधीत जैविक रोग-कीड नियंत्रणावर भर
 • कलिंगडात पाणी व्यवस्थापन हा घटक अत्यंत महत्त्वाचा. त्या दृष्टीने बेड तयार झाल्यानंतर, बेसल डोस मिश्रित केल्यानंतर मल्चिंग पेपर अंथरला जातो. त्यानंतर बेड पूर्णपणे ओलवून घेतला जातो.
 • लागवडीपासून ३० ते ३२ दिवसांपर्यंत काटेकोर पाणी व्यवस्थापन ठेवले जाते. शासकीय वाढीच्या व ३२-४५ दिवसांच्या कालावधीत उत्कृष्ट निचरा होणाऱ्या जमिनीत चार लिटर प्रतितासाच्या ड्रीपर्सद्वारे एक ते दीड तास पाणी.
 • फळधारणा झाल्यानंतर पाण्याची मात्रा वाढवली जाते. फळ पोषणाच्या सुरवातीच्या अवस्थेत दीड ते दोन तास व २५० ग्रॅम वजनाची फळे झाल्यावर दोन ते अडीच तास व शेवटच्या टप्प्यात सरासरी चार तास पाणी देण्यात येते.
 • फ्रूट सेटिंगच्या वेळी पिकास पाण्याचा ताण असणे आवश्यक, असे राजेंद्र सांगतात.

‘ए ग्रेड’चे उत्पादन

 • राजेंद्र एकरी २२ ते २५ टन उत्पादन घेतात. यातील केवळ दोन ते तीन टन माल ‘बी ग्रेड’चा. उर्वरित ‘ए ग्रेड’चा असल्याचे ते सांगतात.
 • एके वर्षी दोन एकरांतील ५० टन मालात केवळ १६ टन माल ‘बी ग्रेड’चा होता.  

व्यापाऱ्यांकडून बांधावर खरेदी
राजेंद्र यांनी आपल्या परिसरातील कलिंगड उत्पादकांचा छोटा गट तयार केला आहे. माल काढणीच्या काही दिवस आधी बेटावद, सूरत आदी भागातील व्यापाऱ्यांशी संपर्क साधला जातो. त्यानंतर व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. किलोला साडेसात रुपयांपर्यंत दर मिळतो. यंदा मात्र आवक सर्वत्र वाढल्याने दर घटले. ते साडेपाच रुपयांपर्यंत मिळाले, असे राजेंद्र म्हणाले.

कर्जमुक्त झाले
प्रगतिशील शेती करण्यापूर्वी किंवा कलिंगड शेती सुरू करण्याआधी पाटील यांचे कुटुंबीय कर्जबाजरी होते. आता त्यांनी टप्प्याटप्प्याने आपली आर्थिक परिस्थिती सक्षम केली आहे. सर्व कर्ज फेडून नव्या तंत्राचा ट्रॅक्टर घेतला आहे. नंदुरबार शहरात प्लॉट घेतला आहे. आपल्या प्रगतीत केव्हीकेचा मोलाचा वाटा असल्याचे ते नमूद करतात. उत्पादन व व विक्रीचे कौशल्य आपल्यापुरतेच सीमित न ठेवता त्यांनी अनुभवाचा फायदा आपल्या परिसरातील शेतकरी, आप्तेष्ट व आपले सोबती यांनाही करून दिला आहे.

छायाचित्रण व पूरक व्यवसाय
कुटुंबाला हातभार म्हणून राजेंद्र विविध कार्यक्रमांत छायाचित्रण व्यवसायही करतात. त्याचबरोबर इलेक््रटीक वायडिंग क्षेत्रातही ते वाक्‌बगार आहेत. या दोन्ही व्यवसायातून त्यांनी अर्थार्जनाची जोड दिली आहे.  

संपर्क : राजेंद्र पाटील, ९४२३७२५८६४
संपर्क : आर. एम. पाटील, ९८५०७६८८७६
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे विषय विशेषज्ज्ञ आहेत.)

 

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...
सिंचन योजनांचे अर्थसाह्य महामंडळाच्या...मुंबई : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील...
मुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...
बाजारात टंचाईमुळे ‘पांढऱ्या सोन्या'च्या...जळगाव ः देशात कापसाची सर्वाधिक सुमारे ४० लाख हेक्...
दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी पंप...
विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढलीपुणे ः गुरुवारी (ता. १८) साजऱ्या हाेणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची...पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू...
मराठवाड्यात यंदा शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : कमी पाऊस आणि मोठा खंड यामुळे...
ऊर्जा विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना...मुंबई  : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या व...
राज्यात २७ लाख हेक्टरवर होणार ज्वारी...पुणे : केंद्र सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे...
सणासुदीत अर्थकारण उंचावणारे पेरीडकरांचे...गणपती उत्सवापासून ते अगदी दसरा, दिवाळीस तुळशीच्या...