प्रयोगशील पाडवी यांनी फुलविली डोंगराळ भागात केळीची बाग

पालघर जिल्ह्यात अतिशय दुर्गम आदिवासी भागात असलेल्या कोरतड येथे विलास पाडवी यांनी केळीची शेती यशस्वी केली आहे. प्रगतीशील शेतीसाठी अत्यंत मर्यादा व प्रतिकूलता अशी इथली स्थिती. अशा या गावात प्रतिकूलता हीच संधी मानून शेतीत नवे प्रयोग करीत राहणारे शेतकरी म्हणून विलास पाडवी यांची अोळख तयार झाली आहे. वयाने साधारण ५१ वर्षांचे असले तरी त्यांचा शेतीतील उत्साह एखाद्या तरुणासारखाच आहे.
 जव्हार-कोरतड भागात विलास पाडवी यांनी केळीचा प्रयोग यशस्वी केला.
जव्हार-कोरतड भागात विलास पाडवी यांनी केळीचा प्रयोग यशस्वी केला.

पालघर जिल्ह्यात अतिशय दुर्गम आदिवासी भागात असलेल्या कोरतड येथे विलास पाडवी यांनी केळीची शेती यशस्वी केली आहे. त्या माध्यमातून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना भागात नव्या पिकांच्या लागवडीसाठी प्रेरणा दिली. सुधारीत तंत्र, कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन घेत त्यांनी शेतीचा विकास साधला आहे. स्थानिक देशी वाणांचे संवर्धन हे आणखी एक शेतीचे वैशिष्ट्य त्यांनी जपले आहे. पालघर जिल्ह्यातील अति दुर्गम तालुका म्हणून जव्हार अोळखला जातो. येथून पश्चिमेला १६ किलोमीटरवर कोरतड हे छोटेसे गाव आहे. इथली शेतीही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.  प्रगतीशील शेतीसाठी अत्यंत मर्यादा व प्रतिकूलता अशी इथली स्थिती. अशा या गावात प्रतिकूलता हीच संधी मानून शेतीत नवे प्रयोग करीत राहणारे शेतकरी म्हणून विलास पाडवी यांची अोळख तयार झाली आहे. वयाने साधारण ५१ वर्षांचे असले तरी त्यांचा शेतीतील उत्साह एखाद्या तरुणासारखाच आहे. त्यांची एकूण पाच एकर शेती असून त्यात ते भात, नागली, वरई, खुरासणी आदी पिके घेतात.पत्नी सौ. लता, हर्षद व सुरज ही मुले, मुलगी कांचन, सून भावना असा त्यांचा परिवार आहे.  

पाडवी यांची शेती पाडवी यांनी १६ वर्षे भारतीय सैन्यदलात नोकरी केली. सन २००० मध्ये पाय फ्रॅक्‍चर झाल्यामुळे ते निवृत्त झाले. मग कोणतीही नोकरी न करता शेतीलाच वाहून घेण्याचे ठरवले. शेती करतानाही भागासाठी नवे तंत्रज्ञान आणून आसपासच्या शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळेल असे प्रयत्न सुरू केले.

मार्गदर्शनातून विविध प्रयोग सन २०१० मध्ये कृषी विज्ञान केंद्र, पालघर (केव्हीके) यांनी कोरतड गाव दत्तक घेतले. गावचे सर्वेक्षण करून शेतीतील समस्यांनुसार आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देण्यास सुरवात केली. पाडवी यांनादेखील प्रयोगशीलतेची आवड होती. साहजिकच भात, नागली, वरई, खुरासणी या पिकांचे आधुनिक लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण त्यांनी केव्हीकेचे तज्ज्ञ भरत कुशारे यांच्याकडून घेण्यास सुरवात केली.

अडचणींवर केली मात

  • जव्हार तालुक्यात तीनहजार मिमी पाऊस पडतो. प्रदेश डोंगराळ असल्याने उन्हाळ्यात पाणी राहात नाही. आसपास जंगल असल्याने वन्यजीव व मोकाट जनावरांचा त्रास असल्याने बागायती शेती करण्यास कोणीही धजावत नव्हते. हा त्रास कमी करण्यासाठी कुंपणच करावे लागते.
  • अडचणींवर मात करताना पाडवी यांनी पाण्याची व्यवस्था होऊ शकेल, अशी तीन एकर अोसाड माळरान जमीन भाडेकरारावर घेतली. त्यातील दगड- गोटे वेचले. झाडेझुडपे, गवत साफ करून घेतले. जमीन नांगरून स्वच्छ करून घेतली. तारेचे कुंपण केले.
  • अर्धा किलोमीटरहून धरणातून पाइपलाइन आणून पाण्याची समस्या सोडवली.
  • केव्हीकेच्या सल्ल्याने माती व पाणी परीक्षण करून घेतले.
  • सुरवातीच्या काळातील व्यवसाय जव्हार भागात शेतीत यांत्रिकीकरण काही वर्षांपूर्वी फार कोणी केले नव्हते. पाडवी यांनी बॅंकेकडून कर्ज घेऊन ट्रॅक्‍टर घेतला. स्वतःच्या शेतात वापरण्याबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांना भाडेतत्वावर देण्याचा व्यवसाय १० वर्षे केला. आज त्यांची प्रेरणा घेऊन परिसरातील अन्य शेतकऱ्यांनी ट्रॅक्‍टरचा वापर सुरू केला आहे. पाडवी यांनी तलाव भाडेतत्वावर (कंत्राटी पद्धत) घेऊन त्यात रोहू, कटला, मृगळ यांचे मत्स्यपालनही सुरू केले. मात्र, मासे चोरून नेण्याचे प्रकार सुरू झाले. त्यात मोठे नुकसान झाले. शेती औजारे तयार करण्याचाही व्यवसाय केला. कंपोस्ट खत बनविले.

    केळी लागवडीतील ठळक बाबी  

  • अतिशय दुर्गम आदिवासी भागासाठी केळीसारखे नवे पीक घेण्याची हिम्मत पाडवी यांनी मेहुणे कृष्णा गवळी यांच्या साथीने दाखवली. विशेषतः भाडेकरारावरील शेतीत त्याचे चांगले व्यवस्थापन केले.  
  • जमीन डोंगराळ आणि हलकी असल्याने सहा बाय सहा फुटावंर खड्डे खोदले. शेणखत व सिंगल सुपर फॉस्फेट वापरून ते भरून घेतले. ठिबक सिंचन केले. मार्च २०१४ मध्ये गुढीपाडव्याला ग्रॅण्डनैन या जातीची उतीसंवर्धित तीनहजार रोपे लावली.
  • विद्राव्य खते देण्याबरोबरच पालापाचोळा आणि केळीचे अवशेष बेडवर टाकून तिथेच कंपोस्ट खत तयार केले जाते. शेणखत किंवा कोंबडी खताचा वापर होतो.
  • हलकी जमीन असल्याने दररोज उन्हाळ्यात चार तास, हिवाळ्यात दीड तास पाणी दिले जाते. प्रति झाड दोन ड्रिपर बसविले आहेत.
  • उत्पादन पहिल्या वर्षी प्रति घड ३० ते ३५ किलो वजन मिळाले. त्या वेळी किलोला ८ रुपये दर मिळाला. दुसऱ्या वर्षी सरासरी ३२ किलो वजन व १० रुपये दर मिळाला. तिसऱ्या वर्षी सरासरी ३० किलो घडाचे वजन व दर १० रुपये मिळाला. जव्हारचे व्यापारी जागेवर येऊन खरेदी करीत असल्याने विक्रीची समस्या आलेली नाही.

    प्रयोगाचा प्रसार   पाडवी यांचा आदर्श घेऊन परिसरातील सुमारे सात आदिवासी शेतकरी केळी लागवडीकडे वळले आहेत. अजूनही शेतकरी लागवडीच्या तयारीत आहेत. पाच बाय चार फूट आणि जोड ओळ पधद्धतीत आठ फूटच अंतर ठेवले तर ठिबक किंवा मायक्रोजेटचा खर्च वाचतो. हवा खेळती राहते आणि उत्पादनही जास्त मिळते असे त्यांना वाटते. त्यादृष्टीने सुधारणा केल्या आहेत. आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे फळपीक मिळवून देण्यासाठी पाडवी यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्यातूनच या शेतकऱ्यांचे आर्थिक, सामाजिक जीवन उंचावण्यास मदत होणार आहे.

    देशी वाणांचे संवर्धन व पुरस्कार पाडवी यांच्याकडे नागलीचे तीन ते चार वाण, खुरासणीचे दोन ते तीन, वरईचे एक ते दोन व भाताचे सात ते आठ देशी वाण आहेत. या सर्व वाणांची सुधारीत लागवड तंत्राने शेती त्यांनी सुरू केली आहे. नाचणीचे पूर्वी एकरी मिळणारे चार क्विंटल उत्पादन आता पाच ते सहा क्विंटलवर पोचले आहे. प्रगतीशील शेतकरी (२०१५) हा कृषी विज्ञान केंद्र, पालघर यांचा पुरस्कार त्यांना मिळाला. त्याचबरोबर नागली पिकाची यशस्वी लागवड आणि उत्पादनासाठी २०१६ मध्ये ‘एल. एम. पटेल फार्मर ऑफ दी इयर’ हा मानाचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. नागली, वरई, खुरासणी या पिकांच्या देशी वाणांचे संवर्धन करण्याविषयीचा कार्यक्रम ‘साम टीव्ही’वरही प्रसारित झाला आहे.

    संपर्क :  विलास पाडवी, ८६९८१५५३१४ (लेखक कृषी विज्ञान केंद्र, पालघर येथे विषय विशेषत्ज्ञ आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com