ऊस, मिरची शेतीला पूरक व्यवसायांचा मोठा आधार

ऊस, मिरची शेतीला पूरक व्यवसायांचा मोठा आधार
ऊस, मिरची शेतीला पूरक व्यवसायांचा मोठा आधार

सात एकर उसाव्यतिरिक्त साधारण दहा गुंठ्यांत मिरची पिकात ठेवलेले सातत्य, विक्रीची अलीकडेच बदललेली पद्धत, देशी शेळी, कोंबडीपालनाची जोड व दुग्ध व्यवसाय अशी शेतीपद्धतीची रचना मोतीराम धोडमिसे या तरुणाने ठेवली आहे. दोन भाऊ व वडील यांची आपापली जबाबदारी व श्रम वाटून घेत वर्षाच्या अर्थकारणाचा लेखाजोखा चांगला ठेवला आहे.

सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्‍यातील कोरवलीपासून अवघ्या चार-पाच किलोमीटरवर हराळवाडी ही छोटीसी वाडी आहे. पाण्याचा कायमचा स्रोत उपलब्ध नाही. नाही म्हणायला कॅनाॅलचा काहीसा आधार होतो. पण बोअर हाच सिंचनाचा मुख्य स्रोत आहे. या गावासाठी बाजारपेठेचे मुख्य सोलापूर ठिकाण सुमारे २५ ते ३० किलोमीटरवर आहे. या भागात उसासह फळे, फुले, भाजीपाल्याचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. ते थेट सोलापूरला पाठवले जाते.

उच्चशिक्षित मोतीरामची शेती हराळवाडीतील मोतीराम धोडमिसे एम.ए. बी.एड. पर्यंत शिकले आहेत. नोकरीचे प्रयत्न त्याने केले. मात्र ‘डोनेशन’ची तयारी नसल्याने त्यातून काही हाती लागले नाही. वडील व मोठा भाऊ काशिनाथ दोघे शेती करीतच होते. एक भाऊ बाबासाहेब शिक्षक आहे. मग घरच्यांना शेतीतच मदत करायला सुरवात केली. घरची नऊ एकर शेती आहे. त्यात सात एकर क्षेत्र उसाचेच आहे. एकत्रित कुटुंब हीच धोडमिसे यांनी मुख्य ताकद आहे. त्यामुळे शेतीचा विस्तार करणे असो, की जबाबदाऱ्या वाटून घेणे असो त्यांना ते त्यामुळेच शक्य झाले.

शेतीचा विकास मोतीराम यांनी शेतीत लक्ष घातल्यानंतर प्रयोगांत आणखीन भर पडली. शेतीसह दुग्ध व्यवसाय, गावरान शेळी व कोंबडीपालन या घरच्या आधीच्या व्यवसायांतही त्यांनी भर घालण्यास सुरवात केली. पाण्याची उपलब्धता आणि उपलब्ध क्षेत्र लक्षात घेऊन सुमारे तीन वर्षांपूर्वी हिरव्या मिरचीची शेती सुरू केली. दरवर्षी जूनमध्ये १० ते ११ गुंठ्यांतील या शेतीत सातत्य ठेवले आहे. त्याचबरोबर काही क्षेत्र जनावरांच्या चाऱ्यासाठी राखून ठेवले आहे.

हंगाम बदलला जूनमध्ये लागवड केलेल्या मिरचीपेक्षा डिसेंबरमध्ये लागवड केलेल्या मिरचीला अधिक दर मिळतो हे मोतीराम यांनी अभ्यासले. त्यानुसार लागवडीचा हंगाम यंदा बदलला. त्यानुसार यंदा जानेवारीमध्ये त उत्पादनाला सुरवात झाली. आतापर्यंत मार्च-एप्रिलपर्यंत उत्पादन सुरूच आहे. आतापर्यंत एकूण कालसावधीत साधारण चार टन उत्पादन मिळाले आहे. अजून एक तोडा उत्पादन हाती लागेल असे मोतीराम यांना वाटते.

विक्री पद्धतीतही बदल मोतीराम यांनी हंगामनिहाय बदलणाऱ्या दरांचा जसा अभ्यास केला तसा विक्री पद्धतीचाही केला. थेट बाजार समितीत मालाची विक्री केली तर तिथली आडत, हमाली आणि वाहतुकीचे भाडे यांचा विचार करता हाती काय राहणार असा सवाल होता. त्याऐवजी विक्रीची दिशा बदलली. शहरातील भाजी मंडई तसेच विजापूर रस्ता, स्टेशन रस्त्यावर किरकोळ व्यापाऱ्यांनाच मिरचीची विक्री करण्याचे ठरवले. आणि हा निर्णय पुढे योग्यच ठरला.

असे झाले फायदे

  • एकतर जूनमधील हंगामात किलोला १५, २० ते २५ रुपये मिळणारा दर यंदाच्या उन्हाळ्यात ४० व कमाल ५० रुपयांपर्यंत गेला होता.
  • त्यातच किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री सुरू केल्याने जिथे किलोला ३५ रुपये मिळणार होते तिथे ४२ ते ४३ रुपये हाती पडले. म्हणजे किलोमागे सात ते आठ रुपये जास्त मिळू लागले.
  • सकाळी तोडणी केलेला ताजा माल दुपारी या व्यापाऱ्यांना मिळू लागल्याने त्यांनीही चांगला दर देण्याची तयारी दर्शविली.
  • दरवर्षी खरिपातील मिरचीचे साधारण दोन ते तीन टन उत्पादन मिळते. यंदा या हंगामात ते किमान चार टनांपर्यंत पोचले आहे.
  • उत्पादनात सातत्य ठेवताना दोन-तीन वर्षांतील मिरचीचा नफा-तोटा लक्षात आला आहे.
  • विक्रीतील कष्ट दररोज सुमारे एक क्विंटल मालाची काढणी करायची. मोटारसायकलवर दोन्ही बाजूंना क्रेट्स किंवा पोते बांधून ती मिरची शहरात आणायची. त्यासाठी दोन खेपा रोज करायच्या. असे कष्ट उचलावे लागत आहेत. मात्र मिळणाऱ्या फायद्यामुळे कष्टाचे समाधानही मोतीराम यांना मिळते आहे.

    पूरक व्यवसायांनी पेलला आर्थिक भार शेतीला जोड म्हणून योगेश यांनी तीन पूरक उद्योग सुरू केले आहेत. दुग्ध व्यवसाय करताना पाच म्हशी, चार रेड्या आहेत. दिवसाला साधारण सात ते आठ लिटर दूध मिळते. गवळ्याला त्याची ३५ रुपये प्रति लिटर दराने विक्री होते. त्यातून आठवड्याला सुमारे १८०० रुपये मिळतात. त्याशिवाय २५ गावरान शेळ्या आहेत. साधारण पंधरा महिन्यांचा हिशेब केला, तर त्या कालावधीत शेळ्या दोन वेळा वितात. या काळातील साधारण ३० ते ३५ शेळ्यांची विक्री करणे शक्य होते. साधारण तीन हजार ते साडेतीन हजार रुपये दर त्यासाठी मिळतो. त्या विक्रीतूनही वर्षाला सुमारे ७५ हजार ते सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न हाती येते. तशीच बाब दोनशे ते अडीचशे गावरान कोंबड्यांबाबतही सांगता येते. मादी प्रति नग ३०० रुपये, तर नर साधारण ४०० रुपये दराने विकला जातो. दररोज १० ते १५ अंड्यांची विक्री होते.

    विक्रीची जबाबदारी मिरची किंवा कोणतेही पीक असो वा जनावरे, पक्षी असोत त्यांच्या विक्रीची जबाबदारी मोतीराम यांच्यावर असते. पंचक्रोशीतील तीन बाजारांत शेळ्या नेऊन विकल्या जातात. काही व्यापारी व ग्राहकही घरापर्यंत येतात. पूरक व्यवसायातील उत्पन्नाने खर्चाचा मोठा भार पेलला असल्याचे मोतीराम यांनी सांगितले.

    संपर्क ः मोतीराम धोडमिसे- ९९२२९९९११०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com