स्वयंचलित यंत्रणेतून पाणी, खत अन् मजुरीची झाली बचत

केळी बागेला पाणी आणि खत व्यवस्थापनासाठी स्वयंचलित यंत्रणेमुळे दर्जेदार घडनिर्मिती होते.
केळी बागेला पाणी आणि खत व्यवस्थापनासाठी स्वयंचलित यंत्रणेमुळे दर्जेदार घडनिर्मिती होते.

पणज (जि.अकोला) येथील विकास विजयराव देशमुख या युवा शेतकऱ्याने केळी बागेत स्वयंचलीत यंत्रणा बसविली आहे. यामुळे पाणी, खत आणि मजुरीमध्ये चांगली बचत झाली. योग्य व्यवस्थापनातून केळीचे दर्जेदार उत्पादन मिळविण्याचे त्यांचे नियोजन आहे. शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर, आच्छादन, जैविक कुंपण, सौर ऊर्जेचा वापर आणि शेतमाल हाताळणी, साठवणुकीसाठी पॅक हाऊसची त्यांनी उभारणी केली आहे. केळी हे हमखास उत्पन्न देणारे पीक. अलीकडे केळी उत्पादन खर्चात वाढ झाल्याने उत्पन्नाचा अाकडा कमी झाला. यातूनच शेतकरी खर्च कमी करण्यासाठी अाधुनिक तंत्राचा वापर करीत आहेत. यापैकीच एक आहेत पणज (ता. अकोट, जि.अकोला) येथील विकास विजयराव देशमुख हे युवा शेतकरी. देशमुख यांची वडिलोपार्जित २३ एकर शेती आहे. यामध्ये दहा एकरात बीटी कपाशी, सहा एकरांत केळी आणि दहा एकरांमध्ये हरभरा लागवड असते. संपूर्ण शेती ठिबक सिंचनाखाली आणली आहे. पाणी पुरवठ्यासाठी एक विहीर आणि तीन कूपनलिका आहेत. कपाशीचे एकरी १० क्विंटल, हरभऱ्याचे एकरी १३ क्विंटल उत्पादन मिळते. यंदाच्या वर्षी पहिल्यांदा त्यांनी चार एकरांत हळद लागवडीचे नियोजन केले आहे. दहा एकरांत बारा वर्षे जुनी आंबा कलमे आहेत. या बागेत केसर, दशहरा, लंगडा, पायरी या जातींची लागवड आहे. बागेला केवळ सेंद्रीय खतांचा वापर केला जातो. देशमुख यांच्याकडे सहा गीर गाई आणि दोन बैल जोड्या आहेत. त्यामुळे शेतीला पुरेसे शेणखत उपलब्ध होते.

अकोला जिल्ह्यातील पणज हा भाग केळी पिकासाठी चांगला समजला जातो. मागील वर्षापासून या भागातील केळी पहिल्यांदा इराण, इराक देशात निर्यात झाली. निर्यातीमधील संधी लक्षात घेऊन विकास देशमुख यांनी निर्यातक्षम केळी उत्पादनावर भर दिला. देशमुख कुटुंब एक दशकापेक्षा अधिक काळापासून केळी लागवड करत आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने देशमुख यांनी पाणी आणि खत मात्रेचा सुयोग्य वापर करण्यासाठी स्वयंचलीत यंत्रणा बसविली.

केळीची होणार निर्यात देशमुख यांच्या बागेतील केळी येत्या काही दिवसांत काढणीला येत अाहे. निर्यातदारांनी या बागेची पाहणी करून शेवटच्या टप्प्यातील व्यवस्थापनाच्या दृष्टीने काही सूचना केल्या. जूनमध्ये ही केळी व्यापाऱ्यांच्यामार्फत इराण, इराक या देशांत निर्यात होतील.याबाबत तसा करार झालेला अाहे. कापणीच्यावेळी बाजारात जो दर असेल त्यापेक्षा किमान क्विंटलला ३०० रुपये अधिक दर मिळणार असल्याचे विकास देशमुख यांनी सांगितले.

मजुरांना वर्षभर रोजगार शेतीतील कामांसाठी या सातपुड्यातील अादिवासी वीस वर्षांपासून देशमुख कुटुंबाकडे कामाला अाहेत. अाता हे मजूर स्वतःच्या शेतात राबावेत, अशा पद्धतीने नियोजन करून आमच्या शेतीची कामे सांभाळत असल्याचे विकास यांनी सांगितले.   सुधारीत तंत्राने केळी बागेचे व्यवस्थापन  केळी लागवड आणि व्यवस्थापनाबाबत विकास देशमुख म्हणाले की, मे महिन्यात सहा एकर क्षेत्राची योग्य मशागत केळी रोपांच्या लागवडीसाठी सहा फुटावर तीन फूट रूंद आणि सव्वा फूट उंचीचा गादीवाफा तयार केला. गादी वाफा तयार करताना त्यामध्ये एकरी १० ट्रॉली शेणखत आणि माती परीक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा मिसळून दिली. २३, जुलै २०१७ मध्ये गादी वाफ्यावर दोन रोपात पाच फुटाचे अंतर ठेऊन लागवड केली. उतीसंवर्धित रोपांची निवड केली आहे. केळी बागेला पाणी आणि खतांच्या योग्य मात्रेत पुरवठ्यासाठी स्वयंचलित यंत्रणा बसविली. योग्य व्यवस्थापनामुळे  झाडांची उंची १५ फुटांपर्यंत झाली. झाडाचा बुंधा ४२ सेटींमीटरपर्यंत झाला आहे. बागेतील सर्व झाडे एकसमान वाढलेली आहेत. आजपर्यंत आम्हाला २५ ते ३५ किलोपर्यंत केळीची रास मिळायची. सुधारीत व्यवस्थापन तंत्रामुळे या बागेतून अधिक वजनाची रास मिळेल अशी आशा वाटते. येत्या काही दिवसांत बाग कापणीला येत आहे. स्वयंचलित यंत्रणा ठरली फायदेशीर स्वयंचलित यंत्रणेमुळे देशमुख यांना पाणी आणि खत नियोजनात चांगली बचत करता अाली.  हंगामनिहाय पिकाच्या गरजेनुसार पाणी देण्यात येते. पीक वाढीच्या गरजेनुसार शिफारशीत मात्रेमध्येच अन्नद्रव्ये दिली जातात. योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये मिळाल्याने झाडाची चांगली वाढ होते. या यंत्रणेमुळे पाण्यामध्ये २५ टक्के, खतांमध्ये ४० टक्के आणि मजुरीमध्ये ५० टक्के बचत झाली आहे. सहा एकरासाठी केवळ दोन मजूर पुरेसे ठरतात. भारनियमनाच्या काळात होणारा खोळंबाही थांबला आहे. वीज अाली की ही यंत्रणा अापोअाप कार्यान्वीत होते. सजीव कुंपण, आच्छादनावर भर   पणज भागात तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. अशा रणरणत्या उन्हापासून केळी पीक वाचवण्यासाठी देशमुख यांनी बागेचे चांगले व्यवस्थापन ठेवले आहे. बागेच्या चारही बाजूंना शेवरीचे नैसर्गिक कुंपण केले असल्यामुळे गरम वारा बागेत शिरत नाही. बागेत चारही बाजूंनी दोन अोळीपर्यंत केळीच्या कापलेल्या पानांचे आच्छादन केले आहे. यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहिला आहे. सौर ऊर्जेचा वापर  देशमुख यांनी गेल्या हंगामात ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौरपंप बसविला.यासाठी ४३ हजार रुपयांचा शेतकरी हिस्सा भरावा लागला. या पंपाची व्यवस्था झाल्याने अाता भारनियमन हा प्रश्न निकाली निघाला आहे. पॅकहाउसची उभारणी देशमुख यांनी कृषी विभागाच्या अर्थसाह्याने शेतामध्ये एक सुसज्ज पॅकहाउस उभारले. यामुळे शेतमालाची प्रतवारी साठवण करणे सोपे आणि सुरक्षित झाले. याचबरोबरीने देशमुख शेतामध्ये निविष्ठा, साहित्यांच्या साठवणुकीची तसेच कामाला असलेल्या मजुरांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे.

संपर्क : विकास देशमुख, ९९२२६२०३४७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com