जमिनीची सुपीकता जपत वाढविले पीक उत्पादन

गादीवाफ्यावर बी टोकणीसाठी एसआरटी साच्याचा वापर व एसआरटी पद्धतीने भात लागवड
गादीवाफ्यावर बी टोकणीसाठी एसआरटी साच्याचा वापर व एसआरटी पद्धतीने भात लागवड

कुडजे (ता. हवेली, जि. पुणे) येथील शुभांगी विनायक जम यांनी पीक उत्पादनवाढीच्या बरोबरीने जमीन सुपीकतेलाही तेवढेच महत्त्व दिले आहे. गेल्या चार वर्षांपासून शुभांगी जम या एसआरटी पद्धतीने भात आणि भाजीपाला पिकांची लागवड करतात. थेट ग्राहकांना तांदूळ, भाजीपाला विक्रीतून त्यांनी नफा वाढविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. पुणे शहरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर कुडजे  हे गाव खडकवासला धरण परिसरात आहे. खरिपात भात हेच मुख्य पीक. पाण्याच्या उपलब्धेतनुसार येथील शेतकरी रब्बी हंगामात पालेभाजी, हरभरा लागवड करतात. शेतीबरोबरीने गावात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. या गावातील प्रयोगशील महिला शेतकरी शुभांगी विनायक जम यांनी गेल्या चार वर्षांपासून पारंपरिक भात लागवडीएेवजी एसआरटी पद्धतीचा अवलंब केला आहे. शुभांगीताईंचे पती विनायक हे पुणे शहरातील कंपनीत नोकरी करतात. त्यामुळे एक एकर शेतीची जबाबदारी शुभांगीताईकडेच आहे.   एसआरटी पद्धतीने भात लागवड शुभांगीताई गेल्या चार वर्षांपासून एसआरटी पद्धतीने पीक लागवड करत आहेत. याबाबत त्या म्हणाल्या, की पूर्वी आम्ही दरवर्षी भात, चवळी, मूग, उडीद अशी पिके घेत होते. २००० मध्ये कूपनलिका घेतल्यामुळे भातानंतर रब्बी आणि उन्हाळी  पिकांच्या लागवडीस सुरवात केली. चार वर्षांपूर्वी गावातील सुदर्शन बचत गटाचे अध्यक्ष विजय पायगुडे यांच्या माध्यमातून एसआरटी पद्धतीने भात लागवडीची माहिती मिळाली. नेरळ (जि. रायगड) येथील चंद्रशेखर भडसावळे यांच्या शेतीवर जाऊन आम्ही भात लागवडीची एसआरटी पद्धत समजाऊन घेतली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार भात शेतीला सुरवात केली. उन्हाळ्यात जमिनीची चांगली मशागत करून एक एकरात दोन ट्रॉली शेणखत मिसळून एक मिटर रुंद आणि सहा इंच उंचीचे गादीवाफे तयार केले. त्यानंतर २५ सें.मी. बाय २५ सें.मी अंतरावर एसआरटी साच्याने गादीवाफ्यावर छिद्रे पाडली. या साच्याने पाच ओळी बसतात. गादीवाफ्यावरील छिद्रामध्ये बुरशीनाशक आणि जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया केलेले बियाणे टोकले. मला इंद्रायणी जातीचे एकरी साडेसहा किलो बियाणे लागले. बी टोकण्यापूर्वी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार तणनाशकाचा वापर करतो. यामुळे उगवलेले गवत आणि अगोदरच्या पिकाची धस्कटे मरणे आणि कुजण्यास मदत होते. बी टोकल्यानंतर संध्याकाळी पाट पाणी देऊन दुसऱ्या दिवशी सकाळी उगवणीपूर्व तणनाशकाची फवारणी करतो. त्यामुळे पुढे तणाचा प्रादुर्भाव होत नाही. उगवणीनंतर २५ दिवसांनी वाफ्यावर युरिया डीएपीच्या ब्रिकेट खोचल्यामुळे योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांची उपलब्धता होते. एकरी साठ किलो ब्रिकेट लागतात. गरजेनुसार पाणी नियोजन आणि गरजेनुसार बेणणी करतो. भात लागवडीमध्ये कीडनियंत्रणासाठी पानावर ट्रायको कार्ड लागतो. शेतात दोन प्रकाश सापळे लावतो. रासायनिक कीडनाशकांच्या एेवजी दर दहा दिवसांनी दशपर्णी अर्काची फवारणी केली जाते. तसेच दर पंधरा दिवसांनी जिवामृत देतो. या पद्धतीने पहिल्या वर्षी भाताचे एकरी १४ क्विंटल उत्पादन मिळाले. दुसऱ्या वर्षी चांगले व्यवस्थापन केले. तसेच हवामान अनुकूल असल्याने आम्हाला ४० क्विंटल उत्पादन मिळाले. गेल्या वर्षी आम्ही सेंद्रिय पद्धतीने भात पिकाचे व्यवस्थापन ठेवले. बायोडायनॅमिक खत लागवडीपूर्वी वाफ्यात मिसळून दिले. तसेच जिवामृत, दशपर्णी अर्काचा जास्तीत जास्त वापर केला, युरिया-डीएपी ब्रिकेटचा वापर केला नाही. यंदा ३५ क्विंटल उत्पादन मिळाले. यंदा २० गुंठे फुले समृद्धी आणि  २० गुंठे इंद्रायणी या भात जातींची लागवड केली आहे.

बाजारपेठेनुसार पीक नियोजन भात कापणीनंतर शुभांगीताई रब्बी हंगामात पाच गुंठ्यांवर भुईमूग, पाच गुंठ्यांवर हरभरा आणि पाच ते दहा गुंठ्यांवर मेथी, कोथिंबीर लागवड करतात. या बाबत शुभांगीताई म्हणाल्या, की गेले तीन वर्षी आम्ही शेती नांगरलेली नाही. भात कापणी करून मुळे वाफ्यातच ठेवतो. तणनाशक मारून गवताचे अवशेष जागेला कुजवतो. गादीवाफ्यावर भुईमुगाच्या पाच आणि हरभऱ्याच्या सहा ओळी बसतात. या बियाण्यांना जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करतो. पिकाच्या गरजेनुसार पाटपाणी दिले जाते. दर पंधरा दिवसांनी जिवामृत  देतो. कीडनियंत्रणासाठी दशपर्णी अर्काची दर दहा दिवसांनी फवारणी करतो. भुईमुगाच्या ओल्या शेंगा पुण्यातील ठरलेल्या विक्रेत्याला देतो. तसेच गावातील शेतकऱ्यांना ५० रुपये किलो या दराने बियाणे विक्री केली जाते. या पिकातून खर्च वजा जाता दहा हजार नफा मिळाला. हरभरा कापून  मुळे तशीच जमिनीत ठेवतो. हरभरा पिकातून आठ हजारांचा नफा मिळाला. मेथी आणि कोथिंबीर विक्रीतून आठ हजारांचा नफा मिळाला. हरभरा आणि भुईमूग पिकाच्या काढणीनंतर जानेवारीत त्याच गादी वाफ्यावर दहा गुंठे क्षेत्रावर भेंडीची लागवड करतो. भेंडी टोकल्यानंतर लगेचच तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार उगवणीपूर्व तणनाशकाची फवारणी करतो. एका वाफ्यावर भेंडीच्या तीन ओळी बसतात. साधारणपणे मार्चमध्ये तोडा सुरू होऊन जूनपर्यंत चालतो. पुण्यातील ठरलेल्या विक्रेत्याला भेंडी विक्री केली जाते. खर्च वजा जाता वीस हजारांचा नफा मिळाला. अशा पद्धतीने मे महिन्यात जमीन न नांगरता फक्त पाट नीट करून गादीवाफ्यावर बायोडायनॅमिक खत पसरतो. तणनाशक फवारून खरिपात भात बियाणे टोकतो. यंदाचे आमचे एसआरटी पद्धतीचे चौथे वर्ष आहे. एसआरटी पद्धतीमुळे जमीन नांगरत नाही. वाफ्यात गांडुळांची संख्या, सेंद्रिय कर्ब वाढला. पीक उत्पादनात चांगली वाढ मिळाली. शेती सुधारणेसाठी उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत भोर, प्रवीण कदम, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रेश्मा शिंदे, कृषी विभागाचे  मंडळ कृषी अधिकारी जनार्धन पवार, कृषी पर्यवेक्षक मनीषा पावडे, कृषी सहायक स्वप्नील भुजबळ यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. खर्च कमी झाला, उत्पन्न वाढले भात पीक उत्पादनाबाबत शुभांगीताई म्हणाल्या, की पारंपरिक पद्धतीने आम्हाला भाताचे एकरी १२ क्विंटल उत्पादन मिळत होते. परंतु एसआरटीचा अवलंब केल्यामुळे उत्पादनात चांगली वाढ झाली. एकरी सरासरी ३० क्विटंल भात उत्पादन मिळते. दरवर्षी मशागत, चिखलणी, भात रोप लावणीचा किमान पंधरा हजाराचा खर्च वाचला. आम्ही पुण्यातील ग्राहकांना थेट पन्नास रुपये किलो दराने तांदळाची विक्री करतो. ठरलेल्या विक्रेत्यांना भेंडी, पालेभाजी, भुईमुगाच्या ओल्या शेंगांची विक्री करतो. त्यामुळे नफ्यात वाढ झाली. दुसऱ्या बाजूला जमिनीची सुपीकता वाढत आहे. नियोजनाची सूत्रे

  • गेली चार वर्षे जमिनीची नांगरट नाही. मशागत खर्च आणि मजुरीत बचत.
  • बायोडायनामिक खत,जिवामृत, दशपर्णी अर्क, प्रकाश सापळ्यांचा वापर.
  • सेंद्रिय शेती योजनेच्या प्रशिक्षणात सहभाग, शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
  • भाताला युरिया- डीएपी ब्रिकेटचा वापर.
  • बाजारपेठेच्या मागणीनुसार पीक लागवडीचे नियोजन.
  • पुण्यातील निवडक व्यापारी, ग्राहकांना भाजीपाला आणि तांदळाची विक्री.
  • महिला बचत गटाची स्थापना, भात प्रक्रिया उद्योगाची तयारी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com