agricultural success story in marathi, loni dist. jalgaon , Agrowon, Maharashtra | Agrowon

दर्जेदार पपई, कलिंगड बनली लोणी गावाची ओळख
चंद्रकांत जाधव
शनिवार, 28 एप्रिल 2018

लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) या गावातील शेतकऱ्यांनी बाजारपेठेची गरज ओळखत कलिंगड, पपई लागवडीवर भर दिला. एकमेकांना सहकार्य करत सुधारित तंत्रातून आर्थिक प्रगतीची दिशा पकडली. राज्य, परराज्यातील व्यापारी कलिंगड, पपईच्या खरेदीसाठी येत असल्याने लोणी गावाने स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे.

लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) या गावातील शेतकऱ्यांनी बाजारपेठेची गरज ओळखत कलिंगड, पपई लागवडीवर भर दिला. एकमेकांना सहकार्य करत सुधारित तंत्रातून आर्थिक प्रगतीची दिशा पकडली. राज्य, परराज्यातील व्यापारी कलिंगड, पपईच्या खरेदीसाठी येत असल्याने लोणी गावाने स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे.

लोणी (जि. जळगाव) हे गाव जळगाव शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील शेतकरी रब्बी हंगामात भुईमूग, हरभरा, गहू आणि इतर पिकांची पारंपरिक पद्धतीने लागवड करत होते. मात्र मागील चार पाच वर्षांपूर्वी बाजारपेठेचा अंदाज घेत शेतकरी कलिंगड, पपई लागवडीकडे वळले.
लोणी गावात दरवर्षी सुमारे ५० हेक्‍टरवर कापसाची पूर्वहंगामी लागवड होते. केळीची मृग आणि कांदे बाग लागवड असते. गावाचे एकूण लागवड क्षेत्र सुमारे ४०० हेक्‍टर आहे. यातील सुमारे १७० हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आहे. या क्षेत्रात केळी, ऊस आणि कापसाची लागवड असायची, परंतु मागील पाच वर्षांत बदल झाले. आता गावातील ८५ हेक्‍टरवर कलिंगड आणि त्यात पपईचे आंतरपीक आहे. पूर्ण क्षेत्रासाठी आच्छादन आणि ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. केळीतही आंतरपीक म्हणून कलिंगड, खरबूज लागवड केली जाते.

वडजी सौंदाणे शिवारातून प्रेरणा
एके दिवशी लोणीमधील शेतकरी मुख्य रस्त्यावर आपापसात शेतीची चर्चा करीत असताना तेथे फैजपूर (जि.जळगाव) येथील व्यापारी दर्जेदार पपई सोबत घेऊन आला. एवढी दर्जेदार पपई कुठून आणली, असे शेतकऱ्यांनी त्यास विचारले असता, त्याने सांगितले की, धुळ्यातील वडजी सौंदाण्यातून ही पपई आणली आहे. आपणही अशी पपई पिकवावी म्हणून लोणी गावातील पांडुरंग पाटील, गोकुळ पाटील, नरेंद्र पाटील, शशिकांत पाटील यांनी पाच वर्षांपूर्वी वडजी सौंदाणे गावातील शेतकऱ्यांना भेट देऊन पपई, कलिंगडाच्या लागवडीचे तंत्र समजून घेतले.

पीक बदलाला झाली सुरवात
लोणी गावातील नरेंद्र पाटील यांनी वडजी सौंदाणेला भेट दिल्याच्या दुसऱ्या वर्षी जानेवारी महिन्यात पन्नास आर क्षेत्रावर कलिंगड आणि त्यामध्ये पपईचे आंतरपीक लागवडीचे नियोजन केले. मात्र बेमोसमी पावसाने कलिंगडाची रोपे खराब झाली,६५ टक्केच रोपे जगली. त्याच क्षेत्रात फेब्रुवारीत पपईची आठ बाय आठ फुटांवर लागवड केली. कलिंगड, पपई विक्रीतून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. २०१५ मध्ये त्यांनी पुन्हा एक हेक्‍टरवर जानेवारीत कलिंगडाची लागवड केली. फेब्रुवारीत त्याच क्षेत्रात पपईचे आंतरपीक घेतले. कलिंगडास सात रुपये प्रतिकिलो दर मिळाला आणि पपईला प्रतिझाड २०० रुपये असा ठोक दर व्यापाऱ्याने दिला. यातून चांगला आर्थिक नफा मिळाला.

पीकपद्धतीचा झाला प्रसार
नरेंद्र पाटील यांना पीक बदलात मिळालेले आर्थिक यश पाहून याच गावातील अभिमन पाटील, गोपाळ पाटील, गोकुळ पाटील, पांडुरंग पाटील, लीलाधर पाटील, भरत पाटील, फजल शेख आदी शेतकऱ्यांनी २०१६ मध्ये सुधारित तंत्राने कलिंगडात पपईची लागवड केली. शेतकऱ्यांना या पिकातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले. मग २०१७ मध्ये सुमारे पंधरा शेतकऱ्यांनी आच्छादनावर कलिंगडात पपईची लागवड केली. त्यांनाही चांगले उत्पन्न मिळाले.

यंदाच्या हंगामात लोणी पंचक्रोशीतील चाळीस शेतकऱ्यांनी कलिंगडात पपईची लागवड केली आहे. सध्याच्या काळात काही शेतकऱ्यांनी कलिंगडाचे तोडे पूर्ण करून त्याचे वेल काढले आहेत. सध्या पपईचे पीक जोमात आहे. अरुण पाटील, चंद्रकांत पाटील, गोरक्षनाथ पाटील, लीलाधर पाटील, किशोर पाटील, नरेंद्र पाटील, गोपाळ पाटील, अभिमन पाटील, फत्तेसिंग चव्हाण, विकास पाटील, दगाजी पाटील, विलास पाटील, मुकेश पाटील, मंगल पाटील, सुरेश धनगर, नसरत शेख, फजल शेख, शिवाजी देशमुख, नारायण पाटील आदी शेतकऱ्यांनी यंदा कलिंगड व पपई असे आंतरपीक नियोजन केले आहे.

गटशेतीतून प्रगती
लोणी गावातील शेतकऱ्यांनी अवजारे बॅंक तयार केल्याने योग्य दरात, योग्य वेळी शेतीसाठी विविध अवजारांची उपलब्धता होते. येथील शेतकऱ्यांनी गटशेतीवर भर दिला आहे. गटातील नरेंद्र पाटील यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण परिषदेत सदस्य म्हणून निवड झाली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे यांनी लोणी गावाला भेट देऊन प्रयोगशील शेतकऱ्यांचे कौतूक केले. ममुराबाद (जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ किरण जाधव यांचेही शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळते. ॲग्रोवनमधील तांत्रिक माहिती तसेच शेतकऱ्यांच्या यशोगाथातील तंत्राचा अवलंब गटातील शेतकरी करतात.

एकीचे बळ मिळते फळ  
लोणी गावामध्ये कलिंगड, भाजीपाला,पपईची लागवड वाढल्याने शेतकरी आच्छादन, बियाणे, रोपे तयार करण्यासाठी आवश्‍यक ट्रे, खते, कीडनाशके निवडक कृषी निविष्ठा विक्रेत्याकडून खरेदी करतात. त्यामुळे कमी दरात चांगल्या गुणवत्तेच्या निविष्ठा मिळतात. लोणी गावात कलिंगड, पपईची लागवड अधिक असल्याने व्यापारी थेट बांधावर फळांची खरेदी करतात. अनेक शेतकऱ्यांच्याबरोबरीने व्यापाऱ्यांनी काही रक्कम देऊन पपई खरेदीचा करार केला आहे. गावात मुंबई, फैजपूर, चोपडा यासह मध्य प्रदेशातील इंदूर, बऱ्हाणपूरचे व्यापारी कलिंगड, पपई खरेदीसाठी येतात.

असे आहे पीक नियोजन

 • डिसेंबरअखेरीस ट्रेमध्ये कलिंगड रोपांची निर्मिती.
 •  गादीवाफा अडीच फूट रुंद आणि सव्वा फूट उंच, दोन गादीवाफ्यावरील लॅटरलमध्ये दहा फूट अंतर.
 • शेतकऱ्यांना गावातील अवजार बॅंकेतून वाफा तयार करणाऱ्याचे बैलजोडीचलीत रिजर आणि प्लॅस्टिक आच्छादनाला छिद्रे पाडण्याचे अवजार नाममात्र शुल्कावर भाड्याने मिळते.
 • गादीवाफ्यामध्ये शिफारशीत मात्रेत शेणखत, निंबोळी पेंड, रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळली जातात.
 • गादीवाफ्यावर एक लॅटरल टाकून प्लॅस्टिक आच्छादन करून छिद्रे पाडली जातात. १५ जानेवारीला गादीवाफ्यावर कलिंगड रोपांची दोन ओळीत सव्वा फूट, रोपात दीड फूट अंतराने लागवड.
 • फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पपई रोपांची दहा फूट बाय सहा फूट अंतराने लागवड.
 • एक एकरात पपईची सुमारे ८०० रोपे तर कलिंगडाची साडेपाच हजार रोपांची लागवड.
 • शिफारशीनुसार खत व्यवस्थापन, कीडनाशके, चिकट सापळ्यांचा वापर.
 • लागवडीनंतर ७५ ते ८५ व्या दिवसापासून कलिंगड तर पपईचे उत्पादन सातव्या महिन्यांत सुरू.
 • सर्व शेतकरी आच्छादनाचा वापर करतात. त्यामुळे तण नियंत्रण होते. पाणी कमी लागते. आच्छादनामुळे कलिंगडाचे तोडे १० ते १५ दिवस लवकर सुरू झाल्यामुळे बाजारपेठेत चांगला दर.
 • कलिंगडाचे एकरी २० टन उत्पादन. यंदा जागेवरच कलिंगडाला प्रति किलो पाच ते सहा रुपये दर. करार शेतीच्या माध्यमातून पपई प्रतिझाड २७० रुपये असा व्यापाऱ्यांच्याकडून दर निश्चित. पपईच्या एका झाडाला  ४० ते ६० किलो फळांचे उत्पादन. खर्च वजा जाता एकरी सरासरी दीड ते दोन लाखांचा निव्वळ नफा.

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....
दीड हजार कोटींचा दुसरा हप्ता...मुंबई  ः गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या...
राज्यात गारठा पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह येऊ...
पंतप्रधान मोदी आज करणार महिला बचत...यवतमाळ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता...
पदव्युत्तर कृषी अभ्यासक्रमात पुढील...नागपूर ः कृषी अभ्यासक्रमात आजची परिस्थिती आणि...
दुष्काळात पीकविम्याचा आधारमुंबई ः यंदाच्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...
पाकच्या मुस्क्या आवळणार; विशेष राष्ट्र...नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ...
चीनमधील शेतीची विस्मयकारक प्रगतीविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताला स्वातंत्र्य...
सेस, सेवाशुल्क आणि संभ्रमप्रक्रियायुक्त शेतमाल, फळे-भाजीपाला आणि शेवटी...
कृषी पथदर्शक राज्य साकारण्याची संधी :...पुणे : “शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्र...
डिजिटल परवान्यासाठी लढा देणार : राजू...पुणे : कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाकडून...