गुणवत्तेवर मिळविली मसाल्यांना बाजारपेठ

विविध प्रकारचे मसाले पाऊचमध्ये भरताना गटातील सदस्या.
विविध प्रकारचे मसाले पाऊचमध्ये भरताना गटातील सदस्या.

खुटबाव (ता. दौंड, जि. पुणे) गावाच्या परिसरात शेतमजुरी करणाऱ्या दोनशे महिलांचे कमल परदेशी यांनी संघटन केले. वीस बचत गटांच्या माध्यमातून सहकारी संस्था उभी केली. आज ही संस्था विविध मसाल्यांची निर्मिती करते. उत्पादनांच्या विक्रीसाठी अंबिका ब्रॅंड तयार करून राज्यभरात वितरणास सुरवात केली आहे. ग्रामीण भागात उत्पन्नासाठी महिलांना शेतावर रोजंदारीवर जावे लागते. परंतु कमी मजुरीमुळे घरखर्च भागविण्यासाठी महिलांपुढे अनेक अडचणी उभ्या राहतात. खुटबाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील बहुतांशी महिलांचे उदरनिर्वाहाचे शेतमजुरी हेच साधन होते. गावातील महिलांच्या चर्चेतून बचत गटांची संकल्पना २००० मध्ये पुढे आली. गावातील महिला गटांनी चार वर्षे हळूहळू छोट्या स्वरूपात मसाला निर्मिती व्यवसाय केला. मात्र अधिक मागणी आणि पुरवठा कमी यामुळे आपण कमी पडत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे व्यवसायात वाढ करण्यासाठी बचत गटांची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

वीस महिला बचत गटांचा पुढाकार खुटबाव गाव आणि परिसरातील महिलांनी दहा महिलांचा एक गट अशा एकूण वीस गटांची स्थापन केली. त्याची पंचायत समितीकडे नोंदणी आहे. त्यानंतर कमल परदेशी यांनी सर्व गटांना सोबत घेत या गटांची अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्था स्थापन केली. आज या संस्थेच्या माध्यमातून दोनशे महिलांना रोजगार उपलब्ध झाला. यातून कुटुंबाला चांगला आर्थिक हातभार लागला आहे.

मसाल्याचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय सुरवातीला बचत गट महिन्याला सुमारे पन्नास किलोपर्यंत मसाला तयार करत होते. परंतु संस्था स्थापन केल्यानंतर उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला. पंरतु उत्पादन वाढविण्यासाठी जागा महत्त्वाची होती. ती नसल्याने अनेक अडचणी या संस्थेसमोर उभ्या राहिल्या. त्यामुळे संस्थेसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करण्याचा निश्चय केला. त्यासाठी कमल परदेशी यांनी पुढाकार घेत पुणे, मुंबई, दिल्ली येथे सरकारी अधिकारी, संस्थांची संपर्क साधून संस्थेच्या इमारत उभारणीला पाठबळ दिले.

संस्थेने उभारली इमारत शासनाच्या माध्यमातून चार वर्षांपूर्वी भांडगाव येथे संस्थेसाठी अर्धा एकर जागा मिळाली. यासाठी संस्थेला साडेसात लाख रुपयांचा खर्च आला. या खरेदी केलेल्या जागेवर सुमारे दोन गुंठे क्षेत्रावर संस्थेची २०१७ मध्ये इमारत बांधली. त्यामध्ये स्वतंत्र कार्यालयाची सुविधा आहे. इमारत बांधकामासाठी ३१ लाख रुपयांचा खर्च आला. त्यासाठी बॅंक आॅफ महाराष्ट्रने मदत केली.

वर्षाला साठ टन मसाला उत्पादन सुरवातीला बचत गटाने तीनशे रुपयांपासून व्यवसाय उभा केला. हळूहळू त्यात वाढ केली. आता दरवर्षी साठ टनांपर्यंत मसाल्याचे उत्पादन होते. मसाल्याची पुणे, दौंड या शहरात विक्री केली जाते. आजमितीस ही संस्था जवळपास दीड कोटी रुपयांची उलाढाल करते. खर्च वजा जात वर्षाला तेरा लाख रुपयांचा निव्वळ नफा संस्थेला मिळत आहे. मसाला निर्मितीसाठी यंत्रसामग्रीची खरेदी मसाला निर्मितीसाठी सुरवातीला छोटी यंत्रणा संस्थेकडे होती. परंतु व्यवसायवाढीचा निर्णय घेतल्यामुळे नवीन यंत्राच्या खरेदीसाठी संस्थेने नाबार्डकडून ६९ लाख रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जातून संस्थेने इमारत बांधकाम, सुधारित मसाला निर्मिती यंत्रांची  खरेदी केली. आगामी काळात स्वतंत्र गोडाऊन उभे करण्याचा या संस्थेचा मानस आहे. संस्था दर तीन महिन्याला १ लाख ३३ हजार रुपये कर्ज हप्ता भरते. संस्थेने आता नवीन मसाले निर्मितीसाठी यंत्रणा भांडगाव येथील संस्थेच्या इमारतीमध्ये बसविलेल्या आहेत.  गटातील महिला दररोज येथे विविध प्रकारचे मसाले तयार करतात. यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच कांदा, लसूण, मिरची, आले, हळद, धने, हरभरा, उडीद, तांदूळ, मोहरी परिसरातील शेतकऱ्याकडून खरेदी केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर मिळण्यास मदत झाली आहे. काही वेळेस व्यापाऱ्याकडून खरेदी केली जाते.

अंबिका ब्रँडने विक्री संस्थेच्या माध्यमातून ३६ प्रकारच्या मसाल्यांची निर्मिती ः मटण मसाला, चहा मसाला, गरम, कांदा मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, काळा मसाला, गोडा मसाला, कोल्हापुरी मसाला, मच्छी फ्राय मसाला, कच्छी दाबेली, मिसळ मसाला, चाट मसाला, पावभाजी मसाला, सांबर मसाला, चिवडा मसाला, कोकणी, मालवणी, गुजराती गोडा मसाला, पाणीपुरी मसाला, छोले मसाला. हळद पावडर, मिरची पावडर, जिरा पावडर, काळीमिरी पावडर, धना पावडर, हिंग पावडर निर्मिती. विक्रीचे नियोजन पुणे, दौंड येथे मसाला विक्रीसाठी तीन विक्रेत्यांची नेमणूक. राज्यभर मसाला विक्री साखळी उभारण्याचे नियोजन सुरू. प्रतिक्रिया

महिलांना मिळाला रोजगार बचत गटाचे संस्थेत रूपांतर केल्यामुळे आमच्या गटातील दहा महिलांना रोजगार उपलब्ध झाला. महिलांना दर महिन्याला आठ हजार रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. स्वाती चव्हाण, सचिव, अंबिका महिला बचत गट महिला आल्या एकत्र एकत्र आल्यामुळे काय होऊ शकते हे आमच्या संस्थेच्या उदाहरणावरून दिसून येते. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला एकत्र आल्या. त्यामुळे अपेक्षित बदल होऊ शकतो. उज्ज्वला थोरात, अध्यक्ष, जय भवानी महिला बचत गट कुटुंबाला मिळाली आर्थिक साथ मजुरी करण्यापेक्षा आम्ही सर्व महिलांनी प्रक्रिया व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे आज महिलांची संस्था उभी राहिली आहे. संस्थेमुळे सर्व महिलांची कुटुंबे प्रक्रिया उद्योगातील नफ्यावर चालतात. नलिनी गायकवाड, अध्यक्ष, रमाई बचत गट ब्रॅंडमुळे मिळाली ओळख सर्व महिला एकत्र आल्यामुळे संस्था स्थापन करू शकलो. संस्थेच्या माध्यमातून इमारत उभी केली आहे. त्यामुळे मसाला उत्पादन वाढू लागले आहे. यापुढे जाऊन मसाल्याचा ब्रँड तयार केला. शहरात या मसाल्यांना चांगली मागणी आहे. आगामी काळात मसाला उत्पादनामध्ये वाढ करण्याचा आमचा मानस आहे. कमल परदेशी, अध्यक्ष, अंबिका महिला सहकारी संस्था  

संपर्क : कमल परदेशी , ९७६४५५८८७४  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com