खडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकता

.मिश्र फळबागेमध्ये झाडांचा भरपूर पालापाचोळा पडतो. ही पाने गोळा करताना संजय मोरे.
.मिश्र फळबागेमध्ये झाडांचा भरपूर पालापाचोळा पडतो. ही पाने गोळा करताना संजय मोरे.

कोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय मोरे यांनी सहा वर्षांमध्ये फळबागेत रुपांतर केले. सुरवातीच्या प्रचंड अडचणीतूनही सातत्याने प्रयत्न करत मार्ग काढला. अपयशाने न डगमगता नव्या उमेदीने लावलेली केशर आंबा, सीताफळ, डाळिंब व आवळ्याची बाग बहरली आहे. गेल्या पंधरा वर्षांमध्ये बंधू हरीशच्या साह्याने मिश्र फळबागेमध्ये जमिनीचा पोत सुधारणे, कायम टिकविणे याला प्राधान्य दिले.

अशी केली फळबागेची लागवड २००३ ते २००९ या दरम्यान टप्प्याटप्प्याने स्वनिर्मित फळरोपांची लागवड केली. बाजारातून जातिवंत सीताफळांची खरेदी करून त्यांच्या बियांपासून सीताफळाची रोपे तयार केली. आंब्याची झाडेही कोयीपासून तयार केली. डाळिंबाच्या गुटी घरी आणून रोपे बनवली. खडकाळ व पडीक असलेल्या जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी २००३ त्यातील खडक काढून घेतले. ट्रॅक्‍टरने नांगरणी करून साडेतीन बाय साडेतीन बाय साडेतीन फूट आकाराचे खड्‌डे केले. खड्डे भरताना कुजलेला काडीकचरा, सुमारे १५ किलो कुजलेले शेणखत व १५ किलो गांडूळ खतही वापरले. या खड्ड्यामध्ये रोपांची निर्मिती केली.

जमिनीच्या सुपीकतेसाठी... फळबागेमध्ये प्रति झाड शेणखत व गांडूळ खत प्रत्येकी १५ किलो (एक टोपले) प्रति वर्ष ऑगस्ट ते ऑक्‍टोबरदरम्यान दिले जाते. दोन वर्षापासून जुन्या बागेमध्ये सेंद्रिय कर्ब व गांडुळाची भरपूर संख्या असल्याने हे प्रमाण कमी केले आहे. संपूर्ण बागेत गवत उगवू दिले जाते. साधारणत: बी पडेपर्यंत गवत ठेवले जाते. ऑक्‍टोबरमध्ये ते गवत कापून घेतात. कापलेले गवत झाडांसाठीच्या बेडवर टाकले जाते. त्यातून आच्छादन होऊन ओलावा टिकण्यासोबतच सेंद्रिय कर्ब उपलब्ध होते. अलीकडे झाडे मोठी झाली असून, त्यांचा बागेत पालापाचोळा मोठ्या प्रमाणात पडतो. अडीच ते तीन फुटांपर्यंतचे ढीग तयार करतो. बागेत खरीप हंगामात आंतरपीक म्हणून सोयाबीन घेतले जाते. त्याचाही पालापाचोळा पडतो, तसेच नत्र स्थिरीकरण होते. दोन ओळीत सोयाबीनवर रोटाव्हेटर मारला जातो. पिकांचे अवशेष, पालापाचोळा आणि गवत हे जमिनीत गाडले जाते. त्यातून सेंद्रिय घटक जमिनीत वाढतात.   असा कुजविला जातो पालापाचोळा बागेतील मातीमध्ये मिसळलेला पालापाचोळा कुजण्यासाठी प्रत्येक वर्षी ऑक्‍टोबरनंतर प्रवाही पाणी दिले जाते. त्यामुळे सेंद्रिय खाद्य आणि ओलावा दोन्ही मिळाल्याने गांडुळाची भरपूर वाढ होते. त्याची कार्यक्षमताही वाढते. ऑक्‍टोबरनंतर उगवलेली गवतावर साधारण सहा महिन्यांनी  (मार्च-एप्रिलमध्ये) हीच प्रक्रिया केली जाते. या काळात उन्हाची तीव्रता वाढलेली असते. गांडुळे जिवंत राहण्यासाठी ओलाव्याची आवश्यकता असते, ती यातून पुरवली जाते.

१५ वर्षांत शेतातील एकही घटक जाळला नाही संजय मोरे यांनी आपल्या सतरा एकर बागेतील लागवडीपासून आतापर्यंत एकही  घटक जाळला नसल्याचे सांगितले. आंब्याची काढणी झाल्यानंतर साधारणतः जुलैमध्ये त्याचे कटिंग होते. सीताफळाची कटिंग डिसेंबरच्या आसपास केली जाते. या तोडल्या जाणाऱ्या फांद्या रोटाव्हेटरच्या साह्याने बारीक केल्या जातात. बारीक चुरा करून बागेतच पसरविल्या जातात. ओलावा असल्याने त्या लवकर कुजतात. त्यातून गांडूळांना खाद्य मिळते. सर्व पोषक घटक फळझाडांना उपलब्ध होत असल्याने फळांना चकाकी येते. अशा फळांना चांगला दर मिळत असल्याचे मोरे यांनी सांगितले.

महत्त्वाची वैशिष्ट्ये

  • एकूण सतरा एकर फळबाग.
  • आंबा, सीताफळ आणि डाळिंब एकत्र १५ एकर. तसेच एक हेक्‍टर क्षेत्रात आवळ्याची १००० झाडे आहेत.
  • सुरवातीपासूनच बाग ठिबकवर असून, संरक्षित पाण्यासाठी शेततळ्याची सोय केली आहे.
  • छाटणी वा गवत कापणीव्यतिरक्‍त मजुरांची गरज लागत नाही.
  • सूक्ष्मजीवांना धोका होऊ नये म्हणून तणनाशक वापरत नाही.
  • प्रतिक्रिया : जमिनीच्या सुपीकतेसाठी सुरवातीला शेणखत, गांडूळ खताचा वापर केला. गवत, पाचापाचोळा कुजवला. आता गांडुळांची संख्या भरपूर आहे. जमीन भुसभुशीत झाली. तजेलदार झाडे आणि चमकदार गोड फळेच मातीच्या सुपीकतेविषयी सांगण्यास पुरेशी आहेत. - संजय मोरे पाटील

    संपर्क : संजय मोरे पाटील, ९४२२३७८५९३, ७९७२८५३३२५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com