‘झोडगे फार्म’ जांभळांचा बाजारपेठेत हुकमी ब्रॅंड

झाडांना लगडलेली दर्जेदार जांभळे व मच्छिंद्र झोडगे
झाडांना लगडलेली दर्जेदार जांभळे व मच्छिंद्र झोडगे

जांभूळ हे पीक हवामानाला संवेदनशील आहे. त्याची गुणवत्ता कायम टिकून राहावी यासाठी लागवडीपासून ते काढणी, पॅकिंगपर्यंत काटेकोर व्यवस्थापनही करावे लागते. पाबळ (जि. पुणे) येथील मच्छिंद्र झाेडगे यांनी ही सर्व पथ्यं पाळून दाेन एकरांतील कोकण बहाडोली जांभळाच्या सुमारे १५० झाडांचे संगोपन तेरा वर्षांपासून केले आहे. स्वतःचा ब्रॅंड तयार करून सर्व जांभळांचे पॅकिंग करून त्याला मुंबईची हुकमी बाजारपेठ तयार करण्यातही ते यशस्वी झाले आहेत.

पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथे झाेडगे कुटुंबाची संयुक्त सहा ते सात एकर शेती आहे. त्यात दोन एकरांत जांभूळ हे महत्त्वाचे पीक आहे. एकत्रित कुटुंबात वडीलधाऱ्या पिढीत दत्तात्रेय, सोनबा, तानाजी या बंधूंचा समावेश होतो. आज त्यांची मुले मच्छिंद्र (दत्तात्रेय यांचा मुलगा) आपले चुलतबंधू सुखदेव यांच्यासोबत शेतीचे व्यवस्थापन पाहतात. अन्य चुलते व चुलतबंधू विक्री व मार्केटिंगची जबाबदारी सांभाळतात.

आंब्याएेवजी जांभळाचा सल्ला मच्छिंद्र सांगतात, की आमच्या कुटुंबाने पूर्वी आंबा लागवडीचा निर्णय घेतला हाेता. मात्र जांभळाचा प्रयोग करून पाहण्याचा सल्ला तारापूरस्थित मामी ॲड. सुनीता दिलीप भुजबळ यांनी दिला. त्यांच्या भागात जांभळाच्या बऱ्याच बागा आहेत. जांभळाला मागणी आणि दर चांगला असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार अर्थकारण अभ्यासून हा प्रयोग करण्याचे नक्की केले. त्यादृष्टीने पावले उचलली.

उत्पादन

  • हंगामाच्या सुरवातीला १०० ते २०० किलाे माल दरराेज निघताे. १५ ते २५ जूनच्या दरम्यान सर्व झाडे उत्पादन देऊ लागल्याने मालाची रोजची उपलब्धता २५०, ३०० ते काही वेळा कमाल ४०० किलाेपर्यंत
  • एकरी सात ते साडेसात टन उत्पादन
  • प्रतवारी, विक्री

  • झाेडगे कुटुंबातील एक सदस्य मुंबई - वाशी बाजार समितीत नोकरीस असल्याने ते विक्रीचे व्यवस्थापन पाहतात.
  • जांभळांची काढणी अत्यंत नाजूकपणे करावी लागते. तेवढ्याच काळजीपूर्वक प्रतवारी होते.
  • त्यानंतर एक किलाे बॉक्स पॅकिंग केले जाते. साधारण बारा बॉक्सचा क्रेट असतो.
  • दर कमाल दर किलोला २०० रुपयांपर्यंत, तर एरवी हेच दर ५०, १०० ते १५० रुपये असेही मिळतात. पूर्वी जांभळाचे दर चांगले होते. अलीकडे जांभळाची लागवड सर्वत्र वाढत असल्याने आवक वाढली आहे, त्यामुळे दर काहीसे कमी मिळत असल्याचे निरीक्षण मच्छिंद्र नोंदवतात. एकूण चोख बाग व्यवस्थापन करून दर्जेदार फळे पिकवली जातात. त्याचा झोडगे फार्म असा ब्रॅंड तयार केला आहे. त्यातून जांभळांना बाजारपेठेत अोळख तयार केल्याचे मच्छिंद्र सांगतात.

    खर्च व उत्पन्न हंगाम संपल्यावर जुलैमध्ये नांगरणी, शेणखत, रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा, मजुरी हाच खर्च ६५ हजार रुपयांवर जातो. शिवाय १० हजार बॉक्स खरेदी ७० हजार रुपये, पॅकिंग मटेरिअल १५ हजार रुपये, वाशी मार्केटचा दरराेजचा वाहतूक खर्च प्रतिट्रिप सव्वातीन हजार रुपयांप्रमाणे होतो. साधारण दोन एकर बागेतून सात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. खर्च साधारण चार लाख रुपयांपर्यंत असतो.

    मजूरबळावर अधिक खर्च मच्छिंद्र म्हणतात की एकूण उत्पादन खर्चात दहा टक्के खर्च मजूरबळावर होतो. लागवडीच्या वर्षभरातील कामांत मजूरबळ लागतेच. शिवाय, काढणी व पॅकिंगसाठी दररोज १० ते १५ मजुरांची गरज भासते.   हवामानाला संवेदनशील पीक खरे तर जांभळाच्या पिकाला पाणी, निविष्ठा कमी लागतात असे म्हटले जाते. मात्र ते तितकेसे खरे नाही. मच्छिंद्र आपला अनुभव सांगतात, की हे झाड हवामानाला अतिशय संवदेनशील आहे. अवकाळी पावसादरम्यान हाेणाऱ्या वादळामध्ये झाडे पडतात. माेहर, फळे गळतात. यामध्ये माेठे नुकसान दरवर्षी हाेऊ शकते. अगदी दाेन टनांपर्यंत फळगळीचा धोका उद्‍भवू शकतो. ज्या वर्षी वादळी पाऊस कमी हाेताे. त्या वर्षीचे नुकसान कमी असते. पाणीही हवे पुरेसे या झाडाला पाण्याचीही पुरेशी गरज असते. बहरात उन्हाळ्यात दर पाचव्या दिवशी आम्ही पाणी देतो. ते कमी पडल्यास फळांची गुणवत्ता घसरते. त्याचा दराला फटका बसतो.

    जांभूळबागेचे व्यवस्थापन

  • दापोली येथील कृषी विद्यापीठाशी संबंधित पालघर केंद्रातून राेपे आणली
  • दोन एकरांत २० बाय २० फुटांवर लागवड.
  • सध्या सुमारे १५० झाडे उत्पादनक्षम.
  • लागवडीनंतर तीन वर्षे मिरची, कांदा, भाजीपाला आदी आंतरपिके घेतली. सुमारे सात वर्षांनंतर उत्पादनाला सुरवात. खऱ्या अर्थाने नवव्या वर्षापासून चांगले उत्पादन.
  • फळहंगाम संपल्यानंतर ट्रॅक्टरने बाग नागंरणी. फळांची गुणवत्ता जपण्यासाठी शेणखत आवश्यक. प्रतिझाड ५० किलोप्रमाणे शेणखत  दरवर्षी. आता झाडाच्या वयानुसार प्रमाण १०० किलोवर नेणार. निंबोळी पेंड व रासायनिक खते असतातच. आॅक्टाेबर - नाेव्हेेंबरमध्ये झाडांना आळी करून, ठिबक आणि पाटाने पाणी.
  • जानेवारी ते फेब्रुवारी माेहर
  • संपूर्ण बहरादरम्यान बुरशीनाशक, कीटकनाशक आणि संजीवकांच्या मिळून एकूण पाच ते सहा फवारण्या
  • जूनमध्ये फळहंगाम, तो ३० दिवस चालतो.
  • पॅकिंग हवे मजबूत पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये खालून व वरून पेपर घालून जांभळे अलगद ठेवावी लागतात. जांभळांची टिकवक्षमता कमी असल्याने, तसेच साल अत्यंत मऊ असल्याने पॅकिंग व वाहतूक या दोन बाबी जपणे गरजेचे असते. त्यासाठी झोडगे स्वतंत्र मालवाहू गाडीने मुंबईला माल पाठवतात.

    संपर्क : मच्छिंद्र झाेडगे, ९९७०२४५११४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com