स्वयंपूर्ण, कमी खर्चिक दर्जेदार नैसर्गिक शेती

भात, पेरु अाणि सफरचंदाची लागवड.
भात, पेरु अाणि सफरचंदाची लागवड.

पुणे जिल्ह्यातील वेळू येथील गुलाब घुले यांनी आपली तीन एकर शेती नैसर्गिक तंत्राच्या वापरातून समृद्ध करण्यास सुरवात केली आहे. ‘ए ग्रेड’चे किंवा अत्यंत दर्जेदार उत्पादन ही त्यांची खासियत आहे. विविध भाजीपाला, फळफळावळ, देशी दूध, भात शेती अशी विविधता जपत कुटुंबाच्या बहुतांश गरजा त्यातून पूर्ण करीत त्यांनी शेती स्वयंपूर्ण केली आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या वेळू येथे गुलाब महादेव घुले यांची तीन एकर शेती आहे. पूर्वी ते रासायनिक पद्धतीने शेती करायचे. त्यात खर्चही भरपूर व्हायचा. जमिनीचा पोतही खराब होत चालला होता. शेतीचे अर्थशास्त्रही जुळत नव्हते. अशातच ॲग्रोवनमध्ये नैसर्गिक शेतीच्या तंत्राविषयी त्यांना माहिती झाली. त्यांनी त्यासंबंधीच्या शिबिरात भाग घेतला. मग सुरू झाले नैसर्गिक शेतीचे प्रयोग.

नैसर्गिक शेतीची वाटचाल

घुले यांची नैसर्गिक शेतीतील वाटचाल या दोन वर्षांतीलच आहे. मात्र शेतीतील खर्च सुमारे ५० ते ६० टक्क्याने कमी केल्याचे समाधान त्यांना आत्तापासूनच मिळायला सुरवात झाली आहे.

शेतीची रचना व पीकपद्धती

  • २० गुंठे भात, हरभरा, २० गुंठ्यात मिश्र भाजीपाला, दहा गुंठ्याचे शेततळे, तीस गुंठ्यात पेरू, अंजीर, शेवगा.
  • १० गुंठे शेडनेट
  • उर्वरित ३० गुंठ्यात घर, रस्ता, चारा पिके
  • नैसर्गिक तंत्राचे प्रयोग शेडनेट

  • दहा गुंठ्यात शेडनेटमध्ये सुमारे सात टन काकडीचे उत्पादन घेतले. त्यातून सुमारे ७५ हजार ते त्याहून अधिक नफा मिळाला. त्यानंतर शेडनेटमध्ये सिमला मिरची घेतली. मात्र चांगला दर न मिळाल्याने दर्जेदार उत्पादन घेऊनही ७० हजार रुपयांच्या उत्पन्नावर समाधान मानावे लागले.
  • आज शेडनेटमध्ये दहा गुंठ्यात शेवंती आहे. फुलांची प्रत चांगली असल्याने व्यापाऱ्यांकडून जागेवरच प्रतिकिलो ५० रुपयांपर्यंत दर मिळतो.
  • भाजीपाला शेती

  • भाजीपाला शेतीत मिश्रपीक पद्धतीचा वापर. पट्टा पद्धतीने लागवड. सरीवर फळभाज्या. टोमॅटो, वांगी, फ्लाॅवर, कोबी, मुळा, कारली, दोडका, घोसवळे, काकडी, मिरची, कांदा, लसूण अशी फळभाज्यांची तर पालेभाज्यांत मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक, चाकवत, करडई अशी विविधता.
  • आठवडी बाजारात विक्रीसाठी या भाजीपाल्याला मागणी
  • फळबागेचे नंदनवन

  • आंब्याची २०, रायपूर आणि ललित गोल गुलाबी पेरूची १००, नारळाची २२, अंजिराची ३०, शेवगा २०, सफरचंद तीन, अॅपल बेर ११, रामफळ सात, जांभूळ सात आणि चिकूची दोन अशी झाडे आहेत. --पेरू आणि अंजीर पिकात बन्सी गहू घेतला आहे.
  • शेवगा, नारळ आणि अशोकाची ‘कुंपण पीक’ म्हणून लागवड
  • ठळक वैशिष्ट्ये

  • काडी कचरा वा पीकअवशेषांचे मल्चिंग. जनावरांचे शिल्लक राहणारे खाद्य कडबा कुट्टी यंत्राद्वारे बारीक करून त्याचा काकडी आणि सिमला मिरचीच्या मल्चिंगसाठी वापर.
  • कंपोस्ट मिळालेच शिवाय पाण्याचे बाष्पीभवनही कमी झाले.
  • शंभर टक्के क्षेत्रावर जिवामृताचा फवारणी व ड्रेंचिगद्वारे वापर. यासाठी दर महिन्याला गूळ आणण्यासाठी २५० रुपये खर्च. बेसनपीठ, शेण, गोमूत्र घरचेच वापरले जाते.
  • किडी नियंत्रणासाठी दशपर्णी अर्काचा वापर, रोगनियंत्रणासाठी ताकाची फवारणी.
  • मक्याची पक्षथांबा म्हणून व सापळा पीक म्हणून वापर.
  • गेल्या दोन वर्षांत रासायनिक निविष्ठांचा शून्य वापर.
  • भात, गहू, हरभरा बियाणे घरीच तयार करतात. केवळ भाजीपाल्याचे बियाणे विकत आणावे लागते.
  • मिश्र व आंतरपीक पद्धतीचा वापर.
  • शेती स्वयंपूर्ण झाली.
  • आई सौ. लीलाबाई, पत्नी सौ. शिवगंगा, सासुबाई वत्साबाई चव्हाण यांची मोठी मदत.
  • पाण्याचे महत्त्व जाणले

    काकडीला एप्रिल, मेमध्ये टॅंकरने पाणी द्यावे लागले. दहा हजार लिटरच्या टॅंकरला ९०० रुपये मोजावे लागले. यातून पाण्याचे महत्त्व कळाले. काकडीतील एक लाख रुपये उत्पन्नातून शेततळ्याचे नियोजन केले. मागेल त्याला शेततळे़ या योजनेतून ५० लाख लिटर क्षमतेचे शेततळे बांधले. बोअरवेल्सही आहेत.

    शेततळ्यात मत्स्यपालन यंदा जूनमध्ये शेततळ्यामध्ये राहू, कटला, मृगळ या जातींचे चार हजार मासे सोडण्यात आले. माशांचे खाद्य महाग असल्याने घरच्या घरीच मक्याचा रवा काढून त्यात जनावरांचे खाद्य असलेली पेंड त्यात मिसळून गोळे तयार केले जातात. तळ्याच्या चारही कोपऱ्यांंत हे गोळे टाकण्यात येतात. पुढील सात- आठ महिन्यांनी उत्पादन सुरू होईल.

    देशी गायींचा वापर एक गीर गाय, वासरू आणि खिलार गाय अशी तीन जनावरे आहेत. त्यांच्यापासून गोमूत्र व शेण मिळते. घरच्यापुरते व वासरांसाठी दूध राखीव ठेवून उर्वरित रतीबाला दिले जाते. त्यास प्रतिलिटर ८० रुपये दर मिळतो. तूपही तयार केले जाते. त्यास प्रती किलो २५०० रुपये दर मिळतो. शिवार फेरीला आलेले शेतकरी तूप खरेदी करतात.

    कृषी पर्यटन व भाजीपाला ‘मार्केटिंग’ घुले यांच्याकडे शिवारफेरीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी व शहरी नागरीकही येतात. त्यामुळे पुढील काळात कृषी पर्यटन करण्याचे नियोजन आहे. मुलगा कला पदवीचे शिक्षण घेत असून शेती व कृषी पर्यटनाकडेच त्याचा कल आहे. नैसर्गिक मालाला सध्या म्हणावा तसा दर मिळत नसल्याने निवासी सोसायट्यांमध्ये थेट विक्रीसाठी भर देणार आहे.

    सफरचंद व दर्जेदार गुणवत्ता घुले यांनी पुरंदर भागातून सफरचंदाचे रोप आणले. त्याचे कलम केले. त्याची तीन झाडे आहेत. जीवामृत व पाण्याचे नियोजन केल्यानंतर फळे येण्यास सुरवात झाल्याचे ते म्हणाले. नैसर्गिक घटकांच्या वापरामुळे दुधी भोपळा, दोडका तीन फुटांपर्यंत वाढला. शेवग्याची शेंग साडेचार फुटांपर्यंत लांब झाली. चिकू अडीचशे ग्रॅम वजनापर्यंत मिळतो. पेरूचा आकार आणि चव चांगली असल्याने प्रतिकिलो ७० ते ८० रुपये दर मिळतो. अंजीर आणि नारळही भरपूर येतात.

    गुलाब घुले- ८६२५८५५६२२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com