गुलाब, जरबेरा, झेंडूने फुलला जळगावचा बाजार

गुलाब, जरबेरा, झेंडूने फुलला जळगावचा बाजार
गुलाब, जरबेरा, झेंडूने फुलला जळगावचा बाजार

भरीताची वांगी, केळी आणि कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावात फुलबाजाराने वेगळी ओळख तयार केली आहे.  झेंडूच्या बरोबरीने गेल्या चार वर्षांत गुलाब, जरबेरा, निशिगंध आणि लिलीची आवक वाढली आहे. खानदेशातील फूल उत्पादकांसह बुलडाणा, सिल्लोड आणि धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या बाजारपेठेला पसंती दिली आहे. जळगाव शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीमध्ये वल्लभदास वालजी व्यापारी संकुलात (गोलाणी मार्केट) गेल्या वीस वर्षांपासून फूल बाजार भरतो अाहे. या बाजारपेठेत प्रामुख्याने झेंडुची मोठी उलाढाल होते. अलीकडे कन्नड, सिल्लोड (जि. औरंगाबाद), धुळे, बुलडाणा येथील शेतकरी या बाजारपेठेत फुलांच्या विक्रीसाठी येत आहेत.   फूल अडतदारांनी गोलाणी संकुलात विक्री कार्यालये सुरू केली आहेत. रोज सकाळी सात वाजता बाजाराला सुरवात होते. बाजारात सुमारे नऊ अडते आहेत. गोलाणी व्यापारी संकुलातील खालच्या मजल्यातील ओटे आणि मोकळ्या जागेत हा बाजार भरतो. जळगाव जिल्ह्यातील शिरसोली, आसोदे, तरसोद, विदगाव, चोपडा, पारोळा, एरंडोल, कुऱ्हे पानाचे, तळवेल आदी भागातील शेतकरी या बाजारात दररोज फुले घेऊन येतात. दर बुधवारी आणि शनिवारी बुलडाणा, धुळे, कन्नड तसेच जळगाव जिल्ह्याबाहेरील शेतकरी या बाजारात फुले घेऊन येतात. जळगाव जिल्ह्यात जरबेरा फुलांची फारशी लागवड नसल्याने सण, लग्नसराईतच्या काळात येथील अडतदार जरबेरा फुलांची पुणे येथून खरेदी करतात. मात्र या बाजारपेठेत वर्षभर गुलाब, झेंडू, निशिगंध, शेवंती फुलांची चांगली उपलब्धता असते. ग्लॅडिओलस, ऑर्किड आदी विदेशी फुलांनाही या बाजारपेठेत मागणी वाढत आहे. बाजारपेठेत फुलांचे वजन इलेक्‍ट्रॉनिक वजन काट्यावर केले जाते. फूल उत्पादकांना लगेच पैसे दिले जातात.

फिलरलाही चांगली मागणी शिरसोली, आसोदा येथील शेतकरी वर्षभर गोल्डन रॉड तसेच सुशोभनासाठी लागणारी फुले, पानांचे उत्पादन घेऊ लागले आहेत. या बाजारात पुष्पगुच्छासाठी आवश्‍यक फिलरची चांगली उपलब्धता असते. बाजारपेठेत गरजेपेक्षा जास्त आवक झाली तर अडते अतिरिक्त फुले, फिलर्स गुजरातमधील निझर, सुरत व बडोदा तसेच मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांना विक्रीसाठी पाठवतात. गुजरात, मध्य प्रदेश बाजारपेठेत जरबेरा, गुलाब फुलांना चांगली मागणी आहे. त्यामुळे दोन-तीन अडतदार बारमाही गुलाब आणि जरबेराची खरेदी करतात. शेतकऱ्यांकडून थेट खरेदी गोलाणी व्यापारी संकुलात २३ फूल विक्री दुकाने सुरू झाली आहेत. या संकुलानजीक विसनजीनगर, नवीपेठेतही फूल विक्री दुकाने आहेत. घाणेकर चौकातही पालिकेच्या जागेत सुमारे ३० फूल विक्रेते व्यवसाय करतात. काही फूल विक्री दुकानदार थेट शेतकऱ्यांकडून शेवंती, गुलाब व जरबेरा फुलांची थेट खरेदी करतात. सध्या शिरसोली येथील २५ शेतकरी गोलाणी व्यापारी संकुलातील फूल विक्रेत्यांना थेट विक्री करतात. या व्यवहारात चांगला दर फूल उत्पादकांना मिळतो. दररोज रावेर, यावलमधील काही विक्रेते पुष्पगुच्छ, पुष्पहाराची मागणी जळगावमधील फूल दुकानदारांच्याकडे नोंदवीत आहेत. विविध फुलांची उलाढाल

  • वर्षभर गुलाबाची आवक. जरबेरा, लिली,  झेंडू तसेच फिलरसाठी उपयुक्त गोल्डन रॉड व इतर प्रकारच्या शोभिवंत पानांचीही रोज उलाढाल.
  • पावसाळ्यात झेंडू, गुलाब, लिली. हिवाळ्यात निशिगंध, ॲस्टर, लिली आणि उन्हाळ्यात मोगरा, गुलाब फुलांची चांगली आवक. झेंडूमध्ये पिवळा, नारंगी रंगाच्या फुलांची मोठी उलाढाल.
  • रोज १५ हजार गुलाब फुलांची विक्री. दररोज जरबेरा दोन हजार जुड्या, झेंडू २०० क्विंटल, निशिगंध ८० क्विंटल, शेवंती १५० क्विंटल आवक.
  • दररोज दोन हजार क्विंटल फिलरची उलाढाल.
  • प्रतिक्रिया गुलाब, झेंडूची चांगली उलाढाल बाजारात गुलाब, झेंडूचा कधीही तुटवडा नसतो. सण समारंभाच्या काळात जरबेरा व लिलीची फुले इतर बाजारपेठेतून मागवावी लागतात. फुलबाजारामुळे फूल विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. जळगावात विदेशी फुले वगळता सर्व प्रकारच्या फुलांचे उत्पादन शेतकरी घेऊ लागले आहेत. वसंत बारी, फूल विक्रेते.

    फूल बाजारात होताहेत सुधारणा फूलबाजार विस्तारत असल्यामुळे जास्तीत जास्त सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. पालिकेच्या सहकार्याने गोलाणी व्यापारी संकुलात स्वच्छ जागी फुलांचे सकाळीच लिलाव होतात. या बाजारात येत्या काळात  सुरक्षा रक्षक, चांगल्या दिव्यांची व्यवस्था करत आहोत. - लक्ष्मण पाटील, सभापती, जळगाव बाजार समिती वर्षभर फुलांना मागणी काही अडतदार जिल्ह्यातील इतर फूलबाजार तसेच गुजरात, मध्य प्रदेशातील बाजारपेठेत फुलांची विक्री करतात. जिल्ह्यात जरबेरा लागवडीस चांगली संधी आहे. जळगाव बाजारपेठेत सर्व फुलांना बारमाही मागणी असते. - श्रीराम बारी, अडतदार फुलशेतीखालील क्षेत्रात वाढ जळगाव जिल्ह्यात जरबेरा, गुलाब, लिली, निशिगंध आदी फुलांची लागवड वाढली आहे.  कृषी विभागाच्या योजनेतून तरसोद, शिरसोली, एरंडोल, यावल, रावेर भागातील शेतकऱ्यांनी हरितगृहात फुलांच्या लागवडीत आघाडी घेतली आहे. काही महिला शेतकरीही हरितगृहामध्ये फुलांचे उत्पादन घेत आहेत. शिरसोली व आसोदे ही पारंपरिक फूल उत्पादनासाठी प्रसिद्ध गावे आहेत. काही शेतकरी थेट खासगी बसने पुणे, ठाणे, कल्याण येथे फुले विक्रीस पाठवितात. - प्रवीण आवटे, तंत्र अधिकारी, कृषी विभाग, जळगाव मिळाली चांगली बाजारपेठ तुकाराम भोळे, आर. सी. महाजन, बिसन बारी आणि परिसरातील फूल उत्पादकांच्या पुढाकारातून १९८५ मध्ये जळगावातील फुले मार्केटमध्ये फुलबाजार सुरू झाला. त्यानंतर गोलाणी मार्केटमध्ये फुलांची दररोज विक्री सुरू झाली. शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ मिळाली आहे. गुलाबाची शेकड्यावर विक्री होते. सरासरी ५० पैसे ते ५ रुपये प्रति गुलाब फुलास दर मिळतो. कुंदा, मोगरा या फुलांची वजनावर विक्री होते. या फुलांना मागणीनुसार प्रति किलो ५० ते ८०० रुपये दर मिळतो. निशिगंधाला सरासरी प्रति किलो १०० रुपये, झेंडू २० ते ६० रुपये, ॲस्टर १० ते ७० किलो असा दर मिळतो. जरबेराच्या दहा फुलांची गड्डी सरासरी ५० ते ७० रुपये दराने विकली जाते. - योगेश भोळे, शेतकरी, (आसोदा, जि. जळगाव)  : ७५८८८१६३७५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com