agricultural success story in marathi, Jalna | Agrowon

उत्कृष्ट कापूस पुढाकार प्रकल्पातून उत्पादन अन् दर्जातही वाढ
संतोष मुंढे
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होणाऱ्या मराठवाड्यातील जिल्ह्यांपैकी जालना हा महत्त्वाचा जिल्हा. साहजिकच येथील शेतकरी या पिकाबाबत सजग अाहेत. त्यांच्या क्रियाशीलतेला आणखी वाव देताना काटेकोर व्यवस्थापन व निविष्ठांचा संतुलित, योग्य वापर करून कापसाचे उत्पादन व त्याचा दर्जा वाढवण्याचे काम जालना जिल्ह्यात प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू आहे. उत्कृष्ट कापूस पुढाकार प्रकल्प असे त्याचे नाव आहे. त्याच्याच जोडीला पाणी हा मुद्दा केंद्रस्थानी ठेऊन कॉटन वॉटर प्रकल्पदेखील राबवण्यात येत आहे.

कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होणाऱ्या मराठवाड्यातील जिल्ह्यांपैकी जालना हा महत्त्वाचा जिल्हा. साहजिकच येथील शेतकरी या पिकाबाबत सजग अाहेत. त्यांच्या क्रियाशीलतेला आणखी वाव देताना काटेकोर व्यवस्थापन व निविष्ठांचा संतुलित, योग्य वापर करून कापसाचे उत्पादन व त्याचा दर्जा वाढवण्याचे काम जालना जिल्ह्यात प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू आहे. उत्कृष्ट कापूस पुढाकार प्रकल्प असे त्याचे नाव आहे. त्याच्याच जोडीला पाणी हा मुद्दा केंद्रस्थानी ठेऊन कॉटन वॉटर प्रकल्पदेखील राबवण्यात येत आहे. जालना येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे (केव्हीके) अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या या प्रकल्पाला ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेने निधी व अन्य साह्य दिले आहे.    
 
प्रकल्पाची व्याप्ती

 • सन २००९ मध्ये या प्रकल्पाला सुरवात झाली. त्यात मर्यादीत उद्दीष्टे होती. सन २०१०-११ पासून त्याची व्याप्ती वाढवण्यात आली.
 • सुरवातीला ३० गावांपासून प्रकल्पाची सुरवात झाली.
 • जालना जिल्ह्यातील जालना, अंबड, भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूर, घनसावंगी या सहा तालुक्‍यांतील ७० गावांचा प्रकल्पात समावेश.
 • प्रत्येक गावात ३० ते ४० शेतकऱ्यांचा     एक शिकावू गट (लर्निंग ग्रूप). एकूण प्रकल्प क्षेत्रात असे ३३० गट.

प्रकल्पाची उद्दिष्टे

 • उत्कृष्ट व्यवस्थापन पद्धती वापरून निविष्ठा वापरात लक्षणीय बचत, शेतकऱ्यांच्या निव्वळ नफ्यात वाढ.
 • सुयोग्य बाजारपेठेशी समन्वय प्रस्थापित करणे.
 • सुमारे १२ हजार १८२ शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून १३ हजार हेक्‍टर क्षेत्र उत्कृष्ट व्यवस्थापनाखाली आणणे.  

   उद्दीष्टपूर्तीसाठी नियोजन

 • क्षेत्रीय स्तरावर मार्गदर्शन व समन्वयासाठी प्रत्येक पाच गावांसाठी मास्टर ट्रेनर.
 • प्रत्येकी दोन प्रात्यक्षिक प्लॉटच्या    माध्यमातून प्रशिक्षण, कार्यशाळा, शेती दिन, अभ्यास सहली आदींद्वारे मार्गदर्शन.

कापूस उत्पादनातील निकष

 • पाण्याचा कार्यक्षमतेने वापर, जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष देणे.
 • नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन.  
 • कापूस धाग्याच्या गुणवत्तेकडे लक्ष.
 • किडींच्या नियंत्रणासाठी पिकाची     प्रतिबंधक काळजी घेणे.
 • मित्र किटकांचे संवर्धन.
 • कीड प्रतिकारक्षमतेचे व्यवस्थापन
 • लेबल क्लेम असलेल्या कीडनाशकांचा     वापर.
 • पीक संरक्षण पद्धतीतील दुष्परिणामांची  तीव्रता कमी करणे. फवारणी दरम्यान संबंधित व्यक्‍तींची पूर्ण काळजी घेणे.    फवारणीनंतर शिल्लक द्रावणाची योग्य   विल्हेवाट लावणे.
 • खते देण्याची वेळ, पद्धत व मात्रा यांत     काटेकोरपणा असणे.  
 • बांध बंदिस्ती, आंतरपीक पध्दती व पीक फेरपालट अवलंब.
 • आरोग्य सुरक्षितता, बालमजुरांचा वापर न करणे.

  झालेली उद्दिष्टपूर्ती

 • प्रकल्पातील ९० टक्‍के शेतकऱ्यांकडून झाडांची एकरी संख्या राखण्याचे उद्दीष्ट पूर्ण.  
 • चाळीस टक्‍के शेतकऱ्यांकडून माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर
 • शत्रू कीड आणि मित्रकीटक यांची शेतकऱ्यांना झाली ओळख.  
 • आर्थिक नुकसानीची पातळी पाहूनच कीटनाशकांचा वापर.  
 • चाळीस टक्‍के शेतकऱ्यांनी केला ठिबक सिंचनाचा अवलंब.

 आकडेवारी
 प्रकल्पापूर्वी

 • कापूस लागवड अंतर- चार बाय चार किंवा चार बाय तीन फूट  
 • झाडांची एकरी संख्या- तीन ते चार हजार
 • खर्च -एकरी २० ते २५ हजार रु.  

  प्रकल्पातील बाबी

 • लागवड अंतर- चार बाय एक आणि तीन बाय दीड  
 • झाडांची संख्या- एकरी-
 • ११ हजार ते १४ हजार
 • उत्पादन खर्च- एकरी-
 • १५ ते १८ हजार रु.

 गुलाबी बोंड अळीचे संकट
प्रकल्प कार्यान्वीत झाल्यानंतर कापसाचे कोरडवाहू व बागायती उत्पादन वाढले, खर्चात बचत झाली.
मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांत राज्यातील कपाशीवर गुलाबी बोंड अळीचे संकट मोठ्या प्रमाणात वाढले आहे. साहजिकच उत्पादनावरही त्याचा परिणाम होत आहे. पुढील हंगामापासून बोंड अळीचे नियंत्रण करण्याच्या दृष्टीनेही व्यवस्थापन अधिक चोख ठेवण्यात येणार असल्याचे केव्हीकेतील तज्ज्ञांनी सांगितले.

उत्पादनात वाढ

 • कोरडवाहू स्थितीत जिथे एकरी ४ ते ५ क्विंटल उत्पादन मिळायचे तेथे ते सात ते आठ क्विंटलपर्यंत मिळू लागले   आहे.  
 • बागायती क्षेत्रात हेच उत्पादन ७ ते ८ क्विंटलवरून १२ क्‍विंटलपर्यंत मिळत आहे.
 • कापसाची प्रत उत्तम ठेवण्यास झाली मदत. त्यामुळे सरासरी शंभर रुपये प्रति क्‍विंटल दर जास्त मिळण्याची शक्यता  
 • बाल कामगार, आरोग्य व सुरक्षितता याविषयी शेतकरी झाले जागरूक
 • पाणी व रासायनिक खतांच्या वापरात सुमारे ३० टक्‍के झाली बचत   

शेतकरी झाले मार्गदर्शक
 प्रकल्पांतर्गत निवृत्ती घुले, बाबासाहेब काटकर, सुभाषराव गायकवाड, विष्णू बचाटे या चार शेतकऱ्यांना चार वर्षांपूर्वी विदर्भात कापूस उत्पादकांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. त्यांनी मराठवाड्यातील काही गावातील कापूस उत्पादकांशीही संवाद साधून मार्गदर्शन करण्याच्या संधीचं सोनं केल. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तरे देत त्यांचे समाधान करण्यात त्यांना यश आलं.  
  
मार्केट लिंकेज
या प्रकल्पांतर्गत जास्तीच्या भाववाढीची तरतूद नाही. मात्र उत्कृष्ट पद्धतीने पिकवलेल्या कापसाला जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळू शकते. वास्तविक प्रकल्पात नोंदणीकृत जिनिंग मिल यांच्या सहकार्यातून कापूस खरेदीची सोय करण्यात आली होती. यात काळाबाजार होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना कार्डस देण्यात आली. सध्या कापूस विक्रीची जबाबदारी शेतकऱ्यांनाच घ्यावी लागते. मात्र दर्जा चांगला असल्याने या कापसाला यापूर्वी स्थानिक बाजारभावापेक्षा क्विंटलला शंभर रपये अधिक दर मिळाल्याचे शेतकरी सांगतात. प्रकल्पात शेतकऱ्याला सर्व कामांची नोंद ठेवणे, सर्व निकषांचा अवलंब करणे, दोन गटांनी बसून चर्चा करणे क्रमप्राप्त आहे. प्रकल्पातील संस्थांनी नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांमार्फत याची पडताळणी होते. ज्या गटाने सर्व निकषांचा अवलंब केला त्या शिकाऊ गटास विक्रीचा परवाना देण्यात येतो.

प्रकल्पाची पुढची दिशा
प्रकल्पाची पुढील दिशा अवर्षण संवेदनशील कापूस उत्पादनाकडे राहणार आहे. यंदा त्यासाठी केव्हीकेच्या माध्यमातून चार ठिकाणी चाचण्या घेण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी एक स्थळ केव्हीकेचेत ठिकाण आहे. यामध्ये कापसाच्या विविध जाती प्रकल्पातील निकषांचा अवलंब करून घेतल्या जातील. त्यामधून नेमकी कोणती जात मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याची ठरू शकेल याची शास्त्रीय मिमांसा केली जाईल.

पाण्याविषयी जागरूक करणारा ‘कॉटन वॉटर’ प्रकल्प
कपाशीतील तंत्रज्ञानाच्या बरोबरीने पाणी हा मुद्दा केंद्रस्थानी ठेऊन कॉटन वॉटर प्रकल्प राबवण्यात येत आहे. जालना जिल्ह्यातील पिरकल्याण, बोरखेडी, नंदापूर, धारकल्याण व वखारी अशी पाच गावे त्यात समाविष्ट आहेत.

  उद्दिष्टे

 • भूगर्भीय पाण्याच्या पातळीत वाढ करणे.
 • शेती करताना पाण्याचे नैसर्गिक प्रवाह व साठवणूक यावर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेणे.
 • पाण्याचे काटेकोर व तंत्रज्ञानात्मक व्यवस्थापन करणे.
 • जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करणे.

  प्रकल्पाचे नियोजन

 • पाच गावांमध्ये प्रत्येक १० ते १५ शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात आले आहेत.
 • पाचही गावशिवारांमधील गायरान जमिनींवर वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
 • हवामान आधारित संदेश सेवा पुरविणे या घटकाच्या अनुषंगाने मे महिन्यापासून प्रत्येक पंधरवड्याला बैठका 

पंचवीस एकरांवर वृक्षलागवड
‘कॉटन वॉटर’ प्रकल्पांतर्गत पाचही गावांमध्ये २५ एकर गायरान जमिनीवर वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यात कडुलिंब, गुलमोहर, गिरीपुष्प, सीताफळ व आंबा यांचा समावेश आहे. संबंधित ग्रामपंचायतींकडून त्यासाठी अधिकृत संमतीपत्र घेण्यात आले आहे. जनावरांपासून सुरक्षेसाठी संपूर्ण क्षेत्राला तारेचे कुंपण करण्यात आले आहे.  

तीन स्वयंचलित हवामान केंद्रे
प्रकल्पांतर्गत पाच गावांतील तीन शेतकऱ्यांच्या शेतावर स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्या माध्यमातून सुमारे ३८० शेतकऱ्यांचे नोंदणीकरण झाले आहे. त्यामाध्यमातून मोबाईलवर हवामानाविषयीचे संदेश पाठविण्याची सोय झाली आहे. यात एक संदेश मागील आठवड्यातील वातावरण व एक संदेश पुढील आठवड्यात राहणाऱ्या वातावरणाचे भाकीत करणारा असतो. त्यामध्ये कमाल व किमान तापमान, सापेक्ष आर्द्रता व पर्जन्यमान या संबंधित माहिती शेतकऱ्यांना मिळण्याची सोय आहे. पिकाला पाणी देणे, पिकांची काढणी या बाबतीत निर्णय घ्यायला यामुळे मदत होते. याचबरोबर २१ शेतकऱ्यांकडे स्वयंचलित माती ओलदर्शक यंत्रे बसवण्यात आली आहेत.

‘कॉटन वॉटर’ प्रकल्पांतर्गत पिरकल्याण व वखारी गावांमध्ये मागील हंगामात लागवडीअाधी व ऑक्‍टोबर अशा दोन वेळा ड्रोनद्वारे शेताचे सर्वेक्षण करण्यात आले. त्या आधारे स्थानिक परिस्थितीतील जमिनीतील ओलावा, पीक परिस्थिती व कीड- रोग यांची प्रत्यक्ष स्थिती लक्षात येण्यास मदत झाली.
- सतीष हरडे, ९८२३८०६७२०
प्रकल्प समन्वयक, कॉटन वॉटर प्रकल्प.
 
सुरवातीला शाश्वत कापूस पुढाकार नावाचा प्रकल्प पुढे उत्कृष्ट कापूस पुढाकार प्रकल्प म्हणून राबविला जात आहे. यात सहभागी गावांची संख्या ७० वर पोचली आहे. या प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनात एकरी तीन ते चार क्‍विंटलची वाढ झाली. अंतरात बदल झाल्यामुळे झाडांची एकरी संख्या वाढली. पाण्याचा किफायतशीर वापर झाला. खते व कीडनाशकांचाही गरजेनुसार वापर करण्याचे तंत्र शेतकऱ्यांना अवगत होऊन उत्पादन खर्चात बचत झाली.
- एस. व्ही. सोनुने, ७३५००१३१४६  
कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, जालना.

उत्कृष्ट कापूस पुढाकार प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या सजगतेत कमालीची सुधारणा झाली आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना तसेच त्यांच्या कापसाला जागतिक स्तरावर ओळख देण्याचा प्रयत्न असून त्यामध्ये प्राथमिक स्तरावर बऱ्यापैकी यश आले आहे.
- सचिन गायकवाड, ७३५००१३१८८
प्रकल्प समन्वयक, उत्कृष्ट कापूस पुढाकार प्रकल्प

प्रकल्पामध्ये कीड नियंत्रण व्यवस्थापनात मोठा फायदा झाला. गरज असेल तरच फवारणीची व आवश्‍यक त्याच कीडनाशकाचा वापर करण्याची पद्धत आम्ही अवलंबिली. रासायनिक खते, पाणी यांचा अनियंत्रित वापर थांबवून उत्पादन खर्चात बचत करणे शक्‍य झाले.
- सुरेश शिंदे, ९९२३०२१८०१  
पिरकल्याण, जि. जालना

निविष्ठांचा कार्यक्षम व गरजेनुसार वापर सुरू केला. स्वयंचलित हवामान केंद्रांमुळे शेतीत अचूक निर्णय  घेण्याची क्षमता वाढीस लागली. माझ्या गावातील सुमारे दोनशे शेतकरी या प्रकल्पात सहभागी आहेत. या प्रकल्पातून मिळालेल्या ज्ञानामुळे मी अन्य ठिकाणी जाऊन कापूस उत्पादनाचे हे किफायतशीर तंत्र शेतकऱ्यांना समजावून सांगू लागलो आहे. माझी बागायती म्हणता येत नसली तरी पाण्याची सोय असलेली शेती आहे. या प्रकल्पातील बाबींचा अवलंब केल्यानंतर एकरी सरासरी १७ ते १८ क्विंटल उत्पादनाची सरासरी मी ठेवली आहे. यापूर्वी एकरी २७ क्विंटल उत्पादनाचा आकडाही गाठला होता.बोंडअळीमुळे गेल्या वर्षांत उत्पादनाला फटका मात्र बसला आहे.
- निवृत्ती घुले. ९९२३३८९५८४
वखारी, जि. जालना.

उत्पादन खर्चावर नियंत्रण मिळविण्याचे तंत्र अवगत करता आले ही समाधानाची बाब आहे.
- दत्तू चव्हाण, नंदापूर, जि. जालना.
 
प्रकल्पात काही आधुनिक तंत्रांचा वापर झाला. त्यामुळे मोबाईलवरून मोटरपंप चालू बंद करण्याची सोय झाली. विजेमध्ये काही बिघाड असल्यास मोबाईलवर तसा संदेश मिळतो. एकूणच पाण्याची बचत होण्यास मदत झाली.
- गजानन घुले, ८८०६४३४४७४
शेतकरी वखारी, जि. जालना.
 
आमच्या गावातील चार ते पाच गट प्रकल्पांत सहभागी आहेत. निविष्ठांचा कार्यक्षम व अचूक वापर करण्यात आम्ही कुशल झालो आहोत.
- ज्ञानेश्वर पाटील अंभोरे, सेलगाव, जि. जालना.
 
 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...